Print Page | Close Window

कावळा (House crow)

Printed From: TreKshitiZ
Category: Nature
Forum Name: Birds of India
Forum Description: Information regarding Birds of India can be shared in this forum
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=315
Printed Date: 02 Jan 2025 at 2:15am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: कावळा (House crow)
Posted By: AARTI
Subject: कावळा (House crow)
Date Posted: 31 Jan 2015 at 1:09pm




 

                                                    कावळा (House crow)

 

           आपल्या सर्वांनाच माहित असलेला, रोजच पाहण्यात आलेला एवढेच नव्हे तर लहान पणापासून काऊ-चिऊ चा घास/ काऊ-चिऊच्यागोष्टी ऐकतचआपण मोठे झालोत,असा हा अत्यंत हुशार, चाणाक्ष, चपळ सर्व परिचित पक्षी म्हणजे कावळा ..               

              काकाद्य (Corvidae) (कोर्व्हिडी) किंवा काक कुळातील हा असून याच्या बऱ्याच जाती असून त्या जगाच्या वेगवेगळया भागांत आढळतात.भारतात नेहमी दिसणाऱ्या कावळयांत दोन जाती आढळतात, एक गाव कावळा/गृह कावळा(House crow) आणि दुसरा डोमकावळा (Jungle crow). गावकावळयाचे शास्त्रीय नाव कोर्व्हस स्पलेंडेन्स (Corvus splendens) डोमकावळयाचे कोर्व्हस मॅक्रोऱ्हिकस (Corvus macrorhynchos)असे आहे.

              हा सुमारे 16-17 इं. (40-42 सें. मी.) आकाराचा,  शरीराचा रंग सामान्यतः काळा असून त्यात जांभळया, निळया  रंगाच्या छटा असतात. मानेच्या भोवती करडया रंगाचा रुंद पट्टा असतो; मान, पाठीचा रचा भाग आणि छाती यांचादेखील रंग करडा असतो. चोच मजबूत असून भक्ष्य फाडण्याकरिता उपयोगी पडते. चोच आणि पाय काळया रंगाचे असतात. डोळे गडद तपकिरी रंगाचे असतात. दृष्टी तीक्ष्ण असते. आवाज मोठा आणि कर्कश असतो.  नर-मादी दिसायला सारखेच असतात.

             कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव इ.  देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो.
गृह कावळ्याच्या आकार आणि मानेजवळील राखाडी रंगाच्या छटांवरून सहज ओळखता येतो.




              कावळा संघचारी (गटागटाने राहणारा) पक्षी आहे. माणसाच्या सहवासामुळे तो चांगलाच धीट झालेला असून खोडया करण्यात प्रवीण बनलेला आहे. तो उद्धट असून सर्वभक्षक आहे. डोळा चुकवून तो हळूच घरात शिरतो एखाद्या खाण्याचा पदार्थ चटकन उचलून पसार होतो, तो सदैव जागरुक असतो. संकटाचा यत्किंचित जरी संशय आला तरी तो उडून जातो. अन्नाच्या बाबतीत त्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही, मग तो मेलेला उंदीर असो, उघडे अन्न असो, कोळणीची माशांनी भरलेली पाटी असो किंवा ताटा मधली पोळी असो तो ती शिताफिने पळवतो. त्याची हि कृत्ये जरी आवडणारी नसली तरी तो शहर स्वच्छ ठेवण्याचे काम निश्चित करतो.

                 कावळ्याचा विणीचा हंगाम एप्रिल ते जून असतो. कावळा आपले घरटे झाडावर साधारणतः 3 ते 8 मीटर उंच ठिकाणी फांद्यांच्या दुबेळक्यात बांधतो. नर आणि मादी दोघेही ते बांधण्याचे काम करतात. घरटे काटक्याकुटक्यांचे असून त्याला लोकरीचे धागे, चिंध्या काथ्या असून घरट्याच्या मध्यभागी वाटीसारखा खोलगट भाग असतो. या खोलगट भागात मादी - अंडी घालते. त्यांचा रंग फिक्कट हिरवा निळा असून त्यावर तपकिरी रंगाचे लहान ठिपके किंवा रेषा असतात. अंडी उबविण्याचे पिल्लांना भरविण्याचे काम नर मादी आळीपाळीने करतात. आपल्या पिल्लांबरोबरच कोकिळाच्या पिल्लांना देखील खाऊ घालून कावळा त्यांना वाढवीत असतो.

              बगळ्यांच्या विणीच्या ठिकाणांना त्याचा फार धोका असतो. त्या जागां भोवती त्याचे थवेच्या थवे असतात. पक्ष्यांच्या घरट्यावर हल्ला करून पिल्लांना अंड्यांना पळवून नेतात खाऊन टाकतात.

              कावळ्याविषयी भारतीय समाजात काही रूढी आहेत मृताच्या क्रियेच्या दहाव्या दिवशी पिंडदानाच्या वेळी तसेच श्राद्धाच्यावेळी भाताच्या पिंडाला कावळ्याने स्पर्श केला म्हणजे तो मृतात्म्याला पोहोचतो असे मानले जाते. तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे. तसेच कावळा दाराशी ओरडत बसला तर अचानक कोणीतरी पाहुणा घरी येणार असा संकेत समजला जातो.


डोमकावळा(Jungle crow) -  याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस मॅक्रोऱ्हिंकस असे आहे. डोमकावळा साध्या कावळ्यापेक्षाथोडा मोठा असून त्याची लांबी 18-23 इंचअसते.रंग चकचकीत काळा असून त्यात जांभळ्या रंगाची झाक असते; डोळे तपकिरी रंगाचे; चोच जाड, मजबूत आणि काळी; पाय काळे असतात. डोमकावळ्याचा आवाज  घोगरा असून हा साधारण पणे मनुष्यवस्ती पासून दूर असतो 



       भारत, श्रीलंका आणि ब्रह्मदेश मध्ये डोमकावळा आढळतो. हिमालयात 3, 965 मी. उंचीपर्यंत तो सापडतो. ऋतुमानाप्रमाणे हिमालयातील आपले स्थान तो बदलतो; उन्हाळ्यात तो वर जातो आणि हिवाळ्यात खाली उतरतो.

                नर आणि मादी दिसायला सारखीच असतात.हा जंगली प्रदेशातील असला, तरी थोड्याफार प्रमाणात ते खेड्यापाड्यात, गावात किंवा शहरात येतो. साध्या कावळ्याला याची नेहमी भिती वाटते. यांचा प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात मार्चपासून मेपर्यंत आणि दक्षिणेत डिसेंबर ते एप्रिल असतो. याचे घरटे कावळ्याच्या घरट्यासारखेच असते. मादी दर खेपेस चार-पाच निळसर हिरव्या रंगाची अंडी घालते; त्यांच्यावर तपकिरी ठिपके रेषा असतात. घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना भरविणे . कामे नर मादी दोघेही करतात.

                 कावळा सर्वाना अतिपरिचित असा पक्षी .. बहुधा नावडता .. पण माझा आणि कावळ्याच खास नातं आहे .. 'खास मैत्री' आहे असं म्हटलं तरी चालेल.माझे कावळ्याच्या बाबतीत काही मजेशीर अनुभव आहेत. आमच्या बाल्कनी मध्ये मी पक्ष्यांसाठी भांडभर पाणी आणि दाणा / शिजवलेले अन्न रोज ठेवेते. पक्षांसाठी एक खास साधारण दीड फुटी लाकडी फळी ठेवली आहे त्यावर दाणा- पाणी ठेऊन त्यावर त्यांना ऐसपैस बसतायेईल एवढी जागा ठेवली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी रोज येउन बाल्कनीत दिवसभर धुडघूस घालत असतात .. त्यातल्यात्यात माझी कावळ्या बरोबर जास्त गट्टी आहे. कारणच तसा आहे.. मी रोज सकाळी चहा प्यायला ग्यालरीत बसले कि हे कावळे महाराज तेथे येतात. त्यांना रोज सकाळी बिस्कीट लागते. त्याची रोजची वेळ पण ठरलेली आहे. साधारण 6: 30 च्या सुमारास येतो तो .. कधी कधी उठायला उशीर झाला तर नुसता ओरडून ओरडून जागं करतो. सकाळच बिस्कीट खाउन निघून जातो. मग साधारण 8 च्या सुमारास पोळ्या करतांचा वास आला कि स्वारी परत ग्यालरीत येउन बसते. त्याला ताजी ताजी पोळी दिली कि मग एकदम खुश .. हा प्रकार गेले अडीच तीन वर्ष चालू आहे. त्यामुळे रोजच्या भेटी- गाठी मुळे आता आम्ही दोघे एकमेकांना चांगलेच ओळखू लागलो आहोत .. कधी कधी तो सकाळी आला नाही तर आठवण येते त्याची 'असं काय काम निघालं असेल कि आज कावळे बुवांना येयला वेळ मिळाला नाही' ... किंवा कधी घरात मी नसेन गावाला गेले असेन तर हा येउन ओरडत बसतो कट्ट्यावर असे शेजारचे सांगत होते मला .. म्हणजे मी नसेन तर त्याला पण माझी आठवण येतेच .. त्यामुळेच हा माझा खास मित्र अस म्हणते मी ...

                 गेले सात - आठ महिने तर मला रोज कावळा आणि फ्यामिली मला भेटायला येतात. 'कावळा- कावळीण आणि बेबी कावळा' ...  एकदा असंच उन्हाळ्याच्या दिवसात मी त्याला फळीवर दोन - चार चमचे आमरस घातला मग काय स्वारी एकदम खुश .. आपल्या फ्यामिलीला बोलावले आणि आमरस फस्त केला .. आणि तो खुशीत असला कि आमच्या कट्ट्यावरून उड्या मारत येरझार्या घालत असतो .. त्याचा हा स्वभाव परिचित झालाय मला .. 

                  माझ्या कल्याण मधल्या आजी कडे पण रोज एक कावळा येतो त्याची आवड अजीबच आहे त्याला रोज कवडीचे दही लागते .. म्हणजेच जाड, घट्ट दही दिला कि तो खुश, बाकी काही घातलं तर तो खात नाही, जो पर्यंत दही मिळत नाही तो पर्यंत स्वयंपाक घराच्या खिडकीत बसून मान वाकडी करत आत डोकावत बसतो ..                             

                 परवा असाच एक किस्सा झाला मी ऑफिस मधून लवकर घरी आले, येताना ढोकळा घेऊन आलेले ढोकळा खायला सुरवात करणार तोच हा ग्यालरीत येउन बसलेला आणि ग्यालारीच्या दारातून आत डोकावत बसलेला .. मी आत काय करतीये ते बघत .. आणि माझ्या हातात ढोकळा दिसताच जोरजोरात ओरडायला लागला .. मी पण त्याला आवाज देत 'आले रे! देते तुला पण .. असं म्हणाले तर हा पठ्ठ्या लगेच त्याच्या खाऊच्या फळी वर जाऊन बसला माझी वाट पाहत. जणू काही मी बोललेले त्याला सगळे कळते असेच मला वाटले. ढोकळा देताच एक घास खाल्ला आणि आणि मोठ मोठ्याने ओरडायला लागला. हा इतक्या मोठ्याने का ओरडतोय हे कळेनाच मला .. जवळ जवळ सात - आठ मिनटे त्याचे ओरडणे चालू होते .. मी पण दहा वेळा ग्यालरीत डोकावून पाहिले होते .. पाणी तर ठेवले होते ... अजून काय पाहिजे आहे ह्याला? असा प्रश्न पडला .. नंतर थोड्या वेळातच ह्याचा सर्व मित्र वर्ग  जवळ जवळ 7-8 कावळे माझ्या ग्यालरीत जमा झाले ... जणू काही कावळ्यांच सम्मेलनच असावं असं वाटलं मला..सोसायटीतले खालून जाणारे येणारे लोक यांच्या गोंगाटाने माना वर करून माझ्या ग्यालरीत बघत जाऊ लागले .. साहजिकच आहे 'एवढे कावळे ह्यांच्या ग्यालरीत काय करत असतील' असा प्रश्न त्यांना पण पडला असेल ... अधिक भर म्हणजे त्यात कावळे फ्यामिली सुद्धा तेथे हजर .. मग काय जो ढोकळा घातलेला तो एका मिनटात फस्त आणि अजून जोरजोरात ओरडणे सुरु .. अजून मागणी .. मग मी अजून ढोकळ्याच्या तीन - चार वड्या घातल्या ... सगळे त्यावर अगदी तुटून पडले .. पाव किलोच्या वर ढोकळा ह्या अचानक भरलेल्या संमेलनात फस्त करून मित्र वर्ग तेथून निघून गेला आणि नेहमीचा कावळा आणि फ्यामिली तिथेच फळीवर बसलेली .. आणि तो ग्यालरीत कट्ट्यावर इकडून तिकडे फेर्यामारात चालत होता .. प्रत्येक फेरीला माझ्याकडे मान वाकडी करून बघून पुढे जाई .. त्याचा हा आनंद मला परिचित होता .. पण त्याच्या ह्या वागण्याचे मला खूप हसू येत होते. रोजच्या भेटी मुळे तो मला चांगलाच ओळखू लागला होता .. अगदी मी ग्यालरीत कट्ट्याला टेकून उभी राहिले आणि हा पण कट्ट्यावर असेल तरी कधी उडून गेला नाही किंवा उडून जर पुढे बसला नाही .. गेल्या अडीच वर्षात आमची खूपच छान गट्टी झाली असून तो माझ्या खास मित्र परिवारापैकी एक वाटतो मला..

 

                                                     आरती दुगल
                                                     30.01.2015

                                                    माहिती स्त्रोत - मराठी विश्वकोश
                                                                                                                              
पक्षी- संदर्भ ग्रंथ

                                                                                                        
फोटो - 1. अमोल नेर्लेकर
                                                                                                                   2.
गुगल

 





Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk