Print Page | Close Window

७) हिंदू लेणी (वैष्ण

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Caves in Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Caves in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=236
Printed Date: 25 Jan 2025 at 10:41pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: ७) हिंदू लेणी (वैष्ण
Posted By: amitsamant
Subject: ७) हिंदू लेणी (वैष्ण
Date Posted: 12 Apr 2014 at 11:17am
Caves in India, Hindu leni, Wamanavtar, Vidisha, Madhyapradesh

हिंदू धर्मात शैव व वैष्णव हे प्रमुख पंथ होते लेण्यांवरही यांचा प्रभाव दिसून येतो ब्राम्हणी लेण्यांमधून विष्णु पुराणातल्या कथांवर आधारीत शिल्पपट कोरण्यात आले आहेत.

गोवर्धनधारी श्रीकृष्ण अवतार:- भगवान श्री विष्णूने, श्रीकृष्णरुपात असताना, गोकुळातील गाईगुरे आणि गोपाळांना इंद्राच्या कोपामुळे होणार्‍या पावसापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरला होता. ही पुराणकथा सांगणारे शिल्प आहे. येथे विष्णू अष्टभूज रुपात आहे विष्णूने आपल्या सर्वात वरच्या दोन्ही हातांनी पर्वत उचलून धरला आहे. एका डाव्या हातात शंख तर दुसर्‍या  हातामध्ये पद्म धरलेले आहे. एका उजव्या हातात चक्र धरलेले असून, दुसरा उजवा हात कंबरेवर ठेवलेला आहे. शिल्पपटात एका कोपर्‍यात  गायी वासरे आहेत.

क्षीरसागरातील शेषशायी विष्णू:- आपल्या शेषशय्येवर निद्रिस्त विष्णूचे हे शिल्प आहे. विष्णूच्या पायाशी देवी लक्ष्मी बसलेली आहे.नाभिकमला मध्ये ब्रह्मा आहे. विष्णूची प्रतिमा चतुर्भुज आहे. उशाशी असलेल्या लोडावर उजव्या हाताची घडी ठेऊन त्यावर श्रीविष्णूने डोके ठेवलेले आहे. पायथ्याशी मानवदेहधारी गरुड आहे. उशाजवळ पाच फण्यांचा सर्पफणा डोक्यावर असलेल्या बलरामाची मुर्ती लक्ष वेधून घेते.

गरुडारुढ विष्णू:-  दोन पंख असलेल्या मनुष्य रुपातील गरुडाच्या खांद्यावर विष्णू बसलेला आहे. विष्णू चतुर्भुज आहे. उजव्या हातात खड्‌ग आणि चक्र आहे. डाव्या हातात शंख आणि पद्म आहे.

वराह अवतार:- या शिल्पपटामध्ये विष्णू आपल्या वराह अवतारात आहे. मनुष्य देह आणि वराहाचे शिर असलेल्या विष्णूने आपल्या सुळ्यांवर भूदेवीला (पृथ्वीला) उचलून धरलेले आहे. एका डाव्या हाताने भूदेवीला धरलेले आहे. तर दुसर्‍या हातात शंख आहे. एका उजव्या हातात चक्र आहे, तर दुसरा उजवा हात कमरेवर ठेवलेला आहे उजव्या पायामागे नागदेवता हात जोडून बसलेली आहे. या नागदेवतेचे वरचे शरीर स्त्रीचे असून, खालचा देह सर्पाचा आहे. वराह मुर्तीचा उजवा पाय शेषनागाच्या हातावर टेकवला आहे. शेषनागाच्या डोक्या पाठीमागे पाच फड्यांचा फणा असून, देह पुरुषाचा व खालचे धड सर्पाचे आहे.

वामनावतार:- वामनाची मुर्ती अष्टभुज आहे. चार उजव्या हातापैकी एका हातात गदा, दुसर्‍या हातात चक्र, तिसर्‍या हातात खड्‌ग आणि चौथ्या हातात कमलपुष्प धरलेले आहे.  डाव्या हातात विविध आयुधे आहेत. एका हातात शंख, दुसर्‍या हातामध्ये धनुष्य, तिसर्‍या हातामधे ढाल आहे.
वामनाने त्रिविक्रमावतार धारण केलेला असून डावा पाय अलिधासनात वर उचललेला आहे. डाव्या बाजूला गरुड मनुष्यरुपात दाखवलेला असून, त्याने एका पुरुषाचे केस हातामध्ये घट्ट धरलेले आहेत व त्यास हात उगारुन तो मारत आहे. हा पुरुष म्हणजे असुरांचे गुरु शुक्राचार्य आहेत. उजव्या बाजूला राजा बळी आणि त्याचे सेवक दिसत आहेत.

नरसिंह अवतार:- या शिल्पपटामध्ये विष्णू नृसिंह अवतारामध्ये कोरलेला आहे. नृसिंह अष्टभुज आहे दुसर्‍या हातात चक्र, तिसर्‍यामध्ये खड्‌ग आहे. एका डाव्या हातात शंख आहेत तर दोन डाव्या हातांनी हिरण्यकश्यपूला धरुन ठेवलेले आहे.

Caves in India, Hindu leni, Narsinmha Vishnu

हरिहर मुर्ती:- या शिल्पामध्ये एका बाजूला नंदी व दुसर्‍या बाजूला गरुड आहे. डाव्या हातात चक्र धरलेले आहे. उजव्या हातात त्रिशूल धरलेला आहे.

नमस्कार मुद्रेतील विष्णू:- विष्णूची ही मुर्ती चतुर्भुज आहे. एका डाव्या हातात शंख व उजव्या हातात चक्र असून, पुढील दोन्ही हात नमस्कार मुद्रेत आहेत.

विष्णू नृसिंह अवतार:- नरसिंह रुपातील विष्णूने हिरण्यकश्यपूला मांडीवर आडवा धरुन वध केला हे दर्शवणारा हा शिल्पपट आहे.

कालियामर्दन:- यमुनेच्या डोहातल्या भयंकर कालिया सर्पाला मारणार्‍या कृष्णाचे शिल्प, या शिल्पामध्ये कालिया मनुष्यरुपामध्ये दाखविलेला आहे.

विष्णू केवलमुर्ती:- विष्णू द्विभुज असून, डाव्या हातात चक्र व उजव्या हातात गदा आहे. बाजूलाच गरुड उभा असल्याचे दिसते.

Caves in India, Hindu leni, Sheshai Vishnu, Vidisha, Madhyapradesh




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk