Print Page | Close Window

पाटणादेवी मंदिर

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Temples of Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Temples in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=191
Printed Date: 04 Jan 2025 at 3:38pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: पाटणादेवी मंदिर
Posted By: amitsamant
Subject: पाटणादेवी मंदिर
Date Posted: 14 Nov 2013 at 10:47pm

गावाचे नाव :- पाटणादेवी
जिल्हा :- जळगाव
जवळचे मोठे गाव :- चाळीसगाव


चाळीसगाव येथील गौताळा अभयारण्याच्या गेटपासून २ किमी अंतरावर डोंगरी नदीच्या काठी पाटणा देवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या समोर कन्हेरगड आहे. पाटणा देवी म्हणजेच चंडीकादेवी हे शक्तीपिठ आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी सुदर्शनचक्र सोडून पार्वतीच्या शवाचे १०८ तुकडे केले. ते तुकडे(अवयव) ज्या ज्या ठिकाणी पडले , तेथे शक्तीपिठ निर्माण झाले आणि त्या अवयवावरून शक्तिपिठाचे नामकरण केले गेले. पाटण येथील डोंगरावर पार्वतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडला म्हणून या ठिकाणी वरदहस्त शक्तीपिठाची निर्मिती झाली.

Patanadevi Mandir, Chalisgaon

पूर्वीच्या काळी गोविंदस्वामी हे देवीचे उपासक होऊन गेले. त्यांनी आयुष्यभर देवीची उपासना केली. वृध्दापकाळामुळे त्यांना उपासनेसाठी डोंगरावर जाणे जमेना म्हणून त्यांनी देवीला डोंगराखाली येण्याची विनंती केली. आपल्या प्रिय भक्ताच्या विनंतीला मान देऊन देवी डोंगराखाली आली. त्या ठिकाणी गोविंदस्वामी यांनी देवीची तपश्चर्या केली. देवीने प्रसन्न होऊन वर दिला मी स्वयंभू मुर्तीच्या रुपाने प्रकट होईन. त्याप्रमाणे देवीची मुर्ती गोविंदस्वामीना कुंडात मिळाली. त्यांनी तिची स्थापना मंदिरात केली. त्याच ठिकाणी इसवी सनाच्या १२ व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी येथे मंदिर बांधुन शीव, शक्ती व विष्णूची स्थापना केली. या मंदिरा समोर गोविंदस्वामींची समाधी आहे.
Patanadevi Mandir, Chalisgaon
पाटणादेवी जवळ असलेली पितळखोरे लेणी निर्मिती सातवहानांच्या काळात झाली असे मानले जाते. त्यानंतर ५- ६ व्या शतकात वाकटाकांच्या काळात या लेण्यांना पुन्हा उर्जितावथा आली. देवगिरीच्या यादवांच्या काळात हा भाग विज्जलगड या नावाने प्रसिध्द होता. पाटणादेवीचे मंदिर यादवराय खेमचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी ११२० मध्ये जनतेसाठी खुले केले.

शुन्याचा शोध लावणारे महान गणिती भास्कराचार्य यांचा जन्म व वास्तव्य विज्जलगड परीसरात इ.स.१११४ ते इ.स. ११८५ या काळात होते. त्यांचे सिध्दांत शिरोमणी, करण कुतुहल, वासनाभास्य, भास्कर व्यवहार, विवाहपटल, सर्वोतोभद्र यंत्र, वासिष्ठतुल्य असे ग्रंथ प्रसिध्द आहेत. सिध्दांत शिरोमणी ग्रंथातील लिलावती हा गणितावरील खंड प्रसिध्द आहेत.
डोंगरी नदी वरचा पुल ओलांडून आपण पाटणादेवी मंदिराच्या समीप येतो. मंदिर १५ फूट उंच दगडी चौथर्‍यावर हे पश्चिमाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्‍यावर  चढून जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. पायर्‍यांच्या दोनही बाजूला २५ फूट उंच दिपमाळा आहेत. चौथर्‍यावर फरसबंदी केलेली आहे. मंदिराच्या उजव्या  बाजूला ४ फूट उंच चौथरा आहे. त्यावर भंगलेला नंदी ठेवलेला आहे. येथेच कोनाड्यात अनेक पुरातन मुर्ती व कोरीवकाम केलेले दगड ठेवलेले आहेत. मंदिराचा सभामंडप १८ खांबांवर तोललेला आहे. सभामंडपाच्या उजव्या बाजूच्या कोपर्‍यात भास्कराचार्यांचा शिलालेख कोरलेला दगड ठेवलेला आहे. लोक त्याला हळदी कुंकू वाहातात म्हणून सध्या तो उलटा करून ठेवण्यात आला आहे, त्यामुळे वाचता येत नाही. मंदिरात मधोमध देवीची मुर्ती आहे. ऑगस्ट - सप्टेंबर हा पाटणादेवीला मंदिराला भेट देण्याचा योग्य काळ आहे. 

आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-  १) पाटणादेवी मंदिरापासून १ कि.मी अंतरावर महादेवाचे पूरातन मंदिर आहे.  
२) महादेव मंदिरामागिल डोंगरावर कन्हेरगड आहे.
३) पाटणादेवी परीसरातील डोंगररांगेत धवलतीर्थ, केदारेश्वर, केदारकुंड, व पितळखोरे लेणी आहेत. 

जाण्यासाठी :- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. 

Patanadevi Mandir, Chalisgaon


Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
Patanadevi Mandir :- Village :- Patana,  Dist :- Jalgaon, Nearest city :- Chalisgaon





Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk