छोटा चांदवा
मध्यंतरी साताराजवळील अजिंक्यताराला गेलो होतो. यापूर्वीही सातारला ट्रेक आणि फिरणे ह्या माध्यमांतून जाण्याचा योग आला होता. सातारा परिसर हा जैवविविधतेने नटलेला स्वर्ग आहे, हे मात्र खरे.
अजिंक्यताराला फिरताना एका फुलपाखराने लक्ष वेधून घेतले आणि मग त्याचे जास्तीत जास्त छायाचित्र काढण्याचा प्रयत्न सुरु झाला.
Danaid Eggfly मराठीत छोटा चांदवा विपुल प्रमाणात आढळणारे फुलपाखरू आहे. नर आणि मादी पूर्णपणे दिसायाला वेगळे असतात. नर काळ्या रंगाचा असून मागील पंखावर एक आणि पुढील पंखावर दोन असे एकून तीन पांढरे मोठे ठिपके असतात. नराने पंख पूर्णपणे उघडल्यास सहा पांढर्या ठिपक्यांचे सुंदर दृश्य बघायला मिळते. ह्या पांढर्या मोठ्या ठिपक्यांची संख्या ४-८ पर्यंत असू शकते. नराच्या पंखांना पांढर्या-काळ्या रंगाची सुरेख झालर असते. मादीचा रंग साधारण फिका तपकिरी असतो. पंखांची बाहेरील बाजू काळसर-निळ्या रंगाची असून त्यावर छोट्या-छोट्या पांढर्या रंगांच्या ठिपक्यांची शृंखला बघायला मिळते.
छोटा चांदवा हे भारतात आणि आशिया खंडात सर्वत्र आढळणारे फुलपाखरू आहे. विविध रूपांत (जसे नर आणि मादी वेगळ्या रंगांचे असतात) आणि रंगात आढळणारे म्हणून हे फुलपाखरू सर्वज्ञात आहे. त्याच्या पंखांचा विस्तार साधारण ७ ते ८ से.मी. इतका असतो. घाणेरीची फुले ह्याला आवडत असल्याने ह्याचा वावर त्यांच्या नजीक आढळतो. घोळू वनस्पतीच्या पानांवर हे फुलपाखरू आपली उपजीविका करते.
Scientific Name : Hypolimnas misippus Linnaeus (nymphalid family).
संदर्भ : www.google.com आणि महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे)
Photos By : १. W. A. Djatmiko (छोटा चांदवा : नर), २. Ajith U (छोटा चांदवा : मादी) ३. Amol Nerlekar (छोटा चांदवा : नर).
- अमोल नेरलेकर, १५. १०. २०१४
|