Print Page | Close Window

किल्ले वासोटा

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Trekking Destinations
Forum Description: Visitors can post requests / information of any trekking destination on this globe.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=377
Printed Date: 27 Dec 2024 at 7:21am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: किल्ले वासोटा
Posted By: Shreyas Pethe
Subject: किल्ले वासोटा
Date Posted: 19 Apr 2020 at 8:05pm

 

    गर्द वनातील किल्ले वासोटा सोबतच ठोसेघर धबधबा आणि कल्याणगडाच्या पायथ्याचे रुचकर जेवण

नवीन वर्षाच्या मालिकेतला पहिला ट्रेक. किल्ले वासोटा. खूप दिवसांपासून या नावचे गारुड मनावर होतं. नवीन वेळापत्रक आल्यावर माझ्या नावासोबत लादेचे नाव सुद्धा ट्रेक लीडर म्हणून दिसलं. मागच्या Schedule मध्ये हरिश्चंद्र नळीच्या वाटेने होतं ना त्याचा लीडर लादेच होता परंतु प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे मला जमलं नव्हतं. या ट्रेकच्या आधी २ दिवस लादेचा फोन आला, किल्ल्याची माहिती द्यायची आहे, देशील ना ? नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मी होकार कळवला. पहिलाच ट्रेक होता बायकोसोबत. बऱ्याच लोकांनी ऐनवेळी नाव कमी केल्यामुळे आमच्या दोघांचा तसेच आदित्य गोखलेचाही नंबर लागला. २१ नोव्हेंबर ला कबड्डीचा सराव करताना नेमका पाय मुरगळला. ट्रेक रद्द करावा लागणार असेच वाटत होते परंतु इच्छाशक्ती आणि केदार, तन्वी (आमच्या सौ.) च्या पाठिंब्यामुळे २३ नोव्हेंबर ला रात्री ओंकार धुळपकडे पोचलो. बऱ्याच दिवसांनी ओंकार आणि गायत्रीची भेट झाली. काही वेळातच Judgement चा डाव रंगला. रात्री ३ च्या सुमारास डोंबिवलीची मंडळी औंधमध्ये दाखल झाली. पुढे चांदणी चौकात भारती आणि सोनम या जोडगोळीला घेऊन बामणोली कडे निघालो.

चहासाठी थांबत रमतगमत गेल्याने वेळेच्या तासभर उशीराच बामणोलीला पोचलो. आधीच उशीर झाल्यामुळे चहा, नाश्ता पटापट उरकून वन खात्याची परवानगी घेऊन २ बोटींमधून कोयनेच्या विस्तीर्ण अशा शिवसागर तलावात उतरलो. तलावाचं निळं-हिरवं पाणी, आजूबाजूची पाण्यात डोकावणारी गर्द वनश्री, त्यात मध्येच पाण्यामुळे तयार झालेली बेटं. अहाहा!!! काय नयनरम्य नजारा होता तो... तब्बल सव्वातासाच्या प्रतीक्षेनंतर वासोटा आणि नागेश्वराची जोडी नजरेस पडली. पाण्यात खेळत, फोटो काढण्याच्या नादात नाव किनाऱ्याला कधी लागली कळलंच नाही. दोन्ही नावांमधून आम्ही २८ जण  उतरलो आणि वनखात्याच्या ऑफिस जवळ पोहोचलो. या ठिकाणी प्रत्येकाजवळ असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक बाटल्या वगैरे किती आहेत याची संख्या सांगून त्यानुसार रक्कम जमा करावी लागते आणि पुन्हा किल्ला उतरून इथे येताना त्या वस्तूंची संख्या जुळल्यास दिलेली रक्कम आपणास परत मिळते.  सर्वांशी एकत्रित ओळख बामणोली मधेच करून घेतली होती, त्यामुळे आता सचिन लादेने सर्वाना घेऊन त्या गर्द जंगलात प्रवेश केला. वाट तशी मळलेली होती. शनिवार- रविवार जोडून सुट्टी असल्याने हवशे नवशे सगळ्यांनी गर्दी केली होती. त्यात एक वयस्कर ट्रेकर्सचापण ग्रुप होता. काही काळ सरळ रस्ता, चढण आणि शेवटच्या टप्प्यातली खडी चढण पार करून माथ्यावर पोचलो. तन्वीनेही जरासं थांबत थांबत चढण पार केली आणि वेळेत गडावर पोहोचली. माथ्यावरून शिवसागर जलाशय, कोयना- सह्याद्री अभयारण्य असा बराच मोठा परिसर डोळ्यांच्या आवाक्यात येत होता.

थोडी विश्रांती घेऊन संस्थेच्या संकेतस्थळावरून तसेच इतर काही साधनांद्वारे मिळवलेली माहिती मी सर्वाना सांगितली. त्यानंतर आम्ही सर्व प्रथम मारुतीच्या मंदिराच्या डावीकडून चुन्याचा घाणा पाहून जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याच्या दिशेने निघालो. अजस्त्र बाबू कडा पाहून कोकण कड्याची आठवण झाली. त्यानंतर मारुती मंदिराच्या उजव्या बाजूने चालत जाऊन वाड्याचे अवशेष पाहिले. वाड्याचा जोता, खांबाच्या खालील दगडी बांधकाम सुस्थितीत आढळून येते. त्यानंतर तसेच पुढे गेल्यावर छोटा नागेश्वर, नागेश्वर कडा यांचे रौद्ररूप दृष्टीस पडते. बरेच जण वासोट्यासोबतच नागेश्वर पण करतात. लोहगडाच्या विंचू कड्याप्रमाणे याचे रूप जाणवत होते. येथून पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आलो.

बोटीतला प्रवास, पायथ्यापासूनची दोन – अडीच तासाची चाल यामुळे सर्वांनाच भूका लागल्या होत्या. मग सर्वानी एका डेरेदार झाडाखाली आपापले डबे उघडले. आमच्या मंडळींनी शेंगाच्या पोळ्या केल्या होत्या.   सोबत  आम्रखंड, नेहमीचेच ठेपले, भुर्जी या पदार्थांनी जेवणात जान आणली. सोबत द्रुमनने आणलेल्या नुडल्स होत्याच. काही वेळ गप्पा गोष्टी करत ग्रुप फोटो काढून झाल्यावर उतरण्यास सुरुवात केली.सिंहगड उतरताना तन्वीच्या मनात असलेली भीती मला जाणवली होती, त्यामुळे वासोटा उतरताना तिच्या मागे लागून तीला जवळजवळ पळवतच खाली आणलं. एकदा भीती मनात बसली की स्वतःच्या पायावरचा Confidence कमी होतो आणि पाय लचकणे असे प्रकार वाढतात. राधासह सगळेच अगदी वेळेत खाली उतरलो. लगेचच लिंबू सरबत रिचवून बोटीतून उलट प्रवासाला लागलो. काही तांत्रिक कारणामुळे आमचे बोटवाले काका बदलले आणि वेगात लगेच फरक पडला. आता आमचा रमत गमत गानमय प्रवास चालू झाला होता. गाण्याच्या भेंड्या खेळायच्या ठरल्या. मी, नॅनो, लादे, कुशल, तन्वी, ऋषिकेश, भारती आणि सोनल मुख्य भिडू होतो. रेकत, ओरडत, तऱ्हेतऱ्हेचे हातवारे करत गाणी म्हणणे चालू झाले. आजूबाजूच्या बोटवाल्यांचे छान मनोरंजन होत होते. काही वेळात एका दुसऱ्याच बोटवरच्या माणसांशी आम्ही भेंड्या सुरु केल्या. सूर्यास्ताची वेळ, जीवाभावाची माणसं, सदाबहार गाणी यामुळे सायंकाळ सुरेख जमून आली होती.

बामणोली मध्ये आल्यावर गावातच मंदिरात सगळे आडवे झाले. आदित्यने ट्रेकक्षितीज संस्थेची माहिती सविस्तर दिली. शेजारच्याच घरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रो कबड्डीचा सामना बघत बघत पोटात घास कधी उतरले समजलंच नाही. शेजारीच असलेल्या विस्तीर्ण जलाशयामुळे हवेत गारवा जाणवत होता.काही वेळातच एक छानसा फेरफटका मारून येऊन स्लीपिंग बॅग मध्ये गुडूप झालो.

मी सहाचा गजर लावला होता पण रात्री  तीन वाजल्यापासून तसा जागाच होतो. एक ट्रेकर्सचा ग्रुप मध्यरात्री मंदिरात येऊन पहाटे आवरून वासोट्याच्या वाटेला लागला होता. सगळे हळू हळू निद्रेतून जागे होत होते. तेवढ्या वेळात आम्ही दोघे- तिघे परसाकडे जाऊन आलो. बऱ्याच दिवसांनी मोकळ्या हवेचा आनंद घेतला. स्वच्छ हात पाय धुवून चटकदार मिसळ आणि कॉफी चा नाश्ता झाला आणि पाणी भरून पुढच्या प्रवासाला तयार झालो. या मधल्या वेळात नॅनो आणि माझी कॉलेजमधील मैत्रीण सोनी आणि तिचा नवरा अभय यांची गाठ पडली. त्या दोघांनी पुण्याहून बेंगलोरला शिफ्ट होण्याचे ठरवले आहे असे त्यांच्या बोलण्यात आले. आम्ही दोघे अवाक् झालो. जास्त काळ काही भेटता आले नाही, आम्ही लागलीच म्हणजेच ८ वाजण्याच्या सुमारास ठोसेघर धबधब्याकडे निघालो. वाटेत घाटात सायकल मॅरेथॉन चालू होती. दरम्यान त्या सर्व सायकलपटूना प्रोत्साहन देत गाडीमध्ये दमशराज चा खेळ खेळत काही वेळातच ठोसेघर असा फलक दृष्टीस पडला.

सह्याद्रीमध्ये आडवाटेवर बऱ्याच ठिकाणी खूप आश्चर्ये दडलेली आहेत. त्यापैकीच हा एक विशाल असा धबधबा. रस्त्यावरून जाणवणार सुद्धा नाही की या डोंगराच्या पोटात हा दुधाचा प्रवाह लपलेला आहे. मोठा आणि छोटा धबधबा असे दोन धबधबे येथे पाहायला मिळतात. छोटा धबधबा, त्याच्या समोरील हिरवाशार डोह, त्यातील नितळ पाणी, त्यालाच मागे लागून असलेली लहानशी गुहा आणि त्या गुहेतून दिसणारा तो जलप्रपात...असं वातावरण स्वर्गातच पाहायला मिळेल. सारंकाही डोळ्यात सामावून घेतलं आणि शेंद्रे फाट्यावरून आमच्या पुढील स्थानाकडे म्हणजेच कल्याणगडाकडे निघालो.

वढे फाट्यावर सर्वांसाठी शक्तिवर्धकआणि पौष्टिक  केळी आम्ही सोबत घेतली. इथून काही वेळातच नंदगिरीचा किल्ला म्हणजेच कल्याणगड दिसू लागला.  परंतु गडाजवळ गेल्यावर तो रस्ता आमच्या गाडीसाठी योग्य नसल्याचे लक्षात आले. त्या हमरस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या जैन स्थानकात चौकशी करून, विचार विनिमय करून लीडरने वर न जाण्याचा निर्णय घेतला. चालत जरी त्या रस्त्याने गेलो तरी बराच वेळ लागणार होता, सबब संस्थेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार लगतच असलेल्या न्यू कल्याणगड फार्म या धाब्यावर जेवणासाठी थांबलो.

बाहेरून धाबा यथातथाच वाटत होता. त्यामुळे उतरून जरा चौकशी केली. जेवण वेळेत मिळू शकेल अशी खात्री वाटल्याने व्हेजवाले आणि नॉनव्हेजवाले या प्रकारानुसार स्थानापन्न झालो. सुरुवातीला पापड, पाया सूप वेळेत आले परंतू बऱ्याच प्रतीक्षेनंतर चिकन थाळी समोर प्रकटली. मधल्या वेळेत द्रुमन सरांनी Watermelon या खेळाने सर्वांचे मनोरंजन केले. ही चिकन थाळी पुण्यातील आजपर्यंत खालेल्ल्या कोणत्याही थाळीच्या तोंडात मारेल अशी होती.  पांढरा,तांबडा रस्सासगळंच जमून आलं होतं. पुढच्या काही दिवसातच फक्त कल्याणगड आणि या जेवणासाठी एक Bike Ride करायची असं मी आणि आदित्य गोखले याने मनोमन ठरवले.


जेवणं आटोपल्यावर जरा आतल्या रस्त्याने उसाच्या बैलगाड्यांचा पाठलाग करत भुईंज जवळ राजरस्त्याला लागलो. प्रथेप्रमाणे सर्वांचे अभिप्राय घेतले गेले. कल्याणगड पाहता न आल्याची खंत वगळता ट्रेक सर्वांनाच आवडला होता. खंबाटकी आणि कात्रजच्या बोगद्यातून दंगा करत वडगाव पुलाजवळ पुण्यात उतरलो. कैलासगड केल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांनी ट्रेक छान झाला आणि आमच्या मंडळींनी न दमता, न थकता तो पूर्ण केला.



-------------
"भटका श्रेयस"



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk