नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी जवळ असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आणि किल्ल्यावर जैन लेणी आहेत. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील वेरूळ, त्रिंगलवाडी, मांगी तुंगी ही लेणी प्रसिध्द आहेत्रिंगलवाडी परीसरात दहाव्या शतकात खोदलेली ८ लेणी असुन त्यातील ६ लेणी किल्ल्याच्या पायथ्याला व २ लेणी किल्ल्यावर आहेत.
पायथ्याजवळचे मुख्य लेण्याचे व्हरांडा, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. व्हरांडा लांबलचक असुन त्याच्या दारासमोरील छतावर हातात हात गुंफलेल्या गणांचे अप्रतिम शिल्प कोरलेले आहे. तर उजव्या बाजूला मोठे फ़ुल कोरलेले आहे. छताला आधार देण्यासाठी २ खांब कोरलेले आहेत. त्यावर यक्ष कोरलेले आहेत. व्हरांड्याच्या छताला आधार देणार्या तुळ्याही कोरलेल्या आहेत. त्यावर कमळाच्या फ़ुलांची नक्षी व मध्यभागी व्याल कोरलेला आहे.
सभामंडपाच्या प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस नक्षी कोरलेली आहे. व्दारपट्टीवर २ चौकटी आहेत त्यात तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उंबरठ्या खाली गण कोरलेले आहेत. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडप ४ खांबांवर तोललेला असून त्यापैकी फ़क्त एकच खांब आता उरलेला आहे. खांबावर सुंदर नक्षी आहे. सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी ९ चौकोनी झरोके असलेल्या २ खिडक्या कोरलेल्या आहेत. गाभार्याच्या प्रवेशव्दारावर नक्षी कोरलेली आहे. गाभार्यात वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मुर्ती आहे. गडावर २ लेणी आहेत पण ती भग्ना अवस्थेत आहेत.
आजुबाजुची पाहाण्याची ठिकाणे :- http://trekshitiz.com/marathi/Tringalwadi-Trek-T-Alpha.html" rel="nofollow - त्रिंगलवाडी किल्ला , त्रिंगलवाडी धरण
जाण्यासाठी :- गाडीने किंवा रेल्वेने इगतपुरी गाठावे. रेल्वेने :- इगतपुरीच्या पूर्वेकडे म्हणजेच एसटी स्टँडच्या बाजूला बाहेर पडावे. एसटी स्थानकाच्या अलीकडे आंबेडकर चौक लागतो. या चौकातून एक वाट वर जाते. या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे वळावे. अर्ध्या तासात आपण वाघोली नावाच्या खिंडीत पोहोचतो. खिंडीतून खाली उतरल्यावर आपण त्रिंगलवाडी नाक्यावर पोहोचतो. येथून डावीकडे (त्रिंगलवाडी गावाकडे) वळावे. अर्ध्या तासात आपण त्रिंगलवाडी गावात पोहोचतो. त्रिंगलवाडी गावापर्यंत इगतपुरी -घोटी -त्रिंगलवाडी अशी जीपसेवा देखील उपलब्ध आहे. गावाच्या मागे त्रिंगलवाडी धरण आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे वळावे. भिंत संपल्यानंतर उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्याशीच पांडवलेणी नावाची गुहा आहे.
रस्त्याने :- कसारा घाट चढून इगतपूरीच्या पुढे ९ किमीवर टाके गाव लागते. या गावातून रस्ता त्रिंगलवाडी - पत्र्याचीवाडी मार्गे तळ्याची वाडी या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. टाके गावापासून हे अंतर अंदाजे ८ किमी आहे. तळ्याचीवाडी गावामागे तलाव आहे. तलावाच्या बाजूने वाट शेताच्या बांधावरुन किल्ल्याच्या पायथ्याच्या लेण्यांपर्यंत जाते. या गुहेवरून गडावर जाण्यास रस्ता आहे. गड चढण्यास अर्धा तास लागतो. त्रिंगलवाडी किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Tringalwadi Fort, Tringalwadi Caves, Tringalwadi Dam, Caves in Maharashtra, Jain Leni, Jain Caves, Facinating spots near Igatpuri
|