आजही लेणी कोरलेल्या डोंगराच्या जवळून जाताना पिंपळाच्या पानांच्या आकाराची भव्य व डौलदार कमान प्रथम आपले लक्ष वेधून घेते. ती असते चैत्य गृहाची दर्शनी कमान. बौध्द लेण्यांमध्ये दोन प्रकार दिसून येतात १) पिंपळपानासारखी कमान व आतंमध्ये स्तूप असलेली चैत्यलेणी व २) विहार. चैत्यलेण्यांचा उपयोग सांघिक प्रार्थनेसाठी व स्तुपच्या पूजेसाठी होत असे. चिता किंवा चित्ती या संस्कृत शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे. वैदिक युगात सत्पुरुषाचे दहन केल्यावर त्याची रक्षा, अस्थी इत्यादी अवशेष पुरुन त्यावर वेदी किंवा चबुतरा बांधत असत. या प्रकारालाच चैत्य असे नाव होते. ही प्रथा पुढील काळात जैन व बौध्द यांनीही स्वीकारली. बौध्द धर्मात चैत्याला अनन्य साधारण महत्व आहे. बौध्द व त्यांचे अनुयायी यांची रक्षा, अस्थी, वापरातील वस्तू यांच्यावर स्तुप उभारले जात असत. हे स्तूप ज्या दालनात असतात त्यांना चैत्यगृह म्हणतात.
प्राचीन काळी बुध्दाचे स्मारक म्हणून असे बरेच स्तूप उभारले गेले. त्यांचा आकार दंडगोलावर अर्धगोल ठेवल्या प्रमाणे किंवा अर्धगोलाकार होता. हे स्तूप दगड, मातीचे बनविलेले असत, तर चैत्यगृहे लाकडी असत. चैत्यगृहाचा आकार आयताकृती असे, त्याच्या दरवाजाच्या विरुध्द टोकाला स्तूप असे. छताचा आकार अर्धगोलाकार असे लाकूड वापरुन स्तूपाचे छत बनविलेले असे. रचनेला गजपृष्ठाकार रचना म्हणतात. महाराष्ट्रात सुरुवातीची लेणी खोदतांना हिनयान पंथीयांनी हिच रचना चैत्यगृहांसाठी जशीच्या तशी वापरलेली दिसते. यात भव्य प्रवेशद्वार त्यावरील पिंपळ पानाच्या आकाराची कमान, कमानीला शोभा आणणारी तोरणे, प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या दर्शनी भागात कोरुन काढलेल्या पाहायला मिळतात. चैत्यगृहाच्या आत दोनही बाजूला भिंत व कलते स्तंभ असतात. त्यामधील जागा कोरुन ‘‘प्रदक्षिणा पथ’’ बनविलेला असतो. तर स्तंभाच्या मधील मोकळी जागा म्हणजे ‘‘पूजा मंडप’’ कोरलेला असतो. या दालनाचे छत अर्धगोलाकार कोरलेले असते. त्यावर लाकडी फासळ्या किंवा त्यांच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा पाहायला मिळतात. या दालनाच्या एका टोकाला स्तूप कोरलेला असतो. स्तूपाच्या सर्वात वरच्या भागात ‘‘छत्रावली’’ कोरलेली असते. ही छत्रावली ज्या दांड्यावर उभी असते त्यास ‘‘यष्टी’’ म्हणतात. यष्टीच्या खाली चौकोनी ‘‘हर्मिका’’ कोरलेली असते हर्मिके खालील अर्धगोलाकार भागास ‘‘अंड’’ म्हणतात. त्याखालील दंडगोलाचे दोन भाग वेदिका व मेधी असतात. या स्तूपाच्या मागील बाजूसही प्रदक्षिणा मार्ग कोरलेला असतो. अशा प्रकारची चैत्यगृह व स्तूपाची आदर्श रचना कार्ले व भाजे येथील लेण्यात पाहायला मिळते. महायान बौध्दांच्या काळात मुर्ती पूजेला महत्त्व आल्यावर स्तुपांवर बुध्द प्रतिमा कोरण्यात आल्या, अजिंठा, वेरुळ व औरंगाबाद येथील चैत्यगृहात असे स्तूप पाहायला मिळतात.
|