बंदुकीच्या
दारुच्या शोधाबरोबर हातातील बंदुक तयार करण्यात यश आले. बंदुकीचा पहिला उपयोग इ.स.
१३२४ मधील मेझच्या वेढ्यात केलेला आढळतो. या १० पौंड वजनी बंदुका हातात धरुन लक्ष्याकडे
नेम धरणे व त्याचबरोबर स्फोटक द्रव्याला बत्ती लावण्यासाठी जळत्या काडीवर नेर ठेवणे,
या दोंन्ही गोष्टी सैनिकाला एकदम कराव्या लागत. १५ व्या शतकात जर्मनीत विकसित झालेल्या
मॅचलॉक तंत्रामुळे, जळत्या काडीचे टोक चाप ओढल्याबरोबर स्फोटक द्रव्याच्या जागी आपोआप
जाऊन बार उडण्याच्या क्रियेमुळे, सैनिकाला नेमबाजीकडे लक्ष केंद्रीत करण्यास अवसर मिळू
लागला.मॅचलॉक तंत्राचा वापर करुन स्पेन मध्ये ६ फूट लांब, १५ पौंड वजनाची मस्कत ही
प्रभावी बंदुक विकसित झाली. १६३५ नंतर, मॅचलॉक पध्दतीतील तांत्रिक अडचणींवर मात करत
विकसित झालेल्या फ्लींट लॉक बंदुकीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. फ्लींट लॉक पध्दतीत
प्रज्वलन क्रिया झटपट होत असे, त्यामुळे पावसाळी वातावरणातही यातून गोळीबार करता येत
असे. फ्लींट लॉक ही मॅचलॉकपेक्षा सुलभ, वजनाने हलकी व स्वस्त बंदुक होती.
सोळाव्या शतकात बाबराबरोबर बंदुक या शस्त्राचे भारतात आगमन झाले. कनवाच्या
युद्धात बाबराच्या सैन्याच्या बंदुकीच्या गोळ्यांना राणासंगाचे कोणकोणते रजपुत सेनापती
कामी आले. याचे उल्लेख बाबराच्या आत्मचरित्रात आढळतात. इतकेच नव्हे तर २०० वर्षानंतर
झालेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईत इ.स. १७६१ मध्ये बंदुकीच्या गोळ्यांनी मराठ्यांचे
दत्ताजी शिंदे व बळवंतराव मेहंदळेसारखे मातब्बर सरदार मारले गेले.
आधुनिक बंदुक सुधारणेच्या पहिल्या
टप्प्यात चार महत्त्वाच्या सुधारणांचा उल्लेख करता येईल:
१) आघात टोपी:- गारगोटीच्या चापाऐवजी आघात टोपीचा उपयोग
केल्याने पावसाळ्यातही गोळीबार करता येऊ लागला. इ.स. १८०७ मध्ये अलेक्झांडर फॉरसिय
या स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञाने पोटॅशियम क्लोरेट अशी अत्यंत स्फोटक अशी दारुगोळी पावडर
तयार केली.
२) रायफलिंग:- बंदुकीची नळी आतील बाजूने एका विशिष्ट
अशा मळसूत्राकार पध्दतीने कोरण्यात येते. या रायफलिंग पध्दतीने नळीतून सुटलेली गोळी
आपल्या आसाभोवती गरागरा फिरत अतिशय वेगाने लक्ष्याच्या शरीरात घुसून मर्मभेद करते अमेरिकन
क्रांतियुध्दात या शस्त्राचा अत्यंत यशस्वी उपयोग करण्यात आला.
३) लंबवर्तुळाकार गोळी:- इ.स. १८२३ मध्ये कॅ नॉरटानने
विकसित केलेल्या लंबवर्तुळाकार लहान गोळीला नळीच्या बाहेर पडताना, फुगुन चक्राकार फिरण्यामुळे
उत्कृष्टता प्राप्त झाली.
४) कागदी काडतूस:-
मॅचलॉक व फ्लींट लॉक नंतर आस्तित्वात आलेल्या पर्युशन पध्दतीत काडतुसाच्या
टोपणावर प्रहार केला जात असे. बंदुकीची गोळी कागदी वेष्टनात गुंडाळून प्रमाणित केलेली
ठराविक दारु त्यामध्ये भरण्यात येत असे. पावसाळी हवेचा त्या गोळीवर परिणाम होऊ नये
यासाठी कागदी काडतुसाला वरुन चरबीचा लेप देण्यात येत असे. ह्याच चरबीच्या काडतूसाचे
नैमित्तिक कारण होऊन १८५७ चे स्वातंत्र्य समर घडले होते.
|