नवीन वेळापत्रक जेव्हा जाहीर झालं तेव्हाच लिडर कडे नाव दिले होते, अशा ट्रेक पैकी एक म्हणजे राजगड ते तोरणा. पण काहीतरी अडचण असतेच. याच तारखांच्या दरम्यान संघाचे शिबीर होते. त्या शिबिराची व्यवस्था आमच्या शाखेकडे होती. आठ तारखेला रात्री खेड शिवापुरला जाऊन व्यवस्थेत सहभाग देऊन आलो, आणि ९, १०, ११ डिसेंबरला ट्रेकला जायचं पक्कं केलं. त्यातपण मी आणि ओंकारने अर्धा दिवस सुट्टी काढून ९ ला रात्री राजगडला जायचा ठरवलं. त्यातच सुट्ट्यांचा प्रोब्लेम. आमचा सगळा ग्रुप आधीच राजगडावर दाखल झाला होता. मी आणि ओंकार ९ तारखेस सहा वाजण्याच्या सुमारास माझ्या लाडक्या शाईन वरून निघालो गुंजवण्याकडे. सर्कस करतच निघालो. समोर खांद्यावर माझी सॅक, मागे ओंकार आणि त्याची सॅक आणि मधे मी आणि (मी फूड टीम मध्ये असल्याने) मॅगी, दुध पावडर, चहा हे साहित्य भरलेली पिशवी. मजा येणार होती. ओंकारने स्वारगेटला आल्या आल्या प्रश्न केला, “हेल्मेट?” मी मानेनेच नाही असे सांगितले. या मुद्द्यावरून मला ट्रेकभर ओंकार, विराज आणि गायत्रीचे बोलणे ऐकावे लागले.<-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p> गुगल मॅप पाहत, पेट्रोल भरत, थंडीपासून स्वतःला वाचवत, शेवटच्या एस्. टी. मागे, तिची टायर धूळ शरीरभर झेलत, आठ वाजण्याच्या सुमारास गुंजावण्यात रसाळ यांच्याकडे पोचलो. रात्रीचे जेवण त्यांच्याकडूनच घेणार होतो असे समजले, त्यामुळे ते वाहून नेणारे काका बराच वेळ आमच्यासाठी थांबले होते. आम्ही चहाचे दोन घोट पोटात ढकलतच त्यांच्या मागे चढायला सुरुवात केली. चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात, पोवाडे ऐकत दीड तासातच राजगड आम्ही चोर दरवाज्याने सर केला. शर्ट, थंडीचे जर्कीन घामेजले होते. ओंकारला थोडा पाठीचा त्रास जाणवत होता. चोर दरवाज्यात आल्यावर समोर चंद्रप्रकाशात डौलाने फडकणाऱ्या भगव्याकडे पाहिल्यावर सगळा शिणवटा दूर झाला.
पद्मावती टाकं
पद्मावती माचीवर, सईबाई राणीसाहेबांच्या समाधीसमोरच मंदिरात आमचा तळ पडला होता. सर्वजण भुकेलेले होते, शेकोटी घेत होते. भेटाभेटी झाल्यावर सर्वानी भाकरी, उसळ, भात, वरण, ठेचा सोबत पेठे स्पेशल शेंगा चटणीवर आक्रमण करून उदाराग्नी शांत केला. जेवण झाल्यावर मस्तपैकी जागा शोधून जेव्हा त्या पद्मावती मातेसमोर देह टेकवला तेव्हा जगातील सर्व सुखं मिळाल्याचा प्रत्यय आला. <-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p> या ट्रेकचा म्होरक्या सन्माननीय विराजशेठ टिल्लू यांच्या हकारण्याने ५.३० वाजताच जाग आली. प्रातःविधी उरकल्यावर चहाची गडबड चालू झाली. मंदिरात आमच्यासोबत अजून एक ग्रूप होता. तसेच गडावर डागडुजी करणारे गडी पण होते. उमेश, गायत्री यांनी रामदेव बाबांची चहा पावडर वापरून बक्कळ चहा केला. आमचा नवीन सदस्य ‘छोटा विराज’ याच्या कृपेमुळे लाकडांची टंचाई जाणवली नाही. मनसोक्त चहा घेऊन पाणपिशव्या भरून नाष्ट्याची वाट बघत होतो. परंतु तो तोरण्याच्या वाटेतच करणार आहोत असे समजले. मग सोबत दुपारची शिदोरी, नाष्टा घेऊन संजीवनी माचीवरून तोरण्याकडे प्रस्थान केले.
संजीवनी माची
माची अलीकडूनच ‘व्याघ्र मुखाच्या’ बाजूने माचीला वळसा घालून त्या सलग पसरलेल्या टेकड्यांवर उतरलो. समोर आपण कोणत्या वाटेने जाणार आहोत हे स्पष्ट दिसत होते. तोरण्याची बुधला माची खुणावत होती. हळूहळू राजगड उतरण्यास सुरुवात केली. टप्पा काहीजणांना जरा कठीण जात होता. दगड, घसरडी वाट, त्यात वाढत जाणारे ऊन होतेच. दहा वाजण्याच्या सुमारास उपीटावर भूक भागवून लगेच पुढील प्रवास चालू ठेवला. मधेच जंगल, मधेच उघडीबोडकी टेकडी असा रमतगमत रस्ता होता. पण तोरण्याच्या अलीकडील चढणीने सगळ्यांचा दम काढला. आमच्यातील काहीजण वाटाड्या मामांसोबत, मेंगाई देवीच्या मंदिरात रात्री झोपण्यासाठी जागा मिळावी म्हणून धडपडत पुढे गेले. त्यात उमेश आघाडीवर होता.
राजगड ते तोरणा या सोंडेवरून
मागे आम्हाला उन्हाचा कडाका जाणवत होता. त्यातच विराजच्या पायाला गोळे येण्यास सुरुवात झाली. याचा अनुभव मी याआधी हरिश्चंद्रगडावर घेतला होता. दमवणाऱ्या वातावरणामुळे मी, ओंकार, गायत्री, पुष्कर, विराज आणि प्रथमेश जरा उशीराच बालेकिल्ल्यावर पोहोचलो. पण वर आल्यावर कानद नदीवरील धरणामुळे हवेतील गारवा सुसह्य करत होता.<-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p> मेंगाई देवीच्या मंदिरात सगळ्यांनी जागा पकडल्या. आम्ही मागचे येईपर्यंत कोणीही जेवायला बसले नव्हते. चार वाजायच्या सुमारास आम्ही शिदोरी सोडली. भारती, अक्षता, विराजने बॅग मधून पिठलं बाहेर काढलं. भाकरी, कांदा, चटणी आणि रसरशीत लोणचं. काय शांत वाटत होतं. पुष्करने कांदा, लोणचं आणि पिठलं ही नवीन डीश शोधून काढली. जेवण झाल्यावर सर्वांना जरा मोकळीक मिळाली. काहीजण सूर्यास्त पाहायला गेले, काही मंदिराच्या आवारात पहुडले.<-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p> संध्याकाळची लाकूडफाटा, पाण्याची व्यवस्था पाहून आलो. पाणी खूप छान होते. सहाच्या सुमारास फक्कड चहा झाला. सगळी बिस्किटे बाहेर आली. त्यानंतर लगेच खिचडी अन् सूपची तयारी सुरु झाली. सगळेजण गरमागरम शेकोटीशेजारी कोंडाळं करून बसले होते. दोन- तीनदा सूप चा राउंड झाल्यावर अगदी योग्य प्रमाणात शिजलेल्या खिचडीकडे मोर्चा वळला. सोबत पापड लोणचं होतंच. पोटभरून खिचडी खावूनसुद्धा शिल्लक राहिलीच. <-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p> आता वेळ होती तोरण्यावरील खास भूतांच्या गोष्टींची. पण यातील मुख्य पात्र गायत्री, तिने ऐनवेळी माघार घेतली. दिवसभर उन्हातील पायपीट, स्वयपाक यामुळे जरा दमली होती. आनंद, अमोलदादा, मनोज, पुष्कर, भारती यांच्या अनुभव, ऐकीव भूत कथाकाथानाने रात्र रंगवली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लिडरने उठावयास सांगितले परंतु सगळे अनुभव ऐकल्याने कोणीही एकटा कुठेही जात नव्हता. शेकोटीपासून दूर गेल्यावर थंडी जीव काढत होती. विस्तव पूर्णपणे शांत करून मी आणि प्रथमेश मंदिरात गेलो. कुठेतरी जागा अॅडजस्ट करून स्लीपिंग बॅग मध्ये शिरलो, ते रात्री काही आवाज आल्यास शेजारच्याला जागं करण्याच्या बोलीवरच.<-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p> सूर्योदय पाहण्यासाठी सगळे लवकर उठले. आवरून चहा घेऊन झुंजारमाचीकडे निघालो. जबरदस्त किल्ल्यावरील तितकीच सुंदर माची. थोडासा कठीण टप्पा पण सकाळी लवकर गेल्यामुळे रविवारच्या जत्रेआधी आम्ही माची पाहून आलो. एकीकडे वेळवंडी तर दुसरीकडे कानद नदीचे खोरे. सुंदर आणि अप्रतिम. खाऊन, भांडी धुवून झाल्यावर सगळ्यांनी सॅक पॅक करून घेतल्या. तोरण्यावर आदित्य गोखले, ट्रेक क्षितीज सोबतच ट्रेक करणारे डॉ. विनोद यांची गाठ पडली. मेंगाई देवीच्या मंदिरासमोर ग्रूपफोटो घेऊन वेल्हाच्या दिशेने उतरण्यास सुरुवात केली.
झुंजार माची
वाट तशी कठीणच, डोक्यावर सूर्य नारायण, रविवारची गर्दी हे अडथळे पार करूनही दोन तासात वेल्ह्यात पोहोचलो. वाटेत चरतच आल्यामुळे भूक अशी नव्हतीच. पण रात्री पोहोचण्यास होणारा उशीर लक्षात घेता सगळ्यांनी दोन दोन घास पोटात ढकलले. जेवण झाल्यावर न मिळालेल्या आईस्क्रीमसह मला आणि प्रथमेशला गुंजवण्यात सोडून डोंबिवलीकर वेगाने एक्सप्रेस वे कडे मार्गस्थ झाले. जेव्हा दोन तीन दिवसाचा ट्रेक असतो तेव्हा नवीन मैत्री खूप छान होते, जुनी नाती नव्याने विणली जातात. आनंद, मनोज, पुष्कर असे नवीन पण आधीच भेटले असावेत असे सवंगडी, बऱ्याच दिवसांनी भेटलेले चंदू आडे, नेहमीचेच रुळलेले विराज, भारती, अक्षता (अकाउंटंट), गायत्री, ओंकार, अमोलदादा, द्रूमन (प्रद्युम्न) सगळ्यांनी धमाल आणली. नवा नवखा छोटा विराज यातूनही खूप काही शिकला.<-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p> मला हेल्मेटमुळे साताऱ्याला न जाऊ देणारे असे कुटुंबीय क्वचितच कुणाला मिळत असतील.<-blogger-escaped-o:p>-blogger-escaped-o:p>
असेच भेटत रहा ट्रेक करत रहा, इतिहास आणि निसर्ग जपत राहा.
------------- "भटका श्रेयस"
|