Print Page | Close Window

Chandragad - ArthurSeat Range Trek

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Range treks in Sahyadri
Forum Description: Sahyadri is one of the mountain ranges in world which offers wide array of trails. Following section is an attempt to document such range treks. Wish our Sahyadrians like it!!
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=241
Printed Date: 23 Dec 2024 at 2:01pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Chandragad - ArthurSeat Range Trek
Posted By: amolnerlekar
Subject: Chandragad - ArthurSeat Range Trek
Date Posted: 30 Dec 2013 at 5:15pm
चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक 

नुकताच झालेला 
चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक हा ह्या हिवाळ्यामधील खास आकर्षण ठरला. थंडी, भरपूर चाल, जंगलातील वाट आणि आर्थरसीटवरील सूर्यास्त ह्यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय होता. 

चंद्रगड ते आर्थरसीट (महाबळेश्वर) ही रेंज प्रामुख्याने खालीलप्रकारांत विभागता येऊ शकते :

१. ढवळे गाव ते चंद्रगड
२. चंद्रगड ते बहिरीची घुमटी 
३. बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ 
४. गाढवाचा माळ ते आर्थरसीट point 

डोंबिवलीवरून ट्रेक टीम शुक्रवार २१ डिसेंबरला रात्री ११:३० ला निघाली. शनिवारी सकाळी ५:३० ला आम्ही ढवळे गावात पोहोचलो. सकाळी ७ वाजता ट्रेकला सुरुवात झाली. 

१. ढवळे गाव ते चंद्रगड (सुरुवात: सकाळी ७ ; शेवट: सकाळी ९)

चंद्रगड हा साधारण ढवळे गावाच्या पूर्वेला असून तो गावामधून लगेच दृष्टीस पडत नाही. गावातील मंदिर डावीकडे  ठेवत चालायला लागायचे. सुरुवातीचा काही भाग हा शेतामधून जातो. सुरुवातीला दिसणाऱ्या एका डोंगराच्या मागे आणि थोडेसे डावीकडे चंद्रगड आहे. ह्या डोंगराला वळसा घालून आपल्याला पहिल्या १५-२० मिनिटांची वाट पार पाडावी लागते. सुरुवातीला दरी डावीकडे आणि नंतर उजवीकडे ठेवत ही वाट पार करायची. शेतजमिनीनंतरची हे वाट जंगलातून जाणारी आहे. इथपर्यंत विशेष चढ नाही. इथे चंद्रगडच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून थोडा आणि मध्यम चढ आहे. माती भुशभुशीत असल्याने जरा जपून चालावे लागते. जेथे गडचढाई चालू होते तेथे ग्रामस्थांनी एक मोठा बोर्ड लावला आहे. येथून पुढील १५-२० मिनिटांची चढाई छोटाशा पठारावर आणून सोडते. तेथून वर जायला कातळमार्ग आहे. काही ठिकाणी कातळात पायऱ्या खोदल्या आहेत. येथून चढत आल्यास आपण पुढील १० मिनिटांत गडावरील पठारावर येउन पोहोचतो.  पूर्वदिशा उजवीकडे राहते. येथे एक शंकराची पिंड आणि नंदी दृष्टीस पडतो. शेवटच छोटा कातळटप्पा पार केल्यावर आपण माथ्यावर येउन पोहोचतो. उत्तरेकडे जाणाऱ्या वाटेवर उजवीकडे एक पाटा-वरवंटा दिसतो. हा पहिल्यापासून आहे का कोण्या गावकर्याने आणला ह्याविषयी मात्र माहिती उपलब्ध नाही.  उत्तरेकडे चालत नेणारी ही वाट मार्गात एक पाणीटाके दाखवते. ह्यातील पाणी खराब आहे. ह्याच्याच खालच्या बाजूला २ पाणीटाकी असून ती कोरडी आहेत परंतू तेथे जाता येत नाही. उत्तरेकडील ही  वाट पुढे एका बुरुजावर उतरते. तेथून उजवीकडे आल्यास २ आणि डावीकडे गेल्यास ३ पाणीटाकी दिसतात. सगळ्यांतील पाणी खराब आहे. डावीकडील टाक्यांच्या इथून दूरवर प्रतापगड दिसतो. 

२. चंद्रगड ते बहिरीची घुमटी (सुरुवात : सकाळी ९:४५ ; शेवट : दुपारी २:४५)

ह्या रेंज मधील सगळ्यात जास्त कठीण हा patch आहे. चंद्रगड बघून दक्षिणेकडील वाटेने खाली यावे आणि चढताना शेवटी लागणारा कातळटप्पा पार करावा. येथून उजवीकडे जाणारा रस्ता ढवळे गावात जातो तर डावीकडील रस्ता घळीत उतरतो. माथ्यावरून इथे यायला १५ मि. लागतात. येथून डावीकडे वळावे आणि चन्द्रगडाची कातळभिंत डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत ही खिंड पार करावी. ही वाट अतिशय निसरडी असून सर्वत्र गवत पसरलेले असते. येथून पुढे खाली उतरणारी वाट पूर्णत: झाडी आणि भुशभूशीत मातीतून आहे. सुरुवातीची २० मि. झाडीतून आणि नंतरचा अर्धा तास दगडातून उतरल्यावर ही वाट एका नळीच्या (ओढ्याच्या) वाटेवर आणून सोडते. येथून उजवीकडे (दक्षिणेकडे) वळल्यावर बहिरीच्या घुमटीची चढाई चालू होते. ही वाट पूर्णपणे जंगलातून आहे. चढ मध्यम स्वरूपाचा असून दरी डाव्या बाजूला ठेवावी. विशेष म्हणजे जंगलातील वाटेमुळे उन्हाचा त्रास जाणवत नाही. 

चंद्रगड ते बहिरीची घुमटी हा मार्ग विस्तृत आणि सतत चढाईचा असल्यामुळे हा पट्टा शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहतो. जंगलातील ही वाट नळीच्या वाटेशी संपते आणि येथून आपल्याला १८० अंशात वळावे लागते. नंतरचा चढ हा परत खडा असून माती भुशभुशीत आहे. 
हा चढ शेवटी एका माळरानावर संपतो. चंद्रगड उत्तरेकडे मागे राहतो आणि आताच्या उंचीसमोर चंद्रगड ठेंगणा वाटायला लागतो. येथून पुढची वाट हि परत C shape मध्ये असून आसमंत उघडा रानमाळ आहे. ही वाट जेथे संपते तेथे छोटासा कातळटप्पा पार केल्यावर आपल्याला बहिरीची घुमटी दिसते. येथे काही देव-देवतांच्या दगडी मूर्त्या आहेत. घुमटीच्या थोडे आधी एक वाट उजवीकडे वळते जी पुढे जोरचे पाणीवर आणून सोडते. येथून पूर्वेकडील रस्ता जोर गावात उतरतो म्हणून ह्यास जोरचे पाणी म्हणतात. येथील पाणी थंड, सुमधूर आणि पिण्यायोग्य आहे. 

३. बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ (आर्थरसीट प्रथमदर्शन) (सुरुवात: दुपारी ४:१५ ; शेवट : दुपारी ४:३०)

जोरचे पाणीवरून उजवीकडील वाट दक्षिणेकडील गाढवाच्या माळावर जाते. ही वाट जंगलातून असून सोपा चढ आहे. ही वळणावळणाची वाट १५-२० मि. चालल्यावर पठारवजा ठिकाणी  आणून सोडते. दक्षिणेकडे महाबळेश्वरचे बुलंद पठार आणि आर्थरसीट point चे प्रथम दर्शन होते. 

४. गाढवाचा माळ (आर्थरसीट प्रथमदर्शन) ते आर्थरसीट point (सुरुवात: दुपारी ४:३०; शेवट : संध्याकाळी ५: ४५)

हा ह्या रेंजमधील शेवटचा टप्पा आहे. ही वाट मिश्रस्वरूपाची (जंगल आणि उघडा रानमाळ) आणि वळणावळणाची आहे. शेवटच्या काही भागात माती भुशभुशीत असल्याने थोडी काळजी घ्यावी लागते.
सगळ्यात शेवटच्या भागात एक १२-१५ फूटांचा rock patch आहे. चढायला सोपा असणाऱ्या ह्या patch मधे जागोजागी खोबण्या आहेत. हा patch चढून गेल्यावर आपण आर्थरसीटवर पोहोचतो. 

अशाप्रकारे जवळपास ११ तासांच्या चालीनंतर आम्ही चंद्रगड ते आर्थरसीट ही रेंज पार केली. हा ११ तासांचा ट्रेक करताना आम्हाला काही अनुभव आले आणि त्यावरून ह्या ट्रेकसाठी घ्यायच्या काही सूचना मांडाव्याशा वाटल्या. त्या अशा:

१. ढवळे गावातून फक्त चंद्रगड करणे शक्य आहे. परंतु, पावसाळ्यात ही रेंज करणे टाळावे. घुमटीकडे जाणाऱ्या खिंडीत खूप गवत साठलेले असते आणि ही वाट निसरडी असून तोल गेल्यास सरळ दरीत पडण्याचा संभव आहे. 

२. चंद्रगडसाठी उन्हाचा फार त्रास होत नाही. पण घुमटीच्या आधी उघडा रानमाळ असल्याने आणि तोवर उन पण चढल्याने उन्हाचा त्रास होऊ शकतो. सोबत glucose, काकड्या, फळे ठेवल्यास ह्या त्रासाची तीव्रता कमी करता येऊ शकते. 

३. ढवळेमधून चालायला घेतल्यावर फक्त घुमटीजवळील जोरचे पाणीमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. त्यामुळे सोबत भरपूर पाणीसाठा बाळगावा. 

४. पाणी कमी प्यायल्यामुळे किव्वा चाल भरपूर असल्याने कधी कधी Cramp येण्याचा किव्वा Muscle Paining चा त्रास होऊ शकतो. सोबत स्वतःचे Medical Kit आणि इतर औषधे बाळगावीत. 

५. पूर्ण रेंजमध्ये १ छोटा आणि १ मोठा Rock Patch आहे. दोन्ही सोपे असून प्रस्तारोहाणाच्या साधनाची गरज भासत नाही. तरी सोबत ५०/१०० फुटी दोर असावा.


--अमोल नेरलेकर
  ९९६७८४८१२४ 



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk