वाचे नाव :- शिंगणापूर जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- दहीवडी, गोंदवले, फलटण, अकलूज.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात शिखर शिंगणापूर येथे प्राचिन स्वयंभू शिवमंदिर आहे. माण तालुक्यातून जाणार्या डोंगररांगेला महादेव डोंगररांग म्हणतात. या डोंगररांगेत वारूगड, वर्धनगड, महिमानगड, कल्याणगड हे किल्ले आहेत. याच रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे.
पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.
आजही दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
इतिहासात डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजाने हे गाव वसविले होते. त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे.
शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी गावात मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
इ.स.१७३५ मध्ये शाहू महाराजांनी देऊळाचा जिर्णोध्दार केला. त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्या आहेत.
इ.स. १९७८ मध्ये शिखर शिंगणापूर मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोध्दार करण्यात आला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्य तज्ञाकडून ६० फूटी शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.
शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे.
काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे.
मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.
जाण्यासाठी :- सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये, सातारा - पंढरपूर रस्त्यावर, सातार्या पासून ६४ कि.मी. अंतरावर दहिवडी गाव आहे. दहिवडी गावापासून २२ कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर आहे.
पुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात. २) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ. ३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा. ४) अकलूजचा किल्ला ४५ किमी. सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Shikhar Shinganapur Shiv Mandir , Village :- Shikhar Shinganapur , Dist :- Satara, Nearest city :- Dahiwadi, Gondawale, Phaltan, Akluj.
|