Forum Home Forum Home > Adventure Forum > Monsoon Trekking
  New Posts New Posts RSS Feed - Ratangad to harishchandragad via Katrabai
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


Ratangad to harishchandragad via Katrabai

 Post Reply Post Reply
Author
Message
Shreyas Pethe View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 05 Aug 2015
Location: Pune
Status: Offline
Points: 135
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Shreyas Pethe Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: Ratangad to harishchandragad via Katrabai
    Posted: 25 Mar 2020 at 8:48pm

 

                               रतनगड ते हरिश्चंद्रगड व्हाया कात्राबाईची खिंड

ट्रेक क्षितीजच्या वेळापत्रकाप्रमाणे राहुल दादा ट्रेक लीडर होता, त्यामुळे त्याच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे दोन दिवस आपल्यासोबत  कोण कोण साथीदार आहेत याबाबत त्याने मौनच बाळगले होते. शुक्रवारी सकाळी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर whats app ग्रूप बनवला गेला  व संध्याकाळी मी , प्रथमेश व अश्विनी (हात पाया पडून तयार केलेली) डोंबिवलीकडे निघालो. रात्री अश्विनीकडे काकूंच्या हातच्या कढी आणि भाताने मजा आली. लगेच टिळक पुतळ्याकडे निघालो.  संजय काका, विराज , उमेश टाटा करायला आलेच होते. फॉर्म भरून बॅग व्यवस्थित ठेऊन रतनवाडीच्या प्रवासाला सुरुवात झाली.  जाताना ऑगस्टिन ला घेऊन पुढे निघालो.

कसाऱ्याच्या अलीकडे नेहमीप्रमाणे एक कट मारून गाडी पुढे निघाली. रतनवाडीच्या  रस्त्याचे काम चालू असल्याने  रस्ता खराब होता,  अशाही रस्त्यावरून काकांनी गाडी खूप व्यवस्थित हाताळली. पहाटे पाच च्या सुमारास रतनवाडी मध्ये दाखल झालो. गाडीतच एक झोप काढून नाश्ता व इतर कामासाठी मार्गस्थ झालो. कालच महाशिवरात्र झाल्याने पुरातन अशा अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला स्टॉल्सची गर्दी होती. काही वेळातच मंदिरात काकडा आरती, भजन चालू झाले. आम्ही जेथे थांबलो होतो काकांनी तेथेच शेकोटी लावली होती. सर्व कार्यक्रम आटोपून गरमागरम पोहे पोटात ढकलले. शांत वाटलं.

सोबत आनंद असल्याने त्याची फोटोग्राफी चालू झाली होती. आम्ही काहीजण रतनवाडी मध्ये पहिल्यांदाच आलो होतो. म्हणून राहुलची परवानगी घेऊन अमृतेश्वर मंदिराकडे  निघालो.  मंदिर अप्रतिम आहे. कलाकुसर नक्षीकाम गाभाऱ्यातील शांतता मन प्रफुल्लित करते. प्रवेशद्वारापाशी एका मोठया विरगळीचा वापर आधारासाठी केलेला दिसतो. मंदिर पाहून झाल्यावर काऊंट घेऊन लगेचच रतनगडाकडे कूच केले. वाटेतच सुंदर पुष्करणीही पहिली. अप्रतिम दगडांची रचना, आतमधील  कोनाड्यातील मूर्ती  मनात घर करतात. साडे सातच्या सुमारास आम्ही धरणाच्या बाजूने थंड वातावरणात आमची आगेकूच सुरु होती. मुबलक पाणी साठ्यामुळे परिसर समृध्द जाणवत होता. या धरणाच्या कडेलाच वेटोळे करून सर्वांच्या ओळखी करून देण्यात आल्या. बरेच नवीन सदस्य होते ट्रेकला. “मजा येणार होती” हे लक्षात आलं .

            हिरव्यागार सदाहरित जंगलातून आमचा प्रवास सुरु झाला. हळू हळू ऊन वाढत होतं. सावलीतून बाहेर आल्यावर ते जाणवत होतं .  पहिली चढाई दमछाक करणारीच असते. नंतर शरीराला त्याची सवय होते. अशा छान सदाहरित कळसूबाई – हरिश्चंद्र अभयारण्यातून आमची वाटचाल चालू होती. या वाटेवरूनच उजवीकडे आम्ही रतनगडाकडे वळलो. सरळ जाणाऱ्या वाटेवर जायला आम्हाला रतनगड बघून मग यायचे होते. पुन्हा एक छानशी चढाई केल्यावर शिड्यांची वाट लागली.वनविभागाने लावलेल्या शिड्या आमची वाट पहात होत्या.कडेने पायऱ्याही होत्या पण त्या सुस्थितीत नव्हत्या.सर्वानी शिड्यांवरून हळूहळू प्रवेशद्वार गाठले.एका सुंदर गजाननाच्या मूर्तीने आमचे स्वागत केले.अर्धवट उभी,मांड्या दुमडलेली मूर्ती आकर्षक आहे.प्रवेशद्वारातून उजवीकडे वळून सरळ आम्ही एका मोठया गुहेत थांबलो.लिंबू सरबताने क्षीण कमी झाला.

ऑगस्टिन आणि तन्मयने याआधी किल्ला पहिला असल्याने आमच्या बॅगांची माकडांपासून वाचविण्यासाठी त्यांना तिथेच थांबवून आम्ही गडप्रदक्षिणा करण्यासाठी निघालो.जिथून किल्ल्यावर प्रवेश केला होता,तिथूनच डावीकडे असलेल्या प्रवेशद्वाराने माचीवर आलो.या दारावरही रिद्धी सिद्धीसह गणेश आणि इतर दोन-तीन शिल्पे कोरलेली आढळतात.पुढे माचीवरून आजोबाचा डोंगर , माहुलीचा किल्ला नजरेत सामावतो.समोरच्या अजस्त्र सुळक्याचे आणि दरीने सह्याद्रीची कणखरता, भव्यता, जाणवते.मध्ये एक सेल्फी व्हायरल झाला होता,तो इथेच काढला होता,राहुलने पुस्ती जोडली.इथून मागे वळल्यावर एक पडका बुरुज नजरेत येतो, रचना अतिशय सुंदर आहे. लागूनच एक पाण्याचे टाके आढळते. इथून उजवीकडे उतरत्या पाण्याची टाक्यांची रचना लक्ष वेधून घेते.इथेच एका सर्पराजाने दर्शन दिले.

            उजवीकडे चालत गेल्यावर आपण साम्रद गावाकडे जाणाऱ्या कोकण दरवाजाकडे येतो.पायवाट खूपच भग्न अवस्थेत आहे.याच रस्त्याने पुढे एक भुयारी टाक्यातील पाण्याचा आस्वाद घेऊन नेढ्याकडे निघालो. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या नेढ्याचे मला नेहमी अप्रूप वाटते. नेढ्यात शांतपणे बसून खूप मोठा परिसर नजरेत येतो.कळसूबाई वरील मंदिरही पाहायला मिळालं. गार वारा अंगावर घेऊन समोरील पायवाटेने उतरण्यास सुरुवात केली. पायवाटेच्या डावीकडे एक दरवाजा व त्याच्या कोरीव २५ ते ३० पायऱ्या पाहण्यासारख्या आहेत.दरवाजांची रचना, दगडांची रचना पाहून हरखून जायला होतं. तसेच वर येऊन उजवीकडून चालत आपण पुन्हा पहिल्या बुरुजाकडे येताना डावीकडे वाड्यांचे भग्न अवशेष दिसतात. मगाशी आलो त्याच रस्त्यानेच गुहेकडे परत आलो. थोडी विश्रांती घेऊन शिडीच्याच वाटेने हळूहळू उतरण्यास सुरुवात केली.नेहमीच्या ट्रेक प्रमाणेच एक श्वान सोबतीला होताच.

            हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या रस्त्याशी एक छानसं झाडीदार ठिकाण पाहून शिदोरी उघडली.अश्विनीच्या जळवा आणि ऑगीच्या चिकनने मजा आणली.सोबत अंकिताने आणलेले श्रीखंड आणि हलवा होताच.जरा जास्तच पोटात गेल्याने गुंगी येत होती.दुपारचे २.०० वाजत आले होते.पुढील गावात पोहोचायला किमान ४ तास लागतील याची कल्पना देत राहुलने निघण्याचा निर्णय घेतला.वाटेवरच दोन्ही बाजूला दोन पाण्याची टाकी आढळतात.पुढील पायवाट पुन्हा गर्द झाडीतून चालू झाली.योगेश सरांना जरा गुडघ्याचा त्रास जाणवू लागला होता.त्यामुळे मी,जेधे,ऑगी आणि मुकुंद काकांनी त्यांच्यासोबत राहण्याचे ठरविले.पुढे काही अंतर चालून गेल्यावर कात्राबाईची खिंड सुरु झाली.दोन्ही बाजूनी डोंगर ,सोबत सर्व सवंगडी तसेच साम्रद मधून याच वाटेने पलीकडे सासुरवाडीला निघालेले एक कुटुंब यांच्यासोबत कधी खिंडीच्या वर पोहोचलो लक्षातच नाही आलं.तिथून थोडेसे उजवीकडे वर कात्राबाईचे दर्शन घेतले आणि डोंगर उतरण्यास सुरुवात केली.

            उतरणीची वाट जरा घसरडी जाणवत होती.मधेच जंगल.बाजूला सह्यकडे.उजवीकडे कात्राबाई.पाठीमागून एक मोठा शेळ्यांचा कळप एका वेगळ्याच मार्गाने पुढे गेला.गावातल्या त्या शेळ्यांसोबत असलेल्या माणसांचा शेळ्या हाकण्याचा एक विशिष्ट आवाज त्या शेळ्या खाली पोहोचेपर्यंत ऐकू येत होता.योगेश सरांना गुडघा जरा जास्तच त्रास देत होता.त्यामुळे वेळ follow करण्यासाठी त्यांना झोळी करून सपाट मैदानापर्यंत आणलं. राहुलची निर्णयक्षमता , सर्वांचे पाठबळ याचा सुंदर प्रत्यय आला.खाली आल्यावर कुमशेजला अस्वल्यांकडे मग सगळे रमतगमत , काहीजण जीपमधून डेरेदाखल झालो.

            दोन तीन दिवसांच्या ट्रेक ची खरी मजा असते , ती म्हणजे रात्रीचे जेवण,गप्पा,ओळखी , नवीन माहिती यांची देवाण घेवाण यांमध्ये. नाष्ट्यासाठी बाकरवडी बाहेर पडली, द्रुमनकडचे ते यंत्र, हातपाय धुण्यासाठी नंबर लावण्यातली मजा काही औरच.जेवणाचा आनंदाने आस्वाद घेऊन केलेल्या व्यवस्थेप्रमाणे सर्वजण माताजींचा आशीर्वाद घेऊन निद्राधीन झाले.

            सकाळी ५.३० वाजता लीडरच्या आधीच आनंदने उत्साहाने सर्वाना उठवायला सुरुवात केली.  सकाळचे सर्व सोपस्कार आटोपून, मस्त चहा घेऊन अस्वले काकांसोबत पेठेच्यावाडी कडे प्रस्थान केले. एका सुंदर मातीच्या रस्त्याने प्रवास सुरु झाला. मधेच रस्ता संपून जंगलवाट सुरु झाली. त्याच वाटेने गर्द झाडीत एक नदी पार करत काही वेळातच पेठेच्या वाडीत पोहोचलो. आपल्या आडनावाचे गाव असल्याची माहिती आत्ताच मिळत होती. ड्रायव्हरकाका बरोबर वाट शोधत गावात आले होते. इथून कलालगडच्या बाजूने पाचनईकडे प्रवास सुरु झाला. वीस- पंचवीस मिनिटातच थोड्याशा खराब वळणावळणाच्या रस्त्याने पाचनई मध्ये आलो. राहुल नाष्ट्याची व्यवस्था करण्यासाठी गेला. तोपर्यंत आम्ही मंदार सोबत सगळ्यांनी शाखेची पद्य म्हणायला सुरुवात केली. आमच्या गाडीच्या शेजारीच सावलीत बसून सगळेच पद्य म्हणण्यात रंगून गेले होते. तेवढ्यात राहूलने नाश्ता तयार असल्याचा इशारा दिला. गरमागरम शेंगायुक्त पोहे खायला मजा आली. शेंगांसाठी भांडत, चहा पिऊन पाचनईमार्गे हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली. डोंगर, बाजूला रेलिंग, फेबृवारीतही हिरवगार जंगल, सोबत कोवळं आणि नंतर हळूहळू डोक्यावर चढत जाणाऱ्या उन्हाच्या सोबतीने दीड पावणेदोन तासात हरीश्चन्द्रावरील मंदिर नजरेस पडलं. दुसऱ्यांदा आलो होतो गडावर. मागच्या वर्षी याच वेळेस नळीच्या वाटेने गड सर केला होता. महादेवाचं पुरातन मंदिर, स्तंभावरील शिल्प, शिलालेख आणि भूमिगत टाक्यातील पाण्याने आत्मा शांत झाला. लगतच असलेल्या केदारेश्वराच्या कुंडात उतरण्याचे ठरवलं. पाणी कमीच होतं आतमध्ये. माझ्यानंतर एकामागोमाग एक सगळे पाण्यात उतरले. महाशिवरात्र आदल्याच दिवशी झाली होती त्यामुळे पाण्यात दुध मिसळलेले जाणवत होते. सुरुवातीला थंड वाटणाऱ्या पाण्यात तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळेस अवयवांची जाणीव नाहीशी झाली. निसर्गाचा एक चमत्कार अनुभवून गणेश गुहा, साहेबाची गुहा पाहून कोकणकड्यावर पोहचलो. पुन्हा एकदा तो अजस्त्र कडा पाहताना आठवणी ताज्या झाल्या. आयुष्यात एकदा तरी पहावाच आणि सर करावाच असा हा सह्यकडा. काय वर्णन करावे या खोलगट उभ्या भिंतीचे. समोर नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरवगड, नाणेघाट, जीवधन, नळीची वाट यांचे दर्शन झाले. मनातून सह्याद्रीला वंदन करत भास्करच्या घरी बाजरीची भाकरी, पिठलं, खरडा, बटाट्याची भाजी असा फक्कड मामला पोटात सारत पुन्हा मंदिराच्या दिशेने निघालो. उन्हाचा कडाका वाढत होता. मी ओला टॉवेलच डोक्यावर ठेऊन चालत होतो. मंदिरातील टाक्यातून पाणी भरून घेतलं. शिखरावरील समाधीच्या जागेची नव्याने ओळख झाली.

            आता सरळ सुसाट निघायचं ठरवलं. हळू हळू उतरलं की पाय दुखतात.. त्यामुळे फक्त एका ठिकाणी थांबत पाकोळ्यांच्या साथीने अर्ध्या तासात मी, राहुल आणि शार्दुलने पाचनई गाठलं. थोड्याफार फरकाने सगळे गाडीपाशी आले. योगेश काकांनी गाडीतच एक छानशी झोप काढली होती. थोडे ताजेतवाने झाल्यावर राजूर कडे निघालो. इथून पुढचा प्रवास एक दिव्यच होतं. राजूर तसं छोटेसे खेडे. इथून अकोले बस नव्हती. त्यामुळे रस्त्यावर थांबून मी, प्रथमेश, अश्विनी, अंकिता आणि निनाद टमटमने संगमनेर आणि तिथून पुण्याला बसने आलो. उशीर झाला तसं पोचायला. डाळ खिचडी ने एका धाब्यावर क्षुधाशांती केली.

            रात्री अंकिता तिच्या भावासोबत रिक्षाने तर मी, अश्विनी आणि प्रथमेश स्नेहलताई कडे आलो. रेंज ट्रेकची आता सवय झाली असल्यामुळे असेल पण ४४ किलोमीटर अंतर पायी कापल्याचे जाणवलेच नाही. रतनगड मनात खऱ्या अर्थाने स्पर्शून गेला तो नेढ्यातून पाहिलेल्या शिकऱ्यामुळे.

"भटका श्रेयस"
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 1.453 seconds.