हिंदू धर्मात शैव व वैष्णव हे प्रमुख पंथ होते. लेण्यांवरही यांचा प्रभाव दिसून येतो. लेण्यांमधून शिव पुराणातल्या कथांवर आधारीत शिल्पपट कोरण्यात आले आहेत.
अंधकासूरवध:- या शिल्पगटात भगवान श्रीशंकराची अष्टभुज मुर्ती आहे. पुढील दोन्ही हातात त्रिशूल धरुन त्यावर अंधकासुराला लटकवून सूर्याच्या जवळ नेण्याच्या प्रयत्नात असलेला शिव येथे आपल्याला दिसतो.
नटराज शिव:- ललित नृत्य करणारी ही शिवप्रतिमा अष्टभूज आहे. वरील पहिला डावा हात कर्ण मुद्रेत, दुसरा हात गजहस्त मुद्रेत छातीवर आहे. त्या खालील डाव्या हातात सर्प धरलेला आहे. तर चौथ्या डाव्या हातात चंद्रकोर धरलेली आहे. पहिला उजवा हात वितर्क मुद्रेत आहे, त्या खालील उजव्या हातात डमरु धरलेले असून तिसर्या हातात त्रिशूल आहे. चौथा हात नृत्याच्या पताका मुद्रेत आहे.
उमा-महेश्वर मुर्ती:- उमा-महेश्वर चौरस खेळताना दिसत आहेत शिवाने पार्वतीचा उजवा हात डाव्या हातात धरलेला आहे शिव चतुर्भुज आहे दुसरा डावा हात जमिनीवर टेकवलेला आहे. एका उजव्या हातात सर्प आहे. दुसरा उजवा हात मांडीवर आहे. पाणिग्रहण मुर्ती किंवा कल्याणसुंदर मुर्ती:- शिवपार्वती विवाहाचे दृश्य दाखवलेले हे शिल्प आहे. शिवाच्या उजव्या हातात पार्वतीने आपले दोन्ही हात दिलेले आहेत. दोन्ही बाजूला दोन गदाधारी द्वारपाल उभे आहेत. मध्यभागी ब्रह्मा पौरोहित्य करण्यासाठी उभा आहे.
रावणानुग्रहमुर्ती:- रावण आपल्या वीस भुजांनी भगवान शंकराचे निवासस्थान असलेला कैलास पर्वत हलवीत आहे हे दाखवणारा हा शिल्पपट आहे.
मार्कंडेय अनुग्रह मुर्ती:- ब्राह्मणपुत्र मार्कंडेयाचे प्राण घेण्यासाठी आलेल्या यमराजाला रोखण्यासाठी साक्षात शिव लिंगामधून अवतरला आहे.
गंगावतरण:- यात गंगावतरणाचा प्रसंग कोरलेला आहे मध्यभागी शिवपार्वती उभे आहेत. पार्वतीने दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. शिवाने उजव्या हाताने जटांमधून कोसळणार्या गंगेला सावरले आहे. तर आपला डावा हात पार्वतीच्या भोवती लपेटलेला आहे. बाजूलाच राजा भगीरथ एका पायावर उभे राहून तप करीत आहे.
लिंगोद्भवमुर्ती:- ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची उपस्थिती आहे. ‘लिंगोद्भव मुर्ती’ म्हणून हे शिल्प ओळखले जाते. लिंगामधून शिव उद्भवतो, त्यामुळे मध्यभागी असलेल्या लिंगामध्ये शिवमुर्ती दाखवलेली आहे. डाव्या बाजूला चतूर्भूज विष्णू आहे, तर उजव्या बाजूला चतुर्भुज ब्रह्मा आहे. त्रिपुरान्तक मुर्ती:- अंधकासुराचे तीन राक्षसपुत्र विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी स्वर्ग, आकाश आणि पृथ्वी येथे बांधलेल्या तीन महालांचा विनाश करणार्या शिवाची पुराणकथा सांगणारा हा शिल्पपट आहे. चार घोड्यांच्या रथामधे शिव बसलेला आहे. एका डाव्या हाताने त्याने पिनाक धरलेले आहे. एका उजव्या हातात खड्ग, दुसर्या उजव्या हाताने तो भात्यातून बाण काढीत आहे.
केवलमुर्ती:- हि एक चतुर्भुज शिव प्रतिमा आहे.
भिक्षाटन शिवमुर्ती:- पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी नग्न भिक्षूच्या रुपातील शिव पार्वती समोर भिक्षा मागतांना येथे दाखवलेला आहे.
शिव:- सरोवरातील मगरीने उजवा पाय तोंडात धरलेला आहे, असे सांगून पार्वतीचा उजवा हात मागणारा शिव यात दाखवलेला आहे.
अर्धनारीश्वर शिव:- शिवाच्या जटांङ्कधील गंगेच्या अस्तित्वामुळे दु:खी झालेल्या पार्वतीला सङ्कजावून सांगताना शंकराने स्वत:ला अर्धनारीश्वर रुपात सादर केले आणि अर्धांगी असलेली पार्वती म्हणजे स्वत:चे अर्धे शरीर आहे हे दाखवून दिले.
|