आलो होतो खरा M.A च्या परीक्षेसाठी.पण मध्ये एक मस्त ट्रेक झालाच पाहिजे म्हणून मग विसापूरला जायचं ठरवलं.सोबत आपला जिगरी(nano)होताच.त्यात काऊ आणि कौस्तुभची भर पडली आणि हो ट्रेकक्षितिज सोबत यावेळी आमचा म्होरक्या होता माधवी काकू!!! २२ मे ला bसकाळी म्हणजे तसे पहाटेच कौस्तुभ आणि काऊच्या गाडीवरून भाजे गावाकडे प्रस्थान केलं.वातावरण खुपच आल्हाददायक होतं.जुन्या हायवे वरून मळवली गाठलं,गरमागरम चहा घेतला आणि विराजला एक फोन केला.टीम ट्रेकक्षितिज आत्ताच जागी झाली होती.नाश्ताच्या वेळेला बरोबर लोहगडवाडीला पोहोचलो.खमंग पोहे,पुन्हा एकदा फक्कड चहा झाला.वातावरण ढगाळ होतं.मंद वारा वाहत होता.काही वेळातच ओळख परेड झाली आणि विसापूर कडे निघालो.जाताना लोहगडची भव्यता जाणवत होती.तटबंदी,विंचूकाटा माची,नेढं जबरदस्त दिसत होतं.
विसापूरची वाट करवंदांच्या जाळ्यांनी भरून गेली होती.त्यामुळे वेगात जरा फरक पडला.आंबट-गोड चवीने मजा आणली. उजवीकडील रस्त्याने वर गेल्यावर लगेच एक पाण्याचे टाके लागले.अजून तसा उन्हाचा कडाका जाणवत नव्हता.थोड्या रिकाम्या झालेल्या पाणपिशव्या भरून घेतल्या.चढण चालू झाली होती.तटबंदीचे ढासळलेले मोठ-मोठ्या दगडांनी काहीसे दमवले.बाकी वाट मस्त आहे.काही वेळातच किल्ल्यात प्रवेशकर्ते झालो.तिथेच चेतनाने विसापूरचा इतिहास सांगितला.तिला मग मीहि थोडी पुष्टी जोडली.हिरडस-मावळाची ओळख करून दिली.तुंग-तिकोना ,पवना धरण असा मोठा विलोभनीय परिसर डोळ्यांसमोर दिसत होता.
उजवीकडून वाटेने झेंड्यापर्यंत जाऊन बुरुज पाहून आलो.मुळ ठिकाणापर्यंत परत येऊन डावीकडील तटबंदीच्या कडेकडेने किल्ला पाहण्यास सुरुवात केली.गडावर चुना मळायचे मोठे जाते,एक दारू कोठार,एक पडका वाडा,शंकराचे मंदिर आणि त्याच्या मागे पुष्करणी,त्यासमोरील स्तंभ या कलाकृती पाहण्यासारख्या आहेत.
चुना मळण्याचे जाते
https://1.bp.blogspot.com/-bfXh5I5alsw/V3KRZLtrWaI/AAAAAAAAB0A/MtDd_9S2x1w0r8r6UoDfmn4ON9rdkgpOwCLcB/s1600/VISTAT.jpg" rel="nofollow">
अजोड तटबंदी
विसापुरचे आणखी एक वैशीष्ट्य म्हणजे त्यावरील तटबंदी.मी आतापर्यंत पाहिलेली सुंदर तटबंदी.त्याची भव्यता भाजे गावातूनच जाणवते.तिच्यावरील बुरुज,तोफांच्या साठी विशेष योजना लक्ष वेधून घेते.किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठया प्रमाणावर पहावयास मिळतात.यावरून त्यावरील लोकवस्तीची कल्पना येते.किल्ल्याचा विस्तार मोठा आहे. आम्ही शंकराचे दर्शन घेऊन जांभळे खात भाजे लेण्याच्या डोंगरावर उतरण्याचे ठरवले.त्याच मार्गावर मारुतीचे सुंदर शिल्प नजरेस पडते.शंख,घोड्याची नाळ,फुल मारुतीच्या आजूबाजूला शोभून दिसते.देवतेच्या हातातही गदा नसून छानसें फुल आहे.या राजमार्गाने आम्ही भाजे लेण्यांवर उतरलो.काय वर्णन करावे या लेण्यांचे!!! कितीही वेळा पहिले तरी त्यांचे अप्रूप वाटतेच.खडकांमधील कोरीव काम,तेथील पाण्याची टाकी ,गोड,थंडगार पाण्यामुळे मन शांत झाले.बौद्ध लेण्यांमध्ये दिसणारे स्तूप,विहार यांची शार्दुलने उत्तम माहिती दिली.तिथे आलेल्या विदेशी पर्यटकांशी तोशदा जर्मन भाषेत संवाद साधत होती,ऐकायला मस्तच वाटत होतं.पण नंतर सगळे म्हणाले काहीही झालं तरी तोशदा हसली मात्र मराठीत. https://4.bp.blogspot.com/-7Ymu-MBO6ME/V3KS53ySorI/AAAAAAAAB0M/xNBUsF52p1wQtx92TTWnh9C8H1Mvz76VgCLcB/s1600/visMar.jpg" rel="nofollow"> मारुतीराया नालासोपारा-पैठण मार्गावरील किल्ल्यांच्या रांगा,मार्गावरील लेण्या,त्यांचे महत्व याचीसुद्धा छान माहिती मिळाली .व्यापारी वर्ग लेण्यांचा,विहारांचा वापर राहण्यासाठी करायचे.. त्यातून देणगी स्वरुपात मदत केली जायची आणि यामुळेच बौद्ध धर्माच्या प्रसारास मदत झाली. देवा सरांनी अजून एका मुद्द्यावर प्रकाश टाकला.आपणच बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो की इथे बघण्यासारखं काहीच नाहीये. इथच आपलं चुकते.विसापूर,लोहगड,पवनेचा नितांत सुंदर परिसर,तुंग-तिकोना,पावसाळ्यातील येथील खळाळणारे धबधबे या सगळ्याचे BRANDING केल्यास लोकांनाही याचे ऐतिहासिक महत्व समजावून सांगणे सोपे जाईल.प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करायला हवेत. भाजे लेणी पाहून(वाढदिवस साजरा करून)एक मस्त ग्रुप फोटो शार्दुलने काढला.खाली गावात आल्यावर वडापाव आणि चहाची तल्लफ भागवली गेली.आम्ही लगेच सगळ्यांचा निरोप घेऊन पुण्याकडे निघालो.खूप दिवसांपासून राहिलेला ट्रेक पूर्ण करून परीक्षेसाठी प्रफुल्लित मनाने निघालो.
https://2.bp.blogspot.com/-GhGfWOyfG34/V3KVG6-C5kI/AAAAAAAAB0g/kg815-3Zp-kIcmgWrdudTWg7brOtaSNywCLcB/s1600/shitiz.jpg" rel="nofollow"> | TEAM TREKSHITIZ
|
|