ब्रम्हेश्वर मंदिर व इंद्रेश्वर मंदिर गावाचे नाव :- इंदुरी जिल्हा :- पुणे जवळचे मोठे गाव :- तळेगाव, चाकण, पुणे
तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले.
ब्रम्हेश्वर मंदिर
इंदुरी किल्ल्याच्या बाजूला इंद्रायणी नदीच्या काठी पुरातन ब्रम्हेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे, तर खालच्या बाजूला कोरलेले आहे. मंदिरा बाहेर जूना दगडात कोरलेला नंदी व दोन पिंडी आहेत.
इंद्रेश्वर मंदिर
इंदुरी गावात तळेगाव चाकण रस्त्याला लागून तलावाकाठी पुरातन इंद्रेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. मंदिरा बाहेर दगडात कोरलेला जूना नंदी व गणपती आहेत.
ऋषींच्या शापाने अंगावर आलेले कोड घालवण्यासाठी इंद्राने येथे तपश्चर्या करून येथील तलावात आंघोळ केल्यावर त्याच्या अंगावरचे कोड निघून गेले अशी या मंदिरा बद्दल दंतकथा आहे. या मंदिरासमोरील तलाव आता पाण वनस्पतींनी भरल्यामुळे दिसेनासा झालाय. जर हा तलाव साफ करून सुशोभित केला, तर या परीसराची शोभा वाढू शकते.
जाण्यासाठी :- मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो. किल्ल्या समोर उभे राहील्यावर डावीकडे एक रस्ता खाली उतरतो, त्या रस्त्यावर किल्ल्यापासून २ मिनिटाच्या चालीवर ब्रम्हेश्वर मंदिर आहे. इंद्रेश्वर मंदिर इंदुरी गावात आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) इंदुरीचा किल्ला २) इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत. ३) राजवाडा व बनेश्वर मंदिर , तळेगाव ४) चाकणचा किल्ला इंदुरीचा किल्ला व चाकणचा किल्ला यांची माहीती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Bramheshwar & Indreshwar Mandir , Village :- Induri, Dist :- Pune, Nearest city :- Talegaon, Chakan.
|