गावाचे नाव :- फलटण जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- सातारा, पुणे.
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जात असे.
फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जरबेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.
जरबेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे.
जाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) श्रीराम मंदिर, फलटण २) निंबाळकर छ्त्री (समाधी), फलटण. ३) राजवाडा, फलटण ४)संतोषगड (ताथवड्याचा किल्ला) किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Jarabeshwar Mandir, Village:- Phaltan, Dist. Satara
|