महाराष्ट्रात इसवी सन पूर्वी दुसर्या शतकापासून लेणी खोदण्यास सुरुवात झाली. साधारण इसवी सनाच्या दुसर्या शतकापासून म्हणजेच महायन पंथाच्या काळापासून बुध्दाच्या मुर्ती बनविण्यास सुरुवात झाली. पुढील दिड हजार वर्षाच्या काळात जैन व हिंदुनी देखील अनेक मुर्ती घडविल्या. निसर्गाचे निरिक्षण, मानवी स्वभाव, वर्तन याचा अभ्यास करून मुर्तीकारांनी मुर्तीशास्त्राचा अभ्यास केला त्यातूनच उत्तरोत्तर ही मुर्तीकला विकसित होत गेली.
बौध्द, जैन व हिंदु लेण्यांमधील विविध शिल्पांमधून देव-देवता, स्त्री - पुरुष, पशु- पक्षी, पाने, फुले. फळे, सांकेतिक चिन्हे इत्यादी दिसून येतात. बुध्द, महावीर, शिव-पार्वती, विष्णू, दशावतार, गजलक्ष्मी, गणेश, कुबेर, यक्ष वगैरे देवता यातून चटकन ओळखता येतात. याच सोबत वृषभ, मकर, घोडा, हत्ती आणि गेंड्या सारख्या शक्तीसाली प्राण्यांच्या आकृतीही यातून दिसून येतात. बौध्द भिक्षूंनी शिल्पमाध्यमाचा उपयोग करून लेण्यांचे मुखदर्शन, स्तंभशिर्ष, चैत्य गवाक्षे उत्कृष्ट रीतीने सजवले. जैनांनी देखिल महावीरांचे मुर्ती रुपांतर करून त्या जास्तीत जास्त सजविल्या. मात्र हिंदु शिल्पकारांसमोर मोठा प्रश्न उभा राहीला. बुध्द व महावीर हे प्रत्यक्ष महापुरुष होऊन गेले. पण शिव-ब्रम्हा, विष्णू, गणेश, पार्वती , लक्ष्मी इत्यादी देवतांना मानवी देहात कसे प्रस्तुत करवे ? खरोखरच हे अत्यंत कठीण काम होते. निर्गुण ईश्वर तत्व सगुण रुपात व्यक्त कर्णे तितकेसे सोपे नव्हत. पण हिंदु लेण्यांम्धील विष्णू अवतार , नटराज शिव . अंधकासूर वध मुर्ती, उमा महेश्वर मुर्ती , रावणानुग्रह मुर्ती, मार्कंडेय अनुग्रह मुर्ती, लिंगोदभव मुर्ती. गोवर्धन्धारी श्रीकृष्ण अवतार, शेषशायी विष्णू, त्रिपुरांतक मुर्ती, वामन अवतार. याशिवाय विशेष उल्लेखनीय नटराज शिव आणि त्रिमुर्ती, गजलक्ष्मी आणि वराह अवतार यांचा समावेश होतो. माणसाच्या शरिराच्य हालचाली प्रमाणे लेण्यातील मुर्ती शिल्पांची मांडणी होऊ लागली. जैन शिल्पकारांनी तिर्थकारांची ओळख , लांछने, वाहने, यक्ष, यक्षी,श्रीवत्स यांच्या माध्यमातून केली. तर हिंदु शिल्पकारांनी देवांची आयुधे, उपकरणे, अलंकार यातून मुर्तीकला विकसित केली. याशिवाय अनेक लेण्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आढळते ती म्हणजे शिलालेख. या शिललेखांमध्ये लेण्यासाठी केलेल्या दानाचे, दान देणार्या व्यक्तीचे, दान प्रकारांचे आणि दान करणार्यांचे अनेक तर्हेच उल्लेख आढळून येतात. या लेण्यातील शिअलालेखांची भाषा बहुतांशी प्राकृत व संस्कृत आहे. ते ब्राम्ही व नागरी लिपीत कोरलेले आहेत. त्यामधून राजघरांणी, वंश , व्यक्ती, सामजिक चालीरीती, राजकीय स्पर्धा अशी विविध मनोरंजक माहीती मिळते. अशाप्रकारच्या लेण्यातील शिलालेख जुम्न्नर, नाशिक मधील पंडव लेण्यात, कुडा, कार्ले, बेडसे लेण्यात आढळतात. नाशिक मधील लेण्यात प्रामुख्याने देणगीदारांची नावे आहेत. नाणेघाटातील लेण्यात देखील सातवाहन नृपतीने देणगी दिल्याचा उल्लेख आलेला अहे. तर, कार्ले , कान्हेरी आणि कुडा लेण्यात केवळ शिलालेखच नाही तर देणगी देणार्या युगलांची मुर्ती देखील आहे.
|