गावाचे नाव :- किकली जिल्हा:- सातारा जवळचे मोठे गाव :- भुईंज, वाई ,सातारा.
सातारा जिल्हयात वाई पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या किकली गावात भैरवनाथाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले असे गावकरी सांगतात. मंदिराचा दरवाजा पूर्वाभिमूख आहे. दरवाज्यामधे डाव्या बाजुला कोनाड्यात गणपतीची मूर्ती आणि उजव्या बाजूला कोनाड्यात सिद्धनाथ मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच भैरवनाथाचे हेमाडपंथी मंदिर दिसते. आजमितिस मंदिराची पडझड झालेली असून जिर्णोद्धाराचे काम चालू आहे. मंदिरासमोर डाव्या बाजूस तीन दीपमाळा आहेत. उजव्या बाजूस एक छोटे मंदिर आहे. या छोट्या मंदिरात आज दत्ताची मूर्ती आहे. दत्त मंदिराच्या उजवीकडे एक पडके मंदिर असून त्यात शंकराची दगडी पिंड आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेच नाही असे गावकरी सांगतात. या पडक्या मंदिराच्या थोड पुढे आल्यावर सध्या बांधलेले एक भैरवनाथ मंदिर आहे. मंदिरासमोरच्या चौथर्यांवर दोन शंकर पिंडी आणि नंदी आहे. मुख्य मंदिरामध्ये समोर नंदी, तिथून आत प्रवेश केल्यावर मंदिराचा मंडप व त्यामध्ये अनेक खांब आहेत ज्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिरात एकूण तीन पिंडी आहेत. उजव्या डाव्या बाजूस एक एक व गाभार्यात एक. मंदिरावर सध्या कळस नाही, पडझड झाली आहे. मंदिराच्या परिसरात शाळा आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) चंदन आणि वंदन किल्ले चंदन आणि वंदन किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
जाण्यासाठी : चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यांवर जाणार्या सयुंक्त वाटा आहेत. पुणे - सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथुन २० कि.मी अंतरावर किकली गाव आहे. वाई आणि सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहेत. किकली गावात भैरवनाथ मंदिर आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची, येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन किल्ला आहे.
Ancient Temples of Maharashtra Bhairavnath Mandir , Village :- Kikali , Dist :- Satara, Nearest city :- Bhuinj, Satara, Vai.
|