Forum Home Forum Home > Historical and Trekking Destinations of India > Trekking Destinations
  New Posts New Posts RSS Feed - औरंगाबाद रेंज ट्रे
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


औरंगाबाद रेंज ट्रे

 Post Reply Post Reply
Author
Message Reverse Sort Order
Shreyas Pethe View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 05 Aug 2015
Location: Pune
Status: Offline
Points: 135
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Shreyas Pethe Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: औरंगाबाद रेंज ट्रे
    Posted: 21 May 2020 at 9:27pm

               आज मुहूर्त लागला, या लिखाणाला. लवकर लिहिलं ना की बरं असतं जास्त लक्षात ठेवावे लागत नाही.पण वहीतून ब्लॉगवर येण्यासाठी फक्त तीन वर्षे लागली आणि निमित्त झाले महाराष्ट्रदिनाचे. असो. निमोने म्हणजेच निमिषाने (जी वेळापत्रकानुसार औरंगाबाद रेंज ट्रेकची लीडर होती) ट्रेकची सगळी तयारी करून दिली आणि शांतपणे काही घरगुती कारणास्तव पुण्याला रवाना झाली. आता खरी जबाबदारी शिवानीवर(नवीन ट्रेक लीडर)  होती.  संपूर्णपणे अनोळखी सवंगड्यांसोबत तिला औरंगाबाद रेंज ट्रेक पूर्ण करायचा होता.

              २३ डिसेंबर २०१६ च्या  रात्री वर्धमानच्या बसने डोंबिवली वरून आमचे शिलेदार निघाले.  मी आणि माझे नवीन साथीदार स्वप्नील जिरगे (जे कराड वरुन आले होते) यांच्यासोबत पुण्यातून रातराणीने औरंगाबादसाठी निघालो. शिवानी वेदुला सोबत कुशल, माधुरी काकू, उमेश असे मेंबर होतेच. विराजचे ऐनवेळी कॅन्सल झालं. आम्ही डोंबिवलीकरांना औरंगाबादला सकाळी सहाच्या सुमारास बस स्टँड वरच भेटलो. सर्वांनी आपापली सकाळची कामे बस  स्टँडवरच उरकून घेतली.इथून आमचा प्रवास सुरु झाला तो म्हणजे आमच्या या प्रवासामधील पहिल्या किल्ल्याकडे -- भांगसीगड म्हणजेच भांगशीमाता किल्ला.

         वेरूळकडे जाणाऱ्या रस्त्यावरून डावीकडे एक डोंगर अजिंठा डोंगर रांगांतून अलग झालेला आहे ज्यावर एक मंदिर लांबूनही दिसते. हाच डोंगर म्हणजे भांगसीगड. सहज दृष्टीस पडणारा, पायथ्यापर्यंत सहजरीत्या गाडी पोहोचेल असा किल्ला. तरी सुद्धा आम्ही थोडी वाट चुकलोच. सकाळी नऊ वाजता गडाच्या पायथ्याशीच  सर्वांची ओळख करून घेऊन पिट्टूमध्ये (लहान आकाराची सॅक) पाण्याची व्यवस्था करून गड चढण्यास सुरुवात केली. गडावर भांगशी मातेचे मंदिर आहे. गड ओळखला जातो त्यावर असलेल्या भूयारामुळे. देवीचे मंदिर गडावर असल्याने गडाला व्यवस्थित पायऱ्या आहेत.  देवीचे स्थान भूयारातच आहे. मंदिरातून एक छोटा दरवाजा शेजारच्या कुंडामध्ये उतरतो. कुंड (खांबटाके) २५ खांबावर उभे आहे. त्याला प्रदक्षिणा मारून पुन्हा वर जाण्यासाठी दुसऱ्या बाजूस पायऱ्या आहेत. असेच एक भुयार गडाच्या मागच्या बाजूस देखील आहे. गडावर पाण्याची टाकी जरी असली तरी स्वच्छतेअभावी ती सर्व रिकामी आहेत. गडफेरी करण्यास अर्धातास पुरेसा आहे. आम्ही गडफेरी करून समोरच दिसणार्‍या बलाढ्य अशा यादवांच्या राजधानीकडे निघालो.

            देवगिरी म्हणजे सध्याचे दौलताबाद. वाहनतळाच्या समोरच गरमागरम पोह्यांचा नाश्ता करून गडाच्या अंबरकोटातून महाकोटात प्रवेश केला. किल्ल्याचा दरवाजाजवळ पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हास तिकीट  स्कॅन करून किल्ल्याच्या आत सोडले. आत प्रवेश करताच समोर दिसतात त्या प्रत्येकीच्या शेजारी व्यवस्थित लावून ठेवलेल्या तोफा. दरवाजाच्या आत गेल्यावर किल्ल्याची भव्यता  जाणवते. अमरकोट आणि कालाकोट यांच्यामधील परिसर म्हणजे महाकोट. मोठे दरवाजे, उंच देवड्या पार करतच चांदमिनार जवळ  पोहोचलो. त्याच्या डाव्या हाताला असलेल्या भारतमाता मंदिराची भव्यता मंदिराचा परिसर आणि खांबावरून लक्षात येत होती. भारतमाता मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अनेक खांबांचे अवशेष सर्वत्र पसरलेले दिसतात. चांदमिनाराच्या मागील बाजूस उत्खननात सापडलेल्या शिल्पांचे सुंदर जतन करून ठेवले आहे.

            पुन्हा चांदमिनारावळ येऊन पुढे सरळ चालत गेल्यावर उजवीकडे एका हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष आढळतात. इथून पुढे मोठया दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण “मेंढा” तोफेजवळ येतो. हा बुरुज फक्त या तोफेसाठीच बांधला आहे. त्या तोफेचे तोंड मेंढीच्या आकाराचे आहे आणि यावर “किल्ला शीकन” म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी असा उल्लेख केलेला आहे. या तोफेची रचना अशी होती की ती ३६० अंशाच्या कोनामध्ये सर्व दिशांना फिरवता येत असे. आपण सध्यातरी याची कल्पनाच केलेली बरी. इथून पुढे गडाचा कालाकोट हा भाग सुरु होतो. कालाकोट म्हणजे किल्ल्याच्या तटबंदी व खंदकाचा भाग.

           दोन पुलांनी खंदकावरून आत प्रवेश करता येतो. एक दगडी पूल आणि एक लाकडी पूल. इथून खंदक प्रचंड दिसत होता.  किल्ल्यात प्रवेश केल्यावर देवगिरी वरील महत्त्वाचा भाग लागतो तो म्हणजे    भूलभुलैया. इयत्ता चौथीमध्ये असताना मराठीत “देवगिरी” किल्ल्याबाबत माहिती देणारा धडा होता. त्या धड्यामध्ये या ठिकाणाची खूप छान माहिती दिली होती.  शत्रूला हमखास चकवा देण्यासाठी याचा वापर  होत असे. या भूलभूलैयाच्या एका द्वारापाशी  गरम तवा ठेवला जायचा तर दुसरे द्वार खंदकात उघडताना दिसते. हा किल्ला एकतर भुईकोट, एकच प्रवेशद्वार म्हणूनच इतका प्रचंड मोठा खंदक, भूलभूलैया  अशा प्रकारच्या तंत्रांचा वापर केलेला दिसतो. येथून पायऱ्या चढून वर गेल्यावर संपूर्ण गड नजरेच्या टप्प्यात येतो. अंबरकोटापर्यंत नजर जाते आणि गडाचा अवाढव्य पसारा पाहून आपण स्तब्ध होतो. काही पायऱ्या चढून  डावीकडे असलेल्या मंदिरात गणेशाचे दर्शन घेऊन, तिथल्या काकूंकडून थंडगार पाणी, प्रसादरुपी साखर घेऊन पुनश्च गड चढावयास सुरुवात केली. फॅन्टॅस्टिक फोर (ट्रेकमध्ये एकत्र आलेल्या चार मैत्रिणी) मधील एका सदस्याने जीव टाकायला सुरुवात केली. तिला तशीच बोलत बोलत वरपर्यंत घेऊन गेलो.

               सर्वात वरच्या भागात सुभेदाराची राहण्याची जागा म्हणजेच बारदरी मध्ये आपण प्रवेश करतो. या वास्तूपासून वरच्या बाजूस जाताना डावीकडे जनार्दनस्वामींच्या पादुका एका गुहेमध्ये विराजमान आहेत. तिथे एक वृद्ध स्त्री सेवा करत होत्या. मी ३ वर्षांपूर्वी किल्ल्यावर आलो होतो त्या वेळी सुद्धा याच स्त्री या पादुकांची सेवा करताना मला दिसल्या होत्या. त्यांची श्रद्धा पाहून मान भरून आले. गडाच्या सर्वात वरच्या भागात “श्री दुर्गे” ही तोफ विराजमान आहे. येथून दूरदूरपर्यंत किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. यादवांची राजधानी कशी असेल याची थोडक्यात प्रचीती येते. येथून पुन्हा किल्ले देवगिरी उतरण्यास सुरुवात केली. हेमाडपंथी बांधणीच्या मंदिरातच सर्वांनी आपले डबे काढले. नेहमीप्रमाणेच वेगवेगळे पदार्थ अजमावयास मिळाले. पोटभर जेवण करून यादवांच्या सुंदर अप्रतिम कलाकृतीला सलाम करत आमच्या वाहनाकडे निघालो. शेवटी आलेल्या संथ लोकांमुळे (ज्यात मीपण होतो) शिवानी मॅडम थोड्या चिडल्या. बाहेर पडल्यावर काही वेळातच गुगल नकाश्याच्या आधारे आम्ही  आमच्या विश्रांतीस्थानाकडे प्रयाण केले.

          देवगिरीतून निघाल्यावर थंडगार वाऱ्यामुळे झोप लागली आणि फुलंब्री तालुक्यातील लहुगडाच्या जवळ आल्यावरच जाग आली. किल्ला तसा उंचीने लहानच.  गाडीतून आपापल्या बॅगा, शिधासामुग्री घेऊन किल्ल्याच्या पायऱ्या चढू लागलो. प्रवेशद्वारातच कमानीच्या भिंतीत लावलेल्या, रंगवलेल्या वीरगळीनी आमचे स्वागत केले. याचे महत्त्व “उमेश गुरुजींनी” सर्वांना समजावून सांगितले. अवघे दहा पंधरा मिनिटातच किल्ल्याच्या मध्यावर- मंदिराच्या आवारात पोचलो. शिवानी, उमेश, द्रुमन येथील साधुबाबांशी  राहण्याबाबत चौकशी करायला गेले व इतर आम्ही मंदिराच्या वरच्या बाजूला असणाऱ्या किल्ल्याकडे निघालो. छोटासाच घेर असणाऱ्या किल्ल्यावर खूप सुंदर पाण्याच्या टाक्यांचा समुह पहावयास मिळतो. वर चढतानाच डाविकडे एक खांब टाके, वर माथ्यावर आठ टाक्यांचा समूह (न पिण्यायोग्य) व थोडे उजवीकडे गेल्यास गोड पाण्याने भरलेले पाण्याचे टाके आहे. मागील बाजूने दोन वाटा या किल्ल्यावर येताना दिसतात. सीतेचे न्हाणीघर या नावाची एक वास्तू आहे. शेजारील डोंगरावरही काही गुहा पहायला मिळतात. तेवढ्यातच  खाली मुख्य साधूबाबा आज आश्रमात नाहीयेत परंतू साधूंनी राहण्यास परवानगी दिली आहे असे समजले. सूर्यास्त झाल्यावरही बराच वेळ संधीप्रकाश पश्चिम क्षितिजावर झळकत होता. खूप शांत वाटत होतं.

             मग आम्ही सूप करण्यासाठी टाक्यातील पाणी आणलं. उमेश, माधवी काऊ, कुशल आणि चैतन्यने पुलाव करण्याची तयारी सुरू केली. पण मी आणि वरूण वेगळ्याच तयारीत होतो. तिथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर काकांनी रामेश्वर मंदिरात संध्याकाळच्या आरतीची तयारी सुरू केली. आरती ऐकून प्रसन्न वाटलं. वरूणने न राहवून शेवटी त्यांच्याकडे पेटीची विचारणा केली आणि अनपेक्षितपणे ती मिळाली. मग काय मी, वरूण आणि ज्ञानेश्‍वर काका मंदिरात देवासमोर मैफिलीसाठी बसलो. वरूणने  “सुर निरागस हो” या गाण्याने  सुरुवात केली. हळूहळू श्रोतृवर्ग वाढायला लागला. फर्माईशी सुरु झाल्या. भक्तीगीत, भावगीतांनी गाभारा भरून गेला. उमेश पुलाव तयार झाल्याचा निरोप घेऊन आल्याने आम्ही सर्वानी आमची गानमैफिल आटोपती घेतली. 

             पुलावाचा बेत अप्रतिम जमला होता. सर्व गोष्टी जुळून आल्या होत्या. मिरची आणि माईन मुळ्याच्या लोणच्याने जेवणात रंगत आणली. शिवानी कडून मिळालेले “बोटभरून” श्रीखंड, मी, उमेश आणि कुशल सर्वांनी मिळून खाल्ले. जेवण झाल्यावर सर्वांनी जागा पकडून स्लीपिंग बॅग मंदिरात पसरल्या. त्याआधी मी किल्ल्याची माहिती, मराठ्यांचा पानिपताबद्दल एका शंकेचे निरसन करणारा उतारा(जो इतिहासाच्या पाऊलखुणा या पुस्तकातील होता) वाचून दाखवला. मी छानपैकी मंदिराच्या दारात एका उंचवट्यावर जागा मिळवली.  दिवसभराच्या थकव्याने सगळे काही क्षणात निद्राधीन झाले.
            डिसेंबरच्या मानाने रात्री जेवढ्या थंडीची अपेक्षा आम्ही केली होती तेवढी काही जाणवली नाही. सकाळी उठल्यावर गडावरील टाक्यातून चहा आणि उपम्यासाठी पाणी आणलं. कुशलने माझा पाणी आणतानाचा एक झकास फोटो पण काढला. नाश्ता तयार होईपर्यंत सर्वांनी आवरून मंदिरातून बाहेर निघायची तयारी करून ठेवली. ड्रायव्हरकाका , येथील एक पुजारी - ज्ञानेश्वर यांच्या सोबत चहा आणि नाष्टा लाउड स्पीकरवरील रीमिक्स भजने ऐकतच पूर्ण केला. पुनश्च रामेश्वराचे दर्शन घेऊन लहुगड उतरायला सुरुवात केली.

         आता आमचे पुढचे लक्ष होते किल्ले जंजाळा, वेताळवाडीचा किल्ला आणि किल्ले सुतोंडा.त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. भेटूया औरंगाबाद रेंज च्या पुढच्या भागात. लवकरच.


"भटका श्रेयस"
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.349 seconds.