फुलपाखरांची नावे मराठीत कशी पडली असतील हे कोड मला नेहमी पडत. कोणाच्या नावात 'स्विफ्ट' तर कोणाच्या नावात 'राजा', कोणाच्या नावात अगदी 'झेब्रा' तर कोणाच्या नावात 'टायगर'. फुलपाखरे तशी स्वच्छंदी, त्यामुळे हवा, प्रदेश ह्यांसारख्या गोष्टींची सीमा फार कमी वेळा ह्यांच्या मधे येते. शिवथरघळला फिरताना मला दिसलेले हे फुलपाखरू - प्लेन टायगर अर्थात बिबळ्या कडवा.
बिबळ्या कडवा आकाराने साधारण ७ ते ८ से. मी. इतके असून रंगाने फिकट चॉकलेटी-केशरी असून पंखांची टोके काळ्या रंगांची असतात. पंखांची वरील बाजू ही खालील बाजूपेक्षा जास्त तेजस्वी असते, म्हणजेच खालील बाजूच्या पंखांचा रंग अतिशय फिकट असतो. वरील बाजूस असणार्या काळ्या टोकान्मध्ये पांढर्या रंगाचे मोठे ठिपके पहायला मिळतात. त्याव्यतिरिक्त, बोर्डरला काळ्या-पांढर्या रंगाची झालर पहायला मिळते. पंखांच्या खालील बाजूसही हे पांढरे ठिपके आणि काळ्या-पांढर्या रंगाची झालर पहायला मिळते. नर मादीपेक्षा आकाराने लहान असतो. तसेच नरांमध्ये खालील पंखांच्या बाजूला एक काळ्या- पांढर्या रंगाची एक जागा असून तिथून विशिष्ट प्रकारची संप्रेरके स्त्रवली जातात. ह्या संप्रेरकांचा उपयोग मादींना आकर्षित करण्यासाठी केला जातो.
बिबळ्या कडवाचे पुनारोत्पादन वर्षभर चालू असते (अपवाद - हिमालयीन भागात हे विशिष्ट काळात होते). मादी पिवळा चित्रकाचे फूल, रुई , आक अशा झाडांच्या पानांवर अंडी घालते. ही अंडी पानांच्या खालच्या बाजूस आणि प्रती पान एक अशी घातली जातात (अळी ची उपजीविका पानांवर होत असल्याने मुबलक प्रमाणात हे पान खायला मिळावे हा त्यामागील उद्देश असतो). अंडी रंगाने पांढरट चांदेरी चमकदार असून आकाराने बुलेटसारखी असतात. अंड्यांचा आकार - व्यास ०.९ मि.मी. आणि उंचीने १.३ मि.मी. इतका असतो. अंडी उबून त्यातून अळी बाहेर यायला २ ते ३ दिवस जातात. एकदा त्यातून अळी आली की तिची उपजीविका अंड्याच्या कवचापासून होते. ह्या टप्प्यात त्याची लांबी २.२ मि.मी. इतकी असते आणि रंगाने पांढरी असते. पुढील टप्पा २ दिवसांचा असून त्यात ह्याची उपजीविका ही त्या झाडाच्या पानांवर होते. ह्या टप्प्यात त्याची लांबी ४.५ मि.मी. इतकी असते आणि रंगाने हिरवट पिवळी असते. तिसर्या टप्प्यात ह्याचे रूपांतर सुरवंटात होते आणि हा टप्पा साधारण १.५ ते २ दिवसांचा असून तेव्हा ह्याची लांबी ९ मि.मी. इतकी होते. चौथ्या टप्प्यात आणि पाचव्या टप्प्यात ह्याची लांबी अनुक्रमे १२ मि.मी. ते २१ मि.मी. इतकी होते आणि रंगाने ते पांढरे असून त्यावर काळ्या- पिवळ्या रंगांचे पट्टे दिसतात. पुढील टप्प्यात सुरवंट कोषात जाउन हा टप्पा साधारण ५ दिवसांचा असतो. हा कोष हिरव्या रंगाचा असून पानांच्या देठावर आधाराशिवाय मुक्तपणे लटकवलेला असतो. ५ दिवसानंतर त्यातून फुलपाखरू बाहेर येते.
बिबळ्या कडवा संरक्षणासाठी अनेक उपाय करते. त्यात मुख्यत्वे alkaloids संप्रेराकांचा वापर होतो. alkaloids मध्ये नायट्रोजन असून हे स्त्रवल्यास त्याच्या वासामुळे मळमळल्यासारखे होते. तसेच ह्या फुलपाखराची त्वचा खूप जाड असल्याने त्याचा उपयोग त्याला वातावरणातील तापमानबदलांमुळे स्वत:ला संतुलित ठेवायला होतो.
बिबळ्या कडवाचा वावर भौगोलिक दृष्ट्या आफ्रिका आणि आशिया खंडात आणि प्रादेशिक दृष्ट्या बाग, उघडा रानमाळ, गवत व छोट्या झाडांत आणि अगदी वाळवंटातदेखील आढळून येतो त्यामुळे 'यत्र-तत्र-सर्वत्र : बिबळ्या कडवा' असे म्हटल्यास त्यात काही वावगे ठरणार नाही.
सर्व फोटो : अमोल नेरलेकर.
संदर्भ: १. https://en.wikipedia.org २. http://butterflycircle.blogspot.in ३. महाराष्ट्रातील फुलपाखरे - डॉ. राजू कसंबे.
http://maazibhatakanti.blogspot.in/2015/10/plain-tiger-butterfly.html
-- अमोल नेरलेकर । ४.१०.२०१५
|