भोरगिरी - भिमाशंकर
भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल ह्या मार्गाने घाटावर जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा (कोकणातला) पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा (घाटावरचा) भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती. भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते.
भिमाशंकर ते भोरगिरी हा ट्रेक मुंबईकरांना आणि पुणेकरांना खालील मार्गांनी करता येतो. अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे.
१) मुंबई - भोरगिरी - भिमाशंकर - खांडस - मुंबई मुंबई - तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा भोरगिरी असा प्रवास करुन भोरगिरी गाठावे. (राजगुरु नगर ते भोरगिरी अंतर ५५ किमी आहे). राजगुरु नगरहुन वाडाला जाण्यासाठी बसेस आणि जीपची सोय आहे. वाडा ते भोरगिरी स्पेशल जीप करुन जावे लागते. राजगुरु नगर ते भोरगिरी स्पेशल जीप करुनही जाता येते. मुंबईहुन बोरीवली - भोरगिरी ही बस भोरगिरीला सकाळी १०.०० वाजता पोहोचते. कल्याण - भोरगिरी ही बस भोरगिरीला दुपारी २.०० वाजता पोहोचते. दोनही बस १५ मिनिटे थांबुन परत जातात. या दोनही बस राजगुरुनगर मार्गे भोरगिरीला जातात.
भोरगिरी - भिमाशंकर अंतर ८ किमी आहे. हा ३ तासांचा सोपा ट्रेक आहे. भोरगिरी गावातून गावा मागील डोंगरावर असलेल्या किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर कातळात खोदलेल्या दोन गुहा आणि त्यांच्या बाहेर फ़डकत असलेला भगवा झेंडा दिसतो. एक छोटा ओढा ओलांडुन आपण पाच मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्यापासून ५ मिनिटात आपण पहिल्या गुहेपाशी पोहोचतो. गुहा पाहुन झाल्यावर पुन्हा आलेल्या वाटेने परत जाऊन गुहेच्या विरुध्द दिशेला असलेल्या पायवाटेने (डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला ठेउन) डोंगर चढुन पाच मिनिटात आपण कोसळलेल्या तटबंदीतून गडमाथावर प्रवेश करतो. गडमाथा साधारणपणे गोल आहे. गडमाथ्यावरील अवशेष पाहायला अर्धा तास पुरतो. गडमाथ्यावर गर्द झाडीत काही पिंडी आणि वीरभद्राची भंगलेली मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या पिंडींच्या जवळच एक वाट खाली उतरतांना दिसते. या पायवाटेने खाली उतरल्यावर डाव्या बाजूला पायवाट खाली उतरते तिथे उध्वस्त प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. या प्रवेशव्दारातून जाणारी पायवाट भिमाशंकरला जाते.
पायवाटेने गर्द झाडीतून एक डोंगर अर्धा उतरुन आपण दोन डोंगरांच्या घळीत येतो. दुसरा डोंगर चढल्यावर आपण भोरगिरी भिमाशंकर या कच्च्या रस्त्यावर येतो. भिमा नदीचा प्रवाह डाव्या बाजुला ठेउन भिमाशंकरकडे जातांना दोन छोटे ओढे ओलांडावे लागतात. त्यापुढे भिमा नदीचा प्रवाह ओलांडावा लागतो. हा प्रवाह उथळ असला तरी पावसाळ्यात पाण्याला जोर असतो. अशावेळी बरोबर रोप बाळगावा. या ठिकाण पर्यंत कच्चा रस्ता आहे. प्रवाह ओलांडल्यावर पुढे दोन पायवाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट थेट भिमाशंकरला जाते. तर डाव्या बाजुला असलेला भिमा नदिला मिळणारा प्रवाह ओलांडून (नदी उजव्या बाजुला ठेउन) १५ मिनिटे वर चढत गेल्यावर आपण भिमाशंकरहुन गुप्त भिमाशंकरला जाणार्या वाटेवर पोहोचतो. इथुन ५ मिनिटे खाली उतरुन गेल्यावर आपण गुप्त भिमाशंकरच्या वरच्या बाजुला भिमा नदीच्या प्रवाहाजवळ पोहोचतो. पावसाळ्यात या प्रवाहाला जास्त पाणी असल्यास प्रवाह ओलांडण्यासाठी रोपची आवश्यकता भासते. त्यामुळे ३० फ़ुटी रोप बरोबर बाळगणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
गुप्त भिमाशंकर पाहुन मळलेल्या पाउलवाटेने भिमाशंकरला पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो. मुंबई भोरगिरी हा पहिल्या दिवसाचा पाच तासाचा प्रवास, कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला, गुप्त भिमाशंकर आणि भिमाशंकर मंदिर ही ठिकाण पहिल्या दिवशी पाहुन होतात. दुसर्या दिवशी सकाळी हनुमान मंदिर आणि नागफ़णी पाहुन दुपारच जेवण करुन गणेश घाट किंवा शिडी घाटाने ३ ते ५ तासात खांडसला उतरता येते.
२) वरील ट्रेक उलट्या मार्गाने म्हणजेच मुंबई - कर्जत - खांडस - भिमाशंकर - भोरगिरी या मार्गाने केल्यास थोडा कठीण होतो. कारण आपण कोकणातून चढुन घाटावर जातो. भिमाशंकरला पोहोचल्यावर त्याच दिवशी नागफ़णी आणि भिमाशंकर मंदिर पाहुन घ्यावे. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठुन भिमाशंकर - भोरगिरी हा ट्रेक चालु करावा. वाटचालीत गुप्त भिमाशंकर, भोरगिरी किल्ला, कोटेश्वर मंदिर ही ठिकाण पाहावीत. भोरगिरीहुन सकाळी १०.०० आणि दुपारी १४.०० वाजता अशा दोनच एसटी असल्याने वेळेचे काटेकोर नियोजन कराव. भोरगिरीहुन - राजरुनगरसाठी जीप मिळण कठिण आहे. तसेच भोरगिरीत जेवणाची सोय होणेही कठीण आहे. त्याकरता राजगुरुनगर गाठणे आवश्यक आहे. हे ध्यानात ठेउन वेळेच नियोजन कराव.
३) मुंबई आणि पुण्याहुन बसने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकरचे मंदिर पाहून भिमाशंकर - भोरगिरी हा ट्रेक चालु करावा. वाटचालीत गुप्त भिमाशंकर, भोरगिरी किल्ला, कोटेश्वर मंदिर ही ठिकाण पाहावीत. हा ट्रेक एक किंवा दोन दिवसाचा करता येईल. एक दिवस केल्यास नागफ़णी पाहाता येणार नाही. तसेच एका दिवसाच्या ट्रेकसाठी खाजगी वाहानाने मुंबई आणि पुण्याहुन तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा - डेहेणे - शिरगाव येथुन भिमाशंकरला जाणारा फाटा आहे (अंतर २१ किमी) या मार्गाने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकरला पाय उतार होऊन वाहान भिमाशंकर (२१ किमी) शिरगाव (१२ किमी) भोरगिरीला बोलवुन घ्यावे आणि आपण वर दिलेल्या मार्गाने भोरगिरी ते भिमाशंकर चालत यावे.
४) पुण्याहुन भोरगिरी - भिमाशंकर - भोरगिरी हा ट्रेक एक दिवसात करता येतो. त्यासाठी खाजगी वाहानाने भोरगिरी गाठुन कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला, गुप्त भिमाशंकर आणि भिमाशंकर मंदिर ही ठिकाण पाहुन परतीचा प्रवास त्याच दिवशी करता येईल. वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास हा ट्रेक एका दिवसात करता येतो. (बरोबर विजेरी (टॉर्च) बाळगणे आणि वाटाड्या घेणे आवश्यक आहे. परत येताना अंधार होण्याची शक्यता असते.) जाण्यासाठी :- भोरगिरीला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहुन तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा - डेहेणे - शिरगाव ( येथुन भिमाशंकरला जाणारा फाटा आहे. अंतर २१ किमी) - भोरगिरी असा रस्ता आहे. (राजगुरु नगर ते भोरगिरी अंतर ५५ किमी आहे). राजगुरु नगरहुन वाडाला जाण्यासाठी बसेस आणि जीपची सोय आहे. वाडा ते भोरगिरी स्पेशल जीप करुन जावे लागते. राजगुरु नगर ते भोरगिरी स्पेशल जीप करुनही जाता येते.
मुंबईहुन बोरीवली - भोरगिरी ही बस भोरगिरीला सकाळी १०.०० वाजता पोहोचते. कल्याण - भोरगिरी ही बस भोरगिरीला दुपारी २.०० वाजता पोहोचते. दोनही बस १५ मिनिटे थांबुन परत जातात. या दोनही बस राजगुरुनगर मार्गे भोरगिरीला जातात.
भोरगिरीला येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मुंबई आणि पुण्याहुन बसने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती वर दिलेली आहे.
सुचना :- १) भोरगिरी ते भिमाशंकर हा कच्चा रस्ता आहे. भिमानदी आपण जिथे ओलांडतो तिथे हा रस्ता संपतो. पुढे जाण्यासाठी दोन पायवाटा आहेत. एक पायवाट गुप्त भिमाशंकर करुन भिमाशंकरला जाते. तर दुसरी पायवाट थेट भिमाशंकरला जाते. भिमाशंकरला जातानांच गुप्त भिमाशंकर पाहिल्यास पुन्हा त्यासाठी वेगळे येण्याची आवश्यकता भासत नाही आणि वेळ वाचतो. भिवगड ते खांडस ट्रेक करणार्यासाठी तर हे आवश्यक आहे.
२) या ट्रेकमधे दोन ठिकाणी भिमा नदीच्या पाण्याचा प्रवाह ओलांडावा लागतो. तसेच गुप्त भिमाशंकर पाहाण्यासाठीही भिमा नदीच्या पाण्याचा प्रवाह ओलांडावा लागतो. प्रवाह उथळ असला पावसाळ्यात पाण्याचा पाण्याची पातळी बर्याचदा पटकन वाढते. त्यामुळे ३० फ़ुटी रोप सोबत बाळगावा.
३) भोरगिरी ते भिमाशंकर ही वाट मळलेली असली तरी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने, गुप्त भिमाशंकर मार्गे जाणारी वाट पटकन सापडण्यासाठी वाटाड्या घेण आवश्यक आहे. पावसाळ्यात बर्याचदा ढग उतरल्यामुळे वाट नीट सापडत नाही. त्यावेळी वाटाड्या आवश्यक आहे.
४) http://trekshitiz.com/marathi/Bhorgiri-Trek-B-Alpha.html" rel="nofollow - भोरगिरी किल्ल्याची माहिती www.trekshitiz.com या साईटवर मराठी सेक्शन मधे दिलेली आहे.
५) कोटेश्वर मंदिराची माहिती www.trekshitiz.com या साईटवर Discussion Forum मधे http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/temples-of-sahyadri_forum21.html" rel="nofollow - Temples of Sahyadri सेक्शन मधे दिलेली आहे.
६) भोरगिरी ते भिमाशंकर ट्रेक मधे पदरगड किल्ला होउ शकत नाही. http://trekshitiz.com/marathi/Padargad-Trek-P-Alpha.html" rel="nofollow - पदरगडाची माहिती www.trekshitiz.com या साईटवर मराठी सेक्शन मधे दिलेली आहे. ७) http://trekshitiz.com/marathi/Bhimashankar-Trek-B-Alpha.html" rel="nofollow - भिमाशंकर ट्रेकची सविस्तर माहिती साईटवर दिलेली आहे. ८) जुलै ते मार्च हा ट्रेक करण्यासाठी योग्य काळ आहे.
अमित सामंत
|