डोंगरांनी मला काय दिले ....
निसर्गात
स्वच्छंदी भटकायचा आनंद, साहसाची अनुभूती, इतिहासाचे भान, काहीतरी
जगावेगळे करयाचा आनंद हे सारे तर दिलेच पण त्यापेक्षादेखील एक अनोखा आनंद
दिला तो म्हणजे पाच्छापुरातील वाचनालयाने ....
दिनांक २६ नोव्हेंबर २००५
भर दुपारची वेळ.. २५- ३० गावकरी आमची वाट पाहत आहेत..
१०० - १५० विद्यार्थीदेखील होते...
खरे तर आम्हाला उशीरच झाला होता...
आम्ही फार मोठे काही करत नव्हतो...
जे आम्हाला हे सुचले होते ते करण्याचा प्रयत्न होता तो..
पण त्यांच्या दृष्टीने खूप काही तरी होते..
आम्ही पोचणार होतो सकाळी १० वाजता. पण दिवा - सावंतवाडी रेल्वेला अपघात
झाला आणि आमची वरात आमच्या एष्टीने १ वाजता पाच्छापुरात पोहचली ....
असे काय होते आमच्याकडे..
ज्यासाठी सारी मंडळी वाट पाहत होती..
आम्ही सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूरच्या शाळेत एक छोटेसे वाचनालय सुरु करणार होतो..
http://4.bp.blogspot.com/-bTzOHD1tuL0/UDAOhGq2zpI/AAAAAAAAJFU/1u2z1-uqFh8/s1600/photo34.jpg" rel="nofollow"> अमुक
एवढी पुस्तके वैगरे काही अंदाज नव्हता. एक कल्पना सुचली होती आणि त्याच्या
अनुषंगाने काम सुरु केले होते. क्षितिज ग्रुपच्या माध्यमातून सुधागडावर
काम करताना जाणवले होते कि गावात देखील काहीतरी केले पाहिजे. इतिहास,
गडावरील वास्तू हे सारे तर महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर पायथ्याच्या
गावातील गिरीजन देखील तितकेच महत्वाचे आहेत. गावात दोन शाळा आहेत. एक
प्राथमिक आणि एक माध्यमिक. माध्यमिक शाळा नुकतीच सुरु झालेली आणि
विनाअनुदानित. आपण आजवर ढिगाने पुस्तके वाचली, इतिहासाची, निसर्गाची, ललित,
विज्ञान, वैचारिक इ. आपली ऐपत होतीच पण त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे
आपल्याला हाताशी अनेक वाचनालयेदेखील होती. मग असेच एक वाचनालय सुरु केले
तर. पाली येथील महाविद्यालयातील उपप्राचार्य सुधीर पुराणिक यांच्याशी बोलता
बोलता योजना नक्की झाली आणि पाहता पाहता वाचनालयाची संकल्पना अस्तिवात आली
होती. एक दोन आठवड्यात आम्ही सर्वांनी मिळून चार साडेचारशे पुस्तके जमा
केली होती. प्रसाद निकतेच्या पुढाकाराने क्षितीज ग्रुपने सुधागडवर अनेक
उपक्रम सुरु केलेच होते त्यात आता आणखीन एका नव्या उपक्रमाची भर पडणार
होती.
हे सारे आठवले ते परवाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी. १५ ऑगस्ट २०१२.
तब्बल ७ वर्षे झाली होती त्या घटनेला. मध्यंतरी दोन तीन वेळा शाळेत गेलो
होतो. वाचनालयाची यादी, नवीन पुस्तके वैगरे, पण नवीन काहीच झाले नव्हते
माझ्याकडून. तसेही अनेक व्यवधाने मागे लावून घेतल्यामुळे याकडे पाहणे
झालेच नव्हते. त्यामुळे ठरवून परवा गेलो.
अगदी छोट्या स्वरुपात सुरु केलेल्या कामाचे आताचे स्वरूप पाहून खरेच मनापासून आनंद होत होता.
http://3.bp.blogspot.com/-99BPNweEkKo/UDAQYjCejyI/AAAAAAAAJFc/4IMHvBlHjYM/s1600/304795_394733070579759_1685033327_n.jpg" rel="nofollow">
पाच्छापुरातील अनेक गावकरी, माध्यमिक शाळेतील सारे विद्यार्थी एकत्र आले
होते. आदल्या दिवशी क्षितीजच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलांच्या स्पर्धा
घेतल्या होत्या. मुख्य म्हणजे वाचनालयासाठी भरपूर पुस्तके जमा झाली होती.
(नक्की संख्या राहुल सांगू शकेल) महत्वाचे म्हणजे हे काम पुढे चालू राहिले
होते. त्या दिवशी राहुल मेश्राम आणि नंदू देवधर सोडले क्षितीजचे इतर
सारेचजण माझ्यासाठी नवे होते. ही ब्लॉग पोस्ट लिहण्याचे सर्वात महत्वाचे
कारण हेच आहे.
संस्था का हवी? २००५ साली आम्ही सर्वांनी मिळून हे वाचनालय क्षितीज ग्रुप
आणि सेठ जे. एन. पालीवला कॉलेज एनएसएस युनिटच्या माध्यमातून सुरु केले. खरे
तर गेल्या ३-४ वर्षात सुरवातीस पुढाकार घेणा-या कोणाचेच याकडे लक्ष
नव्हते. तरीदेखील आज ७ वर्षानंतर त्यात अनेक नवीन पुस्तकांची भर पडत आहे.
इतकेच नाही तर त्या अनुषंगाने अनेक उपक्रम सुरु आहेत. आज तर ९वी -१० वीच्या
विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके देखील दिली जात आहेत.
तब्बल १५० हून अधिक. शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांची संख्या तर १०००
च्या आसपास पोहचली आहे. हे सारे कसे झाले तर त्याच कारण म्हणजे संस्था.
तुम्ही एखादा उपक्रम जेव्हा संस्थेसाठी करता तेव्हा ती संस्थेची जबाबदारी
बनते आणि आपोआपच संस्थेत येणारी पुढची पिढी तो पुढे नेते. नुसताच पुढे नेत
नाही तर त्यात आपल्या परीने नाविन्यपूर्ण अशी भर घालते. संस्थेच्या
कार्यास हातभार लावते. याचे पुरेपूर प्रत्यंतर मला परवाच्या दिवशी आले.
सुरवातीच्या काळातील आम्ही कार्यकर्ते गेली काही वर्षे यात सक्रीय नसलो तरी
संस्थेने आपला उपक्रम सोडला नाही. नेटाने प्रयत्न करत नवनवीन पुस्तके यात
येत आहेत. इतकेच नाही तर संस्थेमार्फत अनेक स्पर्धादेखील घेतल्या जात
आहेत.
परवाच्या दिवशी त्या सर्व शाळेतील मुलांच्या चेह-यावरील आनंद खूप काही
सांगून जात होता. सर्वाना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जात
होते. इयत्तावार प्रमाणपत्र वाटत असताना काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
मिळाले नव्हते. तेव्हा त्यांनी नंदूला विचारले. त्याने सांगितले कि पहिल्या
तीन क्रमांकाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र शेवटी वाटणार. त्यावेळी त्या
मुलांच्या चेह-यावरील आनंद वर्णन करण्यापलीकडचा होता. आपण बक्षीस फार काही
मोठे देणार नव्हतो. पण त्यांना खूप आनंद झाला होता. मी तो सारा आंनद त्या
मुलांमध्ये बसून अनुभवला. खूप बरे वाटले. एक छोटासा उपक्रम कसा वाढू शकतो
त्याचे हे उत्तम उदाहरण. मी क्षितीज ग्रुपचा सदस्य वैगरे म्हणून नाही सांगत
पण संस्था म्हणून एखादा उपक्रम कसा पुढे न्यावा त्याचे हे उत्तम उदाहरण
आहे.
दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे गावातील लोकांचा सहभाग. गेली काही वर्षे
दुर्गसंवर्धनाबद्दल बोलताना कायम या मुद्द्यावर भर देत आलोय. नेमका तोच
मुद्दा साध्य करण्यासाठी वाचनालयाची सुरवात झाली होती. आज गावातील अनेक
मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसत होती. त्यांना आपल्या संस्थेच्या
कामाबद्दल कुतुहूल आणि कृतज्ञता होती. ग्रामस्थ बच्चू कडू सात वर्षापूर्वी
वाचनालय सुरु करताना आपल्या बरोबर होता. आज आपले सर्व कार्यकर्ते त्याच्याच
घरी उतरले होते. चहा घेताना शाळेतील एक शिक्षक आपण देत असलेल्या
पुस्तकांबद्दल तसेच शालेय पुस्तकांबद्दल खूप आभार मानत होते. (त्यांचे
मते शालेय सेटसाठी किमान ६५० रुपये खर्च करावे लागतात) . हा सारा सकारात्मक
प्रतिसाद भविष्यात खूपच उपयोगी ठरणार आहे. ग्रामस्थांनी आपल्या कामाची
नोंद घेतली होती. अर्थात याचा उपयोग भविष्यात नक्की होऊ शकेल..
सुधागडवरील संवर्धनाच्या व पाच्छापुरातील वाचनालयाच्या कार्यरत असणा-या सर्व कार्य कर्त्यांचे अभिनंदन व आभार
..............................
जाता जाता वाचनालय सुरु करतानाच्या आठवणी:
http://3.bp.blogspot.com/-kuEvBlCowsw/UDAQpS4YHxI/AAAAAAAAJFk/3eqnuiwvXfw/s1600/photo41.jpg" rel="nofollow">
२००५ साली जेव्हा असे वाचनालय सुरु कार्याचे ठरवले तेव्हा नेमकी कोणती आणि
कशी पुस्तके घ्यावी याची माहिती नव्हती. तेव्हा अमेयने National बुक
ट्रस्टची माहिती काढली. तेथून एक मोठा बॉक्स भरून तब्बल दोनशे पुस्तके
आणली. (अर्थात ती घेताना मी आणि अमेय नेहमीप्रमाणे भरपूर भांडलो). पुराणिक
सरांबरोबर पुण्याला जाऊन अनमोल प्रकाशन आणि इतर दुकानातून पुस्तके गोळा
केली. हि सारी पुस्तके कॉलेजच्या नावाने घेतली कारण त्यांना सवलत मिळत असे.
पुराणिक सरांच्या भावाने देखील मदत केली होती. त्याचबरोबर अनेक जणांनी
यासाठी रोख तसेच पुस्तक स्वरुपात मदत केली. सुरवातीस घेतलेल्या सर्व
पुस्तकांची रजिस्टरमध्ये नोंद पाली कॉलेजच्या ग्रंथपालानी केली होती.
पाच्छापुरातील माध्यमिक शाळेतील खंडागळे गुरुजीनी सर्व पुस्तके ठेवण्यासाठी
कोठून तरी एक कपाट उपलब्ध केले होते. आज हे खंडागळे सर्व शिक्षा अभियानात
पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत, त्यामुळे परवा भेट नाही झाली. वाचनालय
सुरु करताना शाळेने आणि गावक-यांनी जंगी कार्यक्रम केला होता. चक्क मांडव
वैगरे घातला होता शाळेपुढे. आमचे अगदी हार तुरे घालून स्वागत झाले होते.
त्याच वेळी गावात एनएसएसचे शिबीर सुरु होते. ती मुले दुस-या दिवशी गडावर
कामाला देखील आली होती. महादरवाजाचे बरेच काम तेव्हा झाले होते. विशेष
म्हणजे तेव्हा अप्पा म्हणजेच धनंजय मदन देखील उपस्थित होते.
http://2.bp.blogspot.com/-Q2-bG7jZIEE/UDARIDGS5YI/AAAAAAAAJFs/t4_Qew8v6DY/s1600/photo35.jpg" rel="nofollow">
(पुण्याहून पुस्तके घेऊन येताना खंडाळा घाटात मस्त चांदणे होते, पुराणिक
सरांनी बाईकचा दिवा बंद केला आम्ही त्या नैसर्गिक प्रकाशात बराच घाट
उतरलो.)
डोंगरांनी मला काय दिले याची यादी करायची झाली तर हे वाचनालय हे सर्वोच्च ठिकाणी असेल.
|