Print Page | Close Window

Vasota - Nageshwar range trek वासोटा -

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Range treks in Sahyadri
Forum Description: Sahyadri is one of the mountain ranges in world which offers wide array of trails. Following section is an attempt to document such range treks. Wish our Sahyadrians like it!!
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=304
Printed Date: 11 Jan 2025 at 9:02am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Vasota - Nageshwar range trek वासोटा -
Posted By: amitsamant
Subject: Vasota - Nageshwar range trek वासोटा -
Date Posted: 15 Dec 2014 at 1:05pm
वासोटा - नागेश्वर ट्रेक  
वासोटा - नागेश्वर हा सह्याद्रीतल्या एक सुदंर ट्रेक आहे. नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. कोयना अभयारण्याच्या निबिड जंगलातून, नागेश्वरच्या डोंगर धारेवरून वासोट्याची आणि सह्याद्रीच्या रौद्र सौंदर्याची विविध रुप न्याहळत केलेला ट्रेक कायम स्मरणात राहतो. वासोट्यावरुन समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो, तो खोटा (छोटा) नागेश्वर, त्याच्या पुढे दुरवर एक सुळका दिसतो त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे. नागेश्वरच्या पायथ्याच्या गावातील लोकांच हे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी शिवरात्रीला या पवित्र स्थानी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. गुहेच्या छतावरून बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक शिवलिंगावर होत असतो. 

वासोटा - नागेश्वर हा शरीर - मनाची कसोटी पाहाणारा खालील चार वाटांनी ट्रेक एका दिवसात करता येतो. 
१) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - आल्यावाटेने परत मेट इंदवली.
२) सातारा - बामणोली -मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - नागेश्वर कुंड - ओढ्याच्या वाटेने - मेट इंदवली
३) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - चोरवणे - चिपळूण 
४) चिपळूण - चोरवणे - नागेश्वर - वासोटा - मेट इंदवली -बामणोली - सातारा.
वरील ट्रेकस वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास चारही मार्गाने एका दिवसात करता येतो.

Vasota Nageshwar trek

१) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - आल्यावाटेने परत मेट इंदवली :-
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी वापरली जाणारी सर्वात प्रचलित वाट मेट इंदवलीहून आहे. त्यासाठी सातार्‍याहून बामणोली या गावी यावे. सातरा - बामणोली अंतर ३० किमी आहे. सातारा - कास पठार - बामणोली या सुंदर रस्त्याने तासभरात बामणोलीला पोहोचता येते. बामणोलीला जाण्यासाठी सातार्‍याहून बसची सोय आहे. बामणोलीहून कोयना धरणाचा शिवसागर जलाशय लाँचने पार करून मेट इंदवलीला पोहोचायला दिड तास लागतो. 
मेट इंदवलीला वनखात्याचे ऑफ़िस आहे तिथे आपली व आपल्याकडील पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या यांची नोंद होते व त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूसाठी रुपये १०/- डिपॉझिट भरल्यावर गडावर जाण्याची परवानगी मिळते. ( ट्रेक हून परत येताना नेलेल्या सर्व वस्तू परत दाखवल्यावर डिपॉझिट परत केले जाते. जंगलात होणारा प्लास्टीकचा कचरा कमी करण्यासाठी जंगलखात्याने ही अभिनव योजना चालू केली आहे.) 

वन खात्याच्या कार्यालया मागून जाणारी वाट १५ मिनिटात एका छप्पर नसलेल्या मंदिरापाशी घेउन येते. येथे हनुमानाची व गणपतीची मुर्ती आहे. पुढे ओढा ओलांडल्यावर वासोट्याचा चढ चालू होतो. येथून साधारणपणे १ ते १.३० तासात आपण वासोटा आणि नागेश्वरच्या फ़ाट्यावर पोहोचतो. येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वरला जाते. तर सरळ चढत जाणार्‍या वाटेने ३० मिनिटात गडावर पोहोचता येते. मेट इदंवलीहून मळलेल्या वाटेने २ ते २.३० तासात गडावर पोहोचता येते. गड पाहाण्यास १ तास लागतो. 

गड पाहून २० मिमिटात पुन्हा आपण वासोटा नागेश्वर फ़ाट्यापाशी येतो. या फ़ाट्यावरून वाट गर्द झाडीत शिरते. अनेक चढ उतार पार करुन खोट्या नागेश्वरला वळसा घालून (खोटा नागेश्वर आपल्याला यावाटेवरून दिसत नाही कारण आपण जंगलात खालच्या बाजूने मार्गक्रमण करत असतो.) आपण साधारणपणे ४५ मिनिटात जंगलाच्या बाहेर येतो. आता समोर दुरवर नागेश्वरचा सुळका दिसत असतो. इथून डोंगर धारेवरुन चढ उतार पार करत साधारणपणे १.३० ते २.०० तासात आपण नागेश्वर गुहेपाशी पोहोचतो. आल्या मार्गाने परत गेल्यास वासोटा नागेश्वर फ़ाट्यापाशी पोहोचण्यास ३ तास लागतात व तेथून पायथ्यापर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिट लागतात. 

२) सातारा - बामणोली -मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - नागेश्वर कुंड - ओढ्याची वाट - मेट इंदवली :- 
सातारा ते नागेश्वर क्रमांक (१) मधे सांगितल्याप्रमाणे जावे. नागेश्वरचे दर्शन घेउन खाली उतरल्यावर उजवी कडील वाट चोरवणे गावात उतरते तर डावीकडील वाट नागेश्वर कुंडाकडे जाते. डावीकडील वाटेने खाली उतरुन प्रथम नागेश्वर कुंडातील पाणी भरुन घ्यावे. तिथुन खाली उतरायला सुरवात केल्यावर १० मिनिटानी आपल्याला एक ओढा दिसतो. या वाटेवर असंख्य दगडधोंडे पडलेले आहेत. यावाटेने दगडधोंड्यातून, साचलेल्या पाण्याला वळसे घालत आपण २ तासात छप्पर नसलेल्या हनुमानाची व गणपतीची मंदिरापाशी येतो. तेथुन १५ मिनिटात वन खात्याच्या कार्यालयाजवळ पोहोचतो. ही वाट उताराची असल्याने क्रमांक (१) च्या वाटेपेक्षा ओढ्याच्या वाटेने उतरायला कमी वेळ लागतो. 

Bamnoli- Vasota - Nageshwar Route marked with the help of GPS

३) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - चोरवणे - चिपळूण :- 
सातारा ते नागेश्वर क्रमांक (१) मधे सांगितल्याप्रमाणे जावे. नागेश्वरचे दर्शन घेउन खाली उतरल्यावर उजवी कडील वाट चोरवणे गावात उतरते तर डावीकडील वाट नागेश्वर कुंडाकडे जाते. उजवी कडील वाटेने खाली उतरल्यास ३ तासात आपण चिपळुण जवळील चोरवणे गावात पोहोचतो. या वाटेने जाण्याचा फ़ायदा म्हणजे ही वाट आणि चोरवणे गाव अभयारण्य क्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे उशिर झाला तरी चालू शकतो. या वाटेचा तोटा म्हणजे बामणोली ते मेट इंदवली बोटचे जाण्या येण्याचे पैसे द्यावे लागलात. (खाजगी वाहन असल्यास सकाळी बामणोलीला सोडून आपल्याला वाहान चोरवण्याला मागवता येईल. चोरवण्याहून एसटी सकाळची आहे.)

४) चिपळूण - चोरवणे - नागेश्वर - वासोटा - मेट इंदवली -बामणोली - सातारा :-
हा ट्रेक वरील सर्व ट्रेक मधील सर्वात कठीण आणि थकवणारा ट्रेक आहे. कारण चोरवणेहुन (कोकणातून) पूर्ण घाटमाथा चढुन नागेश्वरला याव लागत. या वाटेवर कोठेही पाणी नाही आहे. या वाय़ेने येण्यासाठी चिपळुणहून एसटीने किंवा खाजगी वाहानाने चोरवणे गाठावे. (सकाळची पहिली एसटी उशिरा असल्याने रात्रीच गावात मुक्कामास गेल्यास उत्तम) चोरवणेहुन खडा चढ चढुन नागेश्वर गाठायला ५ ते ६ तास लागतात. या वाटेवर कोठेही पाणी नाही. नागेश्वर पाहून वासोटा गाठतानाही चढ उतार पार करत आपण साधारणपणे २.०० ते ३.०० तासात वासोटा आणि नागेश्वरच्या फ़ाट्यावर पोहोचतो. येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वरला जाते. तर सरळ चढत जाणार्‍या वाटेने ३० मिनिटात गडावर पोहोचता येते. वासोटा पाहून मेट इंदवलीला उतरायला १ तास लागतो. परतीच्या प्रवासासाठी बामणोलीतून बोट आधी सांगुन ठेवावी लागते. यामार्गात शेवटच्या टप्प्यात जंगल नसल्याने आपण भर उन्हात या भागात पोहोचतो. त्यासाठी पहाटे लवकर ट्रेक चालू केल्यास फ़ायदा होउ शकतो. या वाटेचा तोटा म्हणजे बामणोली ते मेट इंदवली बोटचे जाण्या येण्याचे पैसे द्यावे लागलात. तसेच या ट्रेकमधे उशिर होण्याचा पूर्ण संभव असल्याने वनखात्याच्या कारवाईस सामोरे जाण्याची शक्यता जास्त असते. (खाजगी वाहन असल्यास सकाळी चोरवण्याला सोडून आपल्याला वाहान चोरवण्याला मागवता येईल. बामणोलीहून एसटी सकाळ ६.०० ची आहे.)
     
सूचना :
१) बामणोली येथून मेट इंदवलीला जाण्यासाठी बोटी मिळतात. एका बोटीत १२ माणसे घेतात. १ माणुस असो की १२ माणस असोत, एका बोटीचा दर रुपये ३०००/- (२०१४ साली) आहे.
२) यातील (१),(२),(४) क्रमांकाचे ट्रेक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामणोलीला पोहोचणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. सूर्य मावळल्या नंतर पोहोचल्यास बामणोली येथे वनखात्याकडून कारवाई केली जाते. (पंचनामा केला जातो व माणशी रुपये १००/- दंड आकारला जातो.) तसेच अंधार पडल्यावर बोट चालवणारे अडवणूक करतात त्यांनाही जास्तीचे पैसे द्यावे लागतात.   
३) वासोटा - नागेश्वर परीसर कोयना अभयारण्यात गेल्यामुळे तेथे राहाण्याची परवानगी नाही. 
४) चिपळूणहून चोरवणे मार्गे नागेश्वर - वासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही, तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.
५) वासोट्याला पावसाळ्यात जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी
६) पिण्याच्या पाण्याची सोय वासोटा किल्ल्यावर व नागेश्वर कुंडात आहे.
७) वासोटा - नागेश्वर ही दोनही ठिकाणे कोयना अभयरण्यात असल्यामुळे रात्री राहाण्यास परवानगी नाही. तरी आणिबाणीच्या वेळेला खालील ठिकाणी मुक्काम करता येईल.
अ) वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते.
ब) वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते.
क) नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.

८) http://trekshitiz.com/marathi/Vasota-Trek-V-Alpha.html" rel="nofollow - वासोटा किल्ल्याची सविस्तर माहिती साईटवर दिलेली आहे.


Amit Samant

Vasota Fort. Vasota Nageshwar, Vasota Nageshwar range trek, Vasota Nageshwar Choravane trek, Range treks in Maharashtra, Tough treks in Maharashtra.




Replies:
Posted By: kushal deolekar
Date Posted: 16 Dec 2014 at 1:06pm
Amit dada..ekdum mast info. Share keli ahe..mahiti madhil chotya mothya goshti(botpravas,charges etc...) farch upyogi padtil.



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk