गणपती गडद (पळु सोनावळे लेणी)
प्राचीन काळी कल्याण - मुरबाड - वैशाखरे - नाणेघाट असा व्यापारी मार्ग होता. छोट्या गलबतातून कल्याण बंदरात उतरणारा माल या व्यापारी मार्गाने घाटावरील बाजारपेठात जात असे. या व्यापारी मार्गावर माळशेजच्या डोंगररांगेत पळु सोनावळे गावाजवळील डोंगरात हिंदु लेणी कोरलेली आहेत.या लेण्यांच्या संकुलात १२ लेणी आहेत. यातील मुख्य लेण दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे.
मुख्य लेण्याचा सभामंडप २१ मीटर x १० मीटर असुन तो दोन कोरीव खांबांवर उभा आहे. खांबांवर छताचा भार तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. याशिवाय किर्तीमुख, सुरसुंदरी आणि काही अस्पष्ट मुर्ती आणि नक्षी खांबावर कोरलेली आहे. गाभार्याच्या दोन बाजुला १० मीटर x ७ मीटर दोन खोल्या (कक्ष) असुन त्या रिकाम्या आहेत. गाभार्यात हल्लीच्या काळात बसवलेल्या मुर्ती आहेत. गाभार्याच्या मागील भिंतीत एक खिडकी कोरलेली असुन आत एक दालन कोरलेले आहे, त्याच प्रयोजन मात्र कळत नाही.
लेण्यांच्या परीसरात पाण्याची ३ टाकी आहेत. त्यातील एका टाक्याच्या वरच्या बाजुस कातळात खाचा बनवलेल्या आहेत. टाक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होउ नये म्हणुन या खाचांमधे लाकडी पट्ट्या आडव्या टाकुन त्यावर आच्छादन केले जात असे. पावसाळ्यात मुख्य गुहे समोरुन एक धबधबा पडतो. त्यात १८० फुटाचे रॅपलींग केले जाते.
पायथ्याच्या पळु गावाबद्दल एक दंतकथा आहे. या गावात मोरे आडनावाची माणस मोठ्या प्रमाणात राहातात. हे सर्व जावळीच्या चंद्रराव मोर्यांचे वंशज आहेत. शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव केला. त्यावेळी तिथुन पळुन आलेले मोर्यांचे लोक त्याकाळच्या मुघल साम्राज्यातील सोनावळे गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावाला पळु सोनावळे (पळुन आलेल्या मोर्यांमुळे "पळु") असे नाव पडले.
जाण्यासाठी :- १) कल्याण - माळशेज मार्गावर (४७ किमी) उमरोली गावाच्या पुढे फाटा आहे. या फाट्यावरुन उजव्या बाजुचा रस्ता धसई मार्गे (१० किमी) सोनावळे गावात जातो. २) कल्याण - माळशेज मार्गावर (५० किमी) टोकावडे गावाच्या पुढे फाटा आहे. या फाट्यावरुन उजव्या बाजुचा रस्ता वडगाव मार्गे (१० किमी) सोनावळे गावात जातो. सोनावळे गावामागील डोंगरात गणपती गडद लेणी आहेत. गावातुन लेण्यांपर्यंत पोचायला दिड ते दोन तास लागतात. शेवटच्या टप्प्यात अर्ध्या तासाचा खडा चढ चढावा लागतो. येथील टाक्यात पावसाळ्या नंतर पाणी नसते.
आजुबाजुची पाहाण्याची ठिकाणे :- नाणेघाट, माळशेज घाट, अहुपे घाट , भैरवगड (मोरोशी).
Palu Sonawale Caves, Ganpati Gadad, Ganesh Gadad Caves in Maharashtra, Fasinating spots near Malshej Water fall rapling near Malshej, ganpati gadad water fall rapling Mansoon Treking, Naneghat
|