आज म्हणजेच ७ जून ला
संध्याकाळी डोंबिवली ला उतरल्यावर स्टेशन मधून बाहेर पडायला नेहमी पेक्षा जास्त
वेळ लागला, म्हणून
काय झालाय ते बघितलं, तर दिसलं कि ब्रिज वर बायकांची गर्दी होती, आणि त्या उद्याच्या
वटपौर्णिमेसाठी वडाच्या फांद्या विकत घेत होत्या. क्षणभर विचार आला कि ओरडून
सगळ्यांना सांगावा, कि त्या हे जे करतायत ते चुकीचं आहे, हि आपली संस्कृती नाही, ही खरी
परंपरा नाही, पण
मग विचार आला, किती
जणांना सांगणार? आणि
किती जणांना पटवून देणार? वडाच्या फांद्या विकणारे आणि ते विकत घेणारे, दोघेही तितकेच दोषी. सात
जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून निसर्गातल्या वडाच्या झाडाला ओरबाडणं कितपत योग्य
आहे? जी गत
वडाची, तीच गत
दसऱ्याला आपट्याची..
अध्यात्मिक दृष्टया विचार
केला, तर
पुराणात वडाचं झाड हे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे प्रतीक आहे, ब्रह्मा म्हणजे झाडाची
मुळे, विष्णू
म्हणजे खोड आणि महेश म्हणजे पारंब्या आणि फांद्या, आता अशा प्रतीक असलेल्या झाडाच्या फांद्या तोडणे म्हणजे त्या मागच्या
अध्यात्मिक कल्पनेला तडा देणे नाही का?
आयर्वेद मध्ये हि वडाचे
बरेच उपयोग लिहिले आहेत, जसे, पानांचा उपयोग डायरिया किंवा डिसेंट्री साठी, मुळांचा उपयोग वंध्यत्वावर, उलट्या होतं असतील तर
त्याच्या चिकाचा वापर, असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर
पूर्वीच्या वेळी प्रत्येकाच्या घरात किंवा घरा जवळ वडाचं झाड असायचं, आणि वडाच्या सानिध्यात गेले तर जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, म्हणून या सगळ्यासाठी त्या
झाडाला देव मानून, त्याची आठवण म्हणून पूर्वी त्या झाडाची पूजा केली जात, पण आता चित्र पार पालटून
गेला आहे, फक्त
परंपरा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करायची म्हणून बाजारातून हातभार लांबीच्या
फांद्या घेऊन यायच्या, आणि दुसऱ्या दिवशी कचऱ्यात किंवा निर्माल्यात त्या फेकून
द्यायच्या, यामध्ये
काय साध्य होतं? खरं
सांगायचं तर, हा
मोसम वडाला फळं आलेली असताना, अनेक पक्षी आकर्षित होण्याचा काळ असतो,
पक्षी या झाडाची फळे खाऊन, त्यांचं पचन करून, त्याच्या विष्ठेद्वारे
प्रसाराचे काम करतात, पण झाडाला उघडे केल्यामुळे आपण त्याचा हि निसर्गक्रम बदलवतोय.
मी वटपौर्णिमेच्या किंवा
आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध अजिबात नाही, पण फक्त पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टींचा डोळस
पणे विचार न करता, त्याच्या मागची कारणे लक्षात न घेता, आंधळेपणाने त्या सुरु ठेवणं हे योग्य आहे, कि त्याच्या मागचं शास्त्र
लक्षात घेऊन सध्याच्या परिस्थिती प्रमाणे त्यात आवश्यक ते बदल करणं जास्त योग्य
आहे? आता
आपल्याकडे तेवढी वडाची झाडं शिल्लक नाहीत, तर त्यांच्या फांद्या विकत घेऊन पूजा करत बसलो तर
काही वर्षांनी पूजा करायला फांद्या देखील शिल्लक राहणार नाहीत याचा विचार करायला
नको का? नुकत्याच
झालेल्या पर्यावरण दिनादिवशी असंख्य कार्यक्रम, अनेक लेख, अनेक उपक्रम यांचा पूर आलेला, झाडे लावा, पर्यावरण वाचावा अशा तत्सम
जाणीव असलेले मेसेजे सोशल मीडियावर पहिले, पण जेव्हा आता खरंच निसर्ग वाचवायची वेळ आलीये
तेव्हा आपण या सध्या गोष्टींचा विचार करू नये का?
सध्याच्या असलेल्या
परिस्थिती मध्ये फांद्या घरी आणण्यापेक्षा आपण घरीच कुंडी मध्ये एखादे औषधी गुण
असलेले झाडं लावून किंवा शक्य असेल तर मोठ्या जागेत अथवा अंगणात वडाच झाडं लावून
मग त्याची पूजा केली तर ते वैज्ञानिक दृष्ट्या, पर्यावरण दृष्ट्या हिताचे ठरेल आणि आपली संस्कृती
देखील जपली जाईल, अजून
एक नवी कल्पना म्हणजे, घरातच वडाच बोन्साय बनवावा, किंवा कॉलनी अथवा आसपास असलेल्या बागेत एक तरी वडाच
झाडं असावं असा प्रयत्न करावा, ह्याने पर्यावरणाला मदत होईलच, पण त्याने , बायका एकत्र येऊन त्यांच्या ओळखी वाढतील, विचारविनिमय होतील. घरी
बसून चार भिंतींच्या आत पूजा करण्यापेक्षा हा नक्कीच चांगला उपाय असेल. एकदा विचार
करून बघा, पर्यावरणासाठी
याची खुप गरज आहे, एवढी विनंती.
|