Print Page | Close Window

भीमाशंकर

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Temples of Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Temples in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=193
Printed Date: 20 Nov 2024 at 8:39am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: भीमाशंकर
Posted By: amitsamant
Subject: भीमाशंकर
Date Posted: 15 Nov 2013 at 1:14pm
गावाचे नाव :- भीमाशंकर
जिल्हा:- पुणे
जवळचे मोठे गाव :- घोडेगाव

भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. हे सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर , दाट वनश्रीत वसलेले एक पवित्र, पूरातन देवस्थान आहे. भीमाशंकरचा आजुबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे.  महाराष्ट्र सरकारने हा भाग "भिमाशंकर अभयारण्य" म्हणुन घोषित केलेला आहे. या जंगलात राक्षसी खार / उड्णारी खार म्ह्णजेच शेकरु पाहायला मिळते. तसेच पावसाळ्यात येथील जंगलात अंधारात चमकणारी "ज्योतिवंती" ही वनस्पती पाहायला मिळते. झाडाच्या सालीवर जमा झालेल्या बुरशीमुळे ही वनस्पती अंधारात चमकते. सर्व डोंगरप्रेमींचा तसेच नविन भट्क्यांचा भीमाशंकर हा आवडता ट्रेक आहे. 

पूराणातील कथेनुसार त्रेतायुगात त्रिपुरासुराने भीमाशंकराच्या अरण्यात तपश्चर्या केली. त्यावर प्रस्न्न होऊन शंकराने त्याला वर दिला. या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी शंकराने पार्वतीची (कमलजा माता) मदत घेतली. शिव- पार्वतीने अर्धनारी नटेश्वराच्या (अर्धा पुरुष व अर्धी स्त्री) रुपात त्रिपुरासुराचा कार्तिकी पौर्णिमेला वध केला, तेव्हा पासून तिला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. 

भीमाशंकरचे मंदिर १२०० ते १४०० वर्षापूर्वीचे असून, त्याची बांधणी हेमाडपंथी पद्धतीचे आहे. मंदिराचा सभामंडप व शिखर १८ व्या शतकात नाना फडणवीसांनी बांधले. मंदिराचे मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिराच्या बाह्यभागात सिंहासनाधिष्ठीत देवता व त्यांवर छत्रचामर ढाळणारे त्यांचे सेवक यांच्या मूर्ती आढळून येतात. देवळा समोरच १७२९ सालातील धातूची एक प्रचंड घंटा लटकवलेली आहे. ही पोर्तुगिज बनावटीची घंटा, चिमाजी आप्पांनी वसई वरील विजया नंतर भिमाशंकर मंदिराला अर्पण केली.  मंदिराच्या आवारात ५ ते २० फूट उंचीची दीपमाळ आहे, या दीपमाळेवर एक शिलालेख आढळतो. भीमा नदीचा उगम याच भीमाशंकरच्या डोंगरावर आहे. 

आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 

१) नागफणीचे टोक :-
घाटाच्या रस्त्याने वर आल्यावर एक तळे लागते. या तळ्याच्या उजव्या बाजूने वर जाणारी वाट आपल्याला हनुमान मंदिराकडे घेऊन जाते. मंदिरावरून सरळ वर जाणार्‍या वाटेने आपण नागफणीच्या टोकापाशी येऊन पोहोचतो. येथून समोरच उभा असणारा पेठचा किल्ला, पदरचा किल्ला, पेब आणि माथेरानचे पठार दिसते. 

२) गुप्त भीमाशंकर :- 
राम मंदिराच्या डाव्या बाजूने एक पाण्याची वाट खाली उतरते. या वाटेने सरळ गेल्यास आपण घनदाट जंगलात प्रवेश करतो. पुढे २५ मिनिटानंतर एक मंदिर लागते. या मंदिरापासून डावी कडे उतरणारी वाट आपणांस पाण्यामुळे तयार झालेल्या पिंडी कडे घेऊन जाते. यालाच गुप्त भीमाशंकर असे म्हणतात. पावसाळ्यात येथे फार मोठा धबधबा तयार होतो. 
३) भीमा नदीचा उगम.
४) भिमाशंकरचे जंगल.
५) कमलजा मंदिर.

 जाण्यासाठी :- 
भीमाशंकरला जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे. पुणेकरांनी स्वारगेटवरून एसटी अथवा ट्रेनने कर्जत गाठावे. कर्जतहून खांडस या गावी यावे.खांडस ते कर्जत सुमारे १४ कि.मी चे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने जाण्याची सोय आहे. खांडस गावातून शिडी घाट , गुगळ घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते.
१) गणेश घाट :- 
खांडस गावातून दोन किमी अंतरावर एक पूल लागतो. या पुलापासून उजवीकडे जाणारी कच्च्या रस्त्याची वाट गणेश घाटाची आहे. ही वाट अत्यंत सोपी आहे. या वाटेने तासभराच्या अंतरावर एक गणेशाचे मंदिर लागते. या वाटेने वर जाण्यास ६ ते ७ तास लागतात. 

२) शिडी घाट :-   
पुलाच्या डावीकडे जाणारा रस्ता आपणास खांडस गावात घेऊन जातो. गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते.या वाटेने दीड तासांत ३ शिड्या लागतात. तिसर्‍या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडी मध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. येथे चहापाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यापाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते.
 
३) गुगळ घाट :- 
हि वाट धबधब्यातून जाणारी वाट आहे.पुढे ही वाट व गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. या वाटेने शिडी घाटा एवढाच वेळ लागतो.  ही वाट फारशी प्रचलित नसल्याने वाटाड्या बरोबर न्यावा लागतो.

४) अहुपे घाट :-
  कल्याण - मुरबाड मार्गे- देहरी - खोपवली या गावात पोहोचावे. हे अहुपे घाटाच्या पायथ्याचे गाव आहे. येथुन ३ ते ४ तासात घाट पार करुन आपण अहुपे गावात पोहोचतो.अहुपे गावाच्या मागे भट्टीचे रान आहे. या रानातून जाणारी वाट ८ कि.मी.वरील कोंढवळ गावापर्यंत जाते. येथुन बसने किंवा चालत ८ कि.मी.वरील भीमाशंकरला जाता येते. (अहुपे गाव - कोंढवळ - भीमाशंकर अंतर अंदाजे १६ कि.मी.) 

५)वाहनांची वाट :-  
 भीमाशंकरला जाण्यासाठी वर गावापर्यंत डांबरी सडक बांधलेली आहे. या साठी मुंबई अथवा पुणे येथुन, तळेगाव - चाकण - घोडेगाव मार्गे भीमाशंकरला (अंतर अंदाजे २६५ कि.मी.)  जाता येते. 

Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
Bhimashankar ( Jyotirlinga) :- Village :- Bhimashankar, Dist :- Pune, Nearest city :-  Ghodegaon




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk