मंदिर संकल्पना आणि उदय मंदिर स्थापत्याचा विकास काळाप्रमाणे होत गेला. पूर्वी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात असे, यालाच गुहा मंदिर म्हणतात. मुर्ती ही पुजनीय असल्यामुळे त्यासाठी पवित्र वास्तूची निर्मिती झाली पाहिजे अशी भावना हळुहळू समाजामध्ये विकसित होत गेली. तेव्हांची मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालिन मंदिर ही एक खोली व तिच्या पुढिल लहानसा सोपा म्हणजे व्हरांडा अशी होती. यथावकाश भक्तीचा प्रभाव वाढत गेला त्यातच "तत्वज्ञान नि अध्यात्म" यांचा विचारही महत्वाचा ठरला. त्यामुळे स्थापतींना अशी जाणीव झाली की, सामान्य घरांपेक्षा मंदिर ही वेगळी असली पाहिजेत आणि हळुहळू मंदिरांच्या रचनेत बदल होत गेला. खोलीवजा घराच रुपांतर कळस, सभामंडप, मुखमंडप, इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले. मंदिरांच्या वास्तू्चे स्वरुपही बदलायला लागले, त्याचे एक कारण म्हणजे त्याच्यातून प्रतिष्ठापित केल्या जाणार्या मुर्तीचे शास्त्र ही काळानुसार प्रगत होत गेले.
भारतीय तत्वज्ञान आणि धर्मशास्त्र यांचे साकार रुप म्हणजे "मुर्ती'. जसा या सकल्पनेचा विस्तार वाढत गेला तसा मंदिरांच्या वास्तूत आमुलाग्र बदल होत गेला. "देवघर' व्यक्ती वा कुटुंबासाठी तर 'मंदिर' समूहासाठीच झाले. त्यामुळे सहाजिकपणे सभामंडापाचा आकार वाढला. भक्तांची संख्या वाढली तशी प्रवेशद्वारांची संख्या सुध्दा वाढली. एका ऎवजी मंडपाच्या तीन बाजूंना तीन दरवाजे तयार करण्यात येऊ लागले. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण १८ विभाग कार्यरत असत. तेथे पाठशाळा चालत, त्यांच्या प्रांगणात व आजुबाजूला बाजार भरे, गाभार्यातीला देवदेवतांच्या सन्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन, किर्तन, भजन, गायन वादन, नर्तन केले जावे अशी योजना केली गेली. या प्रकारच्या सेवेला "रंगभोग" म्हणतात. मंडपाच्या मध्यभागी असणार्या शिळेला "रंगशिळा" त्यामुळेच म्हणतात. मंदिरातील १८ विभाग खालील प्रमाणे आहेत.
1)वास्तुकला 2) चित्रकला 3) शिल्पकला 4) किर्तन 5) नृत्यकला 6) धर्मसभा 7) धर्मविवेचन 8) संगीत 9) आयुर्वेदीक वनस्पती 10) गोशाळा 11) अतिथीगृह 12) धर्मकार्ये 13) प्राणिसंग्रह 14) ध्यानमंदिर 15) खलबत खाना 16) ग्रंथालय 17) अनाथ बालसंगोपन 18) पाठशाळा.
मंदिरांचे प्रकार
कल्पक भारतीय वास्तुकारांनी भौगालिक परिस्थितीनुसार अनेकविध प्रकारांची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली. या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत. विटांची मंदिरे :- मंदिर बांधणीच्या उपक्रमांमध्ये सुरुवातीला विटांची मंदिरे बांधली गेली. पण शतकानुशतक टिकून राहण्याच्या दृटीने वीट नाशिवंत असल्याने सुरुवातीच्या कालखंडातील विटांची मंदिरे आजमितीस फारच कमी प्रमाणात आढळतात. मांढाळ, रामटेक, तेर येथिल विटांची मंदिरे आजही पाहावयास मिळतात.
हेमाडपंथी मंदिरे :- हा वास्तुरचना आणि कौशल्याचा स्वतंत्र प्रकार आहे.याचे वैशिष्ट्य असे की, या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यससाठी चुना, माती वापरले जात नाही. मंदिरे विविध प्रकारच्या म्हणजेच त्रिकोणी, चौकानी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी असत, त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे.
नागर शैली मंदिरे :- यांनाच इंडो आर्यन मंदिरे असेही म्हणतात. हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा व काहीसा बहिर्वक्र स्वरुपाचा असतो. शिखराच्या मुख्य आकाराच्या वर बसक्या लोट्या प्रमाणे भाग असतो ज्याला "आमलक' म्हणतात. ही मंदिर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.
द्रविड शैली मंदिरे :- द्रविड हा शब्दच मुळात भौगोलिक प्रदेशाचे सूचक आहे. कृष्णानदी पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशात ही शैली प्रसिध्द होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मंदिराच्या शिखरात मजले बांधलेले असतात. यांनाच "भूमी' असे म्हणतात. ही मंदिरे मोठ्या परिसरात पसरलेली असतात. या मंदिराचा आणखी एक विशेष म्हणजे "गोपूर'.
वेसर शैलीची मंदिरे:- या शैलीची मंदिरे प्रामुख्याने पश्चिम भारतात आढळतात. विंध्यपर्वता पासून कृष्णानदी पर्यंत ही शैली प्रचलित आहे. यात नागर आणि वेसर दोन्ही पध्दतीचा समावेश दिसतो. यालाच "मिश्रक' असेही नाव आहे.
भूमिज शैलीची मंदिरे :- ही शैली नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे. या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या बाजूच्या परिसरात, माळव्यात व महाराष्ट्रात आढळतात. यातही प्रस्तर शिखर असलेली आणि विटांची शिखर असलेली भूमिज मंदिरे असे दोन प्रकार आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर, गोंदेश्वरचे मंदिर ही भूमिज प्रकारची मंदिरे आहेत.
मंदिरांचे भाग
एकीकडे काळानुसार मंदिराची आंतरबाह्य रचना बदलत होती, तर दुसरीकडे मुर्तीच्या संबंधीही अध्यात्माच्या आणि तत्वज्ञानाच्या अंगाने विचार होत होता. मंदिरांची तुलना मानवी देहाशी केली जाऊ लागली. मंदिराच्या विविध अंगाना नावे देण्यात आली, त्यामुळे मानवाच्या देहाप्रमाणे मंदिरांचे सुध्दा भाग निर्माण झाले. मानवाचा गर्भ म्हणजे मंदिराचा गाभारा. जसा गर्भात मानवाचा आत्मा असतो तसा गाभार्यात सृष्टीच्या आत्म्याचा सहवास असतो. "यथा देह तथा देव', असे मानले जाऊ लागले. मंदिर म्हणजे केवळ दगड विटांची एक इमारत न राहता हिंदु तत्वज्ञानाला आकार आणणारी वास्तू असे तिचे स्वरुप झाले. मनुष्य देह आणि देवळाचे भाग यांच्यात साम्य दाखवण्यात आले. उदा. केस म्हणजे कळस, आमलक म्हणजे डोके, मान म्हणजे ग्रीवा असे वर्णन अग्निपुराणात मंदिराबद्दल करण्यात आले आहे.
मंदिरात पावित्र्य आणि भक्तीचे वास्तव्य असल्यामुळे त्याच्या प्रत्येक भागाला अर्थ असतो. त्यामागे एक उद्देश असतो.जिथे देव प्रतिष्ठीत होतो त्याला गाभारा म्हणतात. गाभार्या शिवाय देऊळ असू शकत नाही. त्यानंतर येतो तो सभामंडप. सभामंडप ही एक प्रशस्त जागा असते. जिथे भक्तगण थांबू शकतात, शांत चित्ताने बसू शकतात. या सभामंडपाला किती दरवाजे असावेत हे त्याच्या व्याप्तीवर अवलंबून असते. सभामंडप आणि गाभार्या मध्ये असणार्या जागेला अंतराळ म्हणतात. सभामंडपाच्या समोर एक छोटा मंडप असतो याला मुखमंडप म्हणतात. सभामंडपात मधोमध असेणार्या चार खांबांमध्ये जमिनीवर एक उंचवटा असतो त्याला रंगशिला म्हणतात. देवाची उपासना कलेच्या माध्यमातून करावी आणि ती सादर करण्याची जागा म्हणज "रंगशिला'. सभामंडपाच्या छताचे सुध्दा भागांनुसार प्रकार पडतात. या सभामंडपाला असणार्या खिडक्यांना "जालवातायने" असे म्हणतात. संपूर्ण मंदिराच्या बाहेर असणार्या जागेला प्राकार म्हणतात.
मंदिरातील मुर्ती
जसजशी मंदिराची आंतर बाह्य रचना बदलत गेली तसतसे मुर्तीच्या बांधणीत नवनवे बदल होत गेले. मंदिरातील मुर्तीच्या स्थापनेसाठी अनेक प्रकारच्या देवतांची निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने ब्रम्हा, विष्णू, महेश, गणेश, कर्तिकेय, हनुमान या प्रमुख देवतांचा तर सूर्य, दिकपाल, नवग्रह या दुय्यम देवतांचा समावेश करण्यात आला.
ब्रम्हा हा जगताचा निर्माता, उत्पतीचा जनक , ब्रम्हदेवाच्या मुर्ती फारच थोड्या मंदिरात आढळतात. त्याची चार शीरे ही चार वेदांची प्रतिके समजली जातात. याच वाहन हंस, सरस्वती ही देवी. मंदिरावर ब्रम्हदेव यज्ञ करीत असतांना सोबत मोरावर सरस्वती उभी असलेली बर्याच ठिकाणी दाखवण्यात येते.
गणेश शिव पार्वती यांचे पुत्र. मानवी शरीर व हत्तीच शीर, चतुर्हस्त हातात अंकुश, हस्तिदंत, कमळ व परशु. गजानन हे मुर्तीचे नाव वर्णन करते. तर गणपती हे नाव यक्षगणांचा अधिपती ही पार्श्वभूमी दाखवते.
विष्णूमुर्ती :- विष्णू हा "नारायण' नावानेही प्रसिध्द आहे.विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण,बुध्द, कल्की हे विष्णूच दशावतार प्रसिध्द आहेत.हे दशावतार मंदिरात, मंदिरांवरील शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय विष्णूची मुर्ती २ प्रकारात पाहायला मिळते. "केवळ विष्णू" आणि "शेषशायी विष्णू". केवळ विष्णूच्या मुर्तीमध्ये चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले असतात. मुर्ती साधारण पणे उभी दाखवलेली असहे. वाहन म्हणून गरुड व पायाशी श्रीदेवी व भूदेवी, उजव्या/ डाव्या हाताला लक्षी अशा मुर्ती कोरलेल्या आढळतात. शेषशायी विष्णूच्या मुर्तीत शेषावर पहुडलेल्या विष्णूच्या नाभीतून बाहेर आलेल्या कमळावर ब्रम्हदेव, पायाशी लक्ष्मी कोरलेल्या आढळतात.
शिव-महेश :- "शिव', "शंकर', "महेश' या नावान ओळखला जाणारा हा देव त्रिमुर्ती पैकी एक, त्याच्याकडे लयाला नेण्याचे काम आहे.शिव हाच सृष्टीचा निर्माता असून त्याच्या नृत्यातून सृष्टीचा अविर्भाव झाला असे ही काही पंथीय लोक मानतात. शिव हा स्मशानात राहणारा देव. अंगाला राख फासून राहणारा "योगी' हिमलयाची कन्या पार्वती हिचा पती अहे. नंदी हे त्याचे वाहन आहे. त्याशिवाय अनेक गण त्याचे सहचर आहेत. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष त्याने प्राशन केले होते म्हणून निळकंठ अशा अनेक प्रकारे मुर्तीकारांनी त्याच्या मुर्ती निर्माण केल्या आहेत.
याशिवाय गजलक्ष्मीची मुर्ती सुध्दा काही मंदिरात आढळते. यात पद्मासनात विराजमान झालेल्या लक्ष्मीवर हत्ती पुष्पवृष्टी करतांना दाखविलेले असतात..याशिवाय काही मंदिरात हनुमंताच्या, इंद्राच्या मुर्ती सुध्दा आढळतात.
कासव मंदिरात प्रवेशद्वाराशी कासवाचे शिल्प देवतामुर्तीकडे तोंड करुन कोरलेले असेत. यामागचे कारण असे की, कासवाचा स्वत:च्या इंद्रियांवर ताबा असतो. सर्व इंद्रियांवर ताबा असणार्या योग्याचे प्रतीक म्हणजे "कासव'.
नंदी नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा होता. शेत नांगरत असत्तंना त्यांना हा मिळाला. नंदीने शंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांनी त्याला आपले वाहान आणि त्याला आपल्या गणांचे नायकही बनविले. नंदी हा शंकराचा निस्सीम भक्त ही आहे.. तो शंकराच सर्व काम करणारा सेवकही आहे..विष्णूच्या बाबतीत गरुडाचे किंवा गणपतीच्या बाबतीत उंदराचे स्थान इतके महत्वाचे नाही पण, शंकराच्या नंदीचे स्थान अधिक महत्वाचे आहे म्हणूनच की काय शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचे नाव सांगितले आहे.. नंदीची, नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशी अनेक नावे आहेत. काही ठिकाणी विष्णूपुत्राचा उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवाने बैलाच रुप धारण केले आणि त्याचेच पुढे नंदी नाव रुढ झाले. त्यामुळे सहाजिकच शिवा आधी नंदीचे दर्शन व पूजन करणे भक्तांना बंधनकारक असेत. काही ठिकाणी तर नंदीच्या दोन शिंगांमधून शिवाच दर्शन घेण्याची पध्दत आहे.. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात शिवाच्या गाभार्यात शिरण्या आगोदर नंदी स्थापन कलेला असतो. काही मंदिरात सभामंडपाच्या अगोदर नंदीसाठी स्वतंत्र मंडप बनविलेले असतात. त्यालाच नंदीमंडप असेही म्हणतात. खूप ठिकाणी नंदीची मुर्ती पूर्णाकार स्वरुपाची असते, त्याची शिंगे आखूड टोकदार, शिंड आकारान मोठे असून पुढचा पाय जरी पायाखाली मुडपलेला असला तरी क्वचित पुढे टाकलेले असतो. त्यामुळे हा वृषभ कधीही उठून उभा राहील असे वाटते. शोके जरी एका बाजूला कललेले असले तरी दृष्टी मात्र गाभार्यातील पिंडीकडे लावलेली असते.गळ्यात किंवा पाठीवर घुंगराच्या आणि घंटांच्या माळा, पायात घुंगराच चाळ अशा अनेक अलंकारांनी नंदमुर्ती नटवलेली असते. या सार्या अलंकारापेक्षा बघणार्यावर जी छाप पडते ती त्याच्या भरदार शरीरयष्टीची. याशिवाय अनेक नंदींच्या पाठीवर शिवपिंड कोरलेली असते. उदा. नाशिकच्या सटाणा जवळ असणार्या देवळाणे या मंदिरातील मुर्ती. शिवमंदिरात नंदी नसणारी सुध्दा काही मंदिर आहेत. यात कोल्हापूरच्या खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिराचा समावेश होतो. यामागच कारण असे की प्रजापति दक्षाच्या १६ कन्यांपैकी सतीने प्रजापतिला न जुमानता शंकराशी लग्न केले. त्यामुळे दक्षाच्या मनात शंकराला स्थान नव्हते म्हणून दक्षाने केलेल्या वाजपेय यज्ञात त्याने शंकराला आणि आपल्या कन्येलाही बोलावले नाही. शंकर मानी असेल्याने न बोलविता तो गेलाही नाही पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. म्हणून शंकराने तिला नंदीसोबत दक्षाच्या घरी पाठविले यामुळे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात नंदी नाही.
घंटा - एक मंगलमय नाद
आपण जेव्हा जेंव्हा मंदिरात जातो तेंव्हा तेंव्हा आपण देवासमोर हात जोडण्यापूर्वी घंटा वाजवतो. घंटेतून येणार्या नादामुळे आपल्या मनातील ऎहिक विचारांची साखळी तुटते आणि निर्विचार मनाने आपण देवाला नमस्कार करतो. या घंटेच्या बाबतीत योगशास्त्रात बरेच उल्लेख आहेत.याबद्दलचा एक श्लोक असा आहे की, आगमनार्थ तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम्। कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हानलक्षणम् ।। म्हणजेच "देवाच्या आगमनार्थ आणि राक्षसांच्या गमनार्थ तू घंटे तुझा मधुर मंगलमय असा नाद कर''. अर्थात घंटा ही मंगलतेची सूचक आहे..पृथ्वी आणि आकाश यामधील पोकळीचे प्रतिक घंटा आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सर्व मंदिरात या घंटा आढळतात. मात्र महाराष्ट्रातील काही काही घंटा एवढ्या मोठ्या आहेत की, त्या तेथे कशा आणून लावल्या असतील याबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते. भिमाशंकरच्या मंदिरातील घंटचे वजन ५ मण आहे.. त्यावर १७२९ असा रोमन लीपीतील आकडा सुध्दा कोरलेली आहे. कदाचित त्या साली ती घंटा ओतली असावी. १७३९ च्या सुमारास चिमाजी आप्पांनी वसई जिंकल्यावर ठाणे जिल्ह्यातील वाशिंद गावातून ती आणली असावी असा अंदाज आहे.पंचवटीच्या परिसरात असणार्या नारोशंकर मंदिराच्या समोर सुध्दा अशीच घंटा आहे.. त्या घंटेला सुध्दा "नारोशंकराची घंटा' असे म्हणतात. या घंटेवर सुध्दा १७२१ असा आकडा आहे.. या घंटेचे सुध्दा एका पोर्तुगीज चर्चवरुन स्थलातर झालेले आहे. मंदिराच्या समोरच्या तटावर चढून सुध्दा ही घंटा वाजवता येत म्हणजे त्याची उंची आणि आकार केवढा असेल याची कल्पनाच केलेली बरी. खरेतर या मोठ्या प्रकारच्या घंटा म्हणजे मराठ्यांची विजयचिन्हे आहेत. पण सध्या मात्र ऊन, वारा, पाऊस यांचा मारा खात त्या उभ्या आहेत. या सर्व घंटा साधारणपणे पितळेच्या किंवा पंचधातूच्या बनविलेल्या असतात..
किर्तीमुख अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले. त्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगित्ले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.
मंदिरांवर किर्तीमुखाची विविध स्वरुपातील शिल्पे आढळतात. खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदिराच्या प्राकारात १६ प्रकारात सादर केलेली किर्तीमुख त्यातील कलाकुसर यास तोड नाही. या प्रत्येक किर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम करणार्याने शिवापार्वतीलाही किर्तीमुखात बद्ध केलेले आहे. अनेक ठिकाणी किर्तीमुखातील नक्षीकामातून मोर आणि हंस साकारलेले दिसतात, याशिवाय फळफुले सुध्दा बहरलेली दिसतात. काही ठिकाणी व्याघ्र ही साकारलेले दिसतात. वानर सुद्धा किर्तीमुखाच्या शिल्पात दाखवितात. काही मंदिरात सभामंडपातही खांबांवर किर्तीमुख कोरलेली आहेत.
शिलालेख काळ्या पाषाणात कोरलेली किंवा बांधलेली ही मंदिरे आपल्या सारख्या सामान्य माणसांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. ती पहात असतांना सहाजिकपणे मनात प्रश्न येतो की, कोणी बरे ही मंदिरे बांधली असतील? तर याच उत्तर मिळते ते शिलालेखांवरून आणि ताम्रपटांवरुन. शिलालेखांमध्ये मंदिराचा स्थापनकर्ता, काळ, त्याचे प्रारंभीचे स्वरुप, पुढे त्यात काय बदल झाले, त्यासाठी कोणी दान दिले या सर्व गोष्टींची माहीती मिळते.दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक मंदिरावर असे शिलालेख आढळतात. अशा प्रकारचे शिलालेख ही मंदिरासमोरच्या दिपमाळेवर, पुष्कर्णीवर, पायर्यावर, द्वारांवर, रंगेशिळे, उंबरठ्यावर, तुळवटांवर, खांबांवर तर कधी घंटांवर सुध्दा कोरलेले आढळतात.काही ठिकाणी मुर्तीच्या पायथ्याशी सुध्दा शिलालेख कोरलेले आढळतात.
सुरसुंदरी
सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा वा पर्या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असाही अनेकांचा समज आहे. या सुरसुंदरीचा मंदिराच्या भिंतीवर असण्याचा उद्देश काय ? प्रयोजन काय ? हे समजणे महत्वाचे आहे.. शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध हे ५ विषय एकएकटे सुध्दा मारक असतात.. मानवाला तर या ५ विषयांनी पूर्णपणे ग्रासल आहे. मग त्यांची स्थिती कशी होईल. भक्तगणांनी मंदिरात जातांना कसे सावध चित्त असावे, या संबंधीचे सूचन करणार्या सुरसुंदरी आहेत. शिवाय, काही जणी देवाच्या दर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे,देव दर्शनाला कसे जायचे असते इत्यादिंचे मार्गदर्शन करतात.रिक्तहस्ते देवाला जायचे नसते. पान,फळ, फुल इ. काहीच जवळ नसतांना केवळ पाणी सुध्दा मनोभावे देवाला अर्पण केले तरी चालते. गीतेत याविषयी छान श्लोक आहे. पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज । ते त्या पवित्र भक्तांचे अर्पिले खाए मी सुखे।।
डालमलिका, पद्मगंधा, जया इत्यादी सुरसुंदरी हेच सुचवित असतात.. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नता सुध्दा असावी लागते. मध्ययुगीन मंदिरावर मोठ्या प्रमाणात सुरसुंदरीची शिल्पे कोरण्यात आली आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे भक्तिसंप्रदायाची असणारी त्या काळातील लोकप्रियता. देवालय ही त्या गावांतील सांस्कृतिक केंद्र होती. भक्तजनांमध्ये नितीमूल्य निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उध्दार होईल. मंदिरावर गळ्यात लहानस, डमरुसारख वाद्य अडकवून ताल धरणार्या सुरसुंदरीस मर्दला असे म्हणतात. उर्वशी, मेनका, तिलोत्तमा या बहुदा प्रतापाची जाणीव करुन देण्यासाठी कोरलेल्या असाव्यात. सुरसुंदरी ज्या भावभावना, गुणधर्म वा हेतु प्रकट करतात. ते सर्वच ठिकाणी आढळत असेल तरी कलेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रकटीकरणात वेगळेपण असेल्याचे जाणवते. अनेक ठिकाणच्या मंदिराच्या गाभार्याच्या प्रवेशद्वारापाशी २ सरीतांची शिल्पे कोरलेली असतात. ती गंगा आणि यमुना यांची होत. त्यांच्या हातात जलकुंभ दाखविलेला असतो. तर पायाशी क्रमाने मकर व कासव कोरलेले असेत.
यक्ष-यक्षी भारतीय शिल्पकारांनी यक्षांची आणि यक्षींची योजना वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते.पौराणिक कथांमधून यक्ष आणि यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी असून यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. कुबेर हा त्यांचा नायक किंवा राजा, हा धनाचा, संपत्तीचा अधिपती. यामुळे स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. प्राचीन काळापासून लोकश्रध्देत स्थान मिळवून बसलेल्या स्थानिक व मर्यादीत शक्तीच्या देवतांचाही समावेश याच यक्षयोनीत होतो. असे करीतकरीत निसर्गातील वादळवारे,पूर, वृक्षवल्ली या सगळ्यांना मानवी म्हणजे यक्ष-यक्षीचे रुप देण्यात आले. मानवाने जे आपल्या आकलना पलिकडचे आहे आणि आपल्यापेक्षा सामर्थ्यवान अशा सर्व गोष्टींना यक्षरुप देऊन, त्याची पूजाअर्चा, उपासना करण्यात येऊ लागली. स्थलदेवता, जलदेवता, वृक्षदेवता यांना यक्षरुप देऊन त्यांची शिल्पे मंदिरात कोरण्यात आली. पूरात एखादा माणूस वाहून जाणे, अपघातात दगावणे या गाष्टी नैसर्गिक न समजता मानवाने त्याला जलदेवतेचा, वृक्षदेवतेचा कोप असे स्वरुप दिले आणि सर्व देवता यक्ष योनीत जमा झाल्या आणि माणूस या अतितमानवी शक्तीपुढे नतमस्तक झाला. अशा प्रकार या यक्ष यक्षींचा संभार वाढत गेला.
मंदिर शिल्पात यक्षांना थोडी अवघड कामे दिली आहेत. ती म्हणजे भारवाहनाची! मंदिराच्या खांबाना आपल्या खांद्यावर तोलून धरण्याची. या भारवाहकांना "किचक' असेही म्हणतात. रतनगडच्या पायथ्याशी असणार्या "अमृतेश्वर' मंदिरात अशा प्रकारचे यक्ष आहेत. वेरूळच्या कैलास मंदिरात तीन तीनच्या समूहांत पट्टावरील हसतमुख,बावळट चेहर्याच्या यक्षांना पाहून मन प्रसन्न होत. याच मंदिरावर काही यक्षगण वीणा वादन करतांना दिसतात तर काही यक्षगण आपल्याच धुंदीत नाचतांना दिसतात. तात्पर्य काय तर शिल्पकारांनी निर्माण केलेल्या प्रत्येक शिल्पाच्या मागे काहीतरी निश्चित असा अर्थ आहे.
व्याल
मध्ययुगीन मंदिरांच्या भिंतीवर जे शिल्पकाम आहे त्यात अनेक ठिकाणी पुढचे पाय वर उचलून, मागच्या पायावर उभा असलेल्या सिंहासारखे, हत्तीसारखे डोके असलेला एक प्राणी दिसतो. त्याला "व्याल' असे म्हणतात.नागपूर पासून २१६ कि.मी. अंतरावर असणार्या मार्कंडी नावाच्या मंदिरावर विवध प्रकारच्या व्यालांच्या मुर्ती आढळतात. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे हा कोरलेला असतो. या व्यालांचे अनेक प्रकार आहेत. सिंहव्याल, व्याघ्रव्याल, गजव्याल, वृकव्याल हे त्यापैकीच काही. बहुतेक मंदिर शिल्पात या व्यालांच्या पाठीवर स्वार असतो. तर पायाखाली एखादा बैठा यक्ष असतो. या व्यालांची निर्मिती पश्चिम आशियात झाली . इराणमध्ये मौर्यकाळात अनेक शिल्पांमध्ये याचा वापर करण्यात आला. शिल्पकारांच्या कौशल्यामुळ हा परका, काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला. सर्वच व्यालमुर्ती मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत असे असूनही या व्यालमुर्ती कधी देवता, सुरसुंदरी या मूर्तींच्या आड येत नाहीत किंवा त्यांच्याशी स्पर्धा सुध्दा करत नाहीत.
नाग
काही मंदिरांवर किंवा मंदिरा बाहेर नागाचे शिल्प कोरलेली आढळतात. नाग हे वास्तविक "काळाचे प्रतीक' आहे.. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो. काळही तसाच, तो अतिशय वेगाने पुढे सरकतो. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाचा दुसरा अर्थ म्हणजे "अनंत' म्हणूनच नागालाही "अनंत' म्हणतात. काळ ज्याच्या हातात आहे तो देव, देखिल याच नागाचे एक रुप आहे.
गोमुख
"गो" म्हणजे गाय, तर गोमुख म्हणजे गाईचे मुख. गाईला हिंदुधर्मात महत्वाच स्थान आहे..तिला माता मानले आहे.. गोमातेचे दूध, शेण, मूत्र इत्यादी सासारेच कमालीच आरोग्यप्रद आहे.. त्यामुळे पूजाविधी करतांना पिंडीवर ओतलेले पाणी बाहेर काढतांना गोमुखातून सोडले जाते. याच्या मागची संकल्पना अशी की मुळातच देवावरून सोडलेले पाणी गोमुखातून बाहेर सोडल्यामुळे आणखीनच पवित्र आणि आरोग्यवर्धक होत. अनेक ठिकाणी गोमुखातून बाहेर सोडलेले पाणी एका छोट्याश्या कुंडामध्ये साठेवले जाते.अनेक मंदिरांमध्ये देवावरून सोडलेले पाणी वाहून जाण्यासाठी गोमुखा ऎवजी मकरशिल्प कोरलेले असते. अशा प्रकारची शिल्पे सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत. यांनाच "मकरप्रणाल' असेही म्हणतात.
दिपमाळ
दिपमाळ हा एक महाराष्ट्रीयन शिल्प प्रकार आहे. देवाच्या मुर्ती समोर अखंड नंदादिप तेवत ठेवण्याची एक जुनी पध्दत आहे.. देवाच्या आरतीच्या वेळी दिप लावतात. उत्सव प्रसंगी शहरात दिपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायण ग्रंथामध्ये आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दिपलक्ष्मी आणि दिव्यांची झाडे लावण्याची प्रथा आहे. याशिवाय देवालयासमोर दिपदंड किंवा दिपस्तंभही असतात. पण दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे.विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. उत्सवाच्या प्रसंगी, दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दिपमाळा उजवळण्यात येत असत. म्हणूनच म्हटले आहे. "दिपमाळ उजळे। मंदिरी परमप्रकाश पडे।।". याचा आणखी एक फायदा म्हणजे उंचीमुळे सर्वांना सणांची एक सार्वत्रिक घोषणा होत असे. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दिपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रुढ होती. विषेशत:जेजुरीच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या शेकडो दिपमाळा याचीच साक्ष देत आजही उभ्या आहेत.
वीरगळ अनेकवेळा मंदिराच्या प्राकारामध्ये एक उभट आकाराची उंच आयताकृती अशी शिळा पडलेली दिसते. या शिळेलाच "स्मारक शिळा' असेही म्हणतात. धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारकशिळा म्हणजेच "वीरगळ'. तसेच व्यक्तीच्या निधनानंतर अशा प्रकारची स्मारके उभारण्याची प्रथा होती आणि त्यातही एखादा वीर किंवा राजा किंवा थोर व्यक्ती असेल तर त्यासाठी अशाप्रकारची वीरगळ उभारण्यात येत असे. अर्थातच ही थोर व्यक्ती किंवा हा वीर पूजनीय असल्याने त्या वीरगळीला मंदिरात स्थान मिळाले. कर्नाटक मध्ये या वीरगळींना "कांदळ" म्हणतात. या वीरगळीवरील कोरीव कामाची योजना सर्वसाधारणपणे एकाच स्वरुपाची असते. या शिळांचे तीन भाग किंवा चौकटी पाडलेल्या असतात.. तळाच्या चौकटीत वर्ण्य म्हणजे विषय म्हणजेच वीराचे युध्द त्याचा मृत्यू, मधील चौकटी मध्ये त्याचे स्वर्गारोहण व वरील चौकटीमध्ये तो वीर स्वर्गात करीत असलेली ईशपूजा याप्रमाणे दृश्ये चित्रीत केलेली असतात. तात्पर्य, वीरगळ म्हणजे वीपुरुषाचा एक संक्षिप्त चरित्रपटच होय
कुंड/ पुष्करणी पंचोपचार पूजा, अष्ट्भोग यासाठी म्हणून मंदिराच्या परिसरात अनेक आकाराच्यार बारवा निर्माण करण्यात आल्या. लहान आड ही मंदिर वास्तूच्या पावित्र्याची संकल्पना जपण्यासाठी निर्माण करण्यात आली. याच बरोबर मंदिरात विशेषत: शिवमंदिरात अखंड चालणार्या जलाभिषेकासाठी म्हणून गर्भगृहाच्या मंदिर परीसरातील एखादे "कळ्ळाल' पुष्करणी किंवा कुंडातील व्यवस्था कलेली होती. देवालयात जाण्यापूर्वी स्नान करुन शुचिर्भूत होऊन जाता यावे यासाठी ही व्यवस्था आवश्यक मंदिरासाठी लागणारा दगड विहिरीचा आकार मोठा करुन त्यातून निघत असे तोच वापरला जाई. अनेक ठिकाणी कुंडाना किंवा पुष्करणीला चारही बाजूंनी पायर्या असतात.
|