" प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाणा अष्टप्रधानी शिव मुख्य राणा "
' अष्टप्रधान ' हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल. परंतु हे अष्टप्रधान कोण होते, त्यांचे अधिकार काय होते याची माहिती आपण येथे करून घेणार आहोत. राज्यकारभारामध्ये सुसूत्रता यावी यासाठी विविध दर्जाचे, अधिकाराचे लोक महाराजांनी नेमले होते. ते कोण हे आता पाहूया.
१) मुख्यप्रधान अर्थात पेशवे :- राजानंतर अधिकाराने सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे पेशवे. राजाच्या गैरहजेरीत सर्व कारभार प्रधान सांभाळीत असत.राज्याची एकंदर व्यवस्था सुरळीत आहे कि नाही हे पाहणे तसेच वेळ आल्यास युद्धात नेतृत्व करणे, सैन्य घेऊन नवीन प्रदेश जिंकणे अशी विविध कामे प्रधानांकडे असत.खलीत्यांवर, पत्रांवर राजाच्या शिक्क्यानंतर पेशव्यांचे शिक्कामोर्तब होई. मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे होते. २) अमात्य :- आजच्या भाषेत अमात्य म्हणजे अर्थमंत्री किंवा finance minister. राज्यातील एकंदर जमाखर्चांवर अमात्यांचे नियंत्रण असे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते. ३) सेनापती उर्फ सरनौबत :- संपूर्ण लष्करावर सेनापतीचे नियंत्रण असे. लष्कराचा कारभार, सैनिकांचे वेतन, युद्धात जे पराक्रम गाजवतील त्यांचा छत्रपतींच्या हस्ते सत्कार, युद्ध प्रसंगी नेतृत्व इ. कामे सेनापतींच्या अधिकारात असत. लष्कराचे घोडदळ आणि पायदळ असे दोन मुख्य प्रकार होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. यांचे मूळ नाव 'हंसाजी मोहिते'. ' हंबीरराव' हि महाराजांनी त्यांस दिलेली पदवी आहे.
४) सचिव :- सचिव म्हणजे सेक्रेटरी. सरकारी दफ्तरावर सचिवाची देखरेख असे.सर्व पत्रव्यवहार सचिवाच्या खात्याकडून होत असे. अण्णाजी दत्तो हे सचिव होते. ५) मंत्री :- राजाचे आमंत्रित पाहुणे तसेच भेटीस येणारे लोक यांचे स्वागत करणे, बारा महाल, अठरा कारखाने यांचा बंदोबस्त ठेवणे, राजांच्या दिनचर्येची नोंद ठेवणे इ. मंत्र्याची कामे असत.राजाची राजकीय बाजू सांभाळणे तसेच खासगी सल्लागार म्हणून मंत्र्याची नियुक्ती असे.दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते. ६) सुमंत किंवा डबीर :- सुमंत म्हणजेच सोप्या भाषेत परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा external affairs minister.परराष्ट्र संबंधित सर्व व्यवहार सुमंत पाहत असत. परराष्ट्र राजकारण पाहणे,अन्य राज्यांमधून येणाऱ्या वकिलांची बडदास्त ठेवणे,परराष्ट्राशी होणारा पत्रव्यवहार सांभाळणे ही मुख्यतः सुमान्ताची कामे होत.रामचंद्र त्रिंबक हे सुमंत होते. ७) न्यायाधीश :- न्यायाधीश या शब्दातूनच याचे अधिकार स्पष्ट होतात. निराजी रावजी हे न्यायाधीश होते. ८) पंडितराव :- धार्मिक बाजू सांभाळण्याचे काम पंडितराव किंवा न्यायशास्त्री कडे असे.मोरेश्वर हे न्यायशास्त्री होते.
या अष्टप्रधानांची per annum salary किंवा वार्षिक वेतन पुढीलप्रमाणे :- मुख्य प्रधान, अमात्य, सचिव :- प्रत्येकी १५००० होन. मंत्री, सुमंत, न्यायाधीश, सेनापती, पंडितराव :- प्रत्येकी १०००० होन. एक होन = साडे तीन रुपये.
इतर अधिकारी :- अष्टप्रधानांना एक एक अधिकारी दिलेला असे.अष्टप्रधानांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार हे अधिकारी पाहीत.या अधिकाऱ्यांना 'मुतालिक' म्हणत.या मुतालीकांच्या हाताखाली असलेल्या व्यक्ती किंवा 'कामदार' पुढीलप्रमाणे :- १) कारखाननिस :- दाण्यागोट्याची व्यवस्था. २) जामदार :- एकंदर चीझवस्तू, नगद यांचा संग्रह. ३) पोतनीस :- रोकड सांभाळणे. ४) सबनीस :- दफ्तर सांभाळणे. ५) मुजुमदार :- जमाखर्च पाहणे. ६) फडणवीस :- मुजुमदाराचा दुय्यम अधिकारी. ७) चिटणीस :- पत्रव्यवहार. ८) पाटील :- गावाचा मुख्य अधिकारी. यांस 'मोकदम' असेही म्हणत. ९) कुलकर्णी :- ग्रामलेखक, गावचा लेखापाल. पाटलाचा सह अधिकारी. १०) देशमुख :- अनेक खेड्यांचा मिळून 'परगणा' होत असे. या पर्गण्यांमधील सर्व पाटलांचा मुख्य तो 'देशमुख'. ११) देशपांडे :- या पर्गण्यांमधील सर्व कुलकर्ण्यांचा मुख्य तो 'देशपांडे'.
वरील शब्दांची आडनावे आज आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. हि आडनावे या अधिकारांवरून आलेली आहेत किंवा या अधिकारांवरूनच हि आडनावे रूढ झालेली असावीत.
अठरा कारखाने (अष्टादश शाळा) :- १) तोफखाना, २) पिल्खाना (हत्तीशाळा), ३) दफ्तरखाना, ४) उष्टर्खाना (उंटशाळा), ५) फरासखाना (राहुट्या,तंबू), ६) शिकारखाना, ७) तालीमखाना (मल्लशाळा), ८) अंबरखाना (धान्यकोठार), ९) नगारखाना, १०) शरबतखाना (वैद्यशाला), ११) अब्दारखाना (पेयशाला), १२) जवाहीरखाना, १३) मुदपाकखाना (स्वयंपाक), १४) जीरातेखाना (शस्त्रशाळा), १५) खजिना, १६) जामदारखाना (धनालय), १७) दारूखाना (दारुगोळा), १८) नाटकशाळा.
बारामहाल (द्वादशकोश) :- १) छबिनामहाल (रात्ररक्षक), २) पोतेमहाल (कोषागार), ३) सौदागीरमहाल (व्यापारी महाल), ४) टंकसाळमहाल (नाणी), ५) इमारतमहाल (बांधकाम), ६) पालखीमहाल, ७) गोशाळा, ८) सेरीमहाल (तृप्तीघर), ९) कोठीशाळा, १०) वहिली महाल (रथशाळा), ११) दरुनीमहाल (अन्तःपूर), १२) वसनागार
पायदळाची रचना :- १) नाईक :- ९ शिपायांचा प्रमुख, २) हवालदार :- ५ 'नाईकांचा' प्रमुख, ३) जुमलेदार :- ५ 'हवालदारांचा' प्रमुख. ४) हजारी :- १० 'जुमलेदारांचा' प्रमुख. ५) पाच हजारी :- ५ 'हजारींचा' प्रमुख. ६) सेनापती किंवा सरनौबत :- 'पाच हजारींचा' प्रमुख.
घोडदळाची रचना :- मुख्य २ प्रकार :- १) बारगीर :- बारगीराकडील घोडे सरकारी असत.यांस 'पागा' असेही संबोधिले जायचे. २) शिलेदार :- शिलेदाराकडील घोडे त्याचे स्वतःचे असत. उपप्रकार :- १) हवालदार :- २५ बारगीर किंवा शिलेदारांचा प्रमुख. २) जुमलेदार :- ५ 'हवालदारांचा' प्रमुख. ३) सुभेदार :- ५ 'जुमलेदारांचा' प्रमुख. ४) पाच हजारी :- १० 'सुभेदारांचा' प्रमुख.
मित्रांनो, ऐतिहासिक कथा, कादंबरी वाचताना प्रस्तुत लेखात दिलेल्या शब्दांचे, अधिकारांचे उल्लेख आपल्या वाचनात सर्रास आले असतील. आता या शब्दांचे नक्की अर्थ सुद्धा समजल्यामुळे वाचताना काय गोडी येईल ते पहा !!!
स्वप्नील केळकर. ८६८९८८८७०३ |