Forum Home Forum Home > Information Section > कविता संग्रह
  New Posts New Posts RSS Feed - पानपतचा फटका
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


पानपतचा फटका

 Post Reply Post Reply
Author
Message Reverse Sort Order
saurabhshetye View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 15 Nov 2013
Location: Mumbai
Status: Offline
Points: 159
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote saurabhshetye Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: पानपतचा फटका
    Posted: 27 Sep 2014 at 9:51pm
कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥धृ॥

जासुद आला कधी पुण्याला – “शिंदा दत्ताजी पडला;
कुतुबशहाने शिर चरणाने उडवुनि तो अपमानियला ।”
भारतवीरा वृत्त ऐकता कोप अनावर येत महा
रागे भाऊ बोले, “जाऊ हिंदुस्थाना, नीट पहा.
‘काळा’शी घनयुद्ध करू मग अबदल्लीची काय कथा ?
दत्ताजीचा सूड न घेता जन्म आमुचा खरा वृथा.”
बोले नाना, “ युक्ती नाना करुनी यवना ठार करा;
शिंद्यांचा अपमान नसे हा; असे मराठ्यां बोल खरा.”
उदगीरचा वीर निघाला; घाला हिंदुस्थानाला;
जमाव झाला; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
तीन लक्ष दळ भय कराया यवनाधीशा चालतसे;
वृद्ध बाल ते केवळ उरले तरुण निघाले वीररसे.
होळकराचे भाले साचे, जनकोजीचे वीर गडी,
गायकवाडी वीर आघाडी एकावरती एक कडी.
समशेराची समशेर न ती म्यानामध्ये धीर धरी;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.
निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.
मेहेंदळे अति जळे अंतरी विंचुकरही त्याचपरी;
नारोशंकर, सखाराम हरि, सूड घ्यावया असी घरी.
अन्य वीर ते किती निघाले गणना त्यांची कशी करा ?
जितका हिंदू तितका जाई धीर उरेना जरा नरां.
भाऊ सेनापती चालती विश्वासाते घेति सवे,
सूड ! सूड !! मनि सूड दिसे त्या सूडासाठी जाति जवे.
वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे दृढस्तंभ ते निघति असे.
वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥1॥

जमले यापरि पानपतावरि-राष्ट्रसभा जणु दुसरि दिसे;
वीर वीरमदयुक्त सभासद सेनानायक प्रतिनिधिसे.
अध्यक्ष नेमिले दक्ष भाउ अरि भक्ष कराया तक्षकसे;
प्रतिपक्षखंडना स्वमतमंडना; तंबू ठोकिति मंडपसे.
शस्त्रशब्द ही सुरस भाषणे सभेत करिती आवेशे;
रणभूमीचा कागद पसरुनि ठराव लिहिती रक्तरसे.
एका कार्या जमति सभा या, कृति दोघांची भिन्न किती !
बघता नयनी बाहतीलची पूर अश्रूंचे स्वैरगति.
पूर्ववीरबल करांत राहे, आहे सांप्रत मुखामधी;
हाय ! तयांचे वंशज साचे असुनी झाले असे कधी !
जमले यापरि पानपतावरि भारतसुंदरीपुत्र गुणी
युद्ध कराया, रिपु शिक्षाया, संरक्षाया यशा रणी ॥2॥
 
अडदांड यवन रणमंडपि जमले; युद्धकांड येथोनि सुरू.
करिती निश्चय उभयवीर रणधीर “मारु वा रणी मरू.”
पुढे पडे दुष्काळ चमूंमधि अन्न न खाया वीरांना;
म्हणती, “अन्नावांचुनि मरण्यापेक्षा जाऊ चला रणा.”
मग सेनेने एक दिलाने निश्चय केला लढण्याचा;
स्वस्थ होळकर मात्र नीचतर पगडभाई तो यवनांचा.
परधान्यहरणमिष करुनि रणांगणि पढले आधी बुंदेले;
श्रीशिवराया युद्ध पहाया हाक द्यावया की गेले ?
धन्य मराठे! धन्य यवन ते रणांगणामधि लढणारे !
आम्ही त्यांचे वंशज केवळ हक्कांसाठी रडणारे
आवेश प्रवेशे दोन्ही सैन्यामधे कराया युद्धखळी;
परि स्वार्थ अनिवार मार दे, आर्यजनांमधि करि दुफळी.
आर्यजनांचे दैवहि नाचे अभिमानाचे रूप धरी;
करि वसति मनि सदाशिवाच्या; होय अमुच्या उरा सुरी.
सुरासुरी जणु डाव मांडिला बुद्धिबळाचा भूमिवरी;
परि दुर्दैवे वेळ साधिली आली अम्हावरी !
कलह माजला, झालि यादवी, नविन संकट ओढवले;
कारस्थानी हिंदुस्थाना व्यापुनि पूर्णचि नागविले.
कुणि यवनांचा बाप जाहला, ताप तयाचा हरावया,
नया सोडुनी जया दवडुनी कुणी लाविला डाग वया.
कुणि दिल्लीची वाहि काळजी, कोणी तख्तासाठि झुरे;
कुणा लागला ध्यास प्रीतिाचा विचार सारासारि नुरे.
“लालन लालन !” करि कुणि, साधी मर्जीनेची कुणि मरजी;
असे घसरले, साफ विसरले युद्धरीति अति खडतर जी.
गारदीच मज फार रुचे जरि यवन न सोडी विश्वासा;
निजबंधूंची करणी ऐकुनि सोडि, वाचका, नि:श्वासा !
कलहा करिती काय विसरती क्षुद्र वस्तुच्या अभिमाने,
जसे हल्लिचे लोक तोकसम कलहा करिती नेमाने.
नेमानेमाच्या या गोष्टी कष्टी होते मन श्रवणी
असो; बुडाली एकी, बेकी राज्य चालवी वीरगणी.
सरदारांच्या बुद्धिमंदिरा आग लागली कलहाची
शिपाइभाई परि नच चळले; रीति सडिलि न मर्दाची.
नाही लढले, लढणारहि नच कुणी पुनरपि या जगती;
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥3॥

एके दिवशी रवि अस्ताशी जाता झाला विचार हा –
“प्रात:काली स्मरुनी काली युद्ध करू घनदाट महा. ”
निरोप गेला बादशहाला, “ युद्ध कराया उद्या चला;
समरात मरा वा कीर्ति वरा जय मिळवुनि आम्हावरि अचला.”
सकल यामिनी आर्यवाहिनी करी तयारी लढण्याची;
वीरश्रीचा कळस जाहला परवा न कुणा मरणाची.
परस्परांते धीर मराठे गोष्टि सांगती युद्धाच्या,
वीरश्रीच्या  शस्त्रकलेच्या जयाजयांच्या अश्वांच्या.
बोले कोणी, “ माझा न गणी वंशचि मृत्यूभयासि कधी;
आजा, पणजा, बापहि माझा पडला मेला रणामधी.
बापसवाई बेटा होई खोटा होइल नेम कसा ?
पोटासाठी लढाइ नच परि मान मिळविण्या हवा तसा !”
कुणी धरी तलवार करी तिस पाहुनि आनंदे डोले,
फिरवी गरगर करि खाली वर वीर मराठा मग बोले –
“ अफाट वाढीची ही बेटी मोठी झाली लग्नाला
प्राणधनाचे द्याज घउनी उद्याच देइन यवनाला.”
अशी चालली गडबड सगळी निद्रा कोणा नच आली;
कोठे गेली कशी पळाली रात्र न कोणाला कळली.
प्रभातरूपे ईर्षा आली; भीति पळाली निशामिषे;
भय मरणाचे कैंचे त्यांना ? काय करावे हरा विषे ?
शिंग वाजले संगरसूचक कूच कराया निघे मुभा;
धावति नरवर समरभूमिवर; राहे धनगर दूर उभा.
हटवायाते देशदरिद्रा मुखा हरिद्रा लावुनिया,
कीर्तिवधूते जाति वराया समरमंडपी धावुनिया.
शहावलीचा हलीसारखा अताइ नामा पुत्र बली
यवनदली मुख्यत्व घेत की पापावलिमधि जसा कली.
प्रणव जसा वेदांस, सदाशिव तसा आर्यबलसेनानी;
विश्वासाते पाहुनि वदनी अंगुलि घातलि यवनांनी.
आले यापरि रणभूमीवरि; जसे गात कवि यापुढती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥4॥
 
वाढे जैसा दिवस, वाढले युद्ध तसे अतिनिकराने
हातघाइला लढाइ आली; अंबर भरले नादाने.
उभय वीरवर गर्जति ‘हरहर’, ‘अल्ला अकबर’ उल्हासे;
भासे आला प्रळय; यमाला दिली मोकळिक जगदिशे.
अश्ववीरगज भक्तमंडळी गोंधळ भारतदेवीचा;
तलवारीच्या दिवठ्या केल्या; सडा घातला रक्ताचा.
धूळ उडाली गुलाल झाली; “उदे” गर्जती भक्तबळी,
परस्परांचे बळी अर्पिती भूमि तर्पिती शिरकमळी.
रणवाद्य भयंकर भराड वाजे शुद्ध न कोणा देहाची;
रणमदमदिरामत्त जाहले, हले फणाही शेषाची.
मनुजेंद्रबला जणु अंत न उरला देवेंद्राची नच परवा
म्हणुनि धूलिकण नभी धाडुनी मेघसंघ की रचिति नवा ?
रक्तपाट अतिदाट वाहती घाट बांधिले अस्थींचे;
मृतगजतुरंग मकर खेळती कृत्य अगाधचि वीरांचे.
घोर कर्म हे बघुनी वाटे रविहि धरी निजसदनपथा;
कांपे थरथर स्थीर न क्षणभर; इतरांची मग काय कथा !
यापरि चाले लढाइ; भ्याले दाढीवाले, मग हटले;
पळती, धावति सैरावैरा; आर्यवीर त्यावरी उठले.
आर्यजनां आवेश नावरे; भरे कांपरे यवनांला;
म्हणति “मिळाला जय हिंदूंला लढाइ आली अंताला !”
तोच अताई दूरदृष्टिचा धीर देत निजसैन्याला,
स्वये धावला, पुढे जाहला, स्फूर्ति पुन्हा ये यवनाला.
त्वरित पूर्ववत् समर चालले, हले भरवसा विजयाचा;
दाढी शेंडी एक जाहली खेळ शहाच्या दैवाचा.
करी अताई जबर लढाई नाही उपमा शौर्याला;
त्यावरि ये विश्वास, भासले की खानाचा यम आला !
विश्वासाने अतिअवसाने खान पाडिला भूमिवरी
करिवरचरणी मरणा तया ये, शरश एक मग यमनगरी.
धीर सोडिती वीर शहाचे पळती आवरती न कुणा;
शहावलीची कमाल झाली यत्न तयाचा पडे उणा.
पहात होता शहा खेळ हा दुरुनी, तोही घाबरला,
म्हणे, “करावे काय ? न ठावे !” दैव हात दे परि त्याला.
दक्ष वीर लक्षैकधीर तनुरक्षक सेनेसह धावे;
म्हणे चमूला, “पळति यवन जे कंठ तयांचे छेदावे.”
पुन्हा उलटले यवन लढाया हुकुम ऐकता हा त्याचा;
शहा तयांचे सहाय होता मारा करितो जोराचा.
जसे लढावे वीर संगरी कविजन इच्छा मनि करिती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥5॥
   
नभोमध्यगत सूर्य होत मग युद्धहि आले मध्याला;
हाय ! हाय ! या आर्यभूमिचा भाग्यसूर्य तो शेवटला !
सदा अम्हाला विजय मिळाला, प्रताप गावा जगताने;
परि त्या काळी फुटक्या भाळी तसे न लिहिले दैवाने !
सदाशिवाचा उजवा बाहू राहु रिपुस्त्रीमुखविधुचा,
बाऊ केवळ म्लेंच्छजनांचा, भाऊ माधवरायाचा,
बेटा ब्राह्मण बादशहाचा, पेटा साचा वाघाचा,
वीरफुलातील गुलाबगोटा, वाली मोठ्या धर्माचा,
ताण जयाची द्रौणीवर उद्राण अणिता आर्याला,
विजयाचा विश्वास असा विश्वास – लागला शर त्याला !
मर्म हाणि तो वर्मी लागे कर्म आमुचे ओढवले;
धर्म – सभेला आत्मा गेला, धर्मवधूकरि शव पडले.
अश्रू नयनी आणी लक्ष्मी प्रिय भार्या त्या आर्याची;
उत्तरे चर्या, अघा न मर्या, परि ये स्मृति तिस कार्याची.
करी विचारा वीराचारा दारा वीराची स्वमनी –
“नाथघात सैन्यात समजता धीर उरेल न आर्यजनी. “
छातीचा करि कोट, लोटिला दु:खलोट अनिवार जरी,
नीट बैसवी प्रेता देवी धनुष्य त्याच्या दिले करी.
धन्य सती ती ! धन्य तिचा पती ! धन्यचि जननीजनकाला !
धन्य कवीचे भाग्य असे या म्हणुनि मिळे हे गायाला !
परि जे घडले लपेल कुठले ? वेग फार दुर्वार्तेला;
अल्पचि काळे भाउस कळले – “गिळले काळाने बाळा !”
“ हाय लाडक्या ! काय कृत्य हे ? घाय काय हा भान करी
गोंडस बाळा, तोंड पुण्याला दावु कैसे ? कथि तोड तरी,”
असा करी तो शोक ऐकुनी दु:ख जाहले सकळांला
अश्वावरती स्वार जाहला भाऊराया मरण्याला.
व्यंग समजता भंग कराया आर्यांच्या चतुरंग बळा
सिद्ध जाहला शहा; तयाला देवाने आधार दिला.
फिरती मराठे आला वाटे अंत शिवाजीराज्याला;
भाऊराया योजि उपाया – तोही वाया परि गेला.
मान सोडिला, साम जोडिला; दूत धाडिला होळकरा;
प्रसंग येता मत्त किंकरा धनी जोडिती असे करां.
दूत निघाला, सत्वर आला, होळकराला नमन करी;
म्हणे, “ भाउचा निरोप ऐका – ‘साह्य करा या समयि तरी.
उणे बोललो, प्रमत्त झालो, बहु अपराधी मी काका;
माफ करा, मन साफ करा, या आफतीत मज नच टाका.
मत्प्राणाची नाही परवा बरवा समरी मृत्यु हवा;
परी लागतो डाग यशाला शिवरायाच्या तो दुरवा.
देशकार्य हे व्यक्तीचे नच; सक्ति नको; भक्तीच हवी;
आसक्ती सर्वांची असता मिळवू आता कीर्ति नवी.
राग नका धरु, आग लागते यशा; भाग हा सर्वांचा;
शब्द मुलाचा धरिता कैचा ? हाच मान का काकाचा ?
साह्य कराया यवन वधाया धीर द्यावया या काका ! ’ ”
असे विनविले, हात जोडिले, दया न आली परि काका.
रट्टा दे भूमातेला; शरि कट्टा वैरी मान तिची
बट्टा लवी वयास; केली थट्टा ऐशा विनतीची;
दु:खावरती डाग द्यायला करी होळकर हुकूम दळा –
“ पळा, मिळाला जय यवनाला !” काय म्हणावे अशा खळा ?
फिरले भाले-भाले कैंचे ? दैवचि फिरले आर्चांचे;
पाहे भाऊ, वाहे नयनी नीर; करपले मन त्याचे.
निरोप धाडी पुन्हा तयाला- “पळा वाचवा प्राण तरी
पळताना परि कुटुंबकबिला न्यावा अमुचा सवे घरी;
देशहिताची करुनी होळी नाम होळकर सार्थ करी !
करी दुजा विश्वासघात हा; निजबंधुंच्या दे साची
परवशतेची माथी मोळी, हाती झोळी भिक्षेची !
काय कथावी युद्ध-कथा ? मग वृथा भाउचा श्रम झाला;
धीर सोडुनी पळति मराठे, पूर्ण पराभव त्यां आला.
कोणी वेणीमाधव धावे, वार तयाच्या शिरी जडे;
भारतरमणीकंठतन्मणी धरणीवरती झणी पडे.
भूदेवीची तुटे गळसरी ! फुटे दैव की आर्यांचे
आकाशाची कु-हाड पडली; कडे लोटले दु:खाचे !
सैरावैरा आर्य धावती; हरहर ! कोणी नच त्राता !
यवन करिति ज्या मग प्रळय भयंकर; वदा कशाला तो आता ?
वर्णन करिता ज्या रीतीने कुंठित होइल सुकविमति,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥6॥
 
सन सतराशे एकसष्ट अतिनष्ट वर्ष या देशाला
हर्ष मरे, उत्कर्ष उरेना; सकळा आली प्रेतकळा.
फुटे बांगडी दीड लाख ती; राख जहाली तरुणांची
आग पाखडी दैव अम्हांवर; मूर्ति अवतरे करुणेची.
घरोघरी आकांत परोपरि; खरोखरीचा प्रळय दिसे;
भरोभरी रक्ताच्या अश्रू अबला गाळिति शोकरसे.
‘ दोन हरवली मोति, मोहरा गेल्या सत्तवीस तशा;
रुपये खुर्दा न ये मोजिता ’ – वचना वदती वृद्ध अशा;
घोर वृत्त हे दूतमुखाने कानी पडले नानाच्या;
‘भाऊ भाऊ ’ करिता जाई भेटिस भाऊरायाच्या.
उघडा पडला देश तयाते हे नव संकट का यावे !
दु:ख एकटे कधि न येत परि दु:खामागुनि दु:ख नवे !
धक्का बसला आर्ययशाला; तेथुनि जाई राज्य लया,
रघुनाथाचे धैर्य हरपले, जोड उरेना हिमालया.
“नाथ ! चालला सोडूनि अबला ! पाहू कुणाच्या मुखाकडे ? ”
“ बाळा ! कैसा जासि लोटुनि दु:खाचे मजवरति कडे ? ”
जिकडे तिकडे हंबरडे यापरी परिसती जन फिरता;
कोणिकडेही तरुण दिसेना; सेनासागर होय रिता.
उडे दरारा, पडे पसारा राज्याचा; बळ घेत रजा;
उघडे पडले मढे हत्तिचे कोल्हे त्यावरि करिति मजा !
भलते सलते पुढे सरकले, खरे बुडाले नीच-करी.
मालक पडता नीट बैसले पाटावरती वारकरी.
नडे आमुची करणी आम्हा; खडे चारले यवनांनी;
पडे पडोनी यशपात्राला रडे सदोदित भूरमणी.
गंजीफांचा डाव संपला दिली अखेरी यवनांते
स्वातंत्र्यासह सर्वस्वाते दूर लोटिले निज हाते.
रूमशामला धूम ठोकिता पुणे हातिचे घालविले;
दुग्धासाठी जाता मार्गी पात्र ठेवुनी घरि आले !
करि माधव नव उपाय पुढती परि ते पडती सर्व फशी;
परिटघडी उघडल्या एकदा बसेल कैशी पुन्हा तशी ?
जसा नदीचा ओघ फिरावा पात्री पडता गिरिशिखरे
पानपताच्या पर्वतपाते इतिहासाचा ओघ फिरे.
इतिहासाचे पान येथचे काळे झाले दैवबळे,
या देशावर अपमानाची स्वारी दु:खासहित वळे.
सर्वस्वाचा नाश जयाने वर्णु तयाते अता किती ?
व्यास वर्णिता थकेल याते मग मी कोठे अल्पमति ?
जसे झगडता त्वरित फिरावी सकल जगाची सरल गति
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥7॥
 
जे झाले ते होउनि गेले फळ नच रडुनी लेशभरी;
मिळे ठेच पुढल्यास मागले होऊ शहाणे अजुनि तरी.
पुरे पुरे हे राष्ट्रविघातक परस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवढा तरि घ्या हो !
भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीने हा झाला !
परस्परांशी कलहा करिता मरण मराठी राज्याला.
हा हिंदू, हा यवन, पारशी हा, यहुदी हा भेद असा
नको नको हो ! एकी राहो ! सांगु आपणां किती कसा ?
एक आइची बाळे साची आपण सारे हे स्मरुनी,
एकदिलाने एकमताने यत्न करू तद्धितकरणी.
कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !
कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥8॥

- गोविंदाग्रज



Edited by saurabhshetye - 27 Sep 2014 at 9:52pm
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.750 seconds.