ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली ... एक वाटचाल.....

ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली ... एक वाटचाल.....

(स्वप्न दुर्गभ्रमणाचे आव्हान क्षितिजाचे)


महाविद्यालयात असताना चार डोकी एकत्र येतात, डोंगर भटकंती सुरु होते आणि त्यालाच ट्रेकींग ग्रुपचे स्वरूप मिळते अशीच काहीशी आपल्या संस्थांची कूळकथा असते. डोंबिवलीतील अशाच तेरा जणांना प्रमोद जोशीसरांनी गडकिल्ल्यांची ओळख करुन दिली आणि त्यातूनच 'स्वप्न दुर्गभ्रमंतीचे आव्हान क्षितिजाचे' असे ध्येय बाळगून २००१ साली क्षितिज ग्रुपची स्थापना झाली. ट्रेक क्षितिज संस्था एक सार्वजनिक विश्वस्त संस्था (NGO) आहे. (नोंदणी क्रमांक :- महा/९८/०६/ ठाणे)

* इंटरनेट युगातील या तरुणांनी केवळ भटकंती न करता गडकिल्ल्यांच्या नोंदी करायला सुरुवात केली. त्यादेखील वेबसाईटच्या माध्यमातून. त्यामुळेच २००१ साली www.trekshitiz.com (ट्रेकक्षितिज.कॉम) ही किल्ल्यांची मराठीतून माहिती देणारी पहिली वेबसाईट सुरु झाली. आज या वेबसाईटवर तब्बल ३५० किल्ल्यांची मराठीतून, ३०५ किल्ल्यांची इंग्रजीतून माहिती असून, सुमारे दहा हजार छायाचित्रे, १२० संगणकीय नकाशे उपलब्ध आहेत. डोंगरभटक्यांना एकत्र आणणारे विविध फोरम, अनेक संस्थांची माहिती, डोंगर गावांच्या गाड्यांचे वेळापत्रक असे अनेक गोष्टींचे भांडार या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहे. गेल्या १७ वर्षात ही वेबसाईट तब्बल दोन करोड लोकांनी पाहीली आहे. २००५ साली ट्रेक क्षितिजच्या वेब साईटला उत्कृष्ट मराठी वेब साईट म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विकास परिषदेचे तिसरे पारितोषिक मिळालेले आहे.



* गड किल्ल्यांची माहिती आणि त्याबाबत जागरुकता समाजात निर्माण व्हावी या दृष्टीने संस्थेने शिवोत्सव कार्यक्रम सुरू केला. इसवीसन २००३, २००४, २००६, २०१०, २०१२, २०१९ या वर्षांमध्ये शिवोत्सवचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात शस्त्रात्रांचे प्रदर्शन, रेखाचित्रांचे प्रदर्शन, व्याख्याने असे स्तुत्य उपक्रम त्यात होते. २००६ साली दहा महत्त्वांच्या किल्ल्यांचे फायबर मॉडेल्सचे प्रदर्शन भरवून डोंबिवलीत शिवसृष्टीच निर्माण केली होती.

* २००५ साली सुधागड या पालीजवळील किल्ल्यावरील कामाने, या भटकंतीला गडसंवर्धनाची जोड मिळाली. संस्थेने गेल्या १२ वर्षात सुधागडवर अनेक उपक्रमांचा धडाकाच लावला आहे. महादरवाजातील माती सफाई, वीरगळ सफाई, नियमित वृक्षारोपण, संवर्धन, नियमित टाके सफाई या उपक्रमांतून सुधागडवर संस्थेच्या कार्यकर्त्यांचा कायम राबता असतो. केवळ गडावरच नाही तर पायथ्याच्या पाच्छापूर गावातील शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात. शाळेत चालू केलेल्या वाचनालयात २००० पुस्तके आहेत. दरवर्षी १४ आणि १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम आणि स्पर्धा घेतल्या जातात. त्याच बरोबर वैद्यकीय तपासणी शिबिर, तज्ञांचे मार्गदर्शन, स्लाईड शो असे उपक्रम राबवले जातात. अनेक देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून आजपर्यंत शाळेतील ९ वी आणि १० वीच्या मुलांना शालेय पुस्तके, वह्या, शाळेसाठी कॉम्प्युटर, टेबल, कपाट, बेंचेस, शाळेचे फ़्लोरींग इत्यादी गोष्टी देण्यात आल्या.

* ट्रेकक्षितिजने आजवर गडकिल्ल्यांचे दोनशेहून अधिक स्लाईड शोज केले आहेत, तर दरवर्षी डोंबिवलीत होणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेदरम्यान छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. गड किल्ले, इतिहास, शस्त्रास्त्रे, मंदिरे यांची रेखाचित्रे, छायाचित्रे यांचा योग्य वापर करून आठ वर्षे संस्थेमार्फत दिनदर्शिका देखील काढल्या जात होत्या.

* २०१२ पासून ट्रेक क्षितिज संस्था डोंबिवली ठाकुर्ली परिसरात दिवाळीत किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करते. त्यापूर्वी किल्ले बांधणीसाठी शिबिर घेउन मुलांमधे आणि पालकांमधे किल्ल्यांबद्दल तसेच पर्यावरणाबद्दल जा्गृती निर्माण करण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात केवळ किल्ले बांधणीच्या कौशल्यातच वाढ न होता पर्यावरण आणि परिसराची स्वच्छता याबद्दल स्पर्धक सगज झालेले आढळून आले आहे.

* २०१४ साली झालेल्या तेराव्या गिरिमित्र संमेलनात गिर्यारोहण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल ट्रेकक्षितिज संस्थेचा "गिरिमित्र गिर्यारोहण संस्था सन्मान" हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

* २०१८ पासून ट्रेक क्षितिज संस्थेने ३ दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यास सुरुवात केलेली आहे. इतिहास, निसर्ग इत्यादी विषयातील तज्ञांची व्याख्याने डोंबिवलीकरांसाठी विनामुल्य आयोजित केली जातात.

* सह्याद्रीच्या पट्ट्यात ३०० पेक्षा जास्त किल्ले आहेत. निसर्ग आणि मानवाकडुन होणारा त्याचा ऱ्हास आपण रोखु शकत नाही. पण आज अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांचे, वास्तुंचे जर आपण डॉक्युमेंटेशन केले तर पुढच्या पिढीसाठी तो एक अमुल्य ठेवा होईल. या भावनेतून ट्रेक क्षितिज संस्थेने "नकाशातून दुर्गभ्रमंती" हे १२५ किल्ल्यांच्या अद्ययावत नकाशांचे पुस्तक तयार केले. या पुस्तकाला "२०१४ साली पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.ह.आपटे पुरस्कार" मिळाला.

* २०१९ मध्ये नकाशातून दुर्गभ्रमंती या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती "Forts through Maps" प्रकाशित कराण्यात आली. या पुस्तकात १५० किल्ल्यांचे अद्ययावत नकाशे आहेत.

* २०१९ साली स्वराज्य सोशल वेल्फ़ेअर ऑर्गनायझेशन तर्फ़े दिला जाणारा "स्वराज्य भूषण पुरस्कार", दुर्ग संवर्धन, दुर्गभ्रमण आणि निसर्ग संवर्धन यातील योगदाना बद्दल ट्रेकक्षितिज संस्थेला देऊन गौरव करण्यात आला.

* दुर्गांबद्दल जनजागृती व्हावी यासाठी ट्रेक क्षितिज संस्थेतर्फ़े दर महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी/ रविवारी दुर्गभ्रमणाच्या पदभ्रमण मोहिमा (ट्रेक्स) नेल्या जातात. डोंबिवली ते डोंबिवली असलेल्या या दुर्गभ्रमण मोहिमांदरम्यान किल्ल्यांची व त्याच्या इतिहासाची संपूर्ण माहिती दिली जाते. वर्षातून काही ट्रेक्स इतिहासतज्ञ, निसर्गतज्ञ यांच्या बरोबर नेले जातात. जेणे करुन त्या विषयाची माहिती आणि तज्ञांशी संवाद साधण्याची संधी ट्रेकर्सना उपलब्ध होते.

महाविद्यालयात सुरू झालेले ट्रेकींग ग्रुप चार पाच वर्षे एकत्र राहतात आणि थांबतात असे काहीसे चित्र असण्याच्या आताच्या काळात क्षितिजमधील जून्या - नव्या फळीने संस्थेची वाटचाल जोमाने पुढे सुरू ठेवली आहे.