लिंगाणा - सूळक्यां |
Post Reply |
Author | |
Deepali Lanke
Senior Member Joined: 16 Feb 2013 Location: Pune Status: Offline Points: 230 |
Post Options
Thanks(0)
Posted: 03 Nov 2015 at 2:41pm |
लिंगाणा - सूळक्यांचा मानबिंदू
-दीपाली लंके 01/11/2015 लिंगाणा डोंगर भटक्यांसाठी एक स्वप्नवत वाटणारा किल्ला आहे. रायगड हे राजगृह तर लिंगाणा हे कारागृह म्हणून प्रचलित होते.लिंगाणा हा किल्ला असला तरी सूळक्यांचा मात्र मानबिंदू ठरणाराच आहे. लिंगाणा हा लिंगा सारखा भासत असल्यामुळे हे नाव प्रचलित झाले असावे. ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा बहुरूपी असा आहे. प्रत्येक बाजूने आपल अबाधित स्थान दाखवणारा असाच आहे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील लिंगाणा जणू शिरोमणीच आहे. लिंगाणा या किल्ल्यावर प्रस्थान करन वाटत तेवढं सोपं नसून प्रस्तरारोहणाचे तंत्र आवश्यक आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा किल्ला पादाक्रांत करता येतो. पुण्याहून वेल्हे मार्गे बोराट्याच्या नाळेने हा किल्ला सर करता येतो. किल्ल्यावर जाण्याचा सुरुवातीचा प्रवास आल्हाददायक वाटतो सकाळची थंड हवा, वातावरणातील प्रसन्नता मुळी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. पठारावरची वाट संपते आणि बोराट्याच्या नाळेचा प्रवास सुरु होतो तेव्हा मात्र थंडीत सुद्धा घाम निघतो. नाळ हि दोन दर्यांमधून जाणारी निमुळती व्ही आकाराची वाट असून मोठ मोठ्या दगडांनी आणि झाडा-झुडूपांनी व्यापलेली आहे. पक्ष्यांचा तो किलबिलाट दरीतून घोंगावणारा वारा जणू पुढची वाटचाल वाटते तेवढी सोपी नाहीये हेच कानात सांगून जात होता. काही कातळ छोटे हातात मावतील एवढे तर काही विस्ताराने मोठे उतरून जात असताना मात्र दमछाक होत होती. सूर्योदय झाला आणि जणू लिंगाण्याचे आम्हाला पहिले दर्शन झाले, जणू तो आमच्या स्वागतास सज्ज असल्यासारखेच भासले , खंर सांगायचं तर आमच्या उरात मात्र धडकी भरली. लिंगाणा खरच खूप दिमाखदार भासत होता आजू बाजूच्या दऱ्या खोऱ्या जणू त्याचं अस्तित्व मानून त्याच्या पहारेदारासारख्या भासत होत्या. बोराट्याच्या नाळेतून सुरु झालेला प्रवास हा तुम्हाला अगदी लिंगाण्याच्या समोर आणून ठेवतो नि तुम्ही आ वासून त्याच्या कडे पाहत असता कि खरच आपण या किल्ल्यावर जाणार आहे.सकाळच्या वेळी वाहणारा भणाणता वारा मात्र हैराण करत होता उरात भरलेली धडकी लिंगाण्याचा प्रचंड आणि भयभीत करणारा विस्तार जणू इच्छाशक्तीवर घाव करत होता.सुरुवातच जणू कातळ चढाईची आहे आणि टप्प्या गणिक ती विस्तारत जाते आणि आपल वेगळेपण सिद्ध करू पाहते. एका मागोमाग असणारे कातळ जणू आम्हाला वर त्यांच्याकडे येण्यासाठी साद घालत होते तर काही आमच्यावर चढाई करूनच दाखवा असा आव दाखवून जणू आमच्या जिद्दीला चेतना देत होते. या कातालांच्या बरोबरीला वारा सोबत म्हणून आमची परीक्षाच पाहत होता. दोन्ही बाजूला असणाऱ्या खोल दऱ्या जणू आमच्यावर हसत आहे असंच भासत होते आणि त्यांच्याकडे बघणे मात्र आम्हाला नकोसे वाटत होते. सह्याद्रीची श्रीमंती खूप थोर आहे हे आमच्या मनावर प्रतिबिंबित झाले होते. प्रत्येक कातळ चढून आम्ही विजयी मुद्रेने लिंगाण्याच्या दिशेने प्रयाण करत होतो कधी दोरखंडाच्या सहाय्याने तर कधी स्वतःला उचलून घेत आम्ही मार्गक्रमण करतच राहिलो आणि अखेर तो क्षण आला आणि आम्ही लिंगाणा सर करून त्याच्या माथ्यावर पोहचलो आणि विजयाचा एकंच जल्लोष केला हि स्वतःवर मात होती स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीची आणि घेत असलेल्या मेहनतीच जणू प्रगती पुस्तकच आम्हाला मिळालं होतं. लिंगाण्या वरून दिसणारा रायगड आणि जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेवून आम्ही अक्षरश: तृप्त झालो आणि घेतलेल्या मेहनतीच चीज झाले. आजूबाजूचं विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या रांगा, धबधबे , बोराट्याची नाळ, लपून बसलेली सिंगापूर नाळ, रायलिंग पठार डोळ्यात साठवून घेतले ,विजयी मुद्रेचे फोटो काढून टिपून घेतले.चढाई झाली होती आम्ही जिंकलो होतो पण आता खरी तर लिंगाण्याहून उतरण्याची पुढची लढाई तर अजून बाकीच होती हे लक्षात आल आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले. जीवघेणी चढाई झाल्यानंतर जणू उतरण्याची हिम्मत अजूनच वाढवावी लगली होती खोल दरी आणि कातळ जणू आमच्याशी हितगुज करू पाहत होते तर काही भीती दाखवत होते. दरीत शरीराला मोकळे सोडून दोरखंडाच्या साह्याने उतरण्याशिवाय दुसरा पर्याय च नव्हता. साधारणपणे १००० फूट चढाई नंतर १००० फूट खाली उतरणे म्हणजे एक कसरतहोती. लिंगाण्या ने आम्हाला एवढ्या मेहनती नंतर मायेने जवळ केले होते , आम्हाला शाबासकी दिली होती त्याची लाज म्हणून काहोईना आम्हाला खाली यशस्वीरीत्या गेलंच पाहिजे असं आम्ही स्वतःची समजूत घालून कंबर कसली आणि एक मेकां साहाय्य करू यारीतीने एक-एक करून खाली मार्गाक्रमण करू लागलो. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे स्वतः वरचा अढळ विशासआणि मी हे करणारच हा एक सकारात्मक विचारच तुम्हाला लिंगाणा सर करण्यास पोषक ठरतो तसेच उतरण्यासाठी. एक -एक करतआम्ही परत बोराट्याच्या नाळेने मार्गक्रमण करत, विजयी मुद्रा घेवून, आणि दिवसभरातील साहसी आठवणीना उजाळा देत परतीच्यामार्गाला लागलो. आणि रायलिंग पठारावरून लिंगाण्याचे एक शेवटचे दर्शन सूर्यास्ता सोबत घेतले आणि येथेच खऱ्या अर्थाने आमचालिंगाणा किल्ला आणि सूळक्यांचा मानबिंदू सुफळ संपूर्ण झाला. |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |