Forum Home Forum Home > Information Section > कविता संग्रह
  New Posts New Posts RSS Feed - पोवाडा
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


पोवाडा

 Post Reply Post Reply
Author
Message
AARTI View Drop Down
Senior Member
Senior Member


Joined: 30 Apr 2014
Location: PUNE
Status: Offline
Points: 105
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote AARTI Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: पोवाडा
    Posted: 19 Jul 2014 at 1:35pm
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥
लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥
पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्‍न सांपडलें ॥
हातापायांचीं नखं बोटं शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यांनीं कमळा लाजिवलें ॥
वरखालीं टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले ॥
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौंसी उंच मान माघें मांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लडीं गुंतविलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवले । म्हणोन बोबडें बोले ॥
सरळ नीट नाक विशाळ डोळ्या शोभलें । विषादें मृग वनीं गेले ॥
नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले । ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥
आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें ॥
जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले । धाकटया बाळा लेविवलें ॥
किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडलें । कलाबतुचे गोंडे शोभले ॥
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुंगरुं खुळखुळे ॥
मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवीले ॥
मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडले । चिन्ह पाळणीं दिसलें ॥
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हलवूं लागले ॥
धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केलें । गातों गीत तिनें केलें ॥

जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊं ।
चला वेरुळास जाऊं, दौलताबादा पाहूं ॥
मूळ बाबाजीस ध्याऊं, कीर्ति आनंदाने गाऊं ।
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥
पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास देऊं, छंदाजोगा गिती गाऊं ॥

मालोजी राजा । तुझा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
विचारी पक्का । जाधवा धक्का ॥

शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ।
द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥
देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्धि । गुणानें निधि ॥
लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
सांगोनी गेला । गादी बा तुला ॥

उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होता बाणीचा ॥
खोटया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥१॥

वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥
उभयतांचें एक चित्त तालमींत गेले । फरीगदग्या शिकले ॥
आवडीनें खमठोकीं कुस्ती पेंचानें खेळे । पवित्रे दस्तीचे केले ॥
द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें । घोडी फिरवूं लागले ॥
आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले । गोळी निशान साधले ॥
कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकविलें ॥
अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले । माते कौतुक वाटलें ॥
नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीनें घेतले ॥
छाती कोट करुन सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेनें फसविले ॥
चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडलें । हीत उपदेशा योजिलें ॥
मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षछायीं बसीवलें ॥
पूर्वजांचे स्मरण करुन त्यास न्याहाळीलें । नेत्रीं पाणी टपटपलें ॥
या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगतें मुळीं कसें झालें ॥
क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरलें । क्षेत्रीं सुखी राहिले ॥
अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले । होते लपून राहिले ॥
पाठीं शत्रु भौती झाडी किती उपासी मेले । गोमासा भाजून धाले ॥
पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥
लेखणीचा धड शीपाया सैनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥
बेफाम क्षत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें ॥
सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥
मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥
ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥

महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥
देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें । सर्वांस त्यांहीं पिडीलें ॥
शुद्र म्हणती तुझ्या हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥
गाणें गातें ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले । बोलीं नाहीं मन धालें ।

क्षेत्र क्षत्रियांचें घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार,
आल्या गेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरुवर ॥
परीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार,
सुगंधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर,
क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।
दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथें फार, विधवा झाल्या घरोघर ।
उपाय नाहीं लाचार, स्त्रिया वंदी पाटावर ॥ दुसरा झाला शीरजोर, परशा तोबा कठोर ।
मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भये कांप थरथर ।
दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापर, बाकी राहि मांगमाहार ।
निःक्षेत्रीं झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले सिंधुनदावर, स्वार्‍या केल्या वारोंवार ।
गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर ।

काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥
बामना बोडी । इंद्रियें तोडी ॥
पिंडीस फोडी । देवळें पाडी ॥
चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥
गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥
खंडयास ताडी । जेजूरी गडी ॥
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥
गडास वेढी । लावली शीडी ॥
हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देवळें फोडी । बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी ॥
बुरखा सोडी । पत्‍नीस पीडी ॥
गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥

माताबोध मनीं हसतां राग आला यवनांचा ।
बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा ।
स्नेह येशजी कंकाचा ॥ मित्रा आधीं ठेवी जमाव केला मावळ्यांचा ।
पूर करी हत्यारांचा ॥ मोठया युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा ।
रोविला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला उंच डोंगराचा ।
भ्याला मनीं विजापुरचा । दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।
दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥२॥

जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास । चाकरी ठेवी लोकांस ॥
थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिङ्‌र्गोजीस ॥
थोडया लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास ॥
सुप्यासोबत हातीं घेतलें तीनशें घोडयास । करामत केली रात्रीस ॥
मुसलमानां लाच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिलें त्यास ॥
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास । कैद पाहा केलें सर्वांस ॥
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥
वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥
राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास । बाकी चार किल्ल्यांस ॥
मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥
सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापूरास । मुलान्या सुभेदारास ॥
विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥
करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद तुम्ही करा शहाजीस ॥
भोजनाचें निमित्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास । खुशी मग झाली यवनास ॥
चिरेबंदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास । ठेविलें भोक वार्‍यास ॥
शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बातमीस ॥
पिताभक्ति मनीं लागला लागला शरण जायास । विचारी आपला स्त्रियेस ॥
साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडीं दुसमानास ॥
स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥
चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस । सोडवा माझ्या पित्यास ॥
मोलग थैली गेली थेट मुसलमानास ठेविले किल्ल्यावर त्यास ॥
बाजी शामराज का लाजला जात सांगायास । धरुं पाही शिवाजीस ॥
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥
सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळें केलें महाडास ॥
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥
करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास ॥
वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस । दुसरे वासोटा किल्ल्यास ॥
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥
आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलांस ॥
रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास । पाठवी गडी लुटीस ॥
आडमाग करी हळूंच गेला नगरास । लुटी हत्तीघोडयांस ॥
उंच वस्त्रे, रत्‍नें होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरि ठेवि बारगिरांस ॥
समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥
आबझूलखान शूर पठाण आला वांईस । शोभला मोठा फौजेस ॥
हातीं बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारुगोळीस ॥
कारकुनाला वचनीं दिलें हिवरें बक्षीस । फितविलें लोभी ब्राह्मणांस ॥
गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥
मातेपायीं डोई ठेवी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेतास ॥
समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस ॥
वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥
पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥
हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥
स्वामीभक्ती धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस ॥
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥

नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥
उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥
चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास । दुसर्‍या सरंजामास ॥
अलंकार वस्त्रें देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥
वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुर्‍या गोपीनाथास ॥
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥

शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥
क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥
मातेपायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा ।
आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥३॥

लढे रांगणीं विशाळगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥
स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास ॥
खंडणी घेत गेला भिडला विजापूरास । परत मग आला गडास ॥
राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥
सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥
वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केलें महाग दाण्यास ॥
त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिले गडीं फौजेस ॥
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥
कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥
फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥
सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस ॥
वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥
सिद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ॥
सिद्धया पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥
तों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥
सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुर्‍यास । स्वार दळ लावी पाठीस ॥
चढत होता खिंड शिवाजी गांठलें त्यास । बंदुका लावी छातीस ॥
बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥
स्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥
दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥
अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥

तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनीं हाच ध्यास ॥
बार गडीं ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥
सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥
विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ॥
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥
दळव्यासीं लडून घेई शृंगारपुरास । मारलें पाळेगारांस ॥
लोकप्रीतिकरितां करी गुरु रामदासास । राजगडीं स्थापी देवीस ॥
मिष्ट अन्न भोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ॥
तानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥

जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाही हिंमानी ॥
सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥
छोटे भाइकूं कैद हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥
छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥
मजला भाई भगा दिया । आराकानमें मारा गया ॥
सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥
भाईबंदकूं इजा दिया । रयत सब ताराज किया ॥
मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥
आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥
आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥
बरे हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नामी ॥

आदी आंत न । सर्वां कारण ॥
जन्ममरण । घाली वैरण ॥
तोच तारण । तोच मारण ॥
सर्व जपून । करी चाळण ॥
नित्य पाळण । लावी वळण ॥
भूतीं पाहून । मनीं ध्याईन ॥
नांव देऊन । जगजीवन ॥
सम होऊन । करा शोधन ॥
सार घेऊन । तोडा बंधन ॥

सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाईराचा ॥
सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥४॥

सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥
बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास । शिवाजी करी तयारीस ॥
त्वरा करुन गेला छापा घाली मुधोळांस । मारिलें बाजी घोरपडयास ॥
भाऊबंद मारिलें बाकी शिपाई लोकांस । घेतलें बाप सूडास ॥
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्च्युग्यास ॥
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिलें नव्या जाहाजास ॥
जळीं सैनापती केले ज्यास भीती पोर्च्युग्यीस । शोभला हुद्दा भंडार्‍यास ॥
विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणलें एकीस ॥
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥
शाहाजीचे सद्‌गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वर्गी सुखास ॥
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥
विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यास ॥
सर्व प्रांतीं लूट धुमाळी आणिलें जेरीस । घावरें केलें सर्वांस ॥
संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥
चाकणास जाऊन दावी भय फिङ्‌र्गोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ॥
अखेर दारु घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥
वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश । शाइस्ता पठाण पाठीस ॥
मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥
लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥
प्रातःकाळीं संतोषानें खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥
फिङर्गोजीला भेट देती खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वांस ॥
शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥
फिड्‌र्गोजीचें नांव घेतां मनीं होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥
येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥
पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेटाजीस ॥
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥
जिजाबाईचें मुळचें घर होतें पुण्यास । खान राही तेथें वस्तीस ॥
मराठयांस चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥
लग्नवर्‍हाडी रुपें केला पुण्यांत प्रवेश । मावळे सोबत पंचवीस ॥
माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळालें घरांत स्त्रीयांस ॥
शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास । लागला खालीं जायास ॥
शिवाजीनें जलदी गांठून वार केला त्यास । तोडीलें एका बोटास ॥
स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस । भित्रा जपला जिवास ॥
आपल्या पाठिस देणें उणें शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजडयास ॥
सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥
डौलानें मोंगल भौती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केलें माजमास ॥
राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्च्यूग्यास ॥
सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस ॥
मध्यरात्रीं घेई बरोबर थोडया स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥
यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥
घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास ॥
पती कैलासा गेले कळलें जिजीबाईस । पार मग नाहीं दुःखास ॥
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस । घेई पुढे शिवाजीस ॥

अतीरुपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥
सवतीवर लोटती बाळा । डाग लाविला कुणबी कुळा ॥
सवतीला कसें तरी टाळा । कज्जा काढला पती मोकळा ॥
खर्‍या केंसानें कापि का गळा । नादीं लागला शब्द कोकिळा ॥
मूख दुर्बळ राही वेगळा । अती पिकला चिंतेचा मळ ॥
झाला शाहाजी होता सोहळा । मनीं भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेती जपमाळा । जाती देऊळा दाविती मोळा ॥
थाट चकपाक नाटकशाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा । विषचुंबनीं देती गरळा ॥
झाला संसारीं अती घोटाळा । करी कंटाळा आठी कपाळा ॥
मनीं भिऊन पित्याच्या कुळा । पळ काढला गेले मातुळा ॥
छातीवर ठेवल्या शिळा । नाहीं रुचला सवत सोहळा ॥

कमानीवर । लावले तीर ॥
नेत्रकटार । मारी कठोर ॥
सवदागर । प्रीत व्यापार ॥
लावला घोर । सांगतें सार ॥
शिपाई शूर । जुना चाकर ॥
मोडक्या धीर । राखी नगर ॥
आमदानगर विजापूरकर ॥ मंत्री मुरार ॥
घेई विचार ॥ वेळनसार ।
देई उत्तर ॥ धूर्त चतुर ।
लढला फार ॥ छाती करार ॥
करी फीतूर ॥ गुणगंभीर ।
लाविला नीर ॥ होता लायक ।
पुंडनायक ॥ स्वामीसेवक ।
खरा भाविक ॥

सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा । बजावला धर्म पुत्राचा ॥
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । शत्रु होता आळसाचा ॥
दुःखामधीं सुरु बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥५॥

सर्व तयारी केली राजपद जोडी नांवास । शिक्का सुरु मोर्तबास ॥
अमदानगरीं नटून पस्त केलें पेठेस । भौतीं औरंगाबादेस ॥
विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपट्टीस ॥
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥
जळीं फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥
माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥
जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥
पायवाटेनें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखीं जायास ॥
मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥
औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास । दुसरे दिलीरखानास ॥
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस ।
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥
बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥
हेटकरी मावळे शिपाइ होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥
चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्लया माचीस ॥
बुर्जाखालीं गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीलें फार मोगलास ॥
मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धीस । काबीज केलें माचीस ॥
यशस्वी भोसले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥
हेटकर्‍यांचा थाट नी मारी लुटार्‍यास । मोगल हटले नेटास ॥
बाजी मावळ्यां जमवी हातीं घेई खांडयास । भिडून मारी मोगलास ॥
मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पाहा भ्याले उंद्रास ॥
लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास । जाऊन भिडला मावळ्यास ॥
बाजी मार देई पठाण खचले हिमतीस । हटती पाहून मर्दास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला तीर कमानीस ॥
नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस । पाडिला गबरु धरणीस ॥
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस । सरले बालेकिल्ल्यास ॥
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस । धमकी देती मावळ्यास ॥
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस । पळवी इशानी कोणास ॥
वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस । वरती चढवी तोफांस ॥
चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥
हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥
मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस । घेती यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास । पाठवि थैली शिवाजीस ॥
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ॥
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविले जवळ पुत्रास ॥
दरबार्‍यां घरीं जाई देई रत्‍न भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥
दुखणें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गूल पाहा औरंगजीबास ॥
आराम करुन दावी शुरु दानधर्मास । देई खाने फकीरास ॥
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥
दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥
औरंगजीबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया दिमाखास ॥
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥
जलदी करीती चाकर नेती टोकरास । करामत केली रात्रीस ॥
दिल्ली बाहेर गेले खुलें केले शिवाजीस । नेली युक्ती सिद्धीस ॥
मोगल सकाळीं विचकी दांत खाई होटांस । लावी पाठी माजमास ॥

औरंगजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥
मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥
रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥
माते चरणीं लागला । हळूच फोडी शत्रूला ॥
स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥

हैद्राबादकर । विजापूरकर ॥
कापे थरथर । देती कारभार ॥
भरी कचेरी । बसे विचारी ॥
कायदे करी । निट लष्करी ॥

शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा । पवाडा गाती शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥६॥

शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ॥
तान्हाजीनें भाऊ धाकटा सोबत घेतला । मावळी हजार फौजेला ॥
सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला । योजिलें दोर शिडीला ॥
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळुच वर चढवीला ॥
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला । करी तयार लोकांला ॥
थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥
रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥
धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधू सूडाला ॥
उदेबान मारिला बाकिच्या राजपुत्राला । घेतलें सिंहगडाला ॥
गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झालें दुःख शिवाजीला ॥
सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला । रुप्याचीं कडीं मावळ्याला ॥
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ॥ पिडा जंजिरी सिद्दयाला ॥
सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधीं अनेक स्त्रीयाला ॥
सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला ॥
सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरु केलें चौथाईला ॥
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठया फौजेला ॥
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला । धिंगाणा दक्षिणेंत केला ॥
गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला । मोरोबा पठाण पंक्तीला ॥
लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥
तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला । आळसानें ढिला पडला ॥
गुजर संधी पाहून परत मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥
बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीं गणती शिपायांला ॥
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला । पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला । खिदाडी औरंगाबादेला ॥

रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरेला । गोडबोल्या गोवी ममतेला ॥
एकसारखें औषधपाणी देई सर्वांला । निवडलें नाहीं शत्रुला ॥
जखमा बर्‍या होतां खुलासा सर्वांचा केला । राहिले ठेवी चाकरीला शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला ।
शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।
हाजरी देती शिवाजीला ॥ पोर्च्युग्यास धमकी देई मागे खंडणीला ।
बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला ।
बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला ।
दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला ।
मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला ।
गोवळकुंडीं उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकीं धरी निजामाला ।
सुखें मग रायगडीं गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला ।
लुटलें हुबळी शहराला ॥ समुद्रकांठीं गावें लुटी घेई जाहाजांला ।
केलें खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडाला ।
आणिक चार किल्ल्यांला ॥

हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥
द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥
शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥
केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥
आर्जव करणें शिकला । भोंदिलें सैनापतीला ॥
निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥
रागाऊन लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥
गुजर मनांत लाजला । निघून वराडांत गेला ॥

आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥
फौज घेऊन । आला निघून ॥
रावा प्रताप । झाला संताप ॥
आला घाईनें । गांठी बेतानें ॥
घुसे स्वतानें । लढे त्वेषानें ॥
घेई घालून । गेला मरुन ॥

प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥
तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥
अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला । हल्ला शत्रूवर केला ॥
गुजर दल मागें फिरुन मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥
शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ॥
हंबिरराव पद जोडलें त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥
सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥
प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारुडयाचा ॥
लुटारु शिवाजी सुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारुगोळीचा ॥
बहुरुपी सोंग तूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥७॥

विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायाला । शिवाजी कोकणांत गेला ॥
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला ।
गोवळकुंडीं जाई मागुन घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥
करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥
लोभीं व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेनें फिरवी पगडीला ॥
बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला । बिर्‍हाडीं रागाऊन गेला ॥
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ॥
दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला । करनाटकीं मुख्य केला ॥
हंबीरराव सेनापती हाताखालीं दिला । निघाला परत मुलखाला ॥
वाटेमधी लढून घेई बिलरी किल्ल्याला । तेथें ठेवी सुमंताला ॥
शिवाजीचे मागें व्यंकोजीने छापा घातला । घेतलें स्वतां अपेशाला ॥
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला । शिवाजी रायगडीं गेला ॥
विजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीं सोडला ॥
मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळीवला । सोडिलें नाहीं पिराला ॥
वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला । घाबरा अतिशय केला ॥
भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूं लागला ॥
दुसरी फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें तोंड दिलें तिजला ॥
काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला । धूळ नाहीं दिसली शत्रूला ॥
फौजसुद्धां पोंहचला पटा किल्ल्याला । फसिवलें आयदि मोगलाला ॥
विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥
हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥
नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । त्यांनीं मार्ग अडीवला ॥
विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥
शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥
जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला । लाविला नीट मार्गाला ॥
तह करुन शिवाजी नेती विजापुरला । यवन घेती मसलतीला ॥
शिवाजीचें सोंवळें रुचले नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥
निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्यासी बनला ॥
शिवाजीने पत्र लिहिलें बधुं व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥
वीरपुत्र म्हणवितां गोसावीअ कसे बनलां । हिरा कां भ्याला कसाला ॥
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावांचून काटला ॥
कनिष्ठ बंधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । तुम्ही कां मजवर रुसला ॥
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधतोर्‍याला ॥
मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला । संभाळा मुळ आब्रूला ॥
कीर्ति तुझी ऐकूं यावी ध्यास माझ्या मनाला । नित्य जपतों या जपाला ।
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला । सोडा मनच्या आढीला ॥
सुभोधाचें पत्र ऐकता शुद्धीवर आला । व्यंकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला । रोगानें अती जेर केला ॥
त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःखाला ॥
यवनीं बिरास भिडतां नाहीं कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥
सतत सहा दिवस सोसी ताप दाहाला । नाहीं जरा बरळला ॥
सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला । एकटा पुढें आपण झाला ॥
काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला । पडले सुख यवनाला ॥
कुळवाडी मनीं खचले करती शोकाला । रडून गाती गुणांला ॥

महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ॥
मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥
सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाहीं पाउसाला ॥
डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥
लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥
लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥
वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥
चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥
लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥
राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥
कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥
युक्‍तीनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥
चोरघस्ती घेईअ किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥
पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ॥
युद्धीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ।
आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षां चपळाईची ॥
सुरेख ठेवण चेहर्‍याची । कोंदली मुद्रा गुणरत्‍नाची ॥

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥

इंग्लीश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥
जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा ॥
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥

शाहीर - महात्मा ज्योतिबा फुले

Edited by AARTI - 21 Jul 2014 at 4:36pm
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.898 seconds.