Forum Home Forum Home > Adventure Forum > Events
  New Posts New Posts RSS Feed - निबीड अरण्यातील ट्
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


निबीड अरण्यातील ट्

 Post Reply Post Reply
Author
Message
Deepali Lanke View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 16 Feb 2013
Location: Pune
Status: Offline
Points: 230
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Deepali Lanke Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: निबीड अरण्यातील ट्
    Posted: 06 Oct 2014 at 10:24am
                         निबीड अरण्यातील ट्रेक- लोणावळा ते भीमाशंकर

                                             -दीपाली लंके

विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे नेहमीच दुर्गप्रेमींना आणि डोंगर भटक्यांना साद घालत आले आहेत. लोणावळा हे ऐन घाटमाथ्यावरील ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे तर भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. मग लोणावळा ते भीमाशंकर यांना जोडणारी डोंगररंग भटक्यांच्या नजरेत न येईल तर नवलच आहे. आम्ही १० भटके एकत्रित आलो ते २७ आणि २८ सप्टेंबर २०१४ रोजी आयोजित केलेल्या लोणावळा ते भीमाशंकर या ट्रेक च्या निमित्ताने आणि या ट्रेक चे नेतृत्व निसर्गमित्र संस्थेचा चा सदस्य राहुल खोत याने यशस्वीरीत्या केले.सह्याद्री माणसाला घडवते ,शिकवते आपल्या उदरात वाढवते आणि खेळवते ,माणुसकी आणि माणसांची पारख शिकवणारी हीच सह्याद्री माणसाला एक मेकांशी जोडते ते विविध वाटेतून, दऱ्या खोऱ्यातून बागडताना. अशा या आमच्या लोणावळा ते भीमाशंकर या निबिड अरण्यातील ट्रेक चे दोन दिवसाचे स्वरूप लोणावळा  वळवण गाव - कुसूर पठार - धनगरवाडी- कुसूर गाव -तळपेवाडी-कमलजाई मंदिर- भीमा नदी - गुप्त भीमाशंकर -भीमाशंकर असे होते.

आम्ही १० दुर्ग वेडे सह्याद्रीचा वसा उरात घेवून फिरणारे २६ सप्टेंबर रोजी रात्री साधारपणे ११.३० वाजता लोणावळा बस डेपो ला भेटलो तिथून वैयक्तिक वाहनाने आम्ही वळवण गावाच्या दिशेने निघालो आणि तासाभराने वाहन जिथून पुढे जावू शकत नाही तिथे उतरलो आणि चांदण्या रात्रीतून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली.रात्रीची वेळ असल्यामुळे सावध आणि सूचकता असावी अशी सूचना देण्यात आली आणि आम्ही आमच्या ट्रेक ला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला. रात्री येणारा किड्यांचा किरर्र आवाज, जंगलातील भयाण शांतता आणि मधेच येणारी वाऱ्याची झुळूक अगदी आल्हाददायक वाटत होती.जंगलातील प्रवास म्हंटला कि जंगलात राज करणारे आणि वास्तव्य असणारे न दिसले तर गोष्टच निराळी असंच पुढची वाटचाल करत असताना आम्हाला तस्कर या बिनविषारी असलेल्या सापाचे दर्शन झाले आणि खऱ्या अर्थाने निबिड अरण्यातील आमच्या ट्रेक ला चार चांद लागले असे बोलले तर अतिशयोक्ती नसेल.

तस्कर हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात. हा मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो, छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत.

तस्कर या सापाची चपळ हालचाल कॅमेरात कैद करतच आम्ही पुढची वाट काढत वळवण गावात पोहचलो आणि तिथे असलेल्या मंदिरा शेजारच्या रिकाम्या खोलीत आपले बस्तान बसवले. साधारणपणे ३ वाजता आम्ही निद्राधीन झालो. दुसऱ्या दिवशी ची प्रसन्न पहाट,चिमण्यांचा किलबिलाट, गार वारा अगदी मनाला उल्हसित करत होता आणि आजू बाजूला निसर्गाने नेसलेला हिरवागार शालू तर अगदी विलोभनिय वाटत होता. सकाळची आन्हिक आवरून आम्ही आमचा गाशा गुंडाळला आणि पुढे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आमचा पुढचा टप्पा होता कुसूर पठार, ते गाठेपर्यंत चढ उतार करत आणि निसर्ग मनात साठवत आम्ही एक मेकांशी संवाद साधत आणि डोळ्यात निसर्गाचा अविष्कार साठवत राजमाची , मनोरंजन, ढाक बहिरी ,मांजर सुभा,कलाकारी,आणि कोंडेश्वर यांचे दर्शन मिळाले.सोनकीची फुलं, कारवी याने पठार लक्ष वेधून घेत होते तर सुळके त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत दिमाखात खुणावत होते.वेळ मिळेल तसं आम्ही नजरबद्ध आणि कामेराबद्ध हे सुंदर आणि सोज्वळ दृश्य करून घेत होतो.कुसूर पठारावरून जाताना तर बहरलेल्या सोनकीने आणि हिरवळीने अगदी स्वर्गाभास झाला.निसर्गाच यावेळी अप्रूप वाटल्याशिवाय राहवलं नाही. निसर्गाची किमया आणि खरा श्रीमंत हा निसर्गच आहे असं मनात सारखा डोकावत होतं धनगर वाडीत थोडा वेळ आराम करून आम्ही कुसूर गावात मजल दरमजल करत पोहचलो.तिथूनच आम्ही तळपेवाडी हे अंतर चालतच गाठायचं ठरवून तर निघालो मात्र अंतर जास्त असल्याकारणाने आम्ही वैयक्तिक वाहनाने तळपेवाडी गाठली दिवसभराच्या अथक पायपिटी नंतर आम्ही भूकेने व्याकुळ झालो होतो एका झाडाखाली सामान ठेवून आम्ही आणलेल्या भाकरी ठेच्या वर ताव मारला आणि आत्मा शांत केला. अश्या प्रवासात थोडी विश्रांती सुद्धा माणसाला तजेलदार बनवते. सगळे अगदी टवटवीत झाले आणि पुढचा  टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाले.तळपेवाडीत पोहचे पर्यंत अंधार झाला होता सगळे आम्ही सवंगडी आणि गडकरी एकमेकाच्या साथीने वाडीत पोहचलो आणि दिवसभराची पायपीट,घामेजलेले ,मळकटलेले आम्ही तिथल्या शाळेत सामान ठेवून थंड पाण्याने स्वच्छ हाय पाय तोंड धुवून अगदी शांत झालो.गावकरी आणि त्यांच्यात असलेली  माणुसकी मनाला भावल्याशिवाय राहत नाही. मदती साठी सदैव तत्पर असलेले गावकरी दुर्गप्रेमींच्या मनात कायम घर करून राहतात. आणि या यशस्वी वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा असतो असे बोलले तर ते खरेच ठरेल.डोंगर प्रेमी एकत्र आले कि ज्ञानाचा भांडार च एकत्र आल्यासारखा होतो प्रत्येकाचे अनुभव पुस्तक वाचण्यापासून ते त्यांनी केलेल्या आयुष्यातील विलक्षण आणि यशस्वी गोष्टी ते त्यांचे डोंगर भटकंतीतील ज्ञान याची देवन घेवाण करत असतानाच सगळा थकवा कुठल्या कुठे जातो हेच काळत नाही आणि असलेला वेळ हि अपुरा वाटू लागतो.

दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग आली प्रसन्न सकाळ अतिशय स्वच्छंद वातावरणाने उभारी मिळाली आणि आन्हिक आवरून आम्ही आमचा गाशा गुंडाळून भीमाशंकर च्या दिशेने निघालो.ताशीव कातळ कडे चहु बाजूनी नटलेली सह्याद्री कडे पाहून कृत कृतज्ञ झाल्यासारखे वाटत होते.चालताना नागोबांचे झालेले दर्शन ,मुंगुस यांनी तर अजूनच भर घातली.खेकड्यांच पठार ,कमलजाई मंदिर असे एका नंतर एक टप्पे पार करत आम्ही भीमा नदीच्या दिशेने खाली उतरलो आणि आमच्यातल्या सह्यवेड्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही आणि मनसोक्त पाण्यात डुंबण्याचा आनंद काय असतो ते इथे पाहायला मिळाल. मजल दरमजल करत असताना आम्हाला नागफणीचे दर्शन झाले.हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे. आम्ही भटके गुप्त भीमाशंकराच्या दर्शनासाठी अगदी उत्स्फुर्तपणे धावतच निघालो आणि १५ मिनिटात अंतर गाठले. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.अगदी नजरेस न पडणारी महादेवाची पिंड इथे पाहायला मिळते अगदी मनास शांतता लाभते.परताना अगदी मनात मी नुकत्याच वाचलेल्या महादेवा वरच्या मेलुहा ,नागांचे रहस्य ,आणि वायुपुत्रांची शपथ या मनीष त्रिपाठी यांनी लिहिलेली TRIOLOGY दृष्टीपटलावरून साद घालत राहिली.शेवटी महादेव देवांचा देव कसा झाला त्याचं मनात चित्री करण रंगवत असताना आम्ही भीमाशंकर ला पोहचलो आणि आम्ही जिंकलो हीच एक सुहृदयी भावना मनात राहिली. दुर्ग प्रेमीने स्वत वर मिळवलेला हा विजय च मी मानते. दर्शन आटोपून भूक तहान विसरलेलो आम्ही भुकेने व्याकुळ झालो आणि भीमाशंकर येथील हॉटेलात जे वाट्यास येईल ते पचनी पाडले आणि लागले ते परतीचे वेध.

प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतोच पण शेवट पचायला खरच खूप जड जातो.परतीचा प्रवास करत असताना मनात अभिमान आणि परतण्याची खंत असतानाच एक विचार चमकून गेला जगावं ते या सह्याद्रीच्या कुशीत आणि शेवटी गतप्राण व्हावं ते याच सह्याद्रीच्या कुशीत.

Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.742 seconds.