सम्राट अशोकाच्या काळात (इ.स.पूर्व २५२ ते २००) बिहारमधील बाराबरी, नागार्जुनी व सितामढी येथे प्रथम लेणी खोदण्यात आली. लेण्यांचा मुख्य उपयोग हा बौध्द भिक्षुंना ध्यान, मनन, चिंतन करण्यासाठी व धर्मप्रसाराचे कार्य करत फिरतांना पावसाळ्यात विश्रांतीसाठी / रहाण्यासाठी होत असे. यासाठी लागणारी शांतता मिळण्यासाठी लेणी मनुष्यवस्तीपासून दूर डोंगरात खोदली जात. लेण्यांचा उपयोग वर्षकालात निवासासाठी होत असल्यामुळे त्यात छोटी छोटी दालने (खोल्या), त्यात असणारे दगडी पलंग, भरपूर हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या, लेण्यांजवळ खोदलेले बारामाही पाण्याचे टाकं अशा सोयी केल्या जात.
बौध्द लेण्यांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार दिसून येतात ते म्हणजे , स्तुप असलेली चैत्यलेणी आणि विहार.
१) स्तुप असलेली चैत्यलेणी:- याचा उपयोग सांघिक प्रार्थनेसाठी व पुजेसाठी केला जात असे
२)विहार :- यांचा उपयोग बौध्द भिक्षुंना रहाण्यासाठी व अध्यायनासाठी होत असे.
बौध्द धर्माच्या हीनयान व महायान या दोन प्रमुख पंथांचा परिणाम लेण्यांच्या शिल्पपध्दतीवर झाला आहे. त्यामुळे बौध्द लेण्यांचे वर्गीकरण करतांना १) हीनयान लेणी २) महायान लेणी व ३) हीनयान लेण्यांमध्ये सुधारणा करुन बनविण्यात आलेली महायान लेणी असे करण्यात आले.
१) हीनयान पंथात मूर्तीपुजा करीत नसत, त्यांचा भर स्वत:च्या आचारांवर होता, त्याबाबत ते दक्ष असत. मानवी जीवनात नैतिकमुल्य (अष्टांगमार्ग) आणि प्रज्ञा महत्वाची आहेत अशी त्यांची शिकवण होती. त्यामुळे हीनयान काळात (इसपूर्व २०० ) बांधण्यात आलेल्या लेण्यांमध्ये बौध्द मुर्ती आढळत नाहीत. तसेच चैत्यातील स्तुप साधे असत. त्यावर नक्षीकाम केलेले नसे. महाराष्ट्रात भाजे, कोंडाणे, पितळखोरे, अजिंठा, बेडसे, नाशिक व कार्ले येथील लेणी हिनयान पध्दतीची आहेत.
२) बौधांच्या ३ र्या धर्मपरिषदेत धर्म लोकाभिमुख व्हावा, त्याची भरभराट व्हावी व सामान्य भक्तांना मन एकाग्र करण्यासाठी, भक्तीसाठी मूर्तीपुजेला मान्यता देण्यात आली. त्यानंतर निर्माण झालेल्या लेण्यांवर (इ.स. ४५० ते इ.स. ६५०) महायान पंथाचे व शिल्पपध्दतीचे चित्रकलेचे प्रभुत्व दिसून येते. महायान पंथाने बुध्दाची अनेक ध्याने कल्पिली, बोधिसत्वाचे अनेक अवतार कल्पिले, त्यांना मूर्तरुप दिले. त्याच बरोबर हारीठी (मृतांची देवी), जंभाल (कुबेर), महामायुरी (सरस्वती), अवलोकितेश्वर, पद्मापणी, वज्रपाणी, मैत्रेय, मंजुश्री, बोधिशक्ती तारा, भ्रुकुटी यांच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणावर कोरल्या गेल्या. या काळात अजिंठा, वेरुळ, औरंगाबाद येथील लेणी खोदण्यात आली.