Print Page | Close Window

कळसूबाईच्या नावान

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Events
Forum Description: Mountaineering and Trekking related events, Photography Competition, Audio Video Competition.
Note :- Please do not add trekking events anywhere on this Discussion Board.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=317
Printed Date: 25 Jan 2025 at 11:39pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: कळसूबाईच्या नावान
Posted By: Deepali Lanke
Subject: कळसूबाईच्या नावान
Date Posted: 04 Feb 2015 at 11:42am
 

                                      कळसूबाईच्या नावान चांगभल !!

                                                                - दीपाली लंके (११ जानेवारी २०१५)

ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या झंझावात आम्ही गारठून जावू कि काय अशी भीती वाटत होती.धुकं एवढं होतं कि जणू लपाछपिचा खेळच चालू होता.सह्याद्री मध्ये ट्रेकिंग करत असताना असे कित्येक अनुभव आम्ही 'याची देही याची डोळा' पहिले आहेत. प्रत्येक वेळी वेगळाच अनुभव आपली सोबत करत असतो. एव्हाना आम्हाला थंडगार वाऱ्याने आणि धुक्याने कळसू बाईच्या उंचीची चांगलीच जाणीव करून दिली होती.

कळसुबाई हे साधारणपणे ५४०० फूट उंचीचे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर ,नगरमधील बारी गावातून कळसूबाईला जाण्यासाठी चांगली वाट आहे.या वाटेवर लोकांनी ठीक ठिकाणी लोखंडी शिड्या लावून चढणं सोपं केलं आहे.मध्यरात्री पोहचल्यास  गावातील हनुमानाच्या मंदिरात झोपण्याची सोय होते.चिमण्यांच्या चिव चीवाटाने आणि कोंबड्याच्या आरवाने सकाळ खुणावते.एवढ्या गारव्यात शेकोटी, गरम गरम चहाचा झुरका आणि पोहे स्वर्गीय आनंदच देतात. कळसुबाई शिखर सकाळच्या काळोखात आपले स्थान दिमाखात वर असलेल्या लाईट च्या प्रकाशाने खुणावत असते.बारी गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असून चहुबाजूला डोंगर रांग आणि हिरवागार परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो.

सकाळी आम्ही निसर्ग सौदर्याचा आस्वाद घेत घेत कळसूबाई च्या दिशेने मार्गक्रमण चालू केले.रस्त्या मध्ये कडूनिंब, जांभूळ ,आंबा सगळ्या प्रकारची झाड आढळली.सुरवातीचा टप्पा ओलांडून आम्ही मार्गक्रमण करत होतो जस जसे पुढे जात होतो तस तसे गावाचे विहंगम दृश्य नजरेत आम्ही कैद करत होतो. हळू हळू आकाशात ढगांची रेल चेल वाढत होती आणि सुर्य आपले स्थान कायम आहे असे सांगत डोंगराआडून आपले दर्शन देत होता सुर्य किरणांनी ढगांचा रंग पिवळा धमक झाला होता ते दृश्य पाहणे एक अलोकिक आनंद देवून जात होता.चहु बाजूनी दिसणाऱ्या डोंगर रांगा पाहून मन उल्हसित होत होते आणि सह्याद्रीच्या श्रीमंतीची पावलो गणिक जाणीव होत होती.मधूनच येणारया थंड वाऱ्याची झुळूक मनाला आनंद देत होती तर चढाइच्या वाटेने जात असताना घाम निथळत होता एवढ्या थंडीत पण आम्ही अक्षरश घामाने भिजत होतो.टप्प्या गणिक टप्पे आम्ही घेत होतो आणि कळसुबाई शिखर कधी एकदाचा गाठतो असं वाटत होत. पण कळसुबाई आम्हाला एवढ्या लवकर दर्शन देण्याच्या तयारीत नसावी असंच वाटत होते.जेवढे आम्ही जवळ पोहचत होतो तेवढं शिखर आमच्या पासून दूर दूर वाटत होते. मजल दरमजल करत आम्ही शेवटच्या पायथ्याशी येवून पोहचलो.कळसुबाई महाराष्ट्राचं माउंट एवरेस्ट म्हणून ओळखलं जाते तेव्हा मनात आलं शेवटचा टप्पा शिडी ने न चढता कातळावरून जाव आणि विजयाची कास धरावी आणि कळसू बाईच्या नावानं चांगभलं म्हणावं. शेवटचा कातळ टप्पा एक एक करून आम्ही चढलो तोच कळसुबाई मंदिराचं आम्हाला दुर्लभ वाटत असलेलं दर्शन घडलं आणि आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.आम्ही आमचे समान ठेवून कळसुबाई मंदिरात जावून दर्शन घेतले आणि कळसूबाईच्या नवान चांगभलं ची एकाच गर्जना केली.देवीचा आशीर्वाद आणि वरदहस्त आम्हाला लाभला आणि त्या शिखाराहून आम्हाला जे दृश्य पाहायला मिळाले त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही.

अलंग, मदन, कुलंग, सीतेचा पाळणा, तारामती, ढगात गुडूप झाले होते तरी त्यांचे असलेले भक्कम स्थान आणि सुळके भटक्यांना साद घालीत स्वागतासाठी सज्ज असल्यासारखेच भासत होते.ते दृश्य डोळ्यांमध्ये साठवून घेतले आणि परतीचा मार्ग सुरु झाला.जणू कळसुबाई च्या दर्शनाने आमच्या अंगात शक्ती संचारली होती आणि परतीला आमचा शीण,थकवा कुठच्या कुठे निघून गेला कळलंच नाही.अगदी पायाला आम्ही वेग यंत्र लावल्यासारखे भर भर खाली उतरत होतो आणि मागे वळून बघितला तर असे वाटत होते जणू आम्ही आकाशाला गवसनि घालूनच खाली उतरलोय जाताना अंतर जाणवत होते मात्र उतरताना कसे आम्ही एवढे चढलो हेच कळत नव्हते. शेवटी आम्ही कळसुबाई शिखर यशस्वीरीत्या पादाक्रांत करून विजयी भावना मनात साठवून ताठ मानेने बारी गावात पोहचलो.

या सर्व घटनाक्रमामुळे आणि निसर्ग सौंदर्यामुळे मन भारावून गेल होतं.खाली उतरल्यानंतर नम्रपणाने सह्याद्रीचे नमन करून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. पण मन हरवले ते सह्य्द्रीच्या या वैभवाला परत परत भेट देण्याच्या इच्छेनेच.




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk