लाल कवडी
'आतून एक आणि बाहेरून एक' अस आपल्याकडे थट्टा करताना म्हणण्याची पद्धत आहे. पण हेच जेव्हा फुलपाखरांच्या रंगान्बाबतीत दिसून येत तेव्हा नवल वाटल्यावाचून रहात नाही. सातार्याजवळील चंदन-वंदन ह्या जोड-किल्ल्यांवर फिरताना मला भेटलेले हे फुलपाखरू : Red Pierrot अर्थात लाल कवडी.
नर आणि मादी दिसायला सारखे असून पंखांची आतील बाजू (upper-wings) काळ्या आणि नारिंगी रंगाची असते. ह्यात काळ्या रंगाचे प्रमाण जास्त असून पंखांची खालिल बाजू नारिंगी रंगाची असते. पंखांच्या बाहेरील बाजू (lower-wings) पांढर्या रंगाची असून त्यावर काळे ठिपके दिसतात. वरच्या बाजूस मात्र पंख काळे असून केवळ मागील पंखांची खालची बाजू नारिंगी रंगाची असते. पंखांच्या वरील आणि खालिल बाजूंच्या कडांवर काळ्या-पांढर्या रंगाची बॉर्डर दिसते. पंखविस्तार ३ ते ३. ६ से.मी. इतका असतो.
लाल कवडीचा वावर मुख्य:त करंज, तामण आणि पानफुटीसारख्या वनस्पतींवर आढळतो. मादी प्रामुख्याने पानफुटीच्या पानांच्या खालील बाजूस अंडी घालते. ही अंडी पांढरट-पोपटी रंगाची असून एकाजागी एकच अंडे घातले जाते. अंडे उबल्यावर त्यातून सुरवंट बाहेर पडते आणि त्याची उपजीविका पानफुटीच्या पानांवर चालते. ह्या सुरवंटाचा रंग फिकट पिवळा ते पांढरा असा असतो आणि पूर्णांग पाढर्या केसांनी अच्छादिलेले असते. सुरवंटाची पुढे वाढ किद्यात होते आणि त्याचा रंग पिवळट असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके दिसतात आणि लांबी साधारण १ से.मी इतकी असते. ह्या किड्याचे रूपांतर पुढे फुलपाखरात होते.
लाल कवडी हे जमिनीलगत अत्यंत संथ गतीने उडणारे फुलपाखरू आहे. सूर्यस्नान आवडत असल्यामुळे दुपरच्यावेळेसच ह्याचा उघड्या पंखांचा फोटो घेणे शक्य होते, एरवी हे पंख बंद करून बसते. ह्याचा वावर संपूर्ण भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात आढळतो. लाल कवडी हे निर्भय फुलपाखरू असल्याने पुढील वेळी दिसल्यास त्याचे फोटो काढायला नक्की विसरू नका…!
Scientific name : Talicada nyseus Class/ Family : Insecta / Lycaenidae
संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे), www.google.com.
(फोटो : १. हनीश के. एम. , २. अमोल नेरलेकर)
-- अमोल नेरलेकर । ३.१२.२०१४
|