भारतातील जैनांची सर्वात प्राचीन लेणी ओरीसा राज्यात उदयगिरी आणि खंडगिरी येथे व कर्नाटक राज्यात बदामी येथे आहेत. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली १२ शतकातील जैनांची भव्य लेणी आहेत. धर्मप्रसारासाठी भ्रटकंती करणारे जैनमुनी वर्षाकाळात या गुंफांमधून राहत असत. इ.स पूर्व दुसर्या शतकात कलिंगसम्राट खारवेल हा जैन होता. त्याच्या कारकीर्दित बिहार, ओरीसा या राज्यात जैनांची लेणी खोदण्यात आली. त्यानंतर जैनधर्म भारतभर पसरला. त्याबरोबर गुजरात (जुनागड) येथील लेणी, कर्नाटक राज्यातील बदामीची लेणी, श्रवणबेळगोळची गोंमटेश्वराची मुर्ती, महाराष्ट्रातील वेरुळ, धाराशिव व अंकाई-टंकाईची लेणी खोदण्यात आली.
जैन धर्मिय २४ तीर्थंकर मानतात. पहिला तीर्थंकर ऋषभनाथ/आदिनाथ तर तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ आणि चोविसावे महावीर वर्धमान. महावीराचा जन्म वडील सिध्दार्थ व आई त्रिशालाच्या पोटी इ.स. पूर्व ४५० मध्ये झाला. आईवडील यांनी व्रत वैकल्ये करुन देहत्याग केल्यावर महावीराने गृहत्याग करुन १२ वर्षे घोर तपश्चर्या केली व त्यांना केवलज्ञान प्राप्त झाल., ते जितेंद्रीय झाले म्हणूनच त्यांना जिन, अर्हत, जेता, निर्ग्रंथ असे म्हणतात व त्यांच्या अनुयायांना जैन म्हणतात. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व ब्रम्हचर्य या पाच तत्वावर जैन धर्म आधारलेला आहे.
या सर्व लेण्यांमधून महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर, मातंग सिध्दयिका, नाग, गंधर्व, विद्याधर, भुवनपती, राक्षस, मृग, हत्ती, सिंह (यक्षयक्षिण) यांच्या मूर्ती वारंवार आढळतात जैन संप्रदायाने नंतरच्या काळात हिंदू देव देवतांचा स्विकार केला. इंद्र, इंद्राणी, अंबिका, इशान, गरुड, शुक्र, सरस्वती, लक्ष्मी, गणेश, भैरव, वेरुळ येथील इंद्रसभा लेण्यात पाहाता येते.
जैन तीर्थंकरांच्या मूर्ती उभ्या किंवा पद्मासनात बसलेल्या दाखवतात मूर्तीच्या मुखावर शांत, प्रसन्न व धीरगंभीर भाव असतो. त्यांच्या छातीवर श्रीवत्स व डोळ्यांच्या भुवयांमध्ये उर्णा चिन्ह कोरलेले असते. पद्मासनात बसलेल्या मूर्तीच्या तळहातावर चक्र व तळपायावर त्रिरत्न कोरलेले आढळतात. जैन परंपरेप्रमाणे तीर्थकरांच्या मुर्ती व्यतिरिक्त ह्या आकाराने लहान दाखवण्यात येतात.
मुर्तींच्या रंगावरुनही त्यांची ओळख पटते. नेमिनाथ व पार्श्वनाथ यांच्या मुर्ती नेहमी काळ्या दगडातून किंवा काळ्या संगमरवरातून घडविण्यात येतात. श्वेतांबर जैनांच्या परंपरेत प्रत्येक तीर्थकारांची वेगळी शासनदेवता आहे. उदा. ऋषभनाथ - चक्रेश्वरी, नेमिनाथ-अंबिका या शिवाय विद्यादेवी, सिध्दायिका इत्यादी शासकदेवता आहेत.
जैन लेण्यात २४ तीर्थंकर वेगवेगळ्या आकारात कोरलेले असतात. या मुर्ती दिसण्यास सारख्या असल्यामुळे त्यांच्यावरील विशिष्ट चिन्हावरुन (लांच्छन/अमिज्ञान चिन्ह) आणि त्यांच्या वहानावरुन ओळखता येते. (उदा ऋषभनाथ - वृषभ, २ रे तीर्थंकर अजितनाथ - हत्ती, पार्श्वनाथ - शेषनाग, महावीर - सिंह, १६ वे शांतिनाथ - मृग) .यापैकी तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अस्तेय व अपरिग्रह ही चार तत्वे सांगितली. तर महावीरांनी त्यात पावित्र्य(शूचिता) या पाचव्या तत्वांची भर घातली. आपली शिकवण सर्वसामान्य माणसां पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्राकृत व अर्धमागधी भाषांचा वापर केला. महावीरांनंतर जैन अनुयायात मतभेद होऊन दिगंबर व श्वेतांबर हे पंथ निर्माण झाले.
तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ याची तपश्चर्या भंग करण्यासाठी कमठ राक्षसाने जीवाचे रान केले. त्यावेळी धरणेंद्र यक्ष व त्याची पत्नी पद्मावती यांनी त्याचे संरक्षण केले. या कथेवर आधारीत असलेल्या शिल्पांमध्ये धरणेंद्राने आपला सप्तफणा पार्श्वनाथाच्या डोक्यावर उभारलेला दाखवतात व अमोगाच्या वेटोळ्यांनी त्याच्या देहाचे कमठ राक्षसापासून संरक्षण केल्याचेही दर्शवलेले असते.
जैन लेण्यातून नेहमी आढळणारी मुर्ती म्हणजे बाहुबली/गोमटेश्वर. हा ऋषभनाथांचा मुलगा याचा भाऊ भरत वडीलांच्या पश्चात राजा होतो. हे पाहून याने केशलुंचन करुन प्रव्रज्जा स्विकारली व घोर तपश्चर्या केली, की अंगावर वेलींचे जाळे पसरले, वारुळ वाढले तरी हा विचलीत झाला नाही. शेवटी जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा राजा झालेला भरत त्याला वंदन करण्यास येतो. या कथेवर आधारलेल्या त्याच्या प्रतिमा लेण्यातून सर्वत्र आढळतात. गोमटेश्वराच्या शिल्पात त्याच्या पायाशी साप, विंचू, उंदीर कोरलेले आढळतात; घोर तपश्चर्या करत असल्यामुळे अंगावर चढलेल्या (वेटोळे घातलेल्या) वेली व हे प्राणी त्यांच्या खिजगणतीतही नाहीत हे यातून दर्शवतात.
पश्चिम महाराष्ट्रात जैन धर्मियांनी बौध्द व हिंदू धर्मियांचे अनुकरण करुन ८ ते १२ व्या शतकात लेणी खोदली. त्यातील प्रमुख लेणी म्हणजे नाशिकजवळची चांभारलेणी, वेरुळची ३० ते ३४ आणि जुन्नर जवळील आंम्बिका लेणी होत ही सर्व लेणी हिंदू (ब्राम्हणी) लेण्यांनंतर इ.सनाच्या नवव्या दहाव्या शतकात जैनांनी खोदली. महाराष्ट्रात जुन्नर, वेरुळ, धाराशिव, अंकाईटंकाई, चांभारलेणी, अंजनेरी, त्रिंगलवाडी, मांगीतुंगी, चांदवड, पाटणदेवी (चाळीसगाव) धाराशिव (उस्मानाबाद) आंबेजोगाई, धुळे, जुन्नर येथे जैन लेणी आहेत.