तानाजी मालुसरे पो
Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=258
Printed Date: 11 Jan 2025 at 8:20am Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com
Topic: तानाजी मालुसरे पो
Posted By: AARTI
Subject: तानाजी मालुसरे पो
Date Posted: 23 Aug 2014 at 12:09pm
नरवीर तानाजी मालुसरे पोवाडा
चौक १ राजगड राजाचा । प्रतापगड जिजाबाईचा ॥ सिंहगड पन्हाळा ॥ पहा त्या मोंगलाचा ॥ सरजा शिवाजी शिवभजन । काबिज केलें तळकोंकण ॥ गड माहुली घेतली । कल्याण भिंवडी काबिज केली ॥ खबर त्या विजापुराला गेली । ठाणें राजाचें बसलें ॥ शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर बसले ॥ जिजाबाई माता । आहे प्रतापगडावरी ॥ सोमवाराच्या दिवशीं । हातीं हस्तनाची फणी ॥ उगवते बाजुला नजर गेली । नजर सिंहगडावर गेली ॥१॥
चौक २ बारा मावळ पुण्याखालीं । बारा मावळ जुनराखालीं ॥ पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला । किल्ला सिंहगड पाहिला ॥ नवें कोंबडीचें अंडे । ऐसा किल्ला सिंहगड झळकला ॥ ऐसा पंतोजी तो काका । त्यानें हुजर्या बोलाविला ॥ "जावें राजगड किल्ल्याला । अंचवावें प्रतापगडाला" ॥२॥
चौक ३ शिवाजी महाराज पांच पोषाख नटला । पाई तुमानी सुरवारी चढविल्या ॥ अंगी किनखाप घातले । शिरीं जिरीटोप घातला ॥ हातीं वाघनखें घालून । कृष्ण घोडीला जिन केला ॥ ढाल पाठिवरी टाकिता झाला । सोनसाळीं पट्टा हातांत घेतला ॥ कृष्णघोडीला चाबुक केला । आला मढयाच्या घाटाला ॥ घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥ गांव बिरवाडी सोडिला । आला पोलातपुराला ॥ पोलातपुर पाराचा वेंघला ॥ आले प्रतापगड किल्ल्याला । सलाम जिजाबाईला केला ॥३॥
चौक ४ "धाडला तुम्हीं हुजराचा जासूद । काम सांगावें आम्हाला " । "शिवाजी महाराज । डाव फांशाचा खेळावा" ॥ "डाव खेळावा उमाजी यानें । तूं माता मी तुझा पुत्र ॥ डाव खेळावा मातेसंगें । हें आमचें महत्त्व नव्हे" ॥ "मायलेकरांचा डाव । ह्यामधिं काही गुंता नाहीं"॥ येवढया जाबावरुन । ज्यानें तिवड मांडिली ॥ हातीं फांसा ह्यानें घ्यावा । "डाव पहिला येऊं दे तुला ॥ मी बायकोची जात । पहिला डाव येऊं दे तुझा" ॥४॥
चौक ५ हातीं फांसा जो घेतला । बारा बारा तो बोलला ॥ फांसा जमिनीवर फेकला । त्याचा तिरपगडा पडला ॥ तिरपगड पडला । त्याची बेती हो पडली ॥ बेती हो बोलला । त्याचे बारा जे पडले ॥ तिन डाव गेले ज्याचे । त्या शिवाजी महाराजाचे ॥ "जिजामाई ग माते । आता डाव येऊं दे तुझा" ॥ येवढया जाबावरुन । बाईनें हाती फांसा घेतला ॥ "प्रतापगडची भवानी देवी । तूं पाव माझ्या नवसाला" ॥ बारा रे बोलली बाई । बाईचे बारा रे पडले ॥ बाई बेतीन बोलली । बाईचे बेतीन पडले ॥ तिरपगडें बोलली । बाईचे तिरपगडें पडलें ॥ जिजाबाईचे डाव पुरे रे झाले ॥५॥
चौक ६ "ऐक जिजाबाई । सत्तावीस किल्ल्यांचा मी राजा ॥ माग माग जिजाबाई । जें मागाल तें देतों तुज ॥ नाशकाची बारी सांवताची वाडी । ह्यांतून किल्ला मागून घ्यावा ॥ तुंक तिकोना लघुगड किल्ला विसापुर । हयांतून कन्चा मागून घ्यावा " ॥ ’ह्यांतून नको मला बाळा । पुण्याचे तोंडाला ॥ आहे जेजुरीच्या बारीला । पुरंदर किल्ल्याला ॥ बारे पुरंदर किल्ला (ल्लयाला) । आहे सिंहगड किल्ला ॥ घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राज्याला" ॥ नांव घेतां सिंहगडाचें । राजा थरथरां कांपला ॥ "हा किल्ला उदेभान मोगलाचा । बाई उदेभान मोगलाचा ॥ जे उमराव गेले सिंहगडाला । त्यांच्या पाठी ग पाहिल्या ॥ नाहीं पुढे पाहिले । किल्ला आहे वाघाचा जबडा ॥ सत्ताविस किल्ल्यांची बारी । ह्यांतून मागावा बाईनें" ॥ "नाहीं सिंहगड किल्ला दिल्या । मी शाप देईन ॥ राज्य जाळून टाकीन उभे" । "नको बाई चल माझ्या राजगड किल्ल्याला" ॥६॥
चौक ७ बारा भोयांची पालखी । आंत बाईला बसविली ॥ राजगड किल्ल्याला । शिवाजी महाराज जाऊन तक्तावर बसले ॥ ज्यानें वात लावूनी । जात शोधाया लागले ॥ ’सिंहगड किल्ला घेणें । मला कोणी उमराव दिसेना’ ॥ प्रहर रात्रीपासुनि । बारांचा अंमल झाला ॥ प्रतापगडाखालीं । उमराठया गांवाला ॥ ज्यानें उमराव शोधिला । माझा तान्या मालुसरा ॥ तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥ शिवाजीराजाचे राज्यास । ऐसा उमराव होणें नाहीं ॥ किल्ला घेईल सुभेदार । तानाजी सुभेदार ॥ खरखर लखोटा लिहीला । ज्यानें हुजर्या बोलविला ॥ "जावें उमराठया गांवाला । तानाजी सुभेदाराला ॥ तीन दिसांचा वायदा जो केला ॥ बारा हजार फौज ती घेऊन भेटावें तिसर्या दिवसाला ॥७॥ चौक ८ पंतोजी तो काका । ज्यानें लखोटा घेतला ॥ ज्यानें राजगड तो सोडिला । आला येल्याचे पेठेला ॥ पेठ येल्याची सोडिली । आला डोणीचे पाण्याला ॥ घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥ हुजरा तेथून निघाला । आला कोलातपुराला ॥ तेथून निघाला । गेला उमराठया गांवाला ॥ सवा प्रहर दिवस आला । तानाजी सुभेदार सदरेला बैसला ॥८॥
चौक ९ जासूद महाराजांचा पाहिला । तानाजी सुभेदार सुखी झाला ॥ पोटीं रायाबा तो बेटा । सयंवर बाळाचें मांडिलें ॥ काढल्या पंचमीच्या हळदी । काढलें षष्ठीचें लगिन ॥ लगिन बाळाचें मांडिलें । आली सिंहगडची कामगिरी ॥ लगिन रायाबाचें राहिलें । ज्यानें उमराव बोलाविले ॥ ज्याचा शलोर तो मामा । ज्याचा सूर्याबा तो बंधु ॥ येसा कणकर रुमाजी दादा । ज्यानें सरदार बोलाविला ॥ "माझ्या शेलार तूं मामा । आली सिंहगडची कामगिरी" ॥ दादा परपर बाबाजी । ज्यानें हुजर्या बोलाविला ॥ मिषा तोड मकाजी । ज्यानें हुजर्या बोलाविला ॥९॥ चौक १० मामा बोलाया तो लागला । ऐंशीं वर्षांचा म्हातारा ॥ "लगिन राहिलें रायबाचें तो मजला सांगावी । माझ्या तानाजी सुभेदारा । जे गेले सिंहगडाला ॥ त्याचे पाठिरे पाहिले । नाहीं पुढारे पाहिले । ज्यानें आंबारे खाईला । बाठा बुरजा लाविला ॥ त्याचे झाड होउनि आंबे बांधले । किल्ला हातीं नाहीं आला ॥ सिंहगड किल्ल्याची वार्ता । काढूं नको तानाजी सुभेदारा ॥ जे गेले सिंहगडाला । ते मरुनशानी गेले ॥ तुमचा सपाटा होईल" । "असें बोलूं नको रे मामा ॥ आम्ही सूरमर्द क्षत्री । नाहीं भिणार मरणाला" ॥१०॥
चौक ११ मग रायाबा तो बेटा । बाबाच्या जवळ आला ॥ "ऐक ऐक माझ्या बाळा । जातों आम्ही सिंहगडाला" ॥ "माझें लगिन करील कोण ?" ॥ रायाबा पुसे बाबाला ॥ "साता नवसांचा माझा रायाबा । त्याचें लगीन मागीन ॥ भिऊं नको माझे बाळा । जातों राजगड किल्ल्याला । जाउन सांगतो महाराजाला ॥ सात दिवसांचा वायदा । घेऊन येतों तुझ्या लग्नाला ॥ आहे मी महाराजांचा चाकर " । लखोटा हातांत घेतला ॥ ज्यानें एका लखोटयाचे । बारा लखोटे केले ॥ धाडले कागद खोर्याला ॥ मोठया मोठया सरदारांला ॥ पंधरा गांवचे पारुंचे । ज्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ दसपटिचे मोकाशी । त्यानें आपणाजवळ बोलाविले ॥ उमराठयाचे शिरके । त्यानें आपणांजवळ बिलाविले ॥ नांदविचे सावंत । त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ वडघरचे नाईक । त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ सिलमाचे ठाकूर । त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ बारा हजार फौजेला । ज्याचा लखोटा पोंचला ॥११॥ चौक १२ ’अरे फलाणाचे फलाणा । घाव घाला निशाणा’ ॥ बारा हजार लोक, बिनहत्यारी । होते. सैन्य बोलाया लागलें ॥ बिनहत्यारी लोक । कसे जाऊं महाराजांचे भेटिला । ज्यानें सैन्य पाहिलें । बारा हजार लोक बिनहत्यारी आले ॥ आंकडया कोयत्या त्या कमरेला । टापसीच्या खोळा डोईवर घेतल्या ॥ हातीं सोडा घेऊन । सलाम त्यांनीं केला सुभेदाराला ॥ माझे तानाजीची हिम्मत । म्हणून मिळाली जमात ॥ त्यानें पेटारा उघडिला । बारा हजार रुपया बाहेर काढिला ॥ बारा हजार मनुष्यें । त्यांचे हातांमधिं दिला ॥ ’दाढि होई रे करावी । चिरी मिरी रे घ्यावी ॥ चला महाराजांचे भेटिला । राजगड किल्ल्याला" ॥१२॥ चौक १३ बारा हजार फौज बोलूं लागली । मनीं विचार त्यानें केला ॥ "जातों राजगड किल्ल्याला । धनगर अडविल बायकोला ॥ अब्रु घेईल आमुची । बारा हजार रुपया त्यांनें मागें लावून दिला ॥ सुभेदार बोले त्या सेनेला । "बारा हजार रुपया काय केला ॥
घेतलें धनगराचें घोंगडें । त्याला मागें लावून दिला" ॥
बारा भोयांची पालखी सवारिली । तोरण पालखीला बांधिलें । पाय दिला पालखीमध्यें । हात पालखीला दिला ॥ रायाबा तो बेटा । बाबाच्या आडवा येणार झाला ॥ "माझें लगीन करिल कोण । तुम्ही जातां सिंहगडाला" ॥ "भिऊं नको बेटा । तुझे मी येतों लग्नाला । आधीं लगीन सिंहगडचें । मग करीन रायाबाचें" ॥१३॥
चौक १४ हुकूम ज्यानें भोयांला केला । आले नगरीचे वेशीला ॥ तोरण पालखीचें तुटून उजव्या बाजूवर पडलें ॥ माझ्या शेलार तूं मामा । आम्ही जातों सिंहगडाला ॥ अपशकुन झाला । माझ्या तानाजी सुभेदाराला ॥ तानाजी सुभेदारानें । ह्याचा गुमान नाहीं केला ॥ गेला गांवाच्या शिवेवर । ज्याला आडवा तास गेला ॥ मग तो शेलार मामा बोलला । तानाजी सुभेदाराला ॥ "तानाजी सुभेदारा । मोहोरें बरें नाहीं होणार" ॥ "राजा शिवाजीचें देणें । अढळपदीं सोनें !" ॥१४॥
चौक १५ "अपशकून मानूं नये । ज्यानें हर हर वाहिला" ॥ गांव उमराठें सोडिलें । पांचकर्णांचा बाजा केला । आले त्या पोलातपुराला । पांचकर्णांचा बाजा केला । गेले बिरवाडी गांवाला । पांचकर्णांचा बाजा केला । घाट मढयाचा वेधला । गेले डोणीचे पाण्याला ॥ गलीम तेथुनि निघाला । गेला येल्याच्या पेठेला ॥ गलीम तेथुनि निघाला । गेला रायगडच्या पोटाला ॥ बारांच्या अंमलांत । गेले किल्ल्याच्या पोटाला ॥ बारा हजार फौज चाले । धुरळा गगनास गेला ॥१५॥
चौक १६ हिरव्या बुरुजावरुन । जिजाबाईनें पाहिला ॥ "माझ्या शिवाजीमहाराजा । गलीम वैरियाचा आला ॥ तोफांला आग घाला । गलीम मारावा किल्ल्याखाला" ॥ शिवाजी महाराजानें । गलीम नजरेनें पाहिला ॥ तो शिवाजी महाराजाचा । भगवा झेंडा ओळखिला ॥ "माझे जिजाबाई माते । आमचा तानाजी सुभेदार आला" ॥ नांव घेतलें सुभेदाराचें । बाई गदगदां हांसलि ॥ सेना तानाजीची पाहिली । मनांत संतोषित झाली ॥१६॥
चौक १७ बारा हजार फौज घेऊन । सुभेदार दरवाजाला आला ॥ पहिल्या सदरे जमाडिला । सूर्या गगनीं लखाकला ॥ दुसर्या सदरेमधीं । कमरकमर कापुस टाकला ॥ तिसर्या सदरेमधीं । ज्यानें चांदवे बांधिले ॥ चवथ्या सदरेमधीं । हंडया झुंबर बांधिले ॥ पाचव्या सदरेमधीं । महाराज शिवाजी बैसले ॥ सुभेदार सलामाला गेला । महाराजावर घुसा केला ॥ "मागचे दिवस मागल्यापरी । मोहरिल दिवस मोहरल्यापरी ॥ माझ्या बेटयाचें लगीन, तुम्हीं जासूद धाडिला । तुमचा काय वाद केला ?" ॥ "ऐक तानाजी सुभेदारा । आमची कामगिरी नव्हे तुम्हांला ॥ जिजामातेनें बोलाविलें" । दोघांचा जबाब जिजाबाईनें ऐकिला ॥ जिजाबाई बोलाया लागली । "मी जातीनें बाईल ॥ आतां सुभेदार येईल । माझी अबरु घेईल" ॥१७॥
चौक १८ सर्व शृंगार नटली । धांवा अंबाबाईचा मांडिला ॥ "भले भले अंबाबाई । तानाजी सुभेदार आला ॥ इच्छेप्रमाणें होऊं दे ।" सिंहगड किल्ल्याची पंचारती केली ॥ गेली सुभेदाराला ओंवाळायला । "तुझे जाऊं अलाबला ॥ तानाजी सुभेदारा । चढत्या दवलतीचें राज्य येऊं दे तुला" ॥ सुभेदाराला ओंवाळितां । त्याचा राग निघून गेला ॥ ज्याला वर्तली चिंता । ही आहे महाराजांची माता ॥ इच्या आरतीला । मी घालूं काय आता ॥ ज्यानें मंदिल काढिला । बाईचे पायांवर ठेविला ॥ जिजाबाई बोलली । तानाजी सुभेदाराला ॥ "माझा सुभेदार शाहाणा ।" हात मस्तकी ठेविला ॥ "माग माग जिजाबाई । जें मागशील (तें) देतों तुला" ॥ "काय मागूं सुभेदाराला ? । ह्या म्हातारपणीं सिंहगड किल्ला ॥ घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राजाला ॥ माझा शिवाजी थोरला माझा तानाजी धाकटा । लेकाचें वाण दिलें त्याला" ॥१८॥
चौक १९ सुभेदार तेथुन निघाला । आपल्या सेनेमधिं आला ॥ शेलार त्याचा मामा । त्याला पुसाया लागला ॥ "गेला बाईच्या भेटीला । तुम्हीं काय मजकूर केला" ॥ "काय सांगू शेलारमामा । जाणें आहे सिंहगडाला" ॥ जावें जावें बाईच्या भेटीला । बारा हजार फौज आली तुझ्या ग कामाला ॥ नाहीं गाढव वळायाला । जेवण कर बारा हजारांला मग आम्ही जाऊ सिंहगडाला" ॥ "माझ्या सुभेदार बाळा । तुजवर घातलें गडाचें ओझें" ॥ "भला भला सुभेदारा । यावें जेवायाला ॥ आहे गडाची रे वस्ती । येथें अन्न रे मिळेल ॥ नाहीं मिळायाचें पाणी । जावें गुंजवर्या नदीला ॥ आंघोळ करायाला । मग यावें जेवायाला" ॥१९॥
चौक २० बारा हजार फौजेनिशीं । सुभेदार गडाखालीं उतरला ॥ गडाखालीं उतरुन ज्यानें विचार काढिला । मग त्या शेलार मामानें ॥ विचार काढिला । "भला भला रे सुभेदारा ॥ तीन कोस जावयाला वेळ फार झाला । धोपर संध्या रे करा ॥ चला जाऊं रे जेवणाला" । बारा हजार फौजेतून ॥ एकटा सुभेदार गेला । गुंजवर्या नदीला । आंघोळ करायाला ॥ ज्याने आंघोळ संध्या केली । आला आपल्या फौजेमधीं ॥ बारा हजार घेऊन । आला दरवाजाचे तोंडीं ॥ ज्यानें सैंपाक पाहिला । बारा हजार पाट मांडला ॥ बारा हजार दुरुन । बारा हजार पंचपात्री ॥ बारा हजार लाविला ठाव । सैंपाक वाढून त्वरीत झाली (ला) ॥२०॥
चौक २१ ज्यानें सैंपाक पाहून । हुर्द ज्याचें भरुन आलें ॥ "आग लागो जेवणाला । माझा बाळ अंतरला" ॥ ज्याचा शेलार तो मामा । बोलाया लागला ॥ "भला भला सुभेदार । ऐंशीं वर्षांची उमर ॥ ह्या रे जिजाबाईची । एकटी वाढील रे कुणाला" ॥ मामा बोले सुभेदाराला । "अठरा शाखा अठरा भाज्या ॥ एक ठिकाणीं करा । जेवण वाढिलें फौजेला" ॥ अर्धे उठून उभे राहिले । बारा हजार फौजेनें एकच गर्दी केली ॥ कोणी करतो पोळी पोळी । कोणी करतो खीर खीर ॥ कोणी करतो भाजी भाजी । कोणी करतो डाळ डाळ । ज्यानें एकच गर्दी केली । जिजाबाई माता बहुत श्रमी झाली ॥ धांवा अवघा मांडिला । "प्रतापगडची भवानी धांव संकटाला" ॥ पांचजणी देवी । धांवुनिया आल्या ॥ सैंपाक वाढाया लागल्या । ऐकेनात कुणाला ॥ ज्याचा मापटयाचा आहार । त्याचा अधोलीचा झाला ॥ ज्याच्या मोहरें पांच पोळ्या ॥ याच्या पंधरा पोळ्या झाल्या ॥ खाववतील त्यानें खाव्या । उरतील त्यांनीं गडाखालीं टाकाव्या ॥२१॥
चौक २२ बारा हजार फौज । जेऊन तृप्त झाली ॥ तानाजी सुभेदार गेला । शिवाजीच्या मुजर्याला ॥ "आम्ही जातों सिंहगडाला । आमचा रायाबा संभाळा ॥ जर आलों सिंहगडाहून । लगीन करीन रायाबाचें ॥ जर गेलों तिकडे मेलो । लगीन करा रायाबाचें ॥ मज बापाची सरदारी । द्यावी रायाबा बेटयाला । दिवटी बुदलीची जहागीर । द्यावी रायाबा बेटयाला । डोजगांव द्यावा पानसुपारिला । मालसर्याला दंड द्यावा इनाम खायाला" ॥ सुभेदार तेथून निघाला । आला बाईचे भेटिला ॥ डोईचा मंदिल काढला । बाईच्या चरणावर ठेविला ॥ "आम्ही जातों सिंहगडाला । माझ्या बेटयाला सांभाळा" ॥ बाईनें पेटारा उघडिला । पांच पोषाख काढिले ॥ त्या ग सुभेदाराला दिले । ’यांतून जरि जगून (जिंकून?) तू आला ॥ नव पोषाख करिन तुला’ । ज्यानें पोषाख तो केला फौजेमधीं गेला ॥२२॥
चौक २३ शेलार मामानें पाहिला । "माझ्या ऐक सुभेदारा । बारा हजार फौज आली रे तुझ्या कामाला ॥ हा पोषाक तो घ्यावा नेऊनशानी द्यावा । देशील तर द्यावा बारा हजाराला" । येवढया जाबावरुन । बाई मनीं चरकली ॥ काय सांगू सुभेदाराला । देईन बारा हजाराला ॥ चढविन सिंहगडची पायरी । बाईनें कोठार उघडिले ॥ ’मोहरे येर’ बारा हजार तलवार । बारा हजार काढिल्या ढाला ॥ बारा हजार गूर्दा । बारा हजार सिंगडा ॥ बारा हजार चौकडा । बारा हजारांना तोडा ॥ बारा हजार पोषाक । बारा हजारांना केसरी झगा ॥ घेरदार, बारा हजार । कोणी उमराव समजेना ॥ एकापेक्षां एक अधिक । दादा फौज निघाली ॥२३॥
चौक २४ ’माझे जिजाबाई माते । माझ्या बाळाला सांभाळा" ॥ तानाजी सुभेदार । बारा भोयाचे पालखीमधिं बसला ॥ सर्व सेनेला मग तो मुजरा केला ॥ बसा बसा दादांनो ॥ आम्हीं जातों सिहगडाला । आमचा रामराम तो घ्यावा ॥ ज्यानें राजगड तो सोडीला । पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला । साखरेच्या मुक्कामी गेला ॥ पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला । गेला खामगांवाला । पाच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला । गेला डेर्याच्या मुक्कामी ॥ पांच कर्णांचा बाजा केला । गलीम तेथून निघाला ॥ गेला सिंहगडच्या पोटाला । तेथुनि कर्णा बंद केला ॥२४॥
चौक २५ गलीम आनंदी, बारीला । दबा दिला भला ॥ माझ्या शेलार मामानें काळी घोंगडी हांतरिली । विडे पैजेचे मांडले ॥ "ज्यानें विडा उचलावा । त्यानें जावे सिंहगडाच्या माहितीला ॥ माहिती काढून येईल त्याला । छत्री घोडा इनाम त्याला, बारा गांव इनाम देईन त्याला" ॥ ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालती घातल्या ॥ हात कोणी लाविना विडयाला । तानाजी सुभेदार भला ॥ त्यानें हात विडयाला घातला ॥ विडा मंदिलीं खोंविला ॥२५॥
चौक २६ "सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । आम्ही जातों सिंहगडाला ॥ जगुनशानि आलों । लगीन करुं रायाबाचें ॥ गेलों तिकडे मेलों । लगीन करा रायाबाचें" ॥ तानाजी सुभेदार त्यानें पोषाक काढिला । पाटलाचा थाट केला ॥ जंगल लागलें दारुण । वेळु करकरां वाजती ॥ लागलें चिंवारीचें रान । लागलें आळविचें रान ॥ आरीबोरीचें दारुण । वाट नाहीं रे जावयाला ॥ काळोखी रात्र । वाट नाहीं रे जावयाला ॥ वन धुंडाया लागला । वाट मिळेना जावयाला ॥ सुमार पाहाया लागला । बारे धोंडीवर चढला ॥ गेला कोळ्याचे ग्याटाला (म्याटाला) । बारा जण कोळी होते पहिल्या ग्याटाला (म्याटाला) ॥ त्यानें सुभेदार पाहिला । "मारा मारा ह्या चोराला" ॥ सुभेदार बोलाया लागला । "भ्यालों ह्या चोराला ॥ हे ठार मारतील मला" । "चोर असलों ठार मारा ॥ राव असलों तर काय मरतां । बायकोच्या याराला ? ॥ जरा बत्ती तुम्ही लावा । यावें मला पाहावयाला" ॥२६॥
चौक २७ पहिल्यानें सरदार पाहिला । "धन्य याची नारायणा ॥ कोण तुमचें नांव गांव । येवढे सांगावें आम्हांला " ॥ "मी साखरेचा पाटील । गेलों होतों पुण्याला ॥ मंडईच्या वाडयांत । गेलों होतों पट्टी लावायाला । जात होतों घराला । तेथें वाघानें आडविला ॥ तुमच्या आलों आश्रमाला ॥ भले भले रे दादांनों ॥ घाईनें निघालों । पान खायला विसरलों " । पान द्यावें खायाला ॥ ऐक ऐक दादा । ह्या बारा वर्षामधीं पान खाल्लें नाहीं " ॥ बटवा खाकेचा सोडिला । यानें विडे जे काढिले ॥ बारा त्या कोळयाला । यानें बारा विडे दिले आफुमाजुमाचे विडे कोळ्यांला दिले । कोळी झिंगूनशानी गेले ॥२७॥
चौक २८ बारा बाराजण कोळी । पहिल्या दरबाराचे गेटकरी (मेटकरी) ॥ "बारा असामींचा कोण सरदार सांगावा" । आहे मी खंडोजी नाईक बारांचा सरदार" ॥ "ऐक खंडोजी नाईक । तुमची तैनात सांगावी" ॥ "तीन रुपयांची तैनात । मला सरदाराला मिळती" ॥ ह्यानें कठी जी काढिली । दिली खंडोजी नाईकाला ॥ ज्यानें तोडा जो काढिला । दिला विठोजी कोळ्याला ॥ चौकडा काढिला । दिला मालोजी कोळ्याला ॥ बारा कोळ्यांला बारा । ऐशा वस्ता त्यानें दिल्या ॥ कोळी फितूर ते केले । "ऐक ऐक पाटीलबोवा ॥ मोठया वस्तू आम्हांला जिरतील कशा । काम सांगा आम्हांला" ॥ "काम तुम्हांला सांगेन । भाक द्यावी रे मजला" ॥ इमान ज्यानें दिलें । कोळ्यांनीं इमान दिलें ॥ "मी आहें कोणाचा कोण । नांव सांगतों रे तुम्हांला ॥ राजा शिवाजीचा उंबराव । आहे मी तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥ आहें मी, एकला । आलों सिंहगडच्या माहितीला । लांबी रुंदी सांगा मला" ॥२८॥
चौक २९ नांव घेतां शिवाजीचें । कोळी खालती बसले ॥ "ऐक ऐक तानाजी सुभेदारा । शिवाजीचें कुत्रे नाहीं येत सिंहगडाला" ॥ ज्यानें वस्ता घेतल्या । त्यानें सुभेदाराच्या पुढें ठेविल्या ॥ "घे रे सुभेदारा । आल्या वाटेनें जावें राजगडकिल्ल्याला " ॥ "ऐक खंडोजी नाईका । इमान तूं रे मला दिलें ॥ द्यावी सेजेची बाइल । पण इमान देऊं नये" ॥ येवढया जाबावरुन । कोळी सांगायला लागला ॥ "ऐका सिंहगडची माहिती । तिनकोसांचा आहे बा घेरा ॥ दिडकोचासी आहे बा रुंदी । आहे अठराशें पठाण सिंहगडाला ॥ आहे उदेभान मोंगल । दीड गाई दीड शेळी सवामण तांदूळ वेळेला ॥ अठराजणी बिब्या । आहेत त्याच्या पलंगाला ॥ घेतो तेल्याची पहार । मणगटावर घालतो ॥ सरी करुन घालतो । बिबिच्या गळ्यांत ॥ चांदवडी रुपया । दोहों बोटांनी तोडितो" ॥२९॥
चौक ३० "आहे बाच्छायाचा हत्ती । त्याचें नांव चंद्रावळी ॥ एक बाच्छायाचा हत्ती । करिल सब दुनियेची माती ॥ उदेभानाचा प्रधान । आहे सिद्दी हिलाल ॥ एक शेळी अर्धी गाई । आदमण तांदुळ त्याचे एका वेळेला ॥ नउजणी बिब्या । सिद्दी हिलालाच्या पलंगाला ॥ बाराजण होते लेक । उदेभानाच्या पेक्षां भारी ॥ उगवत्या बाजुला । कड़ा आहे डोणागिरी ॥ तेथें आहे सोलाची जागा । डोणागिरीच्या कडयाला ॥३०॥
चौक ३१ "बसावें सरदारांनो । जातों आपल्या गोटाला" ॥ बाराजण कोळी चरण धरुन । तुम्ही काय सांगतां आम्हांला ॥ त्या मर्दाला पाहुन । कोळी रडाया लागले ॥ "शिवाजीच्या राज्यांत कोणीं । तुजसारखा सरदार नाहीं पाहिला" । "भिऊं नको रे दादांनो । हा किल्ला हातीं आला तर ह्या किल्याची सरदारी देईन तुम्हांला ॥ हजाराची तैनात देईन बारा असामीला" ॥ तानाजी सुभेदारानें दिला हातचा लखोटा । त्या खंडोजी कोळ्याला ॥३१॥
चौक ३२ सुभेदार तेथुनि निघाला । आला आपल्या फौजेला ॥ ज्याचा शेलार तो मामा । त्याच्या पुढें धावत आला । "तुम्ही गेला सिंहगडाला । नवस केला बहिरोबाला ॥ माझा सुभेदार येऊं दे । बारा बकरे देईन तुला ॥ तुम्ही चला हो किल्ल्याला । जातों नवस फेडायाला" । ऐक ऐक शेलारमामा बारा द्यावयाचे ते चोवीस देऊं । पण किल्ला येऊं दे हाताला" ॥ "बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला" ॥ "ऐक ऐक शेलार मामा माझ्या महाराजाचें देणें । अढळ पदीं सोनें ॥ नाही आम्ही बहिरोबा जाणित । साडेतिनशें देव पाणी रांजणांत भरतात ॥ ऐसा शिवाजीमहाराजा । आहे तळकोंकणचा राजा" ॥३२॥
चौक ३३ चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥ बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥ ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥ सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥ भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥ सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥ अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥ आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥ "सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली" ॥ राग आला त्या मर्दाला । "मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥ एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन" ॥ त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥३३॥
चौक ३४ "जावें जावें शेलारमामा सोल बघायाला" । ज्यानें टिचकीनें मारिली ॥ सोलाला जोरानें लागली ॥ काळी घोंगडी जी सोडली ॥ ज्यानें बटवा जो सोडिला । बारा विडे काढिले ॥ "कोण शूर मर्द आहे क्षत्री । त्यानें विडा उचलावा, हात सोलाला घालावा" ॥ ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालीं घातल्या माना ॥ सुभेदार बोलतो । "भरा बायकांच्या बांगडया" ॥ एवढया जाबावरुन । राग आला त्या सैन्याला ॥ मोहिता म्हणतो धार माझी । घाग म्हणतो धार माझी ॥ चवाण म्हणतो धार माझी । जाधव म्हणतो धार माझी ॥ गायकवाड म्हणतो धार माझी । शिरके म्हणतो धार माझी ॥ महाडिक म्हणतो धार माझी । बारा हजार फोजेनें एकच गर्दी केली ॥३४॥
चौक ३५ अरे फलाणाचा फलाणा । घाव घाला निशाणा ॥ घस्त आली मोगलांची । त्यानं कानोसा घेतला ॥ हांक मारली गेटाला (मेटाला) । खंडोजी नायकाला ॥ "किस्का गलबला मेरे भाई । एवढा सांगावा आम्हांला" ॥ खालून कोळ्याने जबाब दिला । जंगलमें धनगराचा वाडा ॥ त्यामध्यें बडा वाघ शिर्या । गाईकी बचडी खाते ॥ रांड पोर किचाड करते । वरती सुखी राज्य करा" ॥३५॥
चौक ३६ सुभेदार बोलतो सेनेला । "पहिली सोल शिवाजीमहाराजांची ॥ दुसरी सोल अंबाबाईची । तिसरी सोल तानाजी सुभेदाराची" ॥ पट्टे घेतले तोंडामधीं । सोल धरली हातामधीं ॥ आपल्या बेताचे माणुस पन्नास मोजीले । सुभेदार गडावर चढले ॥ पन्नास कमी बारा हजार फौज । खालीं होती, त्याने एकच गर्दी केली ॥ सूर्याबा तो बंधु । त्यानें एकच गर्दी केली । दादा वरती गेला (म्हणून) । बारा हजार फौजेनें हात सोलाला घातला ॥ तीन पुरुष वरती गेले । सोल मधीच तुटली ॥ पन्नास कमी बारा हजार । फौज धरणीवर पडली ॥३६॥
चौक ३७ सुभेदार तो वरती जाऊन । त्याला दोन घटका झाल्या ॥ माझ्या "शेलार तूं मामा । कां वेळ लागला फौजेला तूं जावे बघायाला" ॥ सोल पाहुन मामा । धोतरात....ला ॥ "काय सांगूं सुभेदारा । सोल ते तुटली आली मरणाची वेळा" सुभेदार बोलाया लागला । "नाहीं सोल रे तुटली माझें आयुष्य तुटलें ॥ ऐक ऐक शेलार मामा । माझ्या रायाबा बेटयाला रामराम सांगा " ॥३७॥
चौक ३८ शेलार मामा बोलतो । "ऐक ऐक मी तुला एक तोड सांगतो ॥ आहे अठराशें फौज । किल्ल्याला अठराशे पठाण ॥ आहे उदेभान मोंगल । आहे सिद्धी तो हिलाल, आहे चंद्रावळी हत्ती । उडी टाका किल्ल्याखालीं । म्हणजे पहायाला नको" ॥ "भला भला शेलार मामा । उडी टाकीली तरी प्राण जायाचा ॥ पन्नास माणसाचा सरदार । सत्तावीस किंल्ल्यांचा मी सरदार, नाहीं भिणार मरणाला" ॥ शूर मर्दाची कीर्ति । धावा केला अंबाबाईचा ॥ प्रतापगडची भवानी । पाव माझ्या नवसाला ॥ सातारची मंगळाई । मग पुण्याची पर्वती ॥ तुळापुरची (तुळजापूरची) भवानी । माता पाराची वरदानी ॥३८॥
चौक ३९ पांच देवी पुढे धांवत आल्या । गळ्यांत कवडयांच्या माळा ॥ हात मारिला पाठीवर । "भिऊं नका सुभेदारा ॥ यश तुझ्या तलवारीला" । बळ देवीचें सापडलें ॥ जोर हातींचा चढविला । मागची पुढची आशा सोडली ॥ खुन डोळ्यावर चढला । "ऐक माझ्या शेलारमामा ॥ जेथें सुभेदाराचा पटा । तेथें पन्नासांचा पटा ॥ जेथें सुभेदाराचा मान । तेथें पन्नासांची मान चलचल माझ्या मामा" ॥३९॥
चौक ४० गेले पहिले दरवाजाला । ज्यानें दिंडीनें पाहिला ॥ होती आरबाची जात । होती मोगलाची जात ॥ होती मुसलमानाची जात । अफु माजुम खाल्ली ॥ मदनमस्त झाली । ज्यानें डाव जे मांडिले ॥ कोण बारा बारा बोलती । कोण ग्यारा रे बोलती ॥ ह्याने एकच गर्दी केली । खणाखण वाजिती ॥ व्हाळ आसुदाचे वाहती । रक्त अंगाला लागलें खुन डोळ्याला चढला ॥ कोण करितो खुदा खुदा । बुधा धरणीला पडला ॥ कोण करितो अल्ला अल्ला । खाली काला जो पडला ॥४०॥
चौक ४१ पहिला दरवाजा मारिला । गेला दुसर्या दरवाजाला ॥ काळोखी रात्र, पार-- दुसर्या दरवाजाला होता । तिनशें पठाण, ज्यानें दिन दिन वाहिला ॥ मुसलमानी लोक दादा । बिनफिकिर होते, नाहीं गलीमाची माहित ॥ तानाजी सुभेदार, जैसा ठाणांत । वाघ लोटला, सेनांत ॥ पांच पट्टयांचा मारा केला । सवाघटकेमधिं तिनशें पठाण कापिला ॥ गेला तिसर्या दरवाजाला । होता चारशें पठाण ॥ दिन दिन ज्यानें वाहिला । चारशें पठाण कापिला ॥ एकदंर हिशेब नऊशें मनुष्यांचा झाला ॥४१॥
चौक ४२ "ऐक शेलार मामा । गलीमाचा हिशेब घ्यावा ॥ एक ह्यानें कमी । नऊशें पठाण झाला" ॥ त्यांत बोंब्या निघून गेला । उदेभान मोंगलापाशीं गेला ॥ अठरा तो पेले अफूचे । उदेभान एकटा प्याला ॥ भंगीच्या जुडया । आणि अफुच्या वडया खाल्ल्या ॥ उदेभान मोंगल मगरमस्त झाला । आठरा पलंग ज्यानें बिब्यांचे सवारिले ॥ ज्यानें लुंगिज सोडिली । ज्यानें खुंटीवर ठेविली ॥ चोन कराया चालला । तो म्होरें बोंब्या अवचित गेला ॥ "मेरे उदेभान मोंगला । आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया । भाई नऊशें पठाण कापिला ॥ काळोखी रात्र, नाहीं गलीमाची माहित । नऊशें पठाण काटया" ॥ "x x हमारे पर बैठया । आम्ही नाहीं चोन्याला सोडताया ॥ जा बालेकिल्ल्याला । जाऊन सांगा हत्तीच्या महाताला ॥ आठरा घागरी कुसुंबा पाजा हत्तीला । अठरा अफूचे ते पेले ॥ अठरा माजुमाच्या वडया, पांच पते त्या (द्या) सोंडेला । चंद्रावळीचा हत्ती जाऊं दे कल्याणदरवाज्याला ॥४२॥
चौक ४३ सुभेदारानें काय केलें । सुभेदार बोलतो मामाला ॥ "नऊशें पठाण कापिला । माझा जीव श्रमी झाला बटवा सोडा पान खायाला" ॥ शेलार तो मामा शिणल्यावर "दादा पोट रे फुगलें" । "भला भला माझ्या मामा ॥ बाराच्या ठोक्याला । किल्ला सई करुन देतों तुला ॥ पान खाऊं दे मला" । पान जो खातांना मोहरें हत्ती धांवत आला ॥ "किस्का उमराव । मेरा भाई सांगावा मजला" ॥ "उंबराव शिवाजीमहाराजांचा । मी आहें तानाजी सुभेदार" ॥ "नऊशें पठाण कोणी काटया, सांगावें मजला" । "नऊशें पठाण आम्ही काटया" ॥ महाता बोले सुभेदार । "कुणब्याच्या पोरा काय तुझा एवढा तोरा ॥ जंगलामधीं तूं रें जावें । लकडी तोडावी त्याची मोळी । बांधावी जाऊन बनियाला ओपावी ॥ ज्यानी धानोर्या आणाव्या । रांडा पोरा रे घालाव्या ॥ एवढया बडया बडया सरदारी एवढया बडया तलवारी । कोठें होत्या तुझ्या बाला ?" ॥ सुभेदार बोले महताला । "ऐक भुसार्याच्या पोरा जाऊन ताग तूं पेरावा ॥ गोणी ताटुक वळावा । यावें कुणब्याच्या वाडयाला ॥ भात रुपयाचे द्यावें । तुझ्या रंडीनें भरडावें ॥ कणी कोंडा आपण खावा । तांदूळ बनियाला ओपावा ॥ एवढया बडया बडया अंबार्या एवढया बडया तलवारा । कोठें होत्या रे मुसंडया तुला ?" ॥४३॥
चौक ४४ सलाम सलाम मेरे भाई । पहिला हात येऊं दे रे तुझा" ॥ पैलवान हत्तीवर बसला । शिवी दिली हत्तीला ॥ "तेरी रंडीका नर । ह्याला पाहुन घ्यावा" ॥ हत्ती सात पावलें मागे गेला । पांच पटयाचा मारा केला ॥ "संभाळ संभाळ मेरे भाई । आतां संभाळ सुभेदारा ॥ हा हात्ती बाच्छाईचा" । "मी रे आहे महाराजांचा" ॥ पहिला हत्तीनें डोईवर मारा केला । सुभेदार भला, हत्तीच्या पोटाखालून निघून गेला ॥ हत्तीनें मारा केला । बंदुकीचा गजभर चिरा जो तुटला ॥ वरुन पहिलवान बोलला । "सहाही पाताळ गाडिला !" राग आला सुभेदाराला । सात हात जमीन उडाला लाथ मारिली महाताला ॥ अल्ला म्हणून बोलला । शब्द हत्तीनें ओळखिला ॥ हत्तीने उलटा पाठीवर मारा केला । ह्या वैर्याला मारायाला ॥ सुभेदार सराईत भला । कावा नदरेचा राखिला ॥ सळ पटयाचा सोडिला । नऊ तुकडे सोंडेचे नऊ सांखळीचे ॥ अठरा खांडोळीं पाडिलीं । सुभेदार खालीं उतरला ॥ पन्नास माणूस लागलें हत्तीला भोकाया । शेलार मामा धांवत आला ह्याचा "भोचु दे रे बोx" ॥४४॥
चौक ४५ तिथुन बोंब्या निघून गेला ॥ "मेरे उदेभानभाई आग लागो तुझे चोन्याला ॥ "सिंहगड किल्ला डुब होया" । "हम चोन नहीं सोडताई ॥ जा पिराच्या दरग्याला । सांगा सिद्दी हिलालाला ॥ पांच हत्यारें घेऊन जावें । कल्याण दरवाजाला" ॥ सिद्दी हिलाल भला । ज्याच्या नऊ जनी बिब्या पलंगा निजायाला ॥ चोन कराया लागला । लाखोटा मोगलाचा दिला ॥ सिद्दी हिलालानें । त्यानें वाचून पाहिला ॥ सिंहगड किल्ल्याला गलीम बहुत आला । तुम्हीं जावें लढायाला ॥ सिद्दी तो हिलाल पांच पोषाग नटला । दोहीं हातांत दोन पट्टे नऊजण बिब्या हारोहारीनें उभ्या केल्या ॥ ज्यानें पहिला हात टाकिला । अठरा खांडोळीं पाडिलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला । उमराव तेथून निघाला सुभेदारापाशीं आला ॥४५॥
चौक ४६ "सलाम सलाम मेरे भाई । किस्का तूं उमराव ऐसा सांगावा मजला" ॥ "उमराव आहे शिवाजीचा । मी तानाजी सुभेदार" ॥ "ऐक कुळंब्याच्या पोरा । पागोटयाच वेढे घाल गळ्यामधीं शरण यावें सरदाराला" ॥ सुभेदार त्याला बोलता झाला । "घ्यावे तोंडात तृण, घ्यावी डोईवर वहाण, शरण यावें सुभेदाराला ॥ पहिला हात येऊ दे तुझा सिद्दी तूं हिलाला" । पहिला हात जो टाकिला सात हात जमीन उडाला रे हातांमधीं हात त्यानें अठरा टाकीला । सुभेदार गुंजभर नाहीं ढळला ॥ "अरे सिद्दी तू हिलाल । दुसरा हात येऊं दे तुझा" ॥ सुभेदार बोलला ॥ "संभाळ संभाळ मेरे भाई । आतां हाच येतो सुभेदाराचा ॥ नऊ हात जमीन उडाला । मारा सुभेदारानं केला ॥ बत्तीस वेढे पागोटयाचे । बत्तीस वेढे मंदिलाचे ॥ बेंबीपावेतों चिरित नेला । खुदा रे खुदा बोलला बुध्या धरणीवर पाडिला ॥४६॥
चौक ४७ बोंब्या तेथुनि निघाला । उदेभानापाशीं गेला ॥ "मेरे उदेभान भाई आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया । नऊशें पठाण कापिला । बाच्छाईचा हत्ती कापिला ॥ सीद्दी हिलाल कापिला । हमकु किल्ला डुब होया" ॥ "हम चोन नहीं सोडताई । जावें जळमंदिराला ॥ आहेत बारा जण छोकरे । जावा कल्याणदरवाजाला लढायाला" । तुम्हीं जावें लढाईला" ॥ बारा जण भाऊ, केला मरणाचा पोषाग, पांच हत्यारें घेतलीं । तेथुन निघाले आले सुभेदाराजवळी ॥ "सलाम सलाम मेरे भाई । किस्का तू उमराव सांगावें आम्हांला" ॥ "उमराव शिवाजी महाराजाचा । आहे मी तानाजी मालूसरा" ॥ "सुभेदार भाई । पहिला हात येऊं दे तुझा" । "तुम्ही आम्हां मोगलांचे बाळक । पहिला हात येऊं दे तुमचा " ॥ बारा जण लडक्यांनीं । चोवीस हात जे टाकिले ॥ सुभेदार भला । त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तू पाव गे माझ्या नवसाला । नऊ हात जमीन उडाला ॥ बारा जण लडक्यांचीं । चोवीस खांडोळीं पाडिलीं ॥४७॥
चौक ४८ तेथून बोंब्या निघून गेला । उदेभानाचा जवळ आला ॥ "मेरे उदेभान भाई आग लागो ह्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ॥ नऊशें पठाण काटया । बाच्छाईचा हत्ती काटया ॥ सिद्धी हिलाल काटया । तुम्हारे बारा लडके काटया !" लडक्याचा तो जाब ह्याच्या कानावरतीं गेला । उदेभान मोंगल ज्या बिबी xxx बसला होता तेथून उठेनासा झाला ॥ लेंकांचा तो दुःखाचा शब्द । ज्याच्या ऊरामधीं बसला ॥ खरखर लखोटा लिहिला त्या बोंब्यापाशीं दिला ॥ "जाऊन सांगा उमरावाला । उदेभान तो मोंगल पळून पुण्याला गेला ॥ झेंडा लावा सिंहगडाला । यश तुमच्या तलवारीला" ॥४८॥
चौक ४९ उदेभान तेथुन निघाला । आला पिराच्या दरग्याला ॥ फोडल्या कापसाच्या उदी । ओतले तेलाचे बुधले ॥ ज्यानें आग जी लाविली । ज्यानें उजेड तो केला ॥ गलीम किती मोजून पाहिला । पन्नास माणूस पाहून ह्याच्या आलें हिशोबाला ॥ उदेभान माणूस पाहून । त्याच्या भुज्या ज्या थरारल्या ॥ पन्नास माणूस माझी आंबाडाची भाजी मोगल मागें परतला । गेला आखाडखान्यामधीं ॥ पायीं तुमानी सुरवारा घातल्या । अठरा खंडीचे किनखाप त्यानें आंगांत घातलें ॥ बारा आतबडीचा जोडा । त्यानें पायांमधीं घातला ॥ ज्यानें वाघनखें चढविलीं ॥ जिरेटोप डोईस घातला ॥ अठरा जागीं बिब्या । हारोहारीनें उभ्या केल्या ॥ सळ पट्टयाचा सोडिला । अठरा बिभ्यांची खांडें केलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला । गाभणीगाई जी काटली ॥ गेला पिराच्या दरग्याला । सवामण ऊद जाळिला ॥ एका हातीं गुरदा एका हातीं घेतला पट्टा । दोपट्टयाचा मारा केला । आला कल्याणदरवाजाला । ज्यानें सलाम वाहिला ॥ दादा नऊशें पठाण । ज्यानें दिमतीला घेतला ॥४९॥
चौक ५० "सलाम मेरे भाई । उंबराव किस्का सांगावा मजला" ॥ "उंबराव शिवाजी महाराजांचा । आहें मी तानाजी सुभेदार" ॥ उंबराव मोगलानें पाहिला । "ऐसा भला आहेस रे दादा ॥ तुज्यासारख्या भाई पाठीला असावा । खाणें घालावें वजिराला वजीर पाळावा बाजूला ॥ सोड महाराजांची चाकरी । कर माझी मोगलाची चाकरी ॥ हवाला देतों सिंहगडाचा । हजार रुपयांची तैनात देतों बसून खायाला" ॥ सुभेदार बोले मोगलाला । "सोड सिंहगडाची गादी ॥ चल माझ्या राजगड किल्ल्याला । चलावे महाराजाचे भेटीला ॥ राजगड किल्ल्याचा हवाला । उदेभाना देतों तुला " । एवढया जाबावरुन । घुस्सा आला मोगलाला ॥ "पहिला हात येऊं दे तुझा" । "उदेभान हात येऊं दे तुझा" ॥ तानाजी सुभेदार धांवा अंबेचा मांडिला । धांव धांव अंबाबाई ॥ अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । देवी मागें जी सरली ॥ मोगलासमोर उभारिला । गर्भगाळ कोसळला ॥ नऊ हात जमीन उडाला । मोगलाला माराया गेला ॥ हातामधीं हात ज्यानें अठरा टाकिले । गुंजभर नाहीं जो सरला ॥ "ऐका उदेभान मोगला । पहिला हात माझा झाला ॥ दुसरा हात येऊं दे तुझा" । सुभेदार बोलतो "मामा ऐक निर्वाणाची वेळा ॥ लग्न करा रायाबाचें । दोहों हातांचा मुजरा सांगा शिवाजी महाराजाला" ॥ उदेभान मोगल बारा हात जमीन उडाला । वचक सुरबाईचा दाविला मारा कैफाचा केला । पन्नास वेढे पागोटयाचे पन्नास वेढे मंदिलाचे बेंबीपावेतों चिरित नेला । सुभेदार धरणीला लोटिला ॥५०॥
चौक ५१ पन्नास माणूस, ज्यानें रोजन्या----मांडिल्या, आमच्या सुभेदार धन्या ॥ आम्हाला सांभाळील कोण । आणलेंस वाघाच्या रानाला ॥ मग तो शेलार मामानें । मुर्दा मांडीवर घेतला ॥ उदेभान बोलाया लागला । दादा आपल्या सेनेला ॥ "हात मी नऊशें पठाण । पन्नास माणसें घेऊन जावें॥ कल्याण दरवाजाला ॥ आऊत द्यावी हयांची बुरजाला" ॥ लोक खळखळा रडती कैसें झालें नारायणा । दिन दिन पटयानें वाहिला मारायाला लागला ॥ सुभेदार मेलेला मुरदा इरयानें झाला । ऐशी वर्षांचा तो मामा त्याच्या आंगात संचारला ॥ यश आलें मोगलाला । मोगल मागें जात होता ॥ मग तो सुभेदाराचा पट्टा । शेलार मामानें घेतला ॥ "फीर ग मर्दाचे लंडे फीर ग मर्दाचे लंडे" । मोगल मागे पहात होता ॥ दोहों हातांनीं कचका दिला बेंबीपावता चिरीत नेला ॥ खुदा खुदा बोलला । बुधा धरणीला पाडिला ॥ ज्यानें भाव तो आंतला सोडिला मग तो नऊशे पठाण राहीले ॥ नऊशे पठाण । मार माराया लागले ॥ त्यामध्ये एकटा शेलार मामा लढनेवाला । पन्नास माणसांतून पंचवीस माणूस पडला ॥५१॥
चौक ५२ नऊशे पठाण बोलाया लागला । चला कल्याण दरवाजाला ॥ आहुत देऊं पंचवीस माणसांची । संकट पडलें अंबाबाईला ॥ प्रतापगडची भवानी । उभी राहीली सांकडयाला ॥ पिवळें पातळ नेसली । गळीं कवडयांची माळा ॥ संकट पडलें देवीला । यश जातें शिवाजीमहाराजाचें ॥ देवीनें आपल्या हातून दरवाजा उघडिला । पन्नास कमी बारा हजार फौज किल्ल्याला घेतली ॥ ज्याचा सूर्याबा तो बंधु । मामाला पुसाया लागला ॥ "शेलार रे मामा । माझा दादा रे कुठे आहे बंधू रे कुठे आहे" ॥ शेलार मामा रे बोलला । जरी मेलासे बोललों तर सारी फौज बसेल ॥ सुभेदार आहे बाले सद्रेमधीं । मी आहे कल्याणदरवाजाला ॥ नऊशे पठाण मारावा । मग जाऊं दादाच्या भेटीला" ॥ मग त्या बारा हजार फौजेने । ज्यानें हर हर वाहिला ॥ एका एकाच्या मागें तिघे तिघे लागले । नऊशे पठाण कापिला ॥ पांढरें निशाण उपटलें । भगवा झेंडा शिवाजीचा ॥ पांच तोफा जों मारिल्या । यशाच्या तोफा जों मारिल्या ॥ त्या तोफांचा आवाज । गेला राजगड किल्ल्याला ॥ शिवाजी महाराज बोलला । माझ्या सुभेदारानें सिंहगड सही केला ॥ शिवाजी महाराजानें । यशाच्या दहा तोफा सोडिल्या ॥५२॥
चौक ५३ ज्याचा सूर्याबा तो बंधू । शेलार मामाला बोलला ॥ चला जाऊ दादाच्या भेटीला । शेलार मामानें सूर्याबा बंधूचे । पटे घेतले आपल्या हातामधीं ॥ गेले मुर्द्याचे जवळ । वरुन शेला उघडिला ॥ मुर्दा दादाचा पाहिला । मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ "माझ्या सुभेदार दादा लग्न रायाबाचं राहिलं । ह्याचें लग्न करील कोण" ॥ बारा गेटांचे (मेटांचे) कोळी निघाले । आले सुभेदाराजवळ ॥ "आमचा सुभेदार धनी । आम्हांला तैनात देईल कोण आम्हांला हवाल देईल कोण" ॥ सुभेदार बोलायाला लागला । "भिऊं नका रे दादांनो ह्या दादाचें वचन पुरें करीन ॥ जातों राजगड किल्ल्याला । सांगतों शिवाजी महाराजाला सिंहगडाचा हवाला देतों तुम्हाला" ॥ अबिर गुलाल । ज्याचे मुर्द्यांत भरला ॥ दोरा रेशमाचा घातला । मुर्दा पालखींत ठेविला ॥ पंचवीस कमी बारा हजार लोक सगळे घेतले । वाजत गाजत मुर्दा गेला राजगड किल्ल्याला ॥५३॥
चौक ५४ आले किल्ल्याचे पोटाला । पांचकर्णांचा बाजा केला ॥ आवाज महाराजानें घेतला । सुभेदार किल्ला घेऊन आला ॥ सुभेदाराची पालखी । नेली राजाचे सदरेला ॥ शिवाजी महाराजानें । मुर्दा पाहिला सुभेदाराचा ॥ शिवाजीचे राज्यांत । ऐसा उंबराव होणें नाहीं सुभेदारासारखा । जिजाबाई धांवत आली । पालखी पाहिली ॥ गर्व आला सुभेदाराला । नाहीं आला भेटायाला ॥ बाई पालखीपाशीं आली । बाईनें शेला उघडिला ॥ मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ आंग धरणीला टाकिलें ॥ "सुभेदारासारखा । ऐसा क्षत्री होणार नाही ॥ बाजू गेली महाराजांची । बाजू गेली शिवाजीची" ॥ मग त्या शिवाजीनें चाकराचे साठीं । डोईला रुमाल बांधला ॥ बारा भोयांचे पालखींत । सुभेदाराचा मुर्दा जो घातला । वाजत गाज्त आणला उमराठया गांवाला । ह्याचे लेकाचे भेटीला ॥ पांच कर्णांचा आवाज । रायाबा बेटयानें केला (ऐकला?) ॥ रायाबा बोलतो । बाबा आले माझे लग्नाला ॥ पालखीपाशीं धांवत आला । मुर्दा बाबाचा पाहिला ॥ "साता दिवसांची मुदत ॥ केली माझे लगनाला ॥ बाबा माझें लगीन करील कोण । यजमान होईल बाबा कोण ? मंडपांत मिरवेल कोण ? ॥ आग लागो ह्या लग्नाला । कां माझा बाबा निघून गेला" ॥ शिवाजी राजानें । मुलगा पोटासंगं धरिला ॥ "भिऊं नको माझे बेटा । शिवाजी महाराज तो गेला, तान्हाजी सुभेदार । आहे तुला " ॥ बारा दिवसांचे सुतक धरिलें । शिवाजी महाराजांनीं सुभेदाराचें ॥५४॥
चौक ५५ मग त्या तेराव्या दिवसांत । संयबर बाळाचे मांडिलें ॥ ज्यानें मंडप घातला । मंडपाला तोरण बांधिलें ॥ पहिली नवरी रद्द केली । कडाशीचे दरकराची केली रायबा बेटयाला ॥ संयवर केलें रायाबाचें । रायाबा पुढें तो बसविला ॥ बापाची सरदारी । दिली रायाबा बेटयाला ॥ दिवटया बुदलीची जहागिर । दिली रायाबा बेटयाला ॥ डोणजं तें गांव । दिलें पानसुपारीला ॥ मालुसर्याचा दंड । दिला इनाम खायाला ॥ रायाबा तो बेटा । ज्यानें संगतिला घेतला । आले राजगड किल्ल्याला ॥ ज्यानें पंतोजी तो काका । ज्यानें हुजर्या बोलविला ॥ "पंतोजी तो काका । जावें पुण्याचे शहराला ॥ मंडईच्या बाजारीं । आहे तुळशीदास शाहीर ॥ घेऊन यावें त्याला । राजगड किल्ल्याला" ॥ तुळशीदास शाहिर । त्यानें सदरेला आणिला ॥ डफ तुणतुणें घेऊन । मग त्या तान्हाजी सुभेदाराला ॥ शिवाजी महाराजांचा । पोवाडा कटिबंध केला ॥ हजार रुपयांचा तोडा । हातामधीं घातला त्या रे तुळशीदास शाहीराच्या ॥ शूरमर्दाचा पोवाडा । शूरमर्दानें ऐकावा ॥ शिवाजीचे राज्यांत । ऐसा उमराव होणें नाहीं ॥ पोवाडा गात्याला उद्राण ऐकत्याला घडो पुण्य । सत्य युगींचा पोवाडा कलयुगीं वर्तला ॥ सत्तावीस किल्ल्यांचा सरदार निघूनशानी गेला । ऐसा पुनः होणें नाहीं ॥५५॥
शाहीर तुलसीदास
|
|