लिंगाणा—बेलाग सुळका
शब्द उच्चारला तरी अंगावर काटा येतो आणि समोर उभा राहतो अजस्त्र ,बेलाग सुळका....प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न,लिंगाणा सर करणे.मी तयारी सुरु केली.महिनाभर आधीच नाव देऊन ठेवले.३१ जानेवारी २०१६....उत्सुकता शिगेला पोचली होती.२९ तारखेला कोपरगाव वरून निघालो.आत्याकडे थांबून सकाळी १०.०० वाजता चिंचवड वरून प्रवासाला सुरुवात झाली.वेल्हा मार्गे पाबे खिंड उतरलो.तोरणा,राजगडाचे दर्शन झाले.जोडगोळीला पाहून प्रसन्न वाटलं.काही वेळातच वेल्ह्यात पोहचून जेवण केले ,आत्याने दिलेलं श्रीखंड जास्तच गोड लागत होतं.
तोरण्याची भव्यता जाणवत होती.भट्टी वरून पुढे निघालो,धरणाचे काम चालू होतं.रस्ता तसा नीट नव्हताच.काही वेळातच मोरी गावी पोचलो.१०-१२ उंबऱ्याचं गाव.रस्ता खराब असला तरी ड्रायवर काका मस्त होते,त्यामुळे जाणवलं नाही.गावात पोचल्यावर पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.परत ती संधी उद्या मिळणार होती.सर्वाना प्रत्येकी हेल्मेट,डीसेंडर,रोप,हार्नेस दिले गेले,जे लिंगाण्यासाठी अत्यावश्यक आहे.सर्वानी सोबत रायलिंग पठाराकडे प्रस्थान केलं.ब्रह्मानंद-जे सुंदर वक्ते जाणवले,बिएसेनेल मधील जोडगोळी,डॉक्टरांची जोडी.मस्त गट्टी जमली.रायलिंग वरून लिंगाणा पाहताना मनात शेकडो विचार तरळून गेले.
सुर्यास्त...काय देखावा होता.समोर लिंगाणा,त्यामागे रायगड.जगदीश्वराच्या मंदिरामागे सूर्य मावळत होता.मन शांत झालं.असं सुख कुठेही मिळणार नाही.ती दृश्ये मनात साठवतच camping site वर परतलो.तंबू आमच्याच प्रतीक्षेत होते.अंधार पडत असतानाच प्रसादने(ट्रेक लीडर) उद्याच्या सूचना दिल्या.खिचडी,कोशिंबीर तयार झाली होती.ब्रह्मानंदचे बौद्धिक झाले,श्री च्या कवितांचे वाचनही त्याने केले. ३.०० वा उठायचे असल्याने लगेच झोपून गेलो.
पहाटे आपोआप जाग आली.चंद्राच्या शीतल प्रकाशात, ओंकारच्या शब्दात सांगायचं झालं तर “वाघ मारून “आलो. दोन घास पोटात ढकलून,बोराटयाची नाळ उतरायला सुरुवात केली.प्रसाद नवीन नवीन माहिती देत होता..सांधणची आठवण येत होती.काही ठिकाणी anchor चा वापर अत्यावश्यक होता.काही वेळातच पायथ्याशी पोचलो.टीम ची दोर लावायची धावपळ चालू झाली.पहिलाच टप्पा overhang होता.महत्प्रयासाने सर्वजण पाण्याच्या टाक्यापर्यंत आलो.आत्ता लक्षात येत होते ,गडाचा वापर तुरुंग म्हणून का केला जात असावा.टाक्यातील पाणी भरून घेतले आणि परत चढाईला सुरुवात केली.९.१५ पर्यंत माथा गाठला.समोर दिसत होतं महाराजांचा आवडता रायगड आणि आजूबाजूचा विहंगम परिसर.
रांगड्या सह्याद्रीचे वर्णन काय करावे!!!त्या सरळसोट पर्वतांच्या सोंडी,त्यात मुंगीसारखी दिसणारी गावं.बोराटयाची ,सिंगापूर ची नाळ.छानसं photosession करून उतरण्यास सुरुवात केली.आता खरा कस लागणार होता.rappling चा जुजबी अनुभव पाठीशी होता.यावेळी ५ मोठे टप्पे पार करायचे होते.४०,१८० फुटाचे टप्पे पार करू गुहेजवळ थोडी विश्रांती घेतली.थोडी झोप काढली आणि काही वेळातच पुन्हा उतरण्यास सुरुवात केली.एकावेळी एक जण उतरत असल्याने वेळ लागत होता.धाकधुक वाढत होती.दोन्ही बाजूला पूर्ण दारी होती.१००,१०० आणि ३०० फुटाचे टप्पे एकामागून एक rapple करून पायथ्याशी आलो.माती बऱ्याच ठिकाणी ठिसूळ झाली होती.हेल्मेटची उपयुक्तता जाणवत होती.दगडांचा काही ठिकाणी पाऊसपण पडला.शेवटचा टप्पा जेव्हा पार केला आणि वर नजर टाकली ,काळजाचा ठोकाच चुकला.अंधारात चढाई सुरु केल्याने जाणवलं नाही,नाहीतर आमच्यातले निम्मे इथूनच परतले असते.खाली बसून वरून येणार्याना सूचना देण्यास सुरुवात केली.सगळे उतरल्यावर नाळ चढायला लागलो.रोप नेण्यासाठी गावातीलच एक काका आणि ताई आल्या होत्या.३ रोप चं वजन ते सहज उचलत होते,पायात paragon होती.त्या प्रसंगाने आमच्या डोळ्यात अंजन घातलं.आपल्या सुखवस्तू आयुष्याची कीव करावीशी वाटली.
काही वेळातच मोरी गावात दाखल झालो.नाचणीची भाकरी,झणझणीत भाजीचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.ट्रेकचा शीण जाणवत होता पण सर्वात कठीण किल्ला सर् केल्याचा आनंद जास्त होता.पुन्हा एकदा मी,प्रथमेश सोबत एक सुंदर,खऱ्या अर्थाने कस पाहणारा ट्रेक पूर्ण केला.महाराजांना त्रिवार मुजरा करूनच अंथरुणावर पाठ टेकवली.
प्रथमेश नान्नजकरसह श्रेयस पेठे reporting from LINGANA!!!!
|