तांबडी सुरला येथील शिव मंदिर
गोवा राज्य प्रसिध्द आहे तेथील समुद्र किनार्यांमुळे. याशिवाय गोव्यातील अनेक मंदिर आणि चर्चेस पर्यटकांना आकर्षित करतात. या प्रसिध्द मंदिरां व्यतिरीक्त अनेक पूरातन पण पर्यटकांना अज्ञात असलेली मंदिर गोव्याच्या अंर्तभागात आहेत. त्यापैकी एक पुरातन आणि कलाकुसरीने नटलेल शिव मंदिर तांबडीसुरला या गावी आहे. बाराव्या शतकात बांधलेले हे शिव मंदिर गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमेवर अनमोड घाटाच्या पायथ्याशी भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध आहे. मुख्य वस्तीपासून दूर असल्यामुळे हे मंदिर मुस्लिम व पोर्तुगीज हल्ल्यापासून वाचले आहे. त्यामुळे ह्या मंदिराची वास्तू व नक्षीकाम अजून सुस्थितीत आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून सुरला नदीच्या काठाशी वसलेले आहे. हे मंदिर यादव राजा रामचंद्र याच्या हेमाद्री या सरदाराने जैन पद्धतीने बांधले असावे असे काही तज्ञाचे मत आहे. परंतु दहाव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत कर्नाटक लगतच्या गोवा परिसरावर कदंब राजवटीची सत्ता होती.
तांबडी सुरला येथील मंदिराचा आकार गोव्यातील इतर मंदिराच्या तुलनेने लहान आहे. भूमीज शैलीतील या मंदिराचे सभामंडप (नंदीमंडप) , अंतराळ व गाभारा असे तीन भाग आहेत.मंदिर पूर्णतः काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेले आहे. मंदिराला तीन प्रवेशद्वारे असून त्यावर कमळ शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात शीर नसलेला नंदी आहे. नंदीच्या सभोवताली चार खांब आहेत. खांबांवर वेलबुट्टी आणि विविध नक्षी कोरलेली आहे. नंदीच्या मागील एका खांबावर हत्ती घोड्याला पायाखाली चिरडतोय असे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प कदंब राजवटीचे प्रतिक असावे. नंदीमंडपात श्री गणेश , श्री विष्णू , श्री दुर्गा यांच्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. नंदी मंडपाच्या छतावर किर्तीमुख, कमळ व इतर फुलांची शिल्पे आहेत. सभामंडपातून गाभार्याकडे जातांना मधे अंतराळ आहे. त्याच्या दरवाजावर जाळीदार नक्षीकाम आहे व उंबरठ्यावर कमळ शिल्पे कोरलेली आहेत. दरवाजाच्या बाहेर दोनही बाजूस नागशिल्प कोरलेल्या शिळा ठेवलेल्या आहेत. अंतराळाच्या छतावर सुंदर नक्षी कोरलेली आहे.
गाभार्याच्या दरवाज्यावर गणेश प्रतिमा असून उंबरठ्यावर कमळ शिल्प आहे. गाभार्यात काळ्या दगडातील सुंदर पिंड आहे. त्या पिंडीवर सतत पाण्याची धार पडत असते व दोन्ही बाजूस निरांजन सतत तेवत असतात. मंदिराच्या देखभालीसाठी एका पुजार्याची नेमणूक केलेली आहे. कळसावर सुंदर नक्षीकाम केले असून त्यावर श्री शंकर, श्री विष्णू व श्री ब्रम्हा यांची शिल्पे कोरली आहेत. कळसाचे काम अर्धावट राहिले अथवा उध्वस्त झाल्या सारखे वाटते.
मंदिरा भोवती बाग फ़ुलवून परीसर नेटका व सुंदर ठेवलेला आहे. मंदिर नदीच्या काठावर व अभयारण्यात वसले असल्यामुळे पक्षी निरीक्षक व निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
गोव्यातील तांबडी सुरला गावाजवळ हे मंदिर आहे. तांबडी सुरला गावी जाण्यासाठी गोव्याची राजधानी पणजीहुन होंडा या गावी जावे. पुढे राज्य मार्ग १ रस्त्याने वाळपैला यावे. वाळपै शहराच्या अलिकडे एक रस्ता उजवीकडे जातो. त्या रस्त्याने अंदाजे ७ कि. मी. वर एक रस्ता डावीकडे जातो. हा रस्ता आपल्याला भगवान महावीर अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून तांबडी सुरला येथील शिव मंदिरापाशी घेऊन जातो.
|