Print Page | Close Window

पाटेश्वर

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Temples of Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Temples in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=192
Printed Date: 27 Dec 2024 at 1:31am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: पाटेश्वर
Posted By: amitsamant
Subject: पाटेश्वर
Date Posted: 14 Nov 2013 at 10:56pm
गावाचे नाव :- देगाव
जिल्हा:- सातारा
जवळचे मोठे गाव :- सातारा

सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पाटेश्वराचे अप्रतिम मंदिर व लेणी आहेत. पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये, मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी". येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच विविधता पिंडींच्या कोरीव कामातही आढळते. 
सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या डोंगरवरील निसर्ग अजूनही शाबूत आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षीही पाहायला मिळतात. त्यामुळे सातार्‍याला जाणार्‍या प्रत्येक निसर्गप्रेमीने अजिंक्यतारा, कासचे पठार, बामणोली याबरोबर पाटेश्वरलाही आवर्जून भेट द्यावी.

पाटेश्वरची हिंदू (ब्राम्हणी) लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात आहे. पाटेश्वरचे मंदिर अठराव्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधले. पाटेश्वरचा डोंगर चढतांना रस्त्यात दगडात कोरलेली गणपतीची प्राचीन मुर्ती पहायला मिळते. डोंगरावर सुरुवातीला कमळांनी भरलेली " विश्वेश्वर पुष्करणी" आहे. या पुष्करणीच्या एका भिंतीवर शिवाची दुर्मिळ "अजएकपाद"मूर्ती कोरलेली आहे, या शिल्पातील मुर्तीला एकच पाय कोरलेला आहे.
पुष्करणी जवळूनच पहिल्या लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे, या लेण्याला मरगळ म्हशीचे लेणे म्हणतात.या लेण्यात मृतावस्थेत पडलेल्या म्हशीच्या पाठीवर शिवलिंग दाखवलेले आहे. याचा संदर्भ महिषासूर मर्दनाच्या पुराणातील कथेशी असावा. या बरोबरच लेण्यात एकूण ६ शिवलिंग ओळीने कोरलेली आहेत. यातील एक शिवलिंग छोट्या अयोनी शिवलिंगाचा (आपण पहातो त्या नेहमीच्या शिवलिंगास सयोनी शिवलिंग म्हणतात, तर नुसताच दंडगोलाकार उंचवटा कोरलेल्या शिवलिंगास अयोनी शिवलिंग म्हणतात.) मनोरा करून बनविलेले आहे. याच गुहेतील एका शिल्पपटात पाच शिवलिंग कोरलेली आहेत. ती पृथ्वी, आप, तेज ,वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिढीत्व करतात.

पुष्करणी जवळून पायर्‍यांचा मार्ग पाटेश्वर मंदिराकडे जातो. या मार्गावर २ शिवलिंग आहेत. यातील एका पिंडीवर मध्यभागी मुख्य शिवलिंग व बाजूने ६८ सयोनी शिवलिंग कोरलेली आहेत. तर दुसर्‍या शिवलिंगावर मध्यभागी मुख्य शिवलिंगावर दाढी, मिशा असलेला शंकर कोरलेला आहे आणि बाजूने ७१ अयोनी शिवलिंग कोरलेली आहेत.

पुढे ५ लेण्यांचा गट असलेले "बळीभद्र मंदिर लेणे" आहे. यात एक ठिकाणी शिवपिंडीच्या बाजूने चक्र, बदाम, गोल इत्यादी आकारात दहा आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यातील ८ आकृत्या आठ दिशा व २ आकृत्या सूर्य व चंद्र यांचे प्रतिक आहेत. यशिवाय या लेण्यात दशवतार, अष्ट्मातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशाही विष्णू, महिषासूरमर्दीनी, कार्तिकेय, चामुंडा इत्यादी शिल्पही पहायला मिळतात. या लेण्यात "अग्नी-वृष"ची अप्रतिम मुर्ती आहे. हि मानव व बैल यांची एकत्रित मुर्ती आहे. या मुर्तीला ७ हात असून हातात आयुधे व मुद्रा कोरलेल्या आहेत. समोरून पाहील्यास मुर्ती दाढीधारी माणसाची दिसते तर बाजूने पाहिल्यास चेहर्‍यात नंदी(बैल) दिसतो. हा आभास साधण्यासाठी दाढी मध्ये दोन खाचा कोरलेल्या आहेत, त्या बैलाच्या नागपुडी प्रमाणे दिसतात.या मुर्तीचे, सौंदर्य, प्रमाणबध्दता, व शिल्पकाराची कल्पकता "अग्नी-वृष"ची मुर्ती प्रत्यक्ष पाहूनच अनुभवता येते. 

यापुढील वर्‍हाडघर हा ३ लेण्यांचा समुह आहे. त्यातील मुख्य लेण्यातील पूर्वेच्या भिंतीवरील शिल्पपटात पार्वतीची मूर्ती व बाजूला ९७२ शिवलिंग कोरलेली आहेत. ९७२ ही संख्या देवीची १०८ शक्तीपिठे व प्रत्येक पिठाची ९ वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवतात. दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात विष्णूची मूर्ती व बाजूला १००० शिवलिंग कोरलेली आहेत. १००० ही संख्या विष्णूसहस्त्रनामाचे प्रतिक आहेत. दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात सूर्याची मूर्ती व बाजूला १००० शिवलिंग कोरलेली आहेत. याशिवाय लेण्यात भालचंद्र शिवाची व ब्रम्हदेवाची मूर्ती कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये एके ठिकाणी शिवपिंडी ऎवजी २ कुंभ कोरलेले आहेत. याचबरोबर एकमुखी, चतुर्मुखी, सहस्त्रमुखी अशा अनेक प्रकारात शिवलिंग कोरलेली आहेत. याशिवाय लेण्यात काळसर्पाचे शिल्प व  देवनागरी लिपीतील (संस्कृत मधील) शिलालेख आहेत, परंतू पुसट झाल्यामुळे शिलालेख वाचता येत नाहीत.   

पाटेश्वरचे मंदिर हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व ४ फूटी उंच शिवलिंग यांची प्रमाणबध्दता व यावरील तकाकी पहाण्यासारखी आहे.

जाण्यासाठी :- सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. सातारा ते सातारा एम.आय.डी.सी  ७ किमी व सातारा एम.आय.डी.सी ते देगाव ७ किमी अंतर आहे. देगावला जाण्यासाठी सातार्‍याहून सिटी बस व रिक्षाची सोय आहे. देगाव बस स्थानकाच्या मागील डोंगरावर जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पावसाळा सोडून इतर ऋतुत जीप सारखे वहान जाऊ शकते. या रस्त्याने आपण पाऊण तासात चालत पाटेश्वरला पोहोचतो.

आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
सातारा शहरात दोन दिवस मुक्काम करून अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड ,पाटेश्वर, कासचे पठार, बामणोली, चाफळ इत्यादी ठिकाणे पहाता येतात. 
अजिंक्यतारा किल्ला, व सज्जनगड  यांची माहिती साईटवर दिलेली आहे.

Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
Pateshwar Mandir :- Village :- Degav,  Dist :- Satara, Nearest city :-  Satara.





Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk