१) नागार्जुन कोठी लेणी :- ही जैन लेणी असुन लेण्याच्या बाहेर विजयस्तंभ कोरलेला आहे. स्थानिक लोक याला सतीचा खांब म्हणतात. मुल होण्यासाठी या खांबाला नवस बोलला जातो. या लेण्याचे व्हरांडा व आतली सभामंडप असे दोन भाग आहेत. व्हरांडा १८ ' x ६' असुन तो चार खांबावर तोललेला आहे. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला बाकं असलेली बैठकीची खोली आहे. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर तिर्थंकर कोरलेले आहेत. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन हत्तींची मस्तक कोरलेली आहेत.
सभामंडप २०’ x १८ ' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. या खांबांवर अंबा व इंद्र यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर कमळावर पद्मासनात बसलेल्या महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. त्यांच्या मस्तकावर मकर व चक्र कोरलेले आहे. महावीरांच्या बाजुला दोन दिगंबर मुर्ती कोरलेल्या आहेत. वरच्या बाजुस दोन चवरी ढाळणारे सेवक कोरलेले आहेत. सोबत गंधर्व, सेविका कोरलेल्या आहेत. गुहेच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गोमटेश्वराची ४ फूटी मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूला ४ तिर्थंकर कोरलेले आहेत.
गुहेच्या उजव्या बाजूला वरच्या अंगाला पाण्याच टाक आहे. त्याच्या खालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो.
2) सीता न्हाणी :- प्रभु रामचंद्र वनवासाला आले तेव्हा त्यांचा इथे मुक्काम केला होता अशी दंतकथा आहे. ही हिंदु लेणी असुन त्याचे व्हरांडा व सभामंडप असे दोन भाग आहेत. व्हरांडा १८'x ४' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. खांबावर कधीकाळी काढलेली नक्षी आज अस्पष्ट झालेली आहे. सभा मंडप २४' x १३' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात कुठलीही मुर्ती अथवा कोरीवकाम आढळत नाही.
लेण्याकडे तोंड करुन उभे राहील्यास उजव्या बाजुस जाणार्या पाउलवाटेच्या वरच्या बाजुस कातळात कोरलेल पाण्याच टाक आहे.
3) शृंगार चावडी लेणी :- कन्हेरगडा खालील सर्वात सुंदर लेणी म्हणजे शृंगार चावडी लेणी. ही हिंदु लेणी अकराव्या शतकात कोरलेली आहेत. त्याचे व्हरांडा व सभामंडप असे दोन भाग आहेत. व्हरांडा इंग्रजी 'L" आकाराचा असुन तो चार खांबांवर तोललेला आहे. खांबावर सुंदर नक्षीकाम केलेल आहे.या खांबावरील शिल्पपटात काही शृंगार शिल्प कोरल्यामुळे या लेण्याला शृंगार चावडी लेणी नाव पडल असाव. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेल आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन फूलं कोरलेली आहेत. लेण्यातील सभा मंडप ७' x १०' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात कुठलीही मुर्ती अथवा कोरीवकाम आढळत नाही.
लेण्याच्या अलिकडे पायवाटेच्या बाजूला एक पाण्याच टाक खोदलेल आहे.
जाण्यासाठी :- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर (पाटणा गावाच्या पुढे) महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पूरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो.
मंदिराच्या बाजूने (मंदिर उजव्या बाजूला ठेऊन) जाणार्या पायवाटेने मंदिराच्या मागे जावे. थोडे अंतर चालल्यावर पायवाट डावीकडे वळावे. पुढे सरळ जाणारी पायवाट सोडून उजवीकडे जाणारी पायवाट पकडावी. येथे सिमेंटमध्ये बांधलेली एक छत्री (समाधी) आहे. ही समाधी ओलांडली की आपण कन्हेरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. मंदिरापासून गड पायथ्याला जाण्यास १० मिनिटे लागतात.
कन्हेरगडाचा डोंगर आग्नेय - वायव्य ( South East - North West) पसरलेला आहे. या डोंगरावरील कातळ टोपीखाली नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. ती पाहून गडावर जाण्यासाठी प्रथम डोंगराच्या पायथ्याच्या समाधी पासून डोंगरावर चढणार्या पायवाटेने ५ मिनिटांचा खडा चढ चढून जावे. येथे आपल्याला आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे, (डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला) २ मिनिटे सरळ चालल्यावर उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. या वाटेवर सिमेंटने बांधलेल्या काही पायर्या आहेत. ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर पायवाट उजवीकडे वळते (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला) आपण या वाटेने २ मिनिटात नागार्जून कोठडी लेण्यांपाशी पोहोचतो. नागार्जून कोठी लेण्यांखालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो.
सीता न्हाणी लेणी पाहून पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे डाव्या बाजूला २०-२५ फूटी कातळ कडा (रॉक पॅच) दिसतो, तो चढून गेल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. खालच्या पाटणा गावातून येणारी ठळक पायवाट या ठिकाणी येऊन मिळते. पाटणा गावातील लोक याच वाटेने गडावर किंवा पलिकडच्या गावात जातात. या कड्याजवळ आल्याची दुसरी खूण म्हणजे येथून खालच्या जंगलात वन खात्याने बांधलेला वॉच टॉवर उठून दिसतो.
प्रथम गडावर न जाता राहीलेले तिसर लेण म्हणजे "शृंगार चावडी लेणी" प्रथम पाहून घ्यावी. त्यासाठी (रॉक पॅच) खालून जाणार्या पायवाटेने डोंगराला वळसा घालुन सरळ चालत जावे. ५ मिनिटात आपण २ डोंगरांमधील घळीत पोहोचतो. या घळीत असलेला ओढा ओलांडून डाव्या बाजूस थोडेसे वर चढून गेल्यावर कातळात कोरलेल्या ४-५ पायर्या लागतात. पायर्या संपल्यावर पाण्याचे टाक व त्यामागिल शृंगार चावडी लेणी दिसतात.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic191.html" rel="nofollow - पाटणादेवी मंदिर , http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic183.html" rel="nofollow - महादेव मंदिर , (दोन्ही मंदिरांची माहिती साईट्वरील प्राचीन मंदिर या सेक्शनमधे दिलेली आहे.) http://trekshitiz.com/marathi/Kanhergad%28Chalisgaon%29-Trek-K-Alpha.html" rel="nofollow - कन्हेरगड (साईटवर माहिती दिलेली आहे.)
Kanhergad, Chalisgaon, Patanadevi Mandir, Patanadevi temple, Mahadev Temple. Gautala Sanctuary,
Places around Chalisgaon, Places in Gautala Sanctuary