'१३ : मेरा ट्रेकक्षितीज'
'सह्याद्री' म्हटलं की डोळ्यासमोर येत ते त्याच विस्तीर्ण रूप..'सह्याद्री' म्हटलं की कानात घुमतात त्या 'हर हर महादेव'च्या घोषणा..'सह्याद्री' म्हटलं की आठवतो तिथला निसर्ग आणि त्याच्या कुशीत निश्चिंतपणे जगणारे आणि फुलणारे हजारो जीव..आणि 'सह्याद्री' म्हटलं नकळत मनात येत 'ट्रेकक्षितीज'..
आज आपली संस्था १४ व्या वर्षात पदार्पण करते आहे. काही हौशी, सम-छंद आणि समावडी असणारे उत्साही तरुण एकत्र आले आणि त्यातूनच हे बीज पेरलं गेल.. त्यांनी अनेक गड-किल्ले पाहिले आणि ते आपल्यासोबत बाकी सगळ्यांना दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आज त्या बीजाचा मोठा वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या छायेत अनेकांना सहारा मिळतो आहे, पुढचा मार्ग सापडतो आहे..
आपल्या सभोवतालचा समाज विविध अंगांनी, विविध प्रकारच्या माणसांनी भरला आहे हे 'ट्रेकक्षितीज'ने जाणलं आणि वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरु झाले..
'स्लाईड-शो'…सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त फिरताना त्याला नानाविध प्रकारच्या फोटोन्मध्ये साचेबध्द करून इतरांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न..'स्लाईड-शो' ने प्रेक्षकांमध्ये वयाचं बंधन न ठेवता अबालवृद्धान्ना सह्याद्रीमध्ये फिरवून आणलं..त्यांच्या मनात सह्याद्रीविषयी प्रेम निर्माण केल..आजही अनेक themes घेऊन आपण 'स्लाईड-शो' करत आहोत...
ह्या समवेत आपण एक सामाजिक बांधिलकीही बाळगली. सुधागडच्या संवर्धनाची प्रतिज्ञा तर आपण घेतलीच पण त्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तू आणि त्याचा इतिहास ह्याची साक्ष आपण पुढील अनेक पिढ्यांना देत राहू ह्याची खात्री सगळ्यांच्या मनात निर्माण केली. सुधागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या 'पाच्छापूर'मध्ये सार्वजनिक ग्रंथालय सुरु करून आणि तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टींची मदत करून आपण त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवला..आजही त्यांच्यातील उत्साह आपल्याला ह्याची पोचपावती देतो आहे..
साध्याच युग हे तंत्रज्ञानाचे आहे हे आपण जाणलं आणि त्यातूनच www.trekshitiz.com ह्या संकेतस्थळाचा (वेबसाईटचा) जन्म झाला. महाराष्ट्रातील २८० किल्ल्यांची माहिती आपण ह्यावर उपलब्ध करून दिली आणि माहितीचे नवीन दालन उघडले. सह्याद्रीतील फुलपाखरे, पक्षी, लेण्या, मंदिरे, ११० किल्ल्यांचे नकाशे आणि जवळपास ५००० फोटो देऊन त्याला आपण समृध्द केले. आजही ध्रुवतार्याप्रमाणे अढळ स्थान प्राप्त केलेली आपली वेबसाईट अनेकांना किल्ल्यांविषयी मार्गदर्शन करते आहे. दिवसाला साधारण ५००० भेटी ग्राह्य धरल्यास आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख भेटी मिळालेली www.trekshitiz.com ही एकमेवाद्वितीय वेबसाईट आहे.
हे सार करताना आपला मुख्य उद्देश होता तो म्हणजे गिर्यारोहण अर्थातच ट्रेकिंग. आजही वर्षाला २४ ट्रेक्स आणि २४ leaders हे लक्ष्य आपण अविरत आणि यशस्वीरीत्या पार पाडत आहोत..
हे सार जपताना..त्याच संवर्धन करताना आपण सारे एकत्र आलो आणि इतरांनाही एकत्र आणल. गिर्यारोहण आणि इतिहासाची आवड ह्या एका धाग्याने अनेक माणस जोडली..जपली..आणि आज कधीही न तुटणारी आणि आकसणारी एक शृंखला तयार केली. हे सार करताना आपण धर्म, पंथ, जात, भाषा ह्यांवर लक्ष न देता प्रत्येकातल्या 'माणसाला' ओळखलं आणि म्हणूनच आज '१३ मेरा ट्रेकक्षितीज' हे 'तेरा-मेरा ट्रेकक्षितीज' अस लिहिताना खूप समाधान मिळते आहे..
'ट्रेकक्षितीज' हे एक कुटुंब आहे. काळाच्या ओघात, उत्तरोत्तर आपली ह्या कुटुंबाशी आणि पर्यायाने सह्याद्रीशी असलेली मैत्री आणि प्रेम अशीच दृढ होत जाईल ह्यात तीळमात्र शंका नाही...
जय भवानी…जय शिवाजी…!!!
--अमोल नेरलेकर amol.nerlekar@gmail.com
|