Print Page | Close Window

स्वप्न सत्यात!!! हरि

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Trekking Destinations
Forum Description: Visitors can post requests / information of any trekking destination on this globe.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=354
Printed Date: 22 Dec 2024 at 7:38pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: स्वप्न सत्यात!!! हरि
Posted By: Shreyas Pethe
Subject: स्वप्न सत्यात!!! हरि
Date Posted: 11 Jun 2017 at 1:31pm
नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड...दिवस ठरला...तसं संजय काकांनी आधीच कानावर घातलं होतं.नाशिक स्टेशन ला शाईन पार्क केली आणि कल्याण गाठलं.प्रथमेश आणि पुरंदरे काका भेटले.जेवण आटोपून सगळ्यांची वाट पाहत तिथेच थांबलो.तासाभरातच कल्याण स्टेशन ला सगळे जमले.पण गाडी ठरवली होती त्यात पुरेशी जागा न झाल्याने अजून दोन गाड्या काढाव्या लागल्या.मी संजय सरांसोबत वैद्य काकांच्या गाडीत बसलो.मुरबाडला चहा घेतला आणि लगेच वालीवारे (बेलपाडा)मध्ये दाखल झालो.आश्रमशाळेच्या हॉल मध्ये पथाऱ्या पसरल्या आणि तीन तास स्वर्गात फेरफटका मारून आलो.

   सकाळी सहाच्या आसपास जाग आली.सगळ्यांची आवराआवर चालू होती.आश्रमशाळेतील व्यवस्था मस्त असल्याने काही काळजी नव्हती.कमळूकडे चहा,नाश्ता झाला.’पोलीस पाटील मित्र ‘ डायरी मध्ये ‘निसर्ग सान्निध्य मित्र’ या नावाने संजयकाकाने नोंद केली आणि कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.बहुतेकजण ट्रेकक्षितीजचे सदस्य होते,अनुभवी होते.नळीची वाट सांधणची आठवण करून देत होती..पावसाळ्यात काय अवस्था होत असेल याचा अंदाज आला.हळू-हळू सूर्य डोक्यावर येत होता..खडी चढण असल्याने दमछाक होत होती.दगडाचे मोठे patch असल्याने तसेच dehyadration च्या भीतीने सारखे पाणी,गाजर,काकडी सेवन चालू होते.दोन-तीन अवघड टप्पे पार करून हरिश्चंद्रगडच्या काहीशा सपाट भागावर पोचलो.इथेच डबे सोडले.सरबत प्यालो.पावभाजी,चिकन,ट्रेक स्पेशल ठेपले पोटात ढकलले.थोडी विश्रांती घेऊन कोकणकड्याकडे कुच केले.इथे आल्यावर नळीची भव्यता जाणवत होती.कोकणकडा पाहिल्यावर आंतरिक शांतता मिळाली.पेटके काही जणांना त्रास देत होते.सुशांत काकाने कोकणकडा rappling चे टप्पे दाखवले.ते वर्षातून एकदा हा उपक्रम घेतातच.काय वर्णावे त्या कड्याचे रूप!!!तिथेच एकाने parachute jumping चा video दाखवला.काळजात धस्स झालं.


    कोकणकड्यावर भास्करचे घर आणि खानावळ आहे.तिथेच मुक्काम करायचा ठरला.आवरून,काही वेळ विश्रांती घेऊन हरीश्चन्द्रेश्वराच्या मंदिराकडे निघालो.तो भाग थोडा खोलगट ठिकाणी आहे.वरून पाहिल्यावर हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृतीचा भास होत होता.मी आणि सचिन मंदिरे निरखून पाहत होतो.ती वैशिष्ट्यपूर्ण पुष्करणी,गणपती मंदिर गुढ वाटत होते.उत्सुकता निर्माण झाली.महादेव मंदिराच्या जवळच खालच्या बाजूला एक मोठे कुंड आहे ज्यात मोठी पिंड आहे.कुंडातील पाणी थंड आणि स्वच्छ आहे.कुंडाच्या बाहेर अंघोळ उरकली.थंड पाण्यामुळे हुडहुडी भरली.बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं आणि कोकणकड्यावर निघालो.गेल्यावर नाश्ता,आकाश निरीक्षणात वेळ कसा गेलं समजलंच नाही.गप्पा मारतच जेवणं आटोपली.भाकरी आणि पिठल्या चा फक्कड बेत होता.पाठोपाठ यजुवेंद्रचे वडील आणि त्यांचा ग्रुप दाखल झाला.नळीची वाट चढायला जवळपास दहा तास लागले.काही वेळातच पुरंदरे काकांशी गप्पा मारता मारता मस्त झोप लागली.
रात्री वारा सुसाट होता .सकाळी पोटात हलचल चालू झाल्याने जाग आली.वाघ मारून आलो!!पण काहीतरी गडबड झालीये,हे जाणवत होतं.लगेच चहा घेऊन तारामती,रोहिदास कडे प्रयाण केले.चाल थोडी होती पण उभी चढण होती.एकानंतर एक टेकड्या येतंच होत्या.तारामती वरून खुबे घाटातील अडवलेलं पाणी,माळशेज घाट,आजोबाचा डोंगर,भैरवगड(मोरोशी),MTDC चे RESORT इतका सारा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता.त्याच वाटेने पुढे ‘त्या’ मंदिराकडे निघालो.वरून पुष्करणी सुंदर दिसत होती.धावतच मंदिरापाशी पोचलो.इथेच दोन अवलीये भेटले.सायकलवीर प्रीसिलीया मदन आणि सुमित परींगे!!त्यांच्या कथा ऐकून थक्क झालो.नंतर मी आणि सचिनने मोर्चा गुहांकडे वळवला.गणेश गुहा,साहेबांची गुहांची सुंदर रचना लक्ष वेधून घेत होती.काही गोष्टी मनात टिपून ,काहींचा अंदाज लावत पुन्हा कड्यावर आलो.येताना सरबत आणि भज्यांनी सोबत केली.



      जेवण आटोपलं आणि आम्ही परतीच्या तयारीला लागलो.पण माझी तब्येत बिघडत चाललेली मला जाणवत होतं.आमच्या दोन गाड्या बेलपाड्यात असल्याने सहा जणांनी नळीच्या वाटेने उतरण्याचा निर्णय घेतला.त्यांनी लगेचच निघायचा ठरवलं.दिव्यच होतं ते !! ते ठिसूळ झालेले अणुकुचीदार दगड ,त्यात कडक उन ..बापरे!!त्यांना निरोप दिला आणि आम्ही बाकीच्यांनी पाचनई मार्गे उतरण्याच ठरलं.उलटीचा त्रास सुरु झाला होता.निघतानाच गौरवने सर्वांची हाडे मोकळी केली.

      पायवाट रुळलेली होती.तशी वाट सरळ सोपी होती.महाशिवरात्र जवळ आल्याने ग्रामस्थ डोक्यावर साहित्य घेऊन गडावर निघाले होते.उन्हाचा तडाखा वाढत चालला होता.एक-दोन ठिकाणी थांबत ,विश्रांती घेत तास-दीड तासात पायथ्याला लागलो.जीप खाली थांबलेलीच होती.पुण्याच्या मंडळीना राजूर ला सोडून आम्ही पुढे निघालो.तब्येत अचानकच खालावली.उलट्या,जुलाबामुळे अशक्तपणा जाणवत होता.मी मुंबईलाच जाण्याचा निर्णय घेतला.कसाराला ६.१५ ची लोकल पकडून कसातरी विराजच्या घरी ८.०० वाजता पोचलो.

     पण अनुभव खूप जबरदस्त होता.स्वप्न पूर्ण झाले.सक्तीची विश्रांती मिळाली.सकारात्मक गोष्टी मनात साठवून ,पुढच्या ट्रेकचे नियोजन करून दोन दिवसांनी मुंबईला अलविदा केला.....




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk