गावाचे नाव :- कुणकेश्वर जिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, देवगड.
कुणकेश्वर हे समुद्र किनार्याला लागून असलेले निवांत आणि सुंदर गाव आहे. या गावात इ.सनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचे प्राचीन शिवमंदिर बांधले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला. या मंदिरा संबंधी एक दंतकथा प्रचलित आहे. प्राचीनकाळी एक मुस्लिम व्यापारी कुणकेश्वराजवळच्या समुद्रात वादळात सापडला. त्यावेळी त्याला दुरवर एक दिवा दिसला. त्या दिव्याला पाहून त्याने प्रार्थना केली की, मी जर या संकटातून वाचलो तर त्याठिकाणी मंदिर बांधीन. थोड्याच वेळात वादळ शमल, किनार्यावर येऊन व्यापार्याने पाहीले तर त्याठिकाणी छोटे शंकराचे मंदिर होते. त्याने तिथे मोठे मंदिर बांधले. मुर्तीपुजा निषिध्द मानणार्या मुस्लिम धर्मातील लोक आपल्याला वाळीत टाकतील या भितीने त्या व्यापार्याने मंदिराच्या कळसावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याची कबर आजही मंदिराच्या बाजूला दाखवतात.
कुणकेश्वर मंदिर समुद्र किनार्यावर असल्यामुळे त्याची बांधणी उंच जोत्यावर करण्यात आली आहे. त्या जोत्याला बसणारे लाटांचे तडाखे सहन करण्यासाठी त्याची बाहेरच्या बाजूने पायर्या पायर्यां सारखी रचना करण्यात आली आहे. मंदिराची बांधणी द्राविडी पध्दतीची आहे. या बांधणीत मंदिराचा कळस बहुमजली व साधारणपणे चौकोनी आकाराचा असतो. कळ्सा खालील गाभार्यात देवताची मुर्ती किंवा शिवलिंग असते. कळसाच्या पुढच्या बाजूस मंडप असतो. कुणकेश्वर मंदिराच्या परीसरात ६ दिपमाळा आहेत. मंदिराच्या परीसरात गणपती, जोगेश्वरी, भैरव, मंडलिक, नारायण या देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या उत्तरेस छोटा तलाव आहे.
जाण्यासाठी :- १) मालवण कुणकेश्वर अंतर ३९ किमी आहे. २) मुंबई - गोवा महामार्गावरील नांदगावातून देवगडला जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर कुणकेश्वरला जाणारा फाटा आहे.(मुंबई - कुणकेश्वर ४४८ किमी)
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण २) देवगड किल्ला, देवगड ३) विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra kunkeshwar Mandir , Village :- kunkeshwar, Dist :- Sindhudurg, Nearest city :- Malvan, Devgad, Vijaydurg.
|