Print Page | Close Window

Barringtonia acutangula. नेवर, तीव

Printed From: TreKshitiZ
Category: Nature
Forum Name: Flora and Fauna In Sahyadri
Forum Description: Information regarding medicinal herbs,details regarding flowers,useful trees can be shared in this forum
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=324
Printed Date: 30 Dec 2024 at 1:30am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Barringtonia acutangula. नेवर, तीव
Posted By: amitsamant
Subject: Barringtonia acutangula. नेवर, तीव
Date Posted: 15 Apr 2015 at 9:19pm
आज सकाळी एका मित्राने सांगितल की डोंबिवली वेस्टला एव्हरेस्ट सोसायटी मागे वेगळीच फुल फुलली आहेत. ऑफिसहुन येताना संध्याकाळी चक्कर मारली पण फुल फुलली नव्हती. रात्री फुलतात अस कळल. जेवल्यानंतर रात्री तिथे पोहोचलो तर फुलांचा वेगळाच उग्र गंध वातावरणात पसरलेला. झाड फुलांनी लगडलेल.मोबाइल कॅमे‍‍र्‍यात जमतील तितके फोटो काढुन घरी परतलो. "फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रीत" या पुस्तकात आणि flowers of India या साईटवर या फ़ुलाची माहिती मिळाली.

शास्त्रीय नाव :- Barringtonia acutangula.
मराठी नाव :- नेवर, तीवर, समुद्रफळ

Barringtonia acutangula. नेवर, तीवर, समुद्रफळ

नेवराच सदाहरीत झाड ८ ते १५ मीटर उंच वाढते. पान बघुन बदामाच्या पानांचा भास होतो, पण फ़ांद्याची ठेवण आणि पानांचा आकार वेगळा असतो. पान ६ ते १५ सेंटीमीटर लांब असतात. याच्या फ़ुलात पर्जन्यवृक्षाच्या फ़ुलाचा भास होत असला तरी हे फ़ुल बरेच मोठे असते. पानांमधुन लटकलेल्या लांब दांडयाला दोनही बाजूना एकाखाली एक फ़ुल लटकलेली असतात. फ़ुल संध्याकाळी फ़ुलायला सुरुवात होते आणि पहाटे ४ वाजल्यापासून फ़ुल झाडावरून गळुन पडायला सुरुवात होते. सकाळी झाडाखाली फ़ुलांचा खच पडलेला असतो. पाकळ्या पांढर्‍या असतात, पण पुंकेसराच्या पसार्‍यात लपुन बसलेल्या असतात. पुंकेसर जवळजवळ सहा सेमी लांबीचे, पांढर्‍या आणि गुलाबी अश्या दोन रंगाचे असतात. फ़ुलाला उग्र वास असतो. (केळफ़ुल सोलल्यावर येतो तसा वास) या वासामुळे रात्रीच्या अंधारातही किटक याकडे आक्र्षिले जातात. या झाडाला तशी वर्षभर फळे लागतात. फ़ळांचा आकार वरुन सपाट चौकोनी आणि खाली निमुळता होत फ़ेलेला. साधारणपणे शिवलिंगावरचे अभिषेकपात्र असते त्याचा भास होतो. डोंबिवलीतल्या नेवरच्या फुलावर बरेच किटक दिसले. वटवाघुळही झाडाभोवती घिरट्या घालत होते.

Barringtonia acutangula. नेवर, तीवर, समुद्रफळ

संस्कृतमधे या झाडाला "हिज्जा किंवा हिज्जाला " म्हणतात. तर मराठीत नेवर, तीवर, समुद्रफ़ळ, सातफ़ळ या नावाने हे झाड ओळखले जाते. इंग्रजीत Indian Oak, Indian Putata, Fresh water Mangrove म्हणतात. गोड्या पाण्याच्या सोबतीने वाढणारे हे झाड आहे. पण खार्‍या पाण्याच्या सोबतीनेही छान वाढते. याच्या लाकडाचा जळण म्हणुन तर उपयोग होतोच पण या झाडांपासून मासे पकडण्यासाठी एक प्रकारचे विषही तयार करतात. घरगुती औषधात याच्या फ़ळाचा वापर केला जातो. अलिकडेच या झाडाच्या सालीपासून वेदनाशामक औषधे तयार करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहे, पण ते संशोधन पुर्णत्वाला जाऊन प्रत्यक्षात ते औषध बाजारात उपलब्ध होण्यास काही कालावधी जावा लागेल.

हे झाड दुर्मिळ नसल तरी रात्री फुलत असल्याने क्वचित पाहायला मिळत.ज्याना हे झाड पाहायचे असेल त्यानी डोंबिवली (वेस्ट) ला दिनदयाळ रस्त्यावर असलेल्या एव्हरेस्ट सोसायटी आणि पारीजात सोसायटीच्या मधल्या गल्लीत जावे. एव्हरेस्टच्या गेटला लागुन झाड आहे.

Barringtonia acutangula. नेवर, तीवर, समुद्रफळ



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk