कण्हेरगड रामजी पांगेर्यांचा कण्हेरगड किंवा कण्हेरा करण्याची फार दिवसांपासून इच्छा होती. कण्हेरगड हा नाशिक जिल्ह्तात अजंठा सातमाळ डोंगर रांगेत वसलेला आहे. या किल्ल्याची उंची येथील बाकीच्या किल्ल्यांशी तुलना करता कमीच आहे. शनिवारी रात्रीच आम्ही आठ ट्रेकर्स डोंबिवली वरुन निघालो. नाशिक - दिंडोरी - वणी तिथून अहिवंतगड आणि सप्तश्रृंगीगड यांच्यातील खिंडी मधून आथंबे आणि तिथून पायथ्याचे साददविहीर गाव गाठले. चांगल्या रस्त्यामुळे प्रवास सुखकर झाला. पहाटे आराम केला. सकाळी उठून चहा - नाष्ता केला. गावातील लोक फार सहिष्णू आहेत. त्यानी वेळेला आम्हाला कोराच पण चवदार चहा करुन दिला. ते त्याचे पैसे देखील घेत नव्हते. पण तरी आग्रहाने त्यांच्या हाती चहाचे पैसे ठेवले.रस्ता सोपा होता, त्यामुळे सगळे या किल्ल्यावर प्रथमच जात असूनही वाटाड्या घेतला नाही. जाताना वाट कण्हेरगड आणि त्याच्या डावीकडे असलेल्या डोंगराच्या मधल्या घळीतून वर जाते. कमी असला तरी खडा चढ आहे. आमच्या नशीबाने उन नव्हते आणि वातावरण आल्हाददायक होते. घळीत पोहोचताच पूर्वेकडे धोडप किल्ला आणि इखारा सुळक्याचे मनमोहक दर्शन होते. तर उत्तरेला साल्हेर दिसतो. इथून चढ अजून खडा होतो. जसजसे आपण वर जाउ तसतसे पूर्वेला कांचना इंद्राइ राजधेर या किल्लयांचेही दर्शन होते.
अर्ध्या तासाच्या चढाइ नंतर आपण बुरुजावर पोचतो. मधे मातीमुळे वाट निसरडी झालीये. काही ठिकाणी दगडात कोरलेल्या पायर्या दिसतात. बुरुजावरुन पुढे गेल्यावर उजवीकडे नेढ लागत. नेढ्यात बसून कॅमेर्यांसोबत खूप छान वेळ घालवला. नेढ्यातून पुढे गेल्यावर दगडात कोरलेल्या सुस्थितीत असलेल्या पायर्या आहेत. तिथून वर चढून गेल्यावर उंचावर पडलेल्या दरवाजाचे अवशेष दिसतात. त्या दरवाज्यातून पुढे गेल्यावर दक्षिणेकडे रावळ्या जावळ्या तर पश्चिमेकडे मार्कंड्या सप्तश्रृंगी गड यांचे दर्शन होते. गडावर पाण्याची अनेक टाकी आहेत. त्यातली बरीचशी या दक्षिण भागात आहेत. येथून जवळच घराच्या जोती आहेत आणि एका वाड्याच्या अवशेषात तुळशी वृंदावन व महादेवाची पिंड आहे.
येथून पश्चिमेकडे असलेला डोंगर व कण्हेरगड एका खाचेने वेगळे झाले आहेत. तिथे जाउनही बर्याच क्लिक्स केल्या. आता फक्त धोडप च्या बाजुला असलेली गुहा पहायची बाकी होती. दरवाजा उतरुन उजवीकडे मागे गेलो. गुहा फार मोठी नाही. पण आत एक माणूस आरामात लपून राहू शकेल.
नंतर नेढ्यात जाउन किल्ल्याच्या माहिती चे सेशन घेतले. आणि किल्ला उतरायला सुरुवात केली. निसरड्या रस्त्त्यावरुन एकमेका साह्य करु या उक्ती प्रमाणे किल्रा उतरलो.
|