"लक्षवेधी सुधागड"
ट्रेक क्षितीज संस्थेचा सुधागड हा असा ट्रेक आहे जो नेहमीच आपल्या सर्वाना नव-नवीन उपक्रम हाती घ्यायला प्रोत्साहीत करतो. आपल्या चिकित्सक-तेमध्ये आणि आठवणी मध्ये भर घालणारा तसाच अजून एक "सुधागड अॅक्टिविटी ट्रेक " झाला तो दिनांक ९-१० मार्च २०१३ रोजी. नेहमी प्रमाणे रात्री १०.३०-११ वाजता गोदरेजच्या इथे ट्रेक लीडर नंदू देवधर, चैतन्य सबनीस, अमित बोरोले, सीमा बोरोले, उमेश करवल, पल्लवी भारंबे, मयुरी जोशी, राकेश जठार, पियुष बोरोले, कृपाल शवे, विद्या पवार, पूजा मयेकर असे आम्ही १३ जण भेटलो आणि तिथून आमचा प्रवास सुरु झाला तो सुधागडच्या दिशेने .
९ मार्च २०१३- पहिला दिवस दिवसाची सुरुवात झाली ती स्फूर्तीने भरलेल्या अशा शिव-घोषणेने आणि आम्ही १३ जण ३ वेगवेगळ्या टीम मध्ये विभागले गेलो. पहिली टीम- पूर्व बुरुज route marking दुसरी टीम- महादरवाजा मातीकाम तिसरी टीम- Plantation
भव्य आणि दिव्य असा "पूर्व बुरूज". ढोर वाटेच्या मदतीने आम्ही पूर्व बुरुजा-पर्यंत पोचलो. बुरुजावर उतरण्यासाठी बऱ्यापैकी सुस्तिथित असलेल्या पायऱ्या आहेत पण त्यावर वाढलेल्या निवडुंग आणि बाभळीच्या झाडांच्या साम्राज्यामुळे बुरुजावर उतरणे जमले नाही. पूर्व बुरूजावरून दिसणारी 'धोंडसेची' वाट ,डाव्या बाजूला दिसणारा तैलबैला आणि घनगड हे दृश्य डोळ्यात सामावून घेण्यासारखे आहे. बांधकामाची विशेषता आणि सध्या त्याकडे झालेले दुर्लक्ष लक्षात घेऊन त्याच्या संवर्धना-विषयीच्या काही कल्पना ट्रेक लीडर नंदू देवधर आणि अमित बोरोले ह्यांनी व्यक्त केल्या. ह्या संवर्धना-विषयीच्या कल्पना भविष्यात आमलात आणण्यासाठीचे क्षितीज संस्थेचे हे प्रयत्न येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच लाभदायक असतील अशी आशा आहे. सध्या आपल्या सारख्या अनेक ट्रेकर्सना पूर्व बुरुजाचे हे विशेषपण अनुभवता यावे म्हणून आपल्या ह्या टीमने येथे temporary route marking देखील केले आहे.
पुढचा प्रवास पूर्व बुरुज ते महादरवाजा. पूर्व बुरुजावरून महादरवाजा कडे जाण्यासाठी वापरातली/मळलेली अशी वाट नाहीये पण आपली ही टीम पूर्व बुरुजावरून निघाली ती महादरवाजाकडे जाणारी वाट शोधत. ढोर वाट पकडून, काही वाटा चाचपडत, काट्या-कुट्यातून, कच्ची करवंद खात, काही ठिकाणी पुढे वाट संपते की तिला अजून फाटे फुटतात हे न्याहाळून अखेरीस दृष्टीस पडला तो "अभेद्य महादरवाजा". ह्या मध्ये महत्वाचा ठरला ट्रेक लीडरच्या आधीच्या सुधागड एक्सप्लोरेशनचा अनुभव.
महादरवाजा मातीकाम. मातीकामासाठी हातभार लागला तो ठाकूरवाडी मधील मामा आणि त्यांचा मुलगा, तसेच पाच्छापूर माध्यमिक शाळेचे मुख्याधापक माळी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा (श्रीधर,भगवान,धर्मा, मोहन, रोहन).ह्या सगळ्यांच्या मदतीने आपल्या टीमने उन्हं डोक्यावर असताना पण अतिशय उत्साहाने आणि प्रत्येक वेळेला तेवढ्याच ताकदीने घमेली उचलून ,महादरवाजा मध्ये साचलेली माती आणि तेथील दगड वाटेतून बाजूला काढण्याचा उपक्रम/प्रयत्न बऱ्याच प्रमाणात यशस्वी पार पाडला. ह्या सगळ्यात बच्चू काकांचे मोलाचे सहकार्य देखील लाभले. मातीकाम करताना त्या मुलांच्या शाळेच्या गोष्टी , २-३ मुलींना फेकताना चुकून लागलेली घमेली , दगडांना दिलेल्या गुलाबजाम, रसमलाई, सामोसा च्या उपमा ह्यात सगळ्यांचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला होता आणि मग सांज प्रकाशाने सुर्य मावळतीची जाणीव होऊन मातीकाम तिथेच थांबवावे लागले.
Plantation सुधागड वरील आपली सर्वात महत्त्वाची अॅक्टिविटी म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा i.e plantation. ह्या वेळी टीमने भोराई पठारावर लावलेल्या झाडांची कुंपण तपासून त्यांची डागडुजी केली. नंतर ह्या झाडांची मोजणी करण्यात आली ज्याची संख्या आता सुमारे ४२ वर पोचली आहे. १० मार्च २०१३- दुसरा दिवस १० मार्च २०१३, रविवार ,महाशिवरात्र...सूर्योदय झाला तो आपल्या झोळीत एक अविस्मरणीय क्षण जपून ठेवण्यासाठी. आजतागायत या गडाशी सबंधित असलेला,पण कुठेही न उलेखीत केलेल्या "चुन्याच्या घाण्याचे चाक" आपल्याला सापडले. अचानक समोर आलेला इतिहासाचा साक्षीदार असलेला हा नजराणा पाहून आम्ही सगळेच अचंबित झालो.
आता मनसोक्त भेटणार होतो ते स्वराज्याच्या राजधानीच्या निवडीसाठी नियुक्त केलेल्या सरस गडांपैकी एक असलेल्या आपल्या ह्याच सुधागड'ला . ते "टकमक टोक" जिथे उभ राहिल्यावर तिथून शिक्षा झालेल्यांच्या थरथरत्या पायांची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही, तो "चोर दरवाजा" जिथून मराठ्यांनी शत्रूला चकवा दिलेल्या क्षणांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही, तो "पंत सचिवांचा वाडा" जिथे कोणावर अन्याय होऊ न देता अचूक न्यायनिवाडे केले गेले असतील, आणि ते "भोराईचे मंदिर" जिथे मराठे नतमस्तक होत आणि आता आपल्या नकळत आपणही ज्याच्या समोर नतमस्तक होतो....म्हणून असा हा आपला सुधागड सर्वांचे लक्ष वेधून नेहमीच सर्वांच्या स्मृतीत घर करून बसणारा असा गड आहे.
|