Print Page | Close Window

तलवार

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Ancient and Medieval Weapons
Forum Description: In this forum information about Ancient and Medieval Weapons will be uploaded.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=21
Printed Date: 05 Nov 2024 at 3:22pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: तलवार
Posted By: amitsamant
Subject: तलवार
Date Posted: 16 Jun 2012 at 2:28pm

Swordमुघल तलवार

तलवार हे सर्व शस्त्रांत खुप जुने व लोकप्रिय शस्त्र आहे अगदी पुराण काळातही हिंदू देवतांनी तलवार ‘‘शस्त्र’’ म्हणून धारण केली आहे. देववाणी संस्कृतमध्ये तलवारीस खडग, तीक्ष्णवर्म, विषसन, श्रीगर्भ अशी अनेक संबोधने आहेत. इ.स.पूर्व ६०० पासून ते १९ व्या शतकापर्यंत जगातील विविध भागात तलवारीचा प्रसार झाल्यामुळे, तीला वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते...... उदा. उर्दूत :-  समशेर, पंजाबीत:-  तेगा, कानडीत:-  कत्ती, नेपाळीत:-  दाओ कारा, इंग्रजीत:-  स्वॉर्ड

      तलवार हे शौर्याचे प्रतिक समजले जात असे. १०० शत्रुंना तलवारीने पाणी पाजणार्‍या मावळ्यास तलवारीवर एक मानाचा ठोका मारून दिला जात असे. लग्नाची सोयरिक जमवताना, ‘‘तुम्ही किती ‘ठोक्याचे’ मानकरी ?’’ असा प्रश्न पाहुण्यांना विचारला जात असे.

तलवार हाताळण्यावरुन समाजात अनेक संकेत रुढ झाले. तलवार उगारणे म्हणजे आक्रमण, समोर धरणे म्हणजे आव्हान, तलवार तिरकी जमिनीकडे धरणे म्हणजे मानवंदना आणि खाली टोक करुन उभे रहाणे म्हणजे शरणागती. तलवारीचा वापर हा जनांमध्ये एवढा रूळला की मराठे, क्षत्रिय हे खंडेनवमी वा विजया दशमीच्या निमित्ताने तलवारीची पुजा करू लागले. तलवारीने त्यावेळी मानवी जीवनात एवढे महत्त्वाचे स्थान पटकावले होते की, तिच्यावरुन बोली भाषेत धारेवर धरणे, धारेवर चालणे इ. सारखे अनेक वाक्‌प्रचार तयार झाले. शौर्याचे प्रतिक असलेली तलवार अनेक देशांच्या झेंड्यांवर आजही विराजमान झालेली दिसते.

      तलवारीच्या विकासाबरोबर तलवारीमध्ये वैविध्य यायला लागले; इतके की आजमितीस तलवारीचे; मुठीपासून पात्याच्या टोकापर्यंत; एकूण २२ भाग आपण वेगवेगळे दाखवू शकतो. परंतु तलवारीचे मुख्य भाग दोनच, मुठ व पाते. तलवारीचे निव्वळ मुठीवरुनच ४० प्रकार संभवतात. तलवारीच्या मुठीचे तीन मुख्य भाग पडतात. गज, संरक्षक पोलादाचा पत्रा व  चकती. तलवारीच्या मुठी बनविण्यासाठी पितळ, तांबे, हस्तीदंत, सांबरशिंग, उच्च दर्जाची काच यांचा वापर करत, तर मुठीवरील नक्षी कामासाठी सोने, चांदी, हिरे, माणके, पाचू यांचा वापर केला जात असे. तलवारीच्या पात्यासाठी वापरल्या जाणार्‍या पोलादात; परदेशात सालेमन, टोलेडो, दमास्कस हे पोलादाचे प्रकार तर भारतातील पोलादात चंद्रवट, हत्तीपगी, फार्शी येथील पोलाद उत्तम समजले जात असे. धातूकामातील प्रगती बरोबर कार्बन, क्रोमियम, झिंक, निकेल, अल्युमिनीयम, मॉलीब्डेनम, तांबे, चांदी; इ मिश्र धातूंच्या बनविलेल्या तलवारी उपलब्ध होऊ लागल्या. तलवारीच्या पात्यांमध्येही एकधारी, दुधारी व बिनधारी (पण टोकदार) अशी विविधता आढळते.


 Sword

      अशा उच्च दर्जाच्या तलवारीस आवरण म्हणून उंबर व पांगिराच्या लाकडापासून बनविलेले म्यान तयार केले जाऊ लागले. या म्यानासाठी सोन्याचांदीचे जरीकाम केलेल्या मलमलीच्या कापडाचे, रेशीम वा चामड्याचे आवरण चढविले जात असे. तलवार अडकवण्यासाठी म्यानाच्या वरच्या बाजूस असलेल्या धातूच्या पट्टीस ‘‘मेहनाल’’ तर खालच्या बाजूस असलेल्या धातूच्या टोपणास ‘‘तेनाल’’ असे म्हणतात.

Sword handle (Grip)

      जगभर आढळणार्‍या तलवारीत इंग्लिश, युरोपियन, फार्शी, भारतीय, जपानी हे मुख्य प्रकार तर एकूण ६५ उपप्रकार आहेत. भारतीय तलवारीचे कर्नाटकी धोप, पट्टा, गुर्ज, मराठा, राजस्थानी, तेगा, समशेर (मुघल), नायर हे मुख्य उपप्रकार आहेत.


Sword handle (Grip)Sword handle (Grip)    

हातघाईच्या लढाईत तलवारीचा वापर असल्यामुळे सहाजिकच तलवारीच्या पावित्र्यात चपळता, पदलालित्य असणे महत्वाचे असते. तलवारबाजीत आतापर्यंत ५२ पवित्रे ज्ञात आहेत. त्यापैकी हनुमंती, नारसिंही व सुररवी हे पवित्रे हिंदु सैनिकांचे; तर अलिमद्‌द सारखे मुस्लिम सैनिकांचे पवित्रे प्रसिद्ध होते. 





Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk