गावाचे नाव :- नारायणपूर जिल्हा:- पुणे जवळचे मोठे गाव :- नारायणपूर , सासवड
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात चालुक्य कालिन प्राचीन नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे. कापूरहोळ - सासवड रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून आपला मंदिराच्या परीसरात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला रामेश्वराचे छोटे देऊळ आहे. या देवळाबाहेर ४ फूट उंचीची हनुमानाची मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाने पायाखाली अवकळेला दाबून ठेवल्याचे दाखवण्यात आलेले आहे.
नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी भंगलेली नंदीची मुर्ती ठेवलेली आहे. या सभामंडपाच्या उजव्या बाजूला स्टेडीयम मधे असते तशी पायर्या पायर्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या मंदिराच्या भरभराटीच्या काळात या सभामंडपात होणारे कार्यक्रम प्रेक्षकांना समोरून व बाजूने पाहांयासाठी ही व्यवस्था केली असावी. पायर्यांच्या डाव्या बाजूला खालील बाजूस गध्देगाळ बसबलेला आहे. मंदिराचे छ्त कोसळल्यावर त्यातील दगड आजूबाजूच्या बांधकामात वापरलेले आढळतात. नारायणेश्वर मंदिराचा कळस काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे. या कळसाच्या जागी सिमेंटचा (अतिशय भयानक) मंदिराच्या रचनेला न शोभणारा कळस बांधलेला आहे.
मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे. दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी दिसतो. मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे. सभामंडपात ३ एक अक्षरी शिलालेख आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस खांबावर "चांगा वटेश्वर" व त्याच्या पुढे शेवटच्या खांबावर "चांगा वटेश्वराचा श्रीधरयोगी" असे शिलालेख कोरलेले आहेत. सभामंडपाला असलेल्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराच्या डावीकडील बाजूवर "अंचालध्वज" कोरलेले आहे.सभामंडपाच्या दक्षिणेकडील भिंतीवर २ गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे. चांगदेव व त्यांच्या शिष्यांनी या मंदिरात तपश्चर्या केली होती.
मंदिरातील गाभार्याच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या आहेत.हे दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या असल्या तरी त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा बाहेर आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो "राक्षस" गण असून दुसरा "देव" गण आहे. गाभार्याच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
गाभार्यात उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार खड्डा दिसतो. त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणतात. यातील सर्वात मोठी पिंड विष्णुची (नारायणेश्वराची) असून ती बाराही महीने पाण्यात असते. पुरंदर किल्ल्यावर उगम पावणार्या केदारगंगेचे पाणी येथून वाहाते अशी श्रध्दा आहे. गाभार्याच्या उजव्या कोपर्यातील भिंतीत एक दगडी पात्र बसवलेले आहे. पावसाळ्याचे ४ महीने छतावर पडणारे पाणी यात जमा होते. वर्षाचे बाकीचे महीने मंदिरा मागिल बांधीव कुंडातून पाणी आणून मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या कोनाड्यात ओततात तेथून ते दगडी पात्रात येते व तेच पाणी अभिषेकासाठी वापरतात. अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना या मंदिरात पाहायला मिळते. मंदिराच्या गाभार्यात पार्वतीची भग्न मुर्ती आहे.
गाभारार्यातील नारायणेश्वराचे दर्शन घेऊन सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराने बाहेर पडावे. या दरवाजाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षी आहे. या व्दारासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) पुरंदर व वज्रगड किल्ला. २) मल्हारगड (सोनोरीचा किल्ला), सासवड मार्गे २० किमी अंतरावर आहे. ३) नारायणपूरचे बालाजी मंदिर १५ किमी अंतरावर आहे.
जाण्यासाठी :- पुण्याहून ३० किमी अंतरावर सासवड गाव आहे. सासवड ते नारायणपूर अंतर १२ किमी आहे. नारायणपूर हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आणि एकमुखी दत्ताच्या देवळा यामुळे प्रसिध्द आहे. नारायणपूर गावातच एकमुखी दत्त मंदिराच्या बाजूला रस्त्यालगतच नारायणेश्वराचे मंदिर आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे.
पुणे - बंगलोर हायवेने (४६ किमी वरील) कापुरहोळ गावापर्यंत यावे. येथे हायवे सोडून कापूरहोळ - सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर (३.५ किमीवर) बालाजीचे प्रसिध्द मंदिर आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.
सूचना :- १) खाजगी वाहानाने पुण्याहून पुरंदर किल्ला व लेणी आणि नारायणेश्वराचे मंदिर ही ठिकाणे एका दिवसात पाहून होतात. २) पुरंदर, वज्रगड आणि मल्हारगड किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Narayaneshwar Mandir :- Village :- Narayanpur, Dist :- Pune, Nearest city :- Narayanpur, Saswad
|